‘लोकरंग’ (८ डिसेंबर) मधील पुरस्कार संस्कृतीचा रोखठोक पंचनामा करणारे रवींद्र पाथरे आणि राम जगताप यांचे लेख वाचले. ‘सेलिब्रेशन संस्कृती’चाच हाही एक आविष्कार आहे. त्यात फिक्सिंगलाही खूपच वाव आहे. काही वेळा तर पुरस्कार विकतही घेतले जातात. स्वत:च्या वाटय़ाचे कामही जे धडपणे करीत नाहीत, अशा व्यक्तींना जेव्हा ‘उत्तम सेवा पुरस्कार’ मिळतो तेव्हा आश्चर्य वाटते. यानिमित्ताने ११ जानेवारी १९८८ आणि २६ जानेवारी १९८८ च्या ‘लोकसत्ता’मधील प्रा. डॉ. पाटील व भा. गो. बिवलकर यांच्या ‘स्पर्धाची विश्वासार्हता’ या विषयावरील पत्रांची आठवण झाली. गुणवत्ता असूनही पुरस्कार न लाभलेल्या, प्रसिद्धीपराङ्मुख कलावंत-लेखक, किंवा पुरस्कार मिळूनही तो नाकारलेल्यांचाही एकदा अवश्य लेखाजोखा घ्यायला हवा.
– विनय खरे, मुलुंड.
उदारीकरणाचे उत्तम विश्लेषण
‘लोकरंग’(२९ डिसेंबर) पुरवणीतील ‘तीन धडे, तीन प्रवाह’ या शीर्षकाचा अभय टिळक यांनी शब्दांकन केलेला किशोर चौकर यांचा लेख म्हणजे आर्थिक उदारीकरणाविषयीचे उत्तम विश्लेषण आहे. लेखात व्यक्त केलेल्या शासनाविषयीच्या अपेक्षा आपल्या संघराज्य रचनेत कितपत पूर्ण झाल्या, हा अभ्यासाचा विषय आहे. भारताला वैश्विक आर्थिक रचनेत जोडून घेताना सतत बदलत जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाला भारतातील वास्तववादावर आधारीत समाजव्यवस्थेसाठी योग्य (अॅप्रोप्रिएट) बनवणे आवश्यक ठरावे. भारताच्या १९८०-९१ पासूनच्या गरजांमध्ये शेती, शेतीधिष्ठित उद्योग, गृहोद्योग, लघु/ मध्यम उद्योग यांची पुनर्रचना, पायाभूत सुविधांची (पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, बंदर-विकास इत्यादी) उपलब्धी व मुबलकता, अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच आरोग्य व शिक्षण या गोष्टी विश्वमानांकनासमान (ग्लोबल स्टॅन्डर्ड) अपेक्षित आहेत. याकरता लागणारा निधी केंद्र व राज्य शासन, कॉर्पोरेट क्षेत्र, धार्मिक न्यास यांनी वेगळा, कायमस्वरूपी उभारला पाहिजे. एकपक्षीय राज्यव्यवस्था असलेला चीनसारखा देश वाढत्या लोकसंख्येसाठी आर्थिक पुनर्रचना करून अमेरिकेसारख्या बलाढय़ राष्ट्राला शह देऊ शकतो, तर भारतासारख्या लोकशाही व्यवस्थेला स्पर्धायोग्य करण्याकरिता धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी तत्परतेने व काटेकोर पद्धतीने करता आली पाहिजे. त्यासाठी सर्वपक्षीय सामंजस्याची गरज आहे. ‘आर्थिक उदारीकरण : शाप की वरदान’ या वादात न पडता नवनवीन संधींचा उपयोग देशांतर्गत उत्पन्नवाढीसाठी व त्याचे समन्यायी वाटप करून रोजगारनिर्मिती कशी होईल, हे आपल्या नेतृत्वाने पाहण्याची गरज आहे. वाढलेली क्रयशक्ती चंगळवादास आमंत्रण देते, त्याचबरोबर भविष्यकाळातील कुटुंबांचे शाश्वत समाधान निश्चित केले जावे; अशा रीतीने अर्थकारण समाजधारणेशी निगडित ठेवता येईल.
– श्रीकृष्ण फडणीस, दादर, मुंबई.
सर्वासाठी बालमैफल!
‘लोकरंग’मधील ‘बालमैफल’ हे पान मी जरी आजोबा असलो तरी आवडीने वाचतो. म्हणतात ना, म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण! ज्योत्स्ना सुतवणी यांनी नवनवीन तयार केलेली कोडी (डोकॅलिटी) सोडवताना आम्हालासुद्धा डोकं खाजवावं लागतं. त्यानिमित्ताने लहानपणी केलेल्या अभ्यासाची, वाचनाची उजळणी होते. ‘शब्दाचे खेळ’ म्हणजे काय, ते कळते.
‘बालमैफल’मधील इसापनीती, बिरबल बादशहासारख्या जुन्या गोष्टी सोडून उद्बोधक सामान्यज्ञान, व्यवहारज्ञान वाढविणाऱ्या नित्यनवीन गोष्टी वाचनीय असतात. उदा. ‘ग्रहणाची गंमत’ ही गोष्ट फारच छान होती. मध्यंतरी जुन्या म्हणी कशा तयार झाल्या, या विषयाला धरून लिहिलेल्या गोष्टीपण वाचनीय व माहितीत भर घालणाऱ्या होत्या.
घरात माझी नातवंडे इंग्रजी माध्यमात शिकत आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळेत मुद्दाम या गोष्टी त्यांना वाचून दाखवतो. तसेच ‘डोकॅलिटी’तली कोडी एकत्र सोडवण्याचा प्रयत्न करतो; जेणेकरून त्यांना हळूहळू मराठी भाषेची गोडी निर्माण होईल. काही काही मराठी शब्दांचा अर्थ किंवा त्याला समांतर इंग्रजी शब्द या बच्चेकंपनीला सांगताना आमचीही कधी कधी तारांबळ उडते.
श्रीनिवास स. डोंगरे, मुंबई.