‘लोकरंग’मधील (५ जानेवारी) ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरात गिरीश कुबेर यांनी लिहिलेला ‘अजंठ्याची पुसटरेषा…’ हा इंदिरा संत यांच्या विषयीचा नितांत सुंदर लेख वाचला; आणि कवितांमधून भेटणाऱ्या ‘इंदिरा संत’ पुन्हा नव्याने थोड्या जास्त कळल्या. ‘औक्षण’ , ‘शैला’, ‘बाभळी’ या आणि अशा कित्येक कवितांना शब्दांचं लेणं चढवून बाईंनी आशयसमृद्ध कविता लिहिल्या- ज्या आजतागायत काव्यरसिकांच्या काळजात घर करून आहेत. निसर्गाची किमया आपल्या शब्दांच्या जादूने सहजसुंदररीत्या बांधून ठेवण्याची नजाकत बाईंकडे होती. त्यांच्या स्नुषा डॉ. सुप्रिया दीक्षित यांचे ‘अमलताश’ हे पुस्तकही वाचनीय आहे. त्यातही बऱ्यापैकी इंदिराबाईंचा उल्लेख आहे. व्यक्ती किती ‘मोठी’ आहे याचा मापदंड हे केवळ त्याच्या कार्यकर्तृत्वाने होत नाही, तर त्याचे अंतरंग किती मोठे आहे या निकषाने तो मोठा ठरत असतो. साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी केल्या जाणाऱ्या कुरघोड्या, त्याकरिता खेळलं जाणारं गलिच्छ राजकारण… पण या सर्वांवर स्वत:च्या सद्सद्विवेक बुद्धीला प्रमाण मानून ‘स्व’ चे अस्तित्व शाबूत ठेवणाऱ्या इंदिराबाई खरोखरीच श्रेष्ठ. अॅड. सायली नार्वेकर, विरार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा