काँग्रेसविरोधाचे राजकारण समयोचित होते का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकरंग’मधील (३ फेब्रुवारी) ‘जॉर्ज..’ हा जॉर्ज फर्नाडिस यांच्यावरील अरुण नाईक यांचा लेख चांगला आणि माहितीपूर्ण आहे. अनेक वर्षे लेबर युनियन चालवणाऱ्या जॉर्ज यांनी सत्तेत गेल्यावर तितक्याच समर्थपणे विविध खाती सांभाळून आपली पात्रता, बुद्धिमत्ता आणि अविरत श्रम करण्याची शारीरिक क्षमता वारंवार सिद्ध केली. संरक्षण मंत्री झाल्यावर मुंबईत के. सी. महाविद्यालयात झालेल्या सभेत त्यांनी ‘पाकिस्तानपेक्षा चीनपासून जास्त धोका आहे’ अशा आशयाचे विधान केले होते. त्यावरून बरीच टीकाही झाली होती. आज मागे वळून पाहता त्यातील दूरदर्शीपणा जाणवतो.

काश्मीर दौऱ्यानंतर काश्मीरबद्दल स्वतंत्र खाते करून त्याचे मंत्रिपद जॉर्ज यांना द्यावे, ही राजीव गांधी यांच्यासारख्या विरोधी पक्षनेत्याने केलेली सूचना हे त्यावेळच्या उमद्या राजनीतीची, तसेच जॉर्ज यांच्या क्षमतांची पावतीच आहे. या उमदेपणास जितके अटलजी जबाबदार होते, तितकेच राजीव गांधीही!

एक प्रश्न मात्र नेहमी उभा राहतो. १९६० च्या दशकात सुरू झालेले डॉ. लोहियांचे आत्यंतिक काँग्रेसविरोधाचे राजकारण १९८०-९० च्या दशकात तितकेच गरजेचे अथवा समयोचित होते का? त्या राजकारणाच्या सततच्या पाठपुराव्याने भारतातील एकूणच राजकीय घडामोडींवर काय प्रभाव पडला? असो.

– आल्हाद (चंदू) धनेश्वर

नोकरीची आशा हाच ‘धंदा’!

‘आशा नाम मनुष्याणां..’ हा लेख वाचला. हमखास नोकरी आणि उज्ज्वल भवितव्य देऊ  शकेल अशा एखाद्या गोष्टीचा फुगा हवा भरून प्रमाणाबाहेर मोठा करायचा, विद्यार्थ्यांना त्यामागे आशेने धावायला उद्युक्त करायचे, त्या फुग्यामागे धावायचे कसे याचे मार्गदर्शन करण्याचे पैसे घ्यायचे आणि कालांतराने तो फुगा फुटला वा त्यातील हवा कमी झाली की दुसरा फुगा फुगवायचा- अशी ही ‘मोडस ऑपरेंडी’ आहे. कोटा शहरातील आयआयटी प्रवेश परीक्षांचे क्लासेस, वीसेक वर्षांपूर्वी गल्लोगल्ली निघालेले संगणक प्रशिक्षणाचे क्लासेस, त्याच सुमारास कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवलेली खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये, कुठल्या तरी परदेशातल्या कॉलेजमध्ये जाऊन व्यवस्थापनशास्त्रातली पदवी / पदविका (एमबीए) मिळवणे वा त्याची तयारी करवून घेणे, आणि आता लेखात म्हटल्याप्रमाणे, एमपीएससीच्या तयारीचे क्लासेस.. ही सगळी त्याचीच उदाहरणे! मनोरंजन क्षेत्रात हमखास संधी मिळेल या आशेवर पोसले गेलेले आवाजाची कार्यशाळा, अभिनयाची कार्यशाळा इत्यादी प्रकार आणि अनेक ‘रिअ‍ॅलिटी शोज्’ हीसुद्धा त्याचीच रूपे आहेत. या साऱ्यांत गरीब / मध्यमवर्गीय पालक कर्जबाजारी होतात आणि त्याच वेळी उच्च मध्यमवर्गीय / श्रीमंत पालकांच्या खिशालाही चांगलीच फोडणी बसते. ज्यांच्या हाती नुकताच बऱ्यापैकी पैसा खुळखुळू लागला आहे, असे गेल्या २०-२५ वर्षांतील जागतिकीकरणाचे लाभार्थी ठरलेले पालक आणि त्यांचे पाल्य हे तर इथे हमखास ‘गिऱ्हाईक’ बनतात.

उत्तम नोकरीची आशा निर्माण करणे हाच अनेकांचा एक उत्तम (गोरख)धंदा झालेला आहे. मेंढरासारखे एकामागे एक न जात राहता आपल्या डोक्याने सारासार विचार करण्याची वेळ आलेली आहे असे वाटते.

– प्रसाद दीक्षित, ठाणे</p>