‘मध्यमवर्ग, कॉर्पोरेट्स अन् कॉन्सन्ट्रेशन कॅम्प’ लेख उत्तम आहे. परंतु लेखकाने भारतीय सद्य:राजकीय परिस्थितीचा जर्मनीच्या हिटलरशी संबंध जोडण्यात थोडीशी घाई केली आहे असे वाटते. भारतीय लोकशाही भक्कम आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या शक्तींना येथे थारा मिळणे शक्य नाही. तरीही लेखकाने या लेखातून एक वेगळाच दृष्टिकोन दिल्याबद्दल त्यांचे आभार.

असंगत मांडणी
‘मध्यमवर्ग, कॉर्पोरेट्स अन् कॉन्सन्ट्रेशन कॅम्प’ या लेखातून लेखकाने हिटलरचा दाखला देत भारतात येऊ घातलेल्या संभाव्य हुकूमशाहीबद्दल वाचकांना घाबरवून सोडण्याचा प्रयत्न केला आहे. लेखकाने मांडलेले मुद्दे हे असंगत असून वाचकांची दिशाभूल करणारे आहेत. मला वाटते की, लेखकाचा भारतीय लोकशाहीवर विश्वास नाही, किंवा वेड पांघरून पेडगावला जाण्याचाच हा प्रकार असावा. लेखाची सुरुवात खूपच छान आहे, परंतु त्याचा भारताशी जोडलेला संबंध गैरलागू वाटला. भारतीय लोकशाहीवर विश्वास ठेवा, हेच  त्यांना सांगावेसे वाटते.
राजेंद्र कोळेकर

ये गलत है की वक्त गुजर जाता है!
‘लोकरंग’ (२० एप्रिल) पुरवणीतील गुलजार यांच्यावरील ‘सिर्फ एहसास है’ हा लेख वाचला. गुलजार यांनी शब्द आणि भावना या दोन्हीवर अपत्यवत प्रेम केले. त्यांचे निगुतीने संगोपन केले. त्यांना अतिशय हळुवारपणे गोंजारून त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘पाल-पोस के बडा किया’ आणि त्यातून एक सुंदर चित्र निर्माण केलं. त्यांनी ‘बंदिनी’ ते ‘बंटी और बबली’पर्यंतचा अनेक पिढय़ा ओलांडणारा आणि प्रेक्षकांच्या बदलत्या अभिरुचीला सामावून घेणारा प्रवास अतिशय सुंदररीतीने केला. शब्दांचा अतिशय सुंदर उपयोग करत कमीत कमी शब्दांत खूप काही व्यक्त केले. ‘चांद’ अर्थात चंद्र, नर्म धूप, धुंद, पौंधे हे त्यांचे आवडीचे विषय. त्यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अनेक वयोगटांतल्या आणि अनेकविध विचारांच्या रसिकांशी संवाद साधला.    
‘अबके न सावन बरसे, अबके बरस तो बरसेगी अखियां’ किंवा ‘जो गुजर रही उस पे गुजर करते है’मध्ये ‘बरस’ आणि ‘गुजर’ या शब्दांचा किती समर्पक आणि कल्पक उपयोग त्यांनी केला आहे! जो शब्दांच्या पलीकडले बरेच काही सांगतो. ‘तेरी कमर के बल पे नदी मुडा करती थी, हंसी तेरी सून-सून के फसल पका करती थी..’ यातून त्यांचे मातीशी किती घट्ट नाते आहे ते सिद्ध होते.
प्रवास बरेच काही शिकवतो, प्रवास करीत राहा. गंतव्यापेक्षा प्रवास महत्त्वाचा! विचाराशी त्यांची असलेली प्रामाणिक बांधीलकी ‘मूड के हमने कोई मंझील देखी ही नहीं’ किंवा ‘पा के भी तुम्हारी आरजू हो..’ या ओळींतून किती सुंदर व्यक्त होते! पंचमबरोबरच्या आगळ्यावेगळ्या मैत्रीला जवळिकीपलीकडे नेणारी भावना त्यांनी ‘मेरा सगा दोस्त’ असे संबोधून दिली. ‘आंखो कि आवाज’, ‘आवाज का रंग’, ‘रंग कि खुशबू’ अशा अनेक आगळ्यावेगळ्या रम्य कल्पनांतून आपल्या सर्वाना एका स्वप्नवत विश्वात त्यांनी नेले. त्याचबरोबर ‘दिन खाली खाली बर्तन है और रात है जैसे अंधा कुंआ, इन सुनी अंधेरी आंखो में आंसू के जगह आता ही धुआ..’तून वास्तवाशी संवाद केला. ‘दिल ढुंडता है, फिर वोही, फुरसत के रात दिन..’ या गीतातून काही निवांत निसर्गासोबतचे क्षण त्यांनी आपल्या डोळ्यांसमोर उभे केले.       
आणि शेवटी गुलजार यांचा एक भन्नाट विचार- जो आपल्याला अक्षरश: झपाटून टाकतो : ‘ये गलत है की वक्त गुजर जाता है! वक्त कभी नहीं गुजरता, वक्त इटरनल है, परमनंट है! जो गुजर जाते है, वो हम और आप..’ या ओळीतून जणू काही त्यांनी प्रख्यात शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला विज्ञानापलीकडे जाऊन मानवी जीवनाशी जोडणारी परिपूर्णता दिली.    
हर्षवर्धन दातार, ठाणे</strong>

‘श्रीमंत’ नव्हे, ‘मी जिंकलो, मी हरलो’!
‘अमका’ या ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या आत्मकथनावरील परीक्षणात माझ्याकडून अनवधानाने एक चूक झालेली आहे. आचार्य अत्रे यांनी विजय तेंडुलकरांच्या ‘श्रीमंत’ या नाटकाच्या रौप्यमहोत्सवी प्रयोगावर नव्हे, तर ‘मी जिंकलो, मी हरलो’ या नाटकाच्या प्रयोगावर अग्रलेख लिहिला होता. चुकीबद्दल क्षमस्व.
कमलाकर नाडकर्णी

Story img Loader