डॉक्टररुग्ण नात्यात विश्वास हवा!

हे दोन्हीही लेख आपल्या वैद्याकीय क्षेत्राचे बिघडलेले आरोग्य अधोरेखित करतात. वैद्याकीय क्षेत्रातील काही मोजक्या लोकांमुळे याला आज जरी व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले असले, तरी अनेक अर्थाने हा व्यवसाय इतर व्यवसायांपेक्षा वेगळा आहे. यात ज्ञानप्राप्तीबरोबरच डॉक्टरांना कर्तव्य निभावताना आपले कसबही पणाला लावावे लागते. काही प्रसंगांत तर अनपेक्षित गुंतागुंत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्याचा कोणताही दोष नसताना रुग्ण आजारातून बरा न झाल्यास अथवा दगावल्यास नातेवाईक डॉक्टरवर राग काढतात. यापूर्वीही अशा घटना होतच होत्या, मात्र त्यावेळी रुग्णाचे नातेवाईक नकारात्मक निकाल दुर्दैवी किंवा कम नशिबी म्हणून स्वीकारत असत. मात्र गेल्या काही वर्षांत या परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे समाजमाध्यमाच्या माध्यमातून मिळणाऱ्या अर्धवट ज्ञानातून अर्धवट ज्ञानी झालेले नागरिक नकारात्मक गोष्टींचे खापर संपूर्णत: डॉक्टरांच्या माथी मारून मोकळे होतात आणि हिंसाचाराचा मार्ग अवलंबतात. वैद्याकीय उपचारांनाही काही मर्यादा असतात याचे साधे भानही या नागरिकांना नसते.

एकंदरीतच राज्यासह संपूर्ण देशपातळीवर डॉक्टरांवर होत असलेले हल्ले आणि त्यातून होणारा हिंसाचार आणि त्याला रोखण्यात सरकारला आलेले अपयश हा आपल्या देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा पराभव आहे असेच वाटते. वास्तविक विचार केला तर जनतेच्या आरोग्याची जबाबदारी ही शासन आणि प्रशासनाची असते. आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी अथवा वैद्याकीय सुविधांच्या अभावास केवळ सरकारच जबाबदार असते. मात्र या अनियमिततेला केवळ डॉक्टरांना जबाबदार धरून त्यांच्यावर हल्ले केले जातात. एकंदरीतच आपल्या देशाच्या आरोग्य व्यवस्थेचे स्वास्थ्य सुधारायचे असेल तर काही बाबींचा निर्णय युद्ध पातळीवर होणे गरजेचे आहे. वैद्याकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारा कायदा २३ राज्यांत मंजूर झाला असला तरी केंद्र शासनाने देशव्यापी असा कायदा मंजूर करून त्याची कडक अंमलबजावणी करायला हवी. त्याचबरोबर रुग्णांच्या तक्रारींचीही प्रभावीपणे दखल, रुग्णांच्या स्थितीबद्दल वेळोवेळी आणि अचूक माहिती नातेवाईकांना देणे, रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांशी सहानुभूतिपूर्वक वागणे, वैद्याकीय क्षेत्रातील स्वयंसेवी तथा शासकीय संस्थांनी आरोग्याचा लोकजागर करणे, समग्र नागरिकांना आरोग्य शिक्षण देणे यांसारख्या काही तात्कालिक व दीर्घकालीन उपाययोजना करायला हव्यात. डॉक्टरांकडून उपचारांदरम्यान होणाऱ्या चुका अथवा हलगर्जीपणा यासाठी डॉक्टरांना जबाबदार धरण्यासाठी अन्य कायद्यांचे मार्ग अवलंबिणे दोन्ही बाजूंसांठी हिताचे आहे. केवळ डॉक्टरांना जबाबदार धरण्यासाठी केला जाणारा हिंसाचार कोणत्याही कारणासाठी क्षम्य असता कामा नये. अगदी अर्वाचीन काळापासून डॉक्टर व रुग्ण या चालत आलेल्या नात्यात आज अधिक विश्वास दृढ व्हायला हवा.

decline of the y chromosome human males likely to disappear from earth
निमित्त : पुरुष नामशेष होणार आहेत!
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
female doctors safety in hospitals lokrang
डॉक्टरांना कोण वाचवणार?
docudrama Mai, documentaries, documentary,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आकाशपाळण्यातील धाडस..
doctor, doctor work life, doctor security,
एक दिवस धकाधकीचा…
narayan dharap horror books
भयकथांचा भगीरथ…
Loksatta editorial on Gau rakshak killed Brahmin boy Aryan Mishra in Faridabad
अग्रलेख: वाद आणि दहशत
loksatta editorial on tax on medical insurance premium issued in gst council meeting
अग्रलेख: आणखी एक माघार…?

डॉ. बी. बी. घुगे, बीड.

हेही वाचा – एक दिवस धकाधकीचा…

डॉक्टर व परिचारिकांना संरक्षण हवेच

डॉ. अरुण गद्रे यांचा लेख शासनाच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. सरकारी हॉस्पिटलमधील भ्रष्टाचार, अनास्था, आवश्यक उपकरणांची कमतरता यांवर प्रकाशझोत टाकला आहे. सामान्यजन कायम यात होरपळत असतात, तसेच डॉक्टरांनाही काहीच सुविधा नसतात. महिला डॉक्टरांची अवस्था तर त्याहून वाईट. डॉक्टर व नर्स यांच्या संरक्षणाचे तर नावच नसते. सरकारी हॉस्पिटल्सचा सर्वांगीण विकास होणे व डॉक्टर व परिचारिकांना पूर्ण संरक्षण मिळणे हीच आजच्या काळाची गरज आहे.

प्रदीप करमरकर, नौपाडा, ठाणे.

व्यवस्थेला गरजेप्रमाणे बदल घडवायला भाग पाडा

हे दोन्ही लेख वाचले आणि चाळीस वर्षांच्या वैद्याकीय आयुष्यात जे पाहिले, अनुभवले त्याची आठवण देणारी ही वास्तव मांडणी- सगळीकडून प्रचंड अपेक्षांचं ओझं वाहून मनाने विकल झालेला डॉक्टर सतत आपल्यासमोर वाकला पाहिजे, झुकला पाहिजे, राबला पाहिजे अशी समाजाची अपेक्षा, नव्हे जरबच. कलकत्ता प्रकरणाच्या निषेध सभेत एक डॉक्टर भगिनी त्वेषाने म्हणाली, ‘बंदुकीचे, कोयता बाळगायचे लायसन्स मिळायला पाहिजे.’ हे बोलताना त्यांचा हतबल चेहरा बघवत नव्हता. डॉक्टरांकडून अवास्तव अपेक्षा करू नका. सामुदायिक उत्तरदायित्व ओळखून व्यवस्थेला गरजेप्रमाणे बदल घडवायला भाग पाडा. नाहीतर एक दिवस असा येईल की, रुग्णालयात जाण्याचीही प्रत्येकाला भीती वाटेल- उपचार करण्याची आणि उपचार घेण्याचीसुद्धा!

डॉ. श्रीकांत कामतकर, सोलापूर.

राजकारणी घटनेचे भांडवल करण्यात पुढे

डॉ. अरुण गद्रे यांनी मांडलेल्या मुद्द्द्यांप्रमाणे आपल्या देशात समस्यांच्या मुळाशी न जाता झालेल्या दुर्घटनेचे भांडवल करण्याची स्पर्धा असते. त्यास सत्ताधारी व विरोधी पक्ष दोघेही जबाबदार आहेत. आपले ठेवावे झाकून, दुसऱ्याचे पाहावे वाकून, या उक्तीप्रमाणे प्रत्येक पक्ष भूमिका घेत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेप्रमाणे राष्ट्रीय सकल उत्पादनाच्या ५ रक्कम आरोग्य व्यवस्थेवर खर्च करायची आहे. परंतु वस्तुस्थितीप्रमाणे सगळीच राज्ये व केंद्र सरकार ३ हून कमी खर्च करत आहेत. शिवाय नोकरभरतीमध्ये कपात केली असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्यावर कामाचा ताण आहे. पुरेशी विश्रांती व योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना प्रत्येक रुग्णांना दर्जेदार उपचार देता येत नाहीत. त्यातूनच आरोग्यविषयक अपुऱ्या ज्ञानामुळे डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असतात. साधारणत: धर्मादाय व सरकारी रुग्णालयात सुविधांअभावी असे प्रसंग वारंवार घडत आहेत. त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत.

नंदकिशोर भाटकर, गिरगाव.

नाहीतर डॉक्टरांवरही विश्वास राहणार नाही

डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून हल्ले होणे ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे; परंतु अनेक डॉक्टर मंडळी- मग ती सरकारी दवाखान्यातली असो किंवा खाजगी याला थोड्याप्रमाणात जबाबदार आहेत. किती डॉक्टरांना स्वत:च्या कामाबद्दल पुरेशी आस्था आणि प्रामाणिकपणा आहे? हेही तितकेच महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींना दिसणारे डॉक्टरचे चित्र काही निराळेच आहे, याची काही उदाहरणे.
सरकारी दवाखान्यांमध्ये काम करणारे किती डॉक्टर संपूर्ण वेळ, प्रामाणिकपणे दवाखान्यामध्ये उपलब्ध असतात आणि पूर्णवेळ काम करतात? अनेक डॉक्टर्स थोड्या वेळासाठी रुग्णालयात जातात आणि उरलेल्या वेळेत स्वत:चे खाजगी दवाखाने चालवतात. दुसरा मुद्दा रुग्णांप्रति असणारी आस्था. आज आपल्याकडे असे अनेक मोठमोठे डॉक्टर आहेत जे प्रत्येक रुग्णाला त्यांच्या आयुष्यातली दोन ते तीन मिनिटे बहाल करतात आणि त्याबद्दल भरपूर फी आकारतात. सखोल तपासणी, पेशंटबरोबर शांतपणे संवाद साधून त्यांच्या सर्व शारीरिक आणि मानसिक व्याधी समजून घेणे हे अनेक डॉक्टरांच्या बाबतीत कालबाह्य झालेले आहे. याचबरोबर डॉक्टरांची अजून एक मानसिकता म्हणजे रुग्णाला काहीही कळत नाही. किती डॉक्टर आपल्या रुग्णाला त्याला झालेला आजार व्यवस्थित सांगून त्याची कारणे समजावून सांगतात? त्याला व त्याच्या नातेवाईकांना याबाबत काही शंका आहेत का? त्याबाबत विचारणा करून त्या शंकांचे निरसन करतात? मुळात किती मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांसोबत संवाद साधण्याचे, आजार सोप्या भाषेत समजावून सांगण्याचे कौशल्य भावी डॉक्टरांना शिकवले जाते, हासुद्धा एक मोठा प्रश्न आहे.

मेडिकल सायन्समधले या सर्वसामान्य रुग्णाला काय कळणार? तो उगाच काहीबाही प्रश्न विचारून आमचा वेळ फुकट घालवतो आहे, अशीही मानसिकता अनेकदा डॉक्टरांमध्ये बघायला मिळते. अनेक डॉक्टर वेगवेगळ्या दोन ते पाच दवाखान्यांना जोडलेले असतात. त्यांच्या दर दिवशीच्या कामाची विभागणी या सगळ्या दवाखान्यांमध्ये झालेली असते. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या तऱ्हेचे, वेगवेगळे रुग्ण भराभर तपासणे, त्यांच्याकडील फीमधला मोठा भाग हॉस्पिटलला देणे आणि बाकी भाग स्वत: घेणे हा अनेक डॉक्टरांचा ‘व्यवसाय’ करण्याचा सध्याचा सुलभ मार्ग आहे. याचबरोबर काही डॉक्टर रुग्णाच्या गरजा पूर्णत: भागतील अशी औषधे देण्याऐवजी काही ठरावीक कंपन्यांची औषधे प्रमोट करण्याच्या जास्त मागे असतात हेही सत्य आहेच की!

हेही वाचा – डॉक्टरांना कोण वाचवणार?

अशा परिस्थितीमध्ये आपल्यासमोर येणाऱ्या रुग्णाला वेळच दिला गेला नाही, त्याच्याशी पुरेसा वेळ देऊन योग्य तो संवादच साधला गेला नाही तर पुढल्या वेळेला तोच रुग्ण समोर आल्यानंतर डॉक्टरच्या डोक्यात प्रकाश कसा पडणार? मग झटपट त्याला दिलेली फाइल चाळायची, एक-दोन प्रश्न विचारायचे आणि औषध देऊन रुग्णाला परत पाठवायचे, हे चित्र सर्रास दिसत आहे. अजून एक मुद्दा म्हणजे, डॉक्टरांमधल्या आपापसातल्याच मतभेदांचा. माणसाच्या अनेक शारीरिक व्याधी या मानसिक प्रश्न, ताणतणाव यांच्याशीसुद्धा संबंधित असतात. पण आज आपल्याकडे किती डॉक्टर अशा रुग्णाला समजून घेऊन आणि ओळखून मानसोपचारतज्ज्ञाकडे किंवा समुपदेशकाकडे जाण्याचा सल्ला देतात? याचबरोबर या व्यवसायातील अजून एक पद्धत म्हणजे रक्त तपासणी, फिजिओथेरपी इत्यादींसाठी रुग्णाला कोणाकडे पाठवले की त्यातूनही कमिशन घेणे. या पैशाची वसुली पुन्हा रुग्णाकडूनच होते. या सगळ्या व्यावसायिकीकरणामुळे रुग्णाच्या समस्या पूर्णत: न सुटता रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांवरती विमनस्क होण्याची वेळ येते.

डॉक्टरांनी रुग्णाला पुरेसा वेळ, त्याच्याबरोबर योग्य संवाद, अचूक निदान आणि उत्तम उपाययोजना वापरल्या तर निराशा पदरी येणार नाही. पण परत एकदा या सगळ्यावरची सोपी उत्तरे शोधली जातात. डॉक्टरकीचा ‘धंदा’ केलेले डॉक्टर आणि त्यांना पोसणारी भ्रष्ट रुग्णालय व्यवस्था यांच्यात बदल करण्यापेक्षा सर्वसामान्य रुग्णांवरती दोष ढकलणे हा मार्ग सर्वांत सोपा आहे. लहान मुले, गरजू आणि गरीब व्यक्ती यांच्या डोक्यावर एकदा अपयशाचे खापर फोडले की बाकी यंत्रणा ‘हम करे सो कायदा’ म्हणायला तयार! डॉक्टर म्हणजे देव नाही हे सगळ्यांनाच कळते. त्यांनाही त्यांचे काम करताना अडचणी येत असतील हे मान्य आहे. पण आपण आपल्या व्यवसायाचा ‘धंदा’ करून बसलो आहोत आणि त्याचा रुग्णांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत आहे हे डॉक्टरांना मान्य आहे का? हे चित्र बदलले नाही तर ज्याप्रमाणे देशातल्या नागरिकांचा राजकारण्यांवर काडीचाही विश्वास नाही, तसाच डॉक्टरांवरही राहणार नाही आणि याला जबाबदार रुग्ण नसतील.

विभावरी कावळे

‘लोकरंग’ (१ सप्टेंबर) मधील डॉ. अरुण गद्रे व डॉ. श्रुती जोशी लिखित अनुक्रमे ‘डॉक्टरांना कोण वाचवणार?’ आणि ‘एक दिवस धकाधकीचा’ या लेखांवरील निवडक प्रतिक्रिया…