लेख अप्रतिम
‘लोकरंग’मधील (८ जून) अंबरिश मिश्र यांनी राम पटवर्धन यांच्यावर लिहिलेला ‘टू सर, वुइथ लव..’ हा लेख अप्रतिम होता. एका मातब्बर संपादकांची ओळख करून देणारा आणि आयुष्यात आपण अशा व्यक्तीला भेटू शकलो नाही अशी चुटपुट लावून जाणारा हा लेख होता. सरांची ओळख आणि त्यांच्या संपादकीय मूल्यांची झलक त्यातून मिळाली.
– वर्षां वेलणकर.
सद्सद्विवेकबुद्धी हवी
‘लोकरंग’ १५ जूनच्या पुरवणीत डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांचा ‘लाल टोपीवाला माणूस’ हा रुग्ण जागृतीबद्दलचा लेख आवडला. औषधांचा गैरवापर थांबविण्याकरिता अशा प्रकारचे रुग्ण जागृती करणारे लेख विविध माध्यमातून लिहिणे आवश्यक आहे. खरे पाहता फ्लूसारख्या आजारात सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप ही लक्षणे ३ ते ५ दिवस त्रास देतात. फ्लूकरिता फक्त आवश्यक असल्यास ताप कमी करण्याकरिता औषध, पुरेसे पाणी पिणे आणि आराम करणे इतकेच आवश्यक असते, असे उपचार पद्धतीत नमूद केलेले आहे. एवढी सोपी उपचार पद्धती असूनही रुग्णाला मानसिकदृष्टय़ा बरे वाटावे म्हणून अनावश्यक तपासण्या, इंजेक्शन, सलाइन, वेदनाशामक औषधे, प्रतिजैविके (अल्ल३्र्रु३्रू२) यांचा सर्रास वापर केला जातो. बहुतांश डॉक्टर रुग्णाला योग्य उपचार पद्धती समजवायच्या भानगडीत पडत नाहीत. याकरिता रुग्ण तितकेच कारणीभूत आहेत. आजच्या आज बरे वाटले पाहिजे, सुट्टी घेणे शक्य नाही, मुलांच्या परीक्षा चालू आहेत, घरात काळजी घ्यायला कुणीही नाही, अशी अनेक कारणे रुग्ण देतात आणि डॉक्टरांना तीव्र प्रतिजैविके किंवा तीव्र वेदनाशामक गोळ्या देण्यास भाग पाडतात. पूर्वीचे प्रिस्क्रिप्शन दाखवून स्वत:च उपचार करणारे अनेक रुग्ण औषधांच्या दुष्परिणामांचा विचार करत नाहीत. अनेक रुग्णांना व्याधीचे स्वरूप समजून न घेता त्वरित आरामाची अपेक्षा असते. कितीही समजावलं तरी बरे वाटत नाही म्हणून सकाळ – संध्याकाळ दवाखान्यात येणाऱ्या, सतत फोन करणाऱ्या रुग्णांची संख्या काही कमी होत नाही. या जाचाला कंटाळून औषधांची मिसळ देणाऱ्या डॉक्टरांचे प्रमाणही कमी नाही. अनेकदा व्याधीच्या सुरुवातीच्या दिवसात त्या व्याधीची लक्षणे पूर्णपणे दिसून येत नाहीत, अशा वेळी योग्य निदान करण्याकरिता वाट पाहावी लागते. परंतु या डॉक्टरांना आजार समजला नाही या समजाने किंवा त्वरित आराम मिळेल या हेतूने दवाखान्यांची ६्रल्ल६ि २ँस्र्स्र््रल्लॠ सुरू होते. अशा रुग्णांना डॉक्टर बदलून आजाराचे स्वरूप बदलत नाही हे समजून सांगणे आवश्यक आहे. डॉक्टर, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांनी समजूतदारपणे, जबाबदारीने अनेक जंतुनाशकांना दाद न देणाऱ्या सुपरबगपासून बचाव करण्याकरिता योग्य मोहीम राबविणे ही काळाची गरज आहे.
डॉ. अरुण कुऱ्हे, नेरूळ, नवी मुंबई.
गरज, सदानूतन प्रगत उत्पादक राष्ट्रधुनेची..
गिरीश कुबेर यांचा ‘या भवनातील गीत पुराणे’ हा लेख वाचला. ज्या बदललेल्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आíथक परिस्थितीत भारतीय जनतेने नरेंद्र मोदींचे ‘प्लेसमेंट’ पंतप्रधानपदी केले, त्या परिस्थितीचे अचूक विवेचन सदर लेखात सापडते. लेखकाने नरेंद्र मोदींचे वेगळेपण सांगताना महेंद्रसिंग धोनी आणि ‘दिल चाहता है’ या चित्रपटाचा उल्लेख केला. परंतु ‘भारतभवना’त जवाहरलाल नेहरू पर्व, इंदिरा गांधी पर्व, राजीव गांधी पर्व आणि सोनिया पर्वात संस्कृतीच्या केंद्रस्थानी प्रथम बॉलिवूड, नंतर क्रिकेट आणि नंतर औद्योगिक क्षेत्रातील धनाढय़ आले. त्यांसोबत चिरायू ठरणारे आणि गेय गीत निर्माण होणे कठीण ठरले. लोकशाही आणि समाजवाद या दोन संकल्पनांचा मेळ नीट बसला नाही. त्यामुळे, भारतीयांनी गावीत अशी गीते जरी पुरोगामी ‘भारतभवना’त निर्माण झाली, तरी त्यांना कधीच एक छानशी धून लाभली नाही. जागतिकीकरण लाटेत भारतात प्रंचंड गोंधळ निर्माण झाला तो यामुळे. परिणामी, खरी लोकशाही प्रगत उत्पादक देशातच नांदते हे सत्य फक्त नरेंद्र मोदींना उमजले. आणि त्यांनी गुजरातमध्ये प्रगत उत्पादक नव निर्माणाची धून तयार केली. या धुनेचा प्रचार त्यांनी इतक्या पद्धतशीरपणे केला, की तिच्या समोर नेहरू-गांधी पर्वाच्या ४५ वर्षांतील सर्वच राष्ट्रधर्मनिरपेक्ष गीत रचना फिक्या पडल्या.
२०१४ च्या निवडणुकीपर्यंत, जिथे लोकशाही सर्जनशील पुरुषार्थाशी जोडली जाणे आवश्यक होते, तिथे तिची नाळ बांधली गेली सोव्हिएत युनियन छाप डाव्या आíथक-औद्योगिक धोरणाशी. भाषा केली गेली मिश्र अर्थ व्यवस्थेची, पण तिने छोटय़ा उद्योगधंद्यांसाठी दिले ते भ्रष्टाचार वाढवणारे परमिट राज. त्यामुळे ‘सर्वधर्मीय सर्जनशील पुरुषार्थाच्या वाढीतून धन निर्मिती’ या तत्त्वावर आधारित बहुजनांची गुणवत्ताशाही देशात कधीही नांदली नाही. त्याऐवजी देशात वाढली जात-धर्म-भाषा-प्रांत-िलग यांवर आधारित हक्कशाही. तिकडे १९७८ नंतर, चीनने साम्यवादी विचारसरणीला दूर करून स्वजनांच्या सर्जनशील उद्यमशीलतेला जे प्रोत्साहन दिले, त्याकडेही चुकीची बेसुरी गीते गाणाऱ्या भारतीय राजकारणप्रधान व्यवस्थेने अक्षम्य दुर्लक्ष केले. सदर व्यवस्थेत पुरोगमित्त्वाचा टिळा लावणाऱ्या मोजक्या मंडळींकडील विशेषाधिकार आणि अमाप धनसंचय २००४ ते २०१३ या वर्षांत वाढला. तो पाहून भारतीय मतदार खडबडून जागा झाला. त्याने नरेंद्र मोदींच्या तुफानी प्रचाराला भव्य-दिव्य असा प्रतिसाद दिला.
परंतु यापुढील काळात नरेंद्र मोदींसमोर दोन महत्त्वाच्या अडचणी आहेत. पहिली अडचण आहे ती रा. स्व. संघाची. कारण संघ स्वसंघटनेतील अप्रतिम शिस्तीकडे केवळ एक रिवाज म्हणून पहातो. त्या शिस्तीतील सुरचना-सुव्यवस्था आणि सुयंत्रणेच्या बांधीलकीला सेक्यूलर राष्ट्रधर्म म्हणून मानत नाही! आणि दुसरी अडचण आहे ती गेली ३४ वष्रे देशातील दुर्दैवी राजकारणप्रधान व्यवस्थेत सामील असलेल्या भा.ज.पची. नरेंद्र मोदी जर भाजप- रा. स्व. संघात आपली राष्ट्रधून सध्याच्या तडफेने पसरवतील, तर सदानूतन ठरणारी प्रगत उत्पादक राष्ट्रधून अत्यंत सुरेलपणे गाणारे भारतीय तयार होतील.
– रवी परांजपे, पुणे.
वास्तव जरा समजून घ्या राव!
‘चॅनेल फोर लाइव्ह’ या समीरण वाळवेकर लिखित कादंबरीचे ‘लोकरंग’ मध्ये (१ जून) श्रीकांत उमरीकर यांनी लिहिलेले समीक्षण वाचले. मी ही कादंबरी वाचली आहे. मला या समीक्षणातील अनेक मुद्दे अजिबात पटले नाहीत. या कादंबरीतील आशय वास्तवाच्या अतिशय जवळ जाणारा, भेदक, कटू पण शहारा आणणारा आहे, असे मला वाटते.
या कादंबरीवर अरुण साधूंच्या ‘सिंहासन’चा प्रभाव आहे हे स्पष्ट होते खरे, पण त्यात काय वावगे आहे? आता २०१४ मध्ये अरुण साधू यांनी सिंहासनमध्ये वर्णन केलेल्या काळापेक्षा फार वेगळी परिस्थिती प्रत्यक्ष राजकारणात आहे, माध्यमे तर फारच पुढे गेलेली आहेत, आणि परिस्थिती हाताबाहेर जात चाललेली आहे, याचे ‘चॅनेल फोर लाइव्ह’मध्ये केलेले वर्णन वास्तवाच्या अत्यंत जवळ जाणारे असेच आहे. उमरीकरांना कदाचित या भयानक वास्तवाची कल्पना नसावी.
सध्याच्या राजकारणाचे खरे स्वरूप अनुभवावयाचे झाल्यास, यापेक्षाही भयानक वर्णन करावे लागेल. पैसा, वासना आणि सत्ता यांचे एकमेकांशी सध्याच्या राजकारणात अतूट संबंध आहेत, हे जगजाहीर सत्य उमरीकरांना मान्य नसले, तरी ते वास्तव आहे!
उमरीकर यांनी या कादंबरीतील व्यक्तिरेखा आणि त्यांचे खऱ्या सामाजिक, राजकीय व्यक्तींशी लावलेले संबध हास्यास्पद वाटतात, कारण त्या व्यक्ती नव्हे, तर प्रवृत्ती वाटतात.
सद्य राजकारणातील कोणत्या प्रसंगातून प्रेरणा घेऊन संपूर्ण प्रसंग काल्पनिक पातळीवर लिहावा हे लेखकाचे स्वातंत्र्यसुद्धा मान्य करण्यास उमरीकर तयार नाहीत, याला काय म्हणावे? कादंबरीकार लेखक स्वत: जेव्हा पंचवीस वर्षे प्रत्यक्ष टीव्ही किंवा राजकारण जवळून बघतो, तेव्हा त्याच्या अनुभवांच्या जाणिवा इतक्या बाळबोध असतील का?
उमरीकरांच्या संपूर्ण लिखाणास एक प्रकारच्या अर्थहीन आणि अनभिज्ञतेतून आलेल्या आणि कादंबरी या प्रकाराच्या ठरावीक साचाबद्दलचा आग्रही दृष्टिकोनाचा वास येतो, जो खूप उग्र आणि अनाठायी आहे. टीका करावयास हरकत नाही, पण लेखकाच्या कादंबरी लेखनाच्या फॉर्मच्या निवडीबाबत आक्षेप का? मराठीमधील प्रत्येक कादंबरीने मांडणीसहित सर्व बाबतीमध्ये नेमाडे यांचेच उदाहरण आदर्शवत मानले पाहिजे का? लहान प्रकाराने, किंवा चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे छोटे प्रसंग लिहिले, तर ती काय कादंबरी होत नाही?
‘नुसती वर्णने लिहून कादंबरी कशी होणार,’ असे बाळबोध प्रश्न या उमरीकरांना पडले आहेत! कादंबरी कशी लिहावी हा लेखकाच्या स्वातंत्र्याचा भाग आहे. शिवाय त्यात एखादी व्यक्तिरेखा दुसऱ्याशी अशी कशी बोलेल, हे काय समीक्षात्मक प्रश्न असू शकतात? या राज्याच्या राजकारणात टोकाचे भ्रष्ट, वासनेमध्ये लडबडलेली उत्तुंग व्यक्तिमत्त्वे काय आपण बघितलेली नाहीत?
आपल्या कल्पनेपलीकडचे जग असू शकते किंवा तशी कल्पना करूनसुद्धा लिहिले जाऊ शकते, हे लक्षात घ्यावयास हवे. याच कादंबरीच्या पुण्यात झालेल्या प्रकाशन समारंभात साधू यांनी स्वत: ही कादंबरी वाचून ‘‘मला भोवळ आल्याचे’’ म्हटले होते, हे उमरीकरांना मुद्दाम सांगावे लागेल. ‘‘मागील तीस वर्षांत माध्यमांचे आणि राजकारणाचे जग बरेच पुढे गेले आहे आणि ते चिंताजनक आहे.’’ याची खंतसुद्धा साधू यांच्या त्या बोलण्यात व्यक्त झाली होती. हे त्यांचे वक्तव्य या कादंबरीला दाद देणारे होते की नाही? तेव्हा लेखक म्हणून प्रत्येकाच्या जाणिवा केव्हा, कशा आणि कुठपर्यंत प्रगल्भ, विकसित होतील हे कोणीच सांगू शकत नाही. त्याला आशय म्हणावयाचे का नाही, हा सापेक्ष प्रश्न आहे.
तीस वर्षे पूर्वीचे सिंहासन आणि आत्ताचे सिंहासन यात काही फरक असेल का नाही? का अजून आपण जुन्या काळातच समाधान मानून तसेच राजकारण आज होते, असे मानावयाचे? त्या काळात फक्त वर्तमानपत्रे होती, आता पाचशे टीव्ही चॅनल्स आहेत. राजकारणावर त्यांचा परिणाम होतोच! हे उमरीकरांना कोण सांगणार?
एकाच वेळेस कादंबरीमध्ये अनेक पातळीवर अनेक क्षेत्रामधील अध:पतन दाखविल्याबद्दल उमरीकरांचा का राग आहे, ते समजत नाही. राजकीय व्यक्ती आणि पत्रकार कोणत्या थरापर्यंत जाऊन एकमेकांशी बोलतात, वागतात, सूड काढतात किंवा एकमेकांचा उपयोग करतात, याबाबत उमरीकरांचे ज्ञान आणि आकलन मर्यादित असल्याने जाणवते. त्यांनी या क्षेत्रातील काही जाणकारांशी बोलल्यास, प्रत्यक्षातील वास्तव, या कादंबरीपेक्षा भयानक, भयावह आणि शिसारी आणणारे आहे, याची त्यांना जाणीव होईल.
या कादंबरीमध्ये आशयाचा पूर्ण अभाव असल्याचे त्यांचे विधान मला हास्यास्पद तर वाटतेच, पण या कादंबरीवर अन्याय करणारे वाटते. माझासारख्या सर्वसामान्य वाचकास ही कादंबरी वास्तवाच्या अगदी जवळ जाणारी, शहारे आणणारी आणि उद्विग्न करणारा अनुभव देणारी वाचनीय कादंबरी वाटली हे नक्की! शिवाय फॉर्मच्या दृष्टीनेसुद्धा त्यात पटकथेच्या जवळ नेणारा वेगळा प्रयोग झालेला आहे, जो कदाचित उमरीकरांना समजला नसेल! उमरीकरांना म्हणावेसे वाटते की, ‘‘वास्तव जरा समजून घ्या राव! आगपाखड करण्याआधी भोवताली काय घडते आहे, का आणि कसे घडते आहे, हे समजून घेऊन मग लिहा राव!’’
– माधुरी सोमण, पुणे.
सत्यदर्शी, कठोर परीक्षण
त्रयस्थपणे, वस्तुनिष्ठ परीक्षणे ही इतिहासजमा झालेली गोष्ट. सगेसोयरे, गुरू-चेल्यांनी एकमेकांच्या साहित्यकृतींची ‘अहोरूपं अहोध्वनिं’ परीक्षणे प्रसिद्ध करून अप्रत्यक्षपणे जाहिरातबाजी करण्याचे सध्याचे दिवस. चर्चासत्र, परिसंवाद घडवून आणणे, विरोधकांनाही त्यात बेमालूमपणे सहभागी करून घेणे. येनकेनप्रकारेण आपल्या साहित्यकृतींच्या सेलचा आलेख वाढता राहील याची दक्षता घेणे.
हे एकमेव उद्दिष्ट असलेला हा व्यवसाय सध्या तेजीत असलेला.. या पाश्र्वभूमीवर श्रीकांत उमरीकरांचा ‘आशयही महत्त्वाचा असतो राव’ हा समीक्षा लेख म्हणजे बॉम्बगोळाच वाटला.
‘चॅनेल फोर लाइव्ह’ या समीरण वाळवेकर लिखित कादंबरीचे उमरीकरांनी केलेले परीक्षण वस्तुनिष्ठ, सत्यदर्शी, कठोर परीक्षण म्हणजे काय असते, त्याचा आदर्श नमुनाच.
– अनिल ओढेकर, पुणे.
सरळ रेघ तिरकी झाली?
संजय पवार यांची ‘तिरकी रेघ’ वाचली. अजूनपर्यंत ब्राह्मणांना ‘साडेतीन टक्के’ ‘मनुवादी’ आदी विशेषणे लावली जात. पवार यांनी त्यात ‘शेंडीवाले चाणक्य’ अशी भर घातली आहे. संघवाल्यांचे ब्राह्मण्य त्यांना कुठे दिसले? (मोदींचे मंत्रिमंडळ ही त्यांच्या लेखानंतरची घटना असली तरी त्यावरसुद्धा ब्राह्मण्याचा प्रभाव दिसत नाही.) काँग्रेसची बहुसांस्कृतिकता म्हणजे काय? मोदींनी विजयासाठी जे मार्ग अनुसरले ते घटनेला, आचारसंहितेला धरून होते की नाही? नसतील तर तक्रारी केल्या काय? इतरांना हे मार्ग निषिद्ध होते काय? यापैकी कशाचेच स्पष्टीकरण पवार यांनी केलेले नाही.
पवारांची एक तिरकी रेघ थेट भारतीय स्त्रियांच्या दिशेने गेलेली दिसते. ‘भारतीय स्त्रियांना पुरुषार्थाचे आकर्षण असते. आवडता पुरुष मर्द असावा ही इच्छा असते’ असे ते म्हणतात. म्हणजे ‘भाजप’ म्हणजेच मोदींना मिळालेली स्त्रियांची मते ही त्यांच्या मर्दपणावर भाळून त्यांना दिलेली आहेत. आणि इतर पक्षांचे उमेदवार हे मर्द नसून ‘नामर्द’ होते असे पवार यांना म्हणायचे आहे काय? (आणि भारतीय स्त्रीच का?)
कोणत्याही देशाच्या सुज्ञ नागरिकांना संविधानाच्या रक्षणासाठी नेहमीच जागृत राहावे लागते. मग या वेळच्या निवडणुकीत झालेले भरघोस मतदान तशाच सुज्ञ नागरिकांनी संविधानाच्या संरक्षणासाठीच केले आहे असे का म्हणू नये?
‘मुलींना स्वातंत्र्य असावे पण मर्यादाही हवी’ याप्रमाणे स्त्रियांचे सार्वजनिक दर्शन-प्रदर्शन सुविहित, सुस्थितीत व सुसंस्कृत असावे हा विचार संघवाल्यांचाच आहे. मग त्याचे पालन ‘बोरीबंदरच्या म्हातारी’ने केले नाही म्हणून पवार यांना राग का यावा?
त्यांची ती शेवटची ‘सरळ रेघ’ मात्र तिरकी होऊन संघविचारांकडेच झुकली की काय, असा प्रश्न मला पडला.
दि. मा. प्रभुदेसाई, कुर्ला.