‘कथा टिकून राहील’ आणि ‘मराठी कथा आक्रसतेय’ (लोकरंग २० ऑक्टोबर) हे दोन्ही लेख मराठी साहित्यातील कथाविश्वावर प्रखर प्रकाश टाकणारे वाटले. प्रखर प्रकाशाची काही वैशिष्टय़े असतात. तो ज्यावर टाकला आहे, त्या प्रदेशातील नजरेतून सुटलेले अनेक बारकावे दिसायला लागतात, उणिवा दिसू लागतात. त्या दूर करण्याची आत्यंतिक निकड वाटायला लागते, पण हे कुठवर? प्रखर प्रकाशाचे आयुष्य क्षणभंगुर असते. त्यामुळे हा झोत संपला की पुन्हा बारकावे नजरेतून सुटायला लागतात. ये रे माझ्या मागल्या.. सुरू होते.
राजन खान यांची काही निरीक्षणे निश्चितच मौलिक आहेत. कथा किंवा कोणताही साहित्यप्रकार लिहिण्याचे दोन प्रकार नमूद करताना- ‘जेवढे स्वत:च्या जगण्यात येते, तेवढेच लिहायचे, हा एक प्रकार; आणि आपल्या जगण्याबाहेर उतरून, मुद्दाम लेखक म्हणून दुसऱ्या, परक्या जगण्याचा अनुभव घ्यायचा आणि मग लिहायचे, हा दुसरा प्रकार. बहुतेक सर्व मराठी लेखक पहिल्या प्रकारात बसून लिहिणारे असतात.’ राजन खान यांनी केलेले हे विधान मराठी साहित्य व्यवहाराच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे. मराठी लेखकांकडे ही संशोधकवृत्ती व अभ्यासूपणा नसल्यानेच मग आपल्याला अनुवादांवर तहान भागवावी लागते.
मराठी साहित्यात ग्रामीण, दलित, ब्राह्मणी-अब्राह्मणी, मुस्लिम, जैन असे भेदप्रकार का निर्माण झाले? काही लोकांनी काही लोकांकडे दुर्लक्ष केले, म्हणून तर हे वेगवेगळे साहित्यप्रवाह जन्माला आले. हे भेदप्रकार म्हणजे फक्त ‘अभ्यासकांची सोय’ असा अर्थ काढणे हे कोत्या समीक्षेचे लक्षण म्हणायला हवे. अभ्यासकांच्या ‘भेदिक’ वर्गवारीच्या निकषांनी मराठी साहित्य खुरटले वा संकुचित राहिले नाही; तर मराठी समीक्षेने स्पष्टपणाने लेखकांचे खुरटलेपण कधीच मांडले नाही, त्यामुळे ते अधिक खुरटत गेले आहे.
गोष्टीची सांकेतिकता नाकारणारे राजन खान यांचे विवेचन कथेला पसरट, पाल्हाळिक व वर्णनबहुल बनवणारे आहे. त्यांचा हाच न्याय कवितेच्या व्यंगार्थाला लावला तर तिच्या अस्तित्वालाच सुरुंग लागेल. राजन खान कथेकडून लोककथेच्या अपेक्षा करताहेत असे वाटते.
मराठी कथालेखनातील उणिवा दाखवत ‘कथा टिकून राहील’ असा विवेचनाशी विसंगत आशावाद लेखक व्यक्त करतो. नुसता आशावाद व्यक्त करून हे होणारे नाही; तर त्यासाठी मराठी समीक्षेला अधिक परखड, वस्तुनिष्ठ व विवेकी होत लेखनाला व साहित्य व्यवहाराला मार्गदर्शन करावे लागणार आहे. समीक्षा मूग गिळून बसली की, साहित्य व्यवहारात बजबजपुरी माजणारच.
‘मराठी कथा आक्रसतेय’ असे म्हणत रेखा साने-इनामदार यांनी कथेची केलेली तात्त्विक मीमांसा राजन खान यांच्या मीमांसेला काहीसा छेद देणारी आहे. राजन खान कथेकडून सविस्तर गोष्टीची अपेक्षा करतात; तर रेखा साने-इनामदार अल्पाक्षरबहुल कथेचा गौरव करताना दिसतात. ‘कथेतील अनुभवाचा विस्तार व आवाका मर्यादित असल्याने वास्तविक कथालेखन नव्या जोमाने बहरायला हवे होते; परंतु तसे घडलेले दिसत नाही.’ हे त्यांचे विधान याचीच साक्ष देते.
६०-८० च्या दोन दशकांतील नियतकालिके व दिवाळी अंक यांतून येणारे कथालेखन व त्याचे होणारे वाचन हा सगळाच प्रकार कसदार होता, हे सांगताना लेखिकेने केलेले एक विधान फारच महत्त्वाचे आहे. कथा आणि कथेवरील दीर्घ समीक्षालेख- ही सारी प्रक्रियाच संपुष्टात आली आहे, इतिहासजमा झाली आहे.’ आणि या साऱ्या प्रकाराला ओहोटी लागण्यामागे दूरदर्शनचा प्रभाव लेखिकेला कारणीभूत वाटतो. दूरदर्शनमुळे वाचकसंस्कृतीला ओहोटी लागली, हे खरेच आहे. त्याचा परिणाम कथेच्याच नव्हे; तर एकूणच साहित्याच्याच दर्जावरती झाला आहे. ‘लोक साहित्य वाचत नाहीत आणि साहित्यिक समीक्षा वाचत नाही’, असे हे प्रकरण आहे. त्यामुळेच मग कालसुसंगत काय व कालबाह्य़ काय, हे उमजेनासे होते. इंटरनेटवरील मराठी कथालेखन/ कवितालेखन वाचताना हे अधिक जाणवते. मराठी साहित्याचा दर्जा खरेच सुधारायचा असेल तर गावोगावच्या ‘साहित्य मंडळां’नी व ‘साहित्यिक गटांनी’ ‘अहो रूपम्ं! अहो ध्वनिम्!’ चा कौतुक सोहळा बंद करून परखडपणाचे व्रत अंगीकारायला हवे. आत्मसंतुष्ट वृत्ती सोडायला हवी, असे वाटते.
– डॉ. सुधाकर शेलार, अहमदनगर.

उर्दू- एक सुंदर व समृद्ध भाषा
लोकरंग (३ नोव्हेंबर)च्या ‘ऱ्हस्व आणि दीर्घ’ सदरात नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी उर्दू भाषेबद्दल अप्रतिम लेख लिहून मराठी वाचकांच्या भाषाज्ञानात एकप्रकारे भर टाकली आहे. ही भाषा जितकी सुंदर आहे, तितकी समृद्धसुद्धा आहे. इंग्रजी भाषेपेक्षा मोठा शब्दसंग्रह या भाषेत आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. कारण ही भाषा एकेकाळी राज्यकर्त्यांची भाषा होती. भाषा समृद्ध होण्यासाठी दैनंदिन कारभारात तिचा वापर झाला पाहिजे. डॉ. राममनोहर लोहियांचा आग्रह होता की, सार्वजनिक व्यवहारात आपल्या देशी भाषांचा वापर व्हावा, तरच भाषा समृद्ध होतात. त्यांनी हेही सांगितले होते की, कुठलीही भाषा प्रयोगशाळेत वृद्धिंगत होत नसते. त्यांचा सदैव वापर झाला पाहिजे.
कवठेकरांनी सांगितल्याप्रमाणे उर्दू भाषा मुसलमानांपुरती मर्यादित कधीच नव्हती. भारतातच अनेक राज्यांतील स्थानिक मुसलमानांना उर्दूचा गंधही नव्हता व नाही. एकेकाळी मदरशांत आपले अनेक नेतेही तयार झाले होते, ज्यांचा धर्म इस्लाम नव्हता. उर्दूतले अनेक सुप्रसिद्ध शायर हिंदूही होते. तसं म्हटलं तर पाकिस्तानात केवळ ३ टक्के लोकांची भाषा उर्दू आहे. ९७ टक्के  लोकांपैकी ६७ टक्के  पंजाबी, सिंधी व पश्तू भाषा बोलतात. एक वैशिष्टय़ म्हणजे तेथील हिंदू मंदिरातून सर्व ठिकाणी उर्दू लिपीच आढळल्याची माहिती तेथे प्रत्यक्ष भेट देऊन आलेल्यांनी दिली आहे.
उर्दू भाषेच्या एका विद्वान मुस्लिम व्यक्तींचे खालील वाक्य स्मरणीय आहे-
‘‘मेरठ-दिल्ली के आसपास उर्दूका जन्म हुआ, अवध में वह पली, दखन हैदराबाद में जवान हुई और बहु बनकर पाकिस्तान गयी.’’
कवठेकरांनी प्रकाश पंडित यांचा उल्लेख करून आमच्यासारख्या उर्दू चाहत्यांच्या मनातलं लिहिलं आहे. त्यांच्या पुस्तकांशिवाय मी उर्दू प्रेमी झालोच नव्हतो. स्व. माधवरराव पगडींनीसुद्धा उर्दू-मराठीचा मोठा सेतू बांधला होता. त्यांनी गालिबच्या काव्य-संग्रहाचा मराठीत भाषांतर करून मराठी वाङ्मयात बहुमूल्य भर टाकली आहे.
– न्या. राजन कोचर (निवृत्त), मुंबई.

निमिषाची खरीखुरी कथा
‘लोकरंग’ (१० नोव्हेंबर) मधील ‘कहाणी.. एका निमिषा’ची हा सुधीर मोघे यांचा लेख वाचला. तो एक कालमापनवाचक शब्द आहे. ‘निमिष’ या शब्दाची उत्पत्ती कथा पुढीलप्रमाणे- ‘निमी राजाचा उल्लेख विष्णू पुराणात आढळतो. निमी हा इक्ष्वाकूच्या मुलांपकी एक. या पुराणानुसार हजार वष्रे चालणाऱ्या एका यज्ञाचे पौरोहित्य वसिष्ठ ऋषींनी करावे, अशी निमी राजाने त्यांना विनंती केली. परंतु वसिष्ठ ऋषी इंद्राचा पाचशे वर्षांचा यज्ञ करीत असल्याने तोपर्यंत राजास वाट पाहण्यास सांगितले. वसिष्ठ जेव्हा परत आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, निमी राजाने गौतम ऋषी व इतरांच्या मदतीने यज्ञास सुरुवात केली आहे. आपणास पूर्वसूचना न देता यज्ञ आयोजित केल्याचे पाहून अपमानित झालेल्या वसिष्ठांनी निमी राजा झोपेत असताना शाप दिला की तू तुझे शारीरिक अस्तित्व गमावून बसशील. निमी जागा झाला तेव्हा त्याच्या हे लक्षात आले की, आपणास कोणतीही कल्पना न देता शाप देण्यात आला आहे. त्यांनी तशाच प्रकारचा शाप वसिष्ठांना दिला व प्राणत्याग केला. त्याच्या शरीराचे दहन करण्यात आले. यज्ञ जेव्हा संपला तेव्हा पुरोहितांच्या विनंतीवरून देवांनी निमीला पुन्हा जिवदान देण्याची तयारी दर्शविली. परंतु निमीच्या इच्छेनुसार त्याला सर्व सजीवांच्या डोळ्यात स्थान देण्यात आले. त्यामुळे प्राणिमात्रांचे डोळे सारखे उघडझाप करीत असतात.’’ या छोटय़ा उघडझापेलाच आपण ‘निमिष’ म्हणतो.
– तुषार म्हात्रे.

सरदार पटेल, समज व गरसमज
‘लोकरंग’ (१० नोव्हेंबर) मधील प्रा. नरहर कुरुंदकरांनी लिहिलेल्या लेखाचा संपादित अंश वाचला. लेख कोणत्या संदर्भात (निवडणूक, आणीबाणी, किंवा इतर काही) नि काय उद्देशानी लिहिला आहे ते कळायला मार्ग नाही. त्या काळात, त्यावर काही प्रतिक्रियाही आल्या असतीलच. लेखाचा एकूण सूर नेहरूंना पटेलांपेक्षा उजवं ठरवणारा वाटतो. लेखात ‘आज काय, यावर नेहरू पटेलांचे एकमत होते’ असं एक विधान आहे. जर नेहरू भविष्याचा विचार करायचे नि पटेल वर्तमानाचा तर त्यांचं ‘आज काय करायचं’ याच्यावर एकमत Boss is always right या एकाच विचारांनी होऊ शकतं.
सद्यस्थितीत लेखातल्या तपशिलावरून एक अनुमान मात्र नक्की काढता येतं. ते म्हणजे नेहरू पटेलांच्या काळात आजच्यासारखं व्होट-बँकेचं राजकारण होत नसावं, त्यामुळे राजकीय विचारसरणींचं ध्रुवीकरण झालेलं नव्हतं. त्यामुळे सरदार पटेल नि काही समकालीन काँग्रेस नेत्यांच्या (त्यात नेहरूही आले) एकूण लिखाणात/भाषणात िहदुत्ववादी वाटणारे विचार/उद्गार सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शरद कोर्डे, ठाणे.