‘कथा टिकून राहील’ आणि ‘मराठी कथा आक्रसतेय’ (लोकरंग २० ऑक्टोबर) हे दोन्ही लेख मराठी साहित्यातील कथाविश्वावर प्रखर प्रकाश टाकणारे वाटले. प्रखर प्रकाशाची काही वैशिष्टय़े असतात. तो ज्यावर टाकला आहे, त्या प्रदेशातील नजरेतून सुटलेले अनेक बारकावे दिसायला लागतात, उणिवा दिसू लागतात. त्या दूर करण्याची आत्यंतिक निकड वाटायला लागते, पण हे कुठवर? प्रखर प्रकाशाचे आयुष्य क्षणभंगुर असते. त्यामुळे हा झोत संपला की पुन्हा बारकावे नजरेतून सुटायला लागतात. ये रे माझ्या मागल्या.. सुरू होते.
राजन खान यांची काही निरीक्षणे निश्चितच मौलिक आहेत. कथा किंवा कोणताही साहित्यप्रकार लिहिण्याचे दोन प्रकार नमूद करताना- ‘जेवढे स्वत:च्या जगण्यात येते, तेवढेच लिहायचे, हा एक प्रकार; आणि आपल्या जगण्याबाहेर उतरून, मुद्दाम लेखक म्हणून दुसऱ्या, परक्या जगण्याचा अनुभव घ्यायचा आणि मग लिहायचे, हा दुसरा प्रकार. बहुतेक सर्व मराठी लेखक पहिल्या प्रकारात बसून लिहिणारे असतात.’ राजन खान यांनी केलेले हे विधान मराठी साहित्य व्यवहाराच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे. मराठी लेखकांकडे ही संशोधकवृत्ती व अभ्यासूपणा नसल्यानेच मग आपल्याला अनुवादांवर तहान भागवावी लागते.
मराठी साहित्यात ग्रामीण, दलित, ब्राह्मणी-अब्राह्मणी, मुस्लिम, जैन असे भेदप्रकार का निर्माण झाले? काही लोकांनी काही लोकांकडे दुर्लक्ष केले, म्हणून तर हे वेगवेगळे साहित्यप्रवाह जन्माला आले. हे भेदप्रकार म्हणजे फक्त ‘अभ्यासकांची सोय’ असा अर्थ काढणे हे कोत्या समीक्षेचे लक्षण म्हणायला हवे. अभ्यासकांच्या ‘भेदिक’ वर्गवारीच्या निकषांनी मराठी साहित्य खुरटले वा संकुचित राहिले नाही; तर मराठी समीक्षेने स्पष्टपणाने लेखकांचे खुरटलेपण कधीच मांडले नाही, त्यामुळे ते अधिक खुरटत गेले आहे.
गोष्टीची सांकेतिकता नाकारणारे राजन खान यांचे विवेचन कथेला पसरट, पाल्हाळिक व वर्णनबहुल बनवणारे आहे. त्यांचा हाच न्याय कवितेच्या व्यंगार्थाला लावला तर तिच्या अस्तित्वालाच सुरुंग लागेल. राजन खान कथेकडून लोककथेच्या अपेक्षा करताहेत असे वाटते.
मराठी कथालेखनातील उणिवा दाखवत ‘कथा टिकून राहील’ असा विवेचनाशी विसंगत आशावाद लेखक व्यक्त करतो. नुसता आशावाद व्यक्त करून हे होणारे नाही; तर त्यासाठी मराठी समीक्षेला अधिक परखड, वस्तुनिष्ठ व विवेकी होत लेखनाला व साहित्य व्यवहाराला मार्गदर्शन करावे लागणार आहे. समीक्षा मूग गिळून बसली की, साहित्य व्यवहारात बजबजपुरी माजणारच.
‘मराठी कथा आक्रसतेय’ असे म्हणत रेखा साने-इनामदार यांनी कथेची केलेली तात्त्विक मीमांसा राजन खान यांच्या मीमांसेला काहीसा छेद देणारी आहे. राजन खान कथेकडून सविस्तर गोष्टीची अपेक्षा करतात; तर रेखा साने-इनामदार अल्पाक्षरबहुल कथेचा गौरव करताना दिसतात. ‘कथेतील अनुभवाचा विस्तार व आवाका मर्यादित असल्याने वास्तविक कथालेखन नव्या जोमाने बहरायला हवे होते; परंतु तसे घडलेले दिसत नाही.’ हे त्यांचे विधान याचीच साक्ष देते.
६०-८० च्या दोन दशकांतील नियतकालिके व दिवाळी अंक यांतून येणारे कथालेखन व त्याचे होणारे वाचन हा सगळाच प्रकार कसदार होता, हे सांगताना लेखिकेने केलेले एक विधान फारच महत्त्वाचे आहे. कथा आणि कथेवरील दीर्घ समीक्षालेख- ही सारी प्रक्रियाच संपुष्टात आली आहे, इतिहासजमा झाली आहे.’ आणि या साऱ्या प्रकाराला ओहोटी लागण्यामागे दूरदर्शनचा प्रभाव लेखिकेला कारणीभूत वाटतो. दूरदर्शनमुळे वाचकसंस्कृतीला ओहोटी लागली, हे खरेच आहे. त्याचा परिणाम कथेच्याच नव्हे; तर एकूणच साहित्याच्याच दर्जावरती झाला आहे. ‘लोक साहित्य वाचत नाहीत आणि साहित्यिक समीक्षा वाचत नाही’, असे हे प्रकरण आहे. त्यामुळेच मग कालसुसंगत काय व कालबाह्य़ काय, हे उमजेनासे होते. इंटरनेटवरील मराठी कथालेखन/ कवितालेखन वाचताना हे अधिक जाणवते. मराठी साहित्याचा दर्जा खरेच सुधारायचा असेल तर गावोगावच्या ‘साहित्य मंडळां’नी व ‘साहित्यिक गटांनी’ ‘अहो रूपम्ं! अहो ध्वनिम्!’ चा कौतुक सोहळा बंद करून परखडपणाचे व्रत अंगीकारायला हवे. आत्मसंतुष्ट वृत्ती सोडायला हवी, असे वाटते.
– डॉ. सुधाकर शेलार, अहमदनगर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा