वसंत देसाईंवर अनाठायी राग!
‘लोकरंग’ (२७ जानेवारी) मधील आनंद मोडक यांचा ‘सर्वव्यापी यमन’ हा लेख वाचला. यमन रागाची काही मोजकी, नेहमीचीच गाणी त्यांनी आपल्या लेखात उदाहरणांदाखल दिलेली आहेत. या रागावर आधारित अजूनही पुष्कळ उत्कृष्ट गाणी उदाहरणे म्हणून देता येतील. परंतु यमन रागासंबंधी लिहिताना लेखकाची गाडी मल्हार राग आणि संगीतकार वसंत देसाई यांच्यावर आक्षेपार्हरीत्या घसरली आहे.   
जरी त्यांनी वसंत देसाई यांचे  नाव घेतलेले नसले तरी त्यांचा रोख त्यांच्यावरच आहे. कारण त्यांनीच आपल्या संगीतात मल्हार रागाचा वापर सर्वात जास्त आणि उत्कृष्टपणे केलेला आढळतो. देसाई या महान संगीतकाराने प्रभातच्या चित्रपटांपासून ते राजकमलचे व्ही. शांताराम यांच्या अमरभूपाळी, राम जोशी, झनक झनक पायल बाजे, दो आँखे बारा हाथ या चित्रपटांना तसेच गुंज उठी शहनाई, अर्धागिनी, स्कूलमास्टर, आशीर्वाद, मिली, इ. हिंदी चित्रपटांना रागदारीवर आधारित उत्तम संगीत दिले आहे. त्यांचे संगीत सर्वच रागांवर आधारित असले तरीही मल्हार हा त्यांचा अत्यंत आवडता राग असल्याने या रागावरची त्यांची गाणी अतिशय सुमधुर अशी आहेत.
वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली मल्हार रागावरील काही गाणी- ‘ना ना बरसो बादल’ (सम्राट पृथ्वीराज चव्हाण), ‘बोलेरे पपीहरा’ (गुड्डी), ‘डर लागे गरजे बदरिया’ (संपूर्ण रामायण), ‘घिर घिर आयी सावनी अखियाँ’ (आशीर्वाद), ‘बादल बरसो गगन की ओटसे’ ही गाणी तसेच मेघमल्हार रागातले ‘सावन घन गरजे’ हे मल्हारगीत कोण बरे विसरेल?
आनंद मोडक यांनी वसंत देसाई यांच्यावरील आपली मळमळ या लेखात व्यक्त केली आहे असे वाटते. ते वसंत देसाईंच्या यमन रागावर आधारित गाण्यांचा उल्लेख करायला जाणूनबुजून विसरलेले दिसतात. यमन रागावर आधारित ‘अमर भूपाळी’मधली ‘तुझ्या प्रीतीचे’, ‘तू नको ग बोलू अशी’, ‘लटपट लटपट’ ही ती गाणी. वास्तविक मोडक यांचा विषय यमन राग हा होता, परंतु त्यांनी आपला वैयक्तिक राग वसंत देसाई यांच्यावर काढल्याचे जाणवते.
– प्रवीण प्रकाश चव्हाण, नवीन पनवेल.

सडेतोड लेख
नारायण कुलकर्णी कवठेकर यांनी ‘संमेलनातील साहित्य हरवले’ या लेखातून सध्याच्या साहित्य संमेलनातील वास्तव परिस्थितीचे कटू सत्य मांडून गोंधळ घालणाऱ्या साहित्यिकांचा खरपूर समाचार घेतला आहे. खरे तर लेखक, कवी, साहित्यिकांना वाचकांच्या मनात आदराचे स्थान असते. पण हे साहित्यिक संमेलन जवळ आले की आपले भान विसरून वेसण नसलेला बैल उधळावा तसे वागू लागतात. प्रतिष्ठेसाठी कोणत्याही थराला जायचे ही वृत्ती म्हणजे ‘जगा सांगे ब्रह्मज्ञान, अन् स्वत: कोरडे पाषाण’ होय. राजकारण अन् निवडणुका यामुळे माणसाचे ‘माणूसपण’च हरवून बसते की काय? त्यात निकोप, निखळ, पारदर्शीपणा शोधून सापडत नाही. सद्बुद्धीने व सदाचाराने साहित्याची आराधना दूरच; अरेरावी, अमंगल भाषा वापरण्याची खुमखुमी काही लेखकांना येते. अशा मनात एक अन् ओठात एक असलेल्या लेखकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्याचे काम हा लेख करतो. समाजमनात मूल्ये रुजवणाऱ्या साहित्यिकांनीच जर असे ‘गुण’ उधळले तर समाजाने त्यांच्याकडून कोणता आदर्श घ्यायचा? साहित्य संमेलनातील अशा गोंधळांचा परिणाम आपल्या वाचनसंस्कृतीवर नक्कीच होईल. साहित्यिकांनी स्वत: शहाणपण अंगी बाणवावे अन् नंतरच जगाला सद्मार्गाने जायला सांगावे. अन्यथा वाचकच अशा साहित्यिकांना साहित्यशारदेच्या मंगलमय सोहळ्याच्या व्यासपीठावरून पायउतार व्हायला भाग पाडतील.
संतोष बोंगाळे,  पिंपळखुंटे, ता. माढा., जि. सोलापूर.

Story img Loader