वसंत देसाईंवर अनाठायी राग!
‘लोकरंग’ (२७ जानेवारी) मधील आनंद मोडक यांचा ‘सर्वव्यापी यमन’ हा लेख वाचला. यमन रागाची काही मोजकी, नेहमीचीच गाणी त्यांनी आपल्या लेखात उदाहरणांदाखल दिलेली आहेत. या रागावर आधारित अजूनही पुष्कळ उत्कृष्ट गाणी उदाहरणे म्हणून देता येतील. परंतु यमन रागासंबंधी लिहिताना लेखकाची गाडी मल्हार राग आणि संगीतकार वसंत देसाई यांच्यावर आक्षेपार्हरीत्या घसरली आहे.
जरी त्यांनी वसंत देसाई यांचे नाव घेतलेले नसले तरी त्यांचा रोख त्यांच्यावरच आहे. कारण त्यांनीच आपल्या संगीतात मल्हार रागाचा वापर सर्वात जास्त आणि उत्कृष्टपणे केलेला आढळतो. देसाई या महान संगीतकाराने प्रभातच्या चित्रपटांपासून ते राजकमलचे व्ही. शांताराम यांच्या अमरभूपाळी, राम जोशी, झनक झनक पायल बाजे, दो आँखे बारा हाथ या चित्रपटांना तसेच गुंज उठी शहनाई, अर्धागिनी, स्कूलमास्टर, आशीर्वाद, मिली, इ. हिंदी चित्रपटांना रागदारीवर आधारित उत्तम संगीत दिले आहे. त्यांचे संगीत सर्वच रागांवर आधारित असले तरीही मल्हार हा त्यांचा अत्यंत आवडता राग असल्याने या रागावरची त्यांची गाणी अतिशय सुमधुर अशी आहेत.
वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली मल्हार रागावरील काही गाणी- ‘ना ना बरसो बादल’ (सम्राट पृथ्वीराज चव्हाण), ‘बोलेरे पपीहरा’ (गुड्डी), ‘डर लागे गरजे बदरिया’ (संपूर्ण रामायण), ‘घिर घिर आयी सावनी अखियाँ’ (आशीर्वाद), ‘बादल बरसो गगन की ओटसे’ ही गाणी तसेच मेघमल्हार रागातले ‘सावन घन गरजे’ हे मल्हारगीत कोण बरे विसरेल?
आनंद मोडक यांनी वसंत देसाई यांच्यावरील आपली मळमळ या लेखात व्यक्त केली आहे असे वाटते. ते वसंत देसाईंच्या यमन रागावर आधारित गाण्यांचा उल्लेख करायला जाणूनबुजून विसरलेले दिसतात. यमन रागावर आधारित ‘अमर भूपाळी’मधली ‘तुझ्या प्रीतीचे’, ‘तू नको ग बोलू अशी’, ‘लटपट लटपट’ ही ती गाणी. वास्तविक मोडक यांचा विषय यमन राग हा होता, परंतु त्यांनी आपला वैयक्तिक राग वसंत देसाई यांच्यावर काढल्याचे जाणवते.
– प्रवीण प्रकाश चव्हाण, नवीन पनवेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा