डॉ. राजीव शारंगपाणी यांचा ८ सप्टेंबरच्या ‘लोकरंग’मधील ‘लोढणी टाका’ हा लेख मोठय़ा औत्सुक्याने वाचला आणि मनात पहिली प्रतिक्रिया उमटली- अतिशयोक्ती आणि विपर्यास करून सजवलेले लिखाण! लेखकाने ‘लोढणं’ आणि जात, धर्म, कुळाचार, परंपरा, नैतिकता, मानसिकता यांची तुलना करताना विवेकाची कास सोडल्याचे जाणवते.
मुळात लेखाचे शीर्षक ‘लोढणी टाका’ हे अत्यंत कलुषित प्रवृत्तीचे द्योतक ठरावे. एखादा डॉक्टर एखाद्या जुनाट रोगावर दवापाणी करतो त्यावेळी तो संबंधित रुग्णाच्या मानसिकतेचाही विचार करतो. लेखकाने स्वत: डॉक्टर असूनही समाजमनाच्या मानसिकतेचा जराही विचार केलेला दिसत नाही. त्यांनी ‘लोढणी’ या शब्दाच्या केलेल्या वापरामुळे लेखकाबद्दल मनात अढी निर्माण होते. थोडय़ा हळुवारपणाने ‘कालबाह्य़ रुढी, जातींचे बंधन वगैरेंचे लोकांनी आत्मपरीक्षण करून त्यांचा हळूहळू त्याग केला पाहिजे. कारण शेवटी ‘माणूस’ हीच जात चिरकाल टिकणारी आहे..’ अशा प्रकारे शर्करावगुंठित हे लेखन असतं तर अशी अढी निर्माण झाली नसती. ‘लोढणी’ हा शब्द किती चपखल आहे हे बिंबविण्यासाठी लेखकाने दिलेली उदाहरणेही अस्थानी अन् अतिशयोक्तीपूर्ण आहेत. ‘(एखादा मनुष्य) प्राण जायची वेळ आली तर प्राण देतो, परंतु ते ‘लोढणं’ सोडत नाही’ हे म्हणणं म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास होय. आपल्याला सर्वानाच माकडीण आणि तिचं पोर अन् हौदात हळूहळू वाढणारं पाणी ही गोष्ट परिचित आहे. त्यात ती माकडीण पोराचं ‘लोढणं’ मारते आणि स्वत:चा जीव वाचवते, असं लेखकाचं म्हणणं दिसतं. त्यापुढचं उदाहरण म्हणजे ‘डोक्यावर ओझं तसंच ठेवून रथात बसलेला माणूस’ हे त्या माणसाच्या मूर्खपणाचे उदाहरण आहे. ‘लोढण्या’शी त्याचा सुतराम संबंध नाही. साखळदंड आणि कैदी.. म्हणजे सवयीचा परिणाम! काय संबंध त्याचा लोढण्याशी? उगीचच वडाची साल पिंपळाला लावायची?
लेखकाने दिवाळी, होळी, गणेशोत्सवासंबंधी बरंच काही लिहिलं आहे. परंतु इथेही त्यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास केल्याचं जाणवतं. हे सण साजरे करताना ज्या अयोग्य गोष्टी होतात, ज्या पर्यावरणास हानीकारक आहेत, प्रदूषण वाढवणाऱ्या आहेत, त्या आता बऱ्याच प्रमाणात कमी झाल्या आहेत. यावर्षी गणपती मिरवणुकीत फक्त २० टक्के गुलाल वापरला गेला. जनतेला त्याच्या दुष्परिणामांची माहिती दिल्यामुळेच हे शक्य झालं. त्यासाठी कायदेकानूंचाही आधार घ्यावा लागला. त्यामुळे आता होळीलाही मोठय़ा प्रमाणावर झाडं तोडली जात नाहीत. फटाक्यांचे प्रमाणही काहीसं कमी झालं आहे. गणपतीचे मंडपही योग्य ती काळजी घेऊन उभारले जातात. तरी बरं, गणपतीपुढील आरास, देखावे आणि २५-३० तास चालणाऱ्या विसर्जन मिरवणुकीला लेखकाने ‘लोढणं’ म्हटलेलं नाही. कारण देखावे काय, आरास काय अन् मिरवणूक काय- हे तरुणाईतला उत्साह, उन्मेष आणि समर्पणाच्या भावनेचं प्रतीक आहे. अशा देखाव्यांतूनही समाजप्रबोधन केलं जातं. तरीही समजू- माणसं चुकत असतील; पण त्याचा दोष गणेशाला देऊन त्याला ‘बुद्धिहर्ता’ म्हणण्याचं प्रयोजन काय?
सतीची चाल, केशवपन, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी समाजानेच हळूहळू त्याज्य ठरविल्या. त्यासाठी कायद्याचा आश्रयही घ्यावा लागला. जसजसा समाज शिक्षित झाला, त्याच्या विचारांत, आचारांत आधुनिक विचारसरणी, शास्त्र आदींचा प्रभाव निर्माण झाला, तसतशा या रूढी संपुष्टात आल्या. जसजसा काळ पुढे सरकेल तसतशा अन्यही काही रूढी, अंधश्रद्धा लोप पावतील, हे निश्चित. परंतु कितीही खिजवण्याचा प्रयत्न केला तरी एकदम कुणी त्या टाकून देत नाही. जसं ‘देवाला रिटायर करा’ असा कितीही कंठशोष केला तरी त्याने काही साध्य होत नाही, तसंच ‘लोढण्यां’चंही आहे. याचं कारण समाजाची मानसिकता ही हळूहळू बदलते.
खरं पाहता हिंदू धर्माने कोणावरही कोणतेही बंधन घातलेले नाही. तुम्ही तुमच्या रूढी-परंपरा पाळा अथवा पाळू नका. तुमचं वर्तन निरपेक्ष, माणुसकीची कास न सोडणारं आणि प्रामाणिक असेल तर अशा व्यक्तीचे कधीही वाईट होणार नाही. हिंदू संस्कृतीत देवाला नमस्कार करण्याचंही बंधन नाही किंवा ठराविक दिवशी देवळात जाण्याचीही गरज नाही. तुम्ही देवाला नमस्कार करा वा अजिबात करू नका; तुम्हाला कुणी विचारणार नाही. सर्वसाधारणपणे प्रत्येक घरात छोटा का होईना, देव्हारा असतो. तो नसला तरी कोणत्याही दिशेला तोंड करून शुद्ध भावनेने नमस्कार केलात तरी तो जगन्नियंत्याला पावतो अशी आपली श्रद्धा आहे. म्हणूनच असा नमस्कार करणं कोणाला ‘लोढणं’ वाटत नसावं.
अशोक सीताराम जोशी, पुणे.
वडाची साल पिंपळाला!
डॉ. राजीव शारंगपाणी यांचा ८ सप्टेंबरच्या ‘लोकरंग’मधील ‘लोढणी टाका’ हा लेख मोठय़ा औत्सुक्याने वाचला आणि मनात पहिली प्रतिक्रिया उमटली- अतिशयोक्ती आणि विपर्यास करून सजवलेले लिखाण!
आणखी वाचा
First published on: 06-10-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response to article