कमलाकर नाडकर्णी यांचे बालरंगभूमीबाबतचे दोन लेख वाचले. मराठी बालरंगभूमीसाठी (बऱ्यापैकी) भरीव योगदान देणाऱ्या (कै.) नरेंद्र बल्लाळ यांचा एका ओळीत आणि तोही ओझरता उल्लेख करून नाडकर्णी यांनी बल्लाळ यांच्यावर अन्याय केला आहे. बल्लाळ माझे वडील होते म्हणून मला ही गोष्ट खटकली नाही तर मराठी बालरंगभूमीने बाळसेही धरले नव्हते, त्या काळात तिला शक्ती आणि आत्मविश्वास देण्यासाठी १९६८ साली पहिली मराठी बालनाटय़ परिषद त्यांनी स्थापन केली. त्याचे उद्घाटन गजानन जहागीरदार यांनी केले होते. पुरुषोत्तम दारव्हेकर, भालचंद्र कोल्हटकर आणि विजय तेंडुलकर यांच्यासारखे दिग्गज त्यास उपस्थित होते. सुधा करमरकर आणि रत्नाकर मतकरी यांनाही बल्लाळ यांनी आपल्याबरोबर नि:स्पृहपणे घेतले होते. मराठी बालरंगभूमीला गांभीर्याने घेतले जावे असेच  बल्लाळ यांना वाटत होते. एक प्रकारे त्यांनी बालरंगभूमीकडे सर्वाचे लक्ष वेधले होते.

मराठी बालरंगभूमी अनेकांनी आपापल्यापुरती समृद्ध केली, पण तिला सर्वसमावेशक करण्याचा पहिला प्रयत्न बल्लाळ यांनी या बालनाटय़ संमेलनाच्या माध्यमातून केला आणि त्या वेळी बालनाटय़ांना व्यावसायिक नाटय़संस्था न समजता थिएटरच्या भाडय़ात काही प्रमाणात सवलत द्यावी, असा ठरावही केला होता. परंतु त्याचा शासनाने विचार न केल्याने तो तसाच बासनात पडून राहिला. खरं म्हणजे त्याचा नाडकर्णीसारख्या लोकांनी पाठपुरावा करायला हवा होता. दुसरे बालनाटय़ संमेलन तब्बल २२ वर्षांनी भरले. त्यातही बल्लाळ यांनीच पुढाकार घेतला होता. नाडकर्णी यांना या संमेलनाचा तरी विसर पडायला नको होता. कारण तेही या संमेलनात प्रमुख वक्ते होते.

बल्लाळ यांनी विविध विषय घेऊन एकूण १२ बालनाटय़े लिहिली. मराठीतील पहिले सायन्स फिक्शन- ‘मंगळावर स्वारी’ त्यांनी रंगमंचावर आणून राजा-राणी-चेटकीण-जादूगार यांच्या पाशात अडकलेल्या मराठी बालरंगभूमीस एक नवा आयाम दिला. आर्थिक पाठबळ नसताना केवळ मराठी बालप्रेक्षकांच्या कल्पकतेला आणि वैचारिकतेला खाद्य पुरवण्याच्या तळमळीने बल्लाळ प्रयोग करत राहिले. हे काम फावल्या वेळातले नक्कीच नव्हते! दादरच्या बालमोहनमध्ये ‘मंगळावर स्वारी’चे आठवडाभर रोज, तेही ७० च्या दशकात प्रयोग करण्याचा विक्रम केला. यशवंत देवांचे संगीत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांनी रेखाटन केलेले नाटकातील पात्रांचे कपडे, सचिन शंकर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंताने आणि श्रीधर पारकर यांनी बसवलेली नृत्ये, सुविंदो रॉय या कसलेल्या बंगाली नेपथ्यकाराच्या संकल्पनेतून साकारलेले रॉकेट, सायक्लोरामाचा वापर आदी बाबी मराठी बालरंगभूमीत बल्लाळ यांनी प्रथम आणल्या. नवलभूमीचा यक्ष (व्हिजार्ड ऑफ ओझ) या बालनाटय़ाद्वारे भंपक कल्पनांवर आघात केला. 

बल्लाळ यांनी नि:स्पृहपणे बालरंगभूमीची सेवा केली. दीड खोलीच्या विलेपाल्र्यातील घरात वृद्ध आई, पत्नी कुमुदिनी आणि बालकलाकारांना घेऊन त्यांनी ‘नवल रंगभूमी’चा प्रपंच थाटला. गरिबी असली तरी दरिद्रीपणा शिवणार नाही, याची काळजी घेतली. इला भाटे, प्रिया-सुषमा तेंडुलकर, बाळ कर्वे, विजय साळवी, अविनाश मसुरेकर, पटकथा लेखक अरुणा जोगळेकर, शोभा बोंद्रे, अशोक पावसकर (टीव्ही फेम नट, दिग्दर्शक, लेखक) असे अनेक कलाकार ‘नवल रंगभूमी’मधून घडल्याच्या आम्हा बल्लाळ कुटुंबीयांना आनंद वाटतो. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिनेही कै. बल्लाळ यांच्या नाटकात (‘चंद्र हवा, चंद्र हवा’) प्रमुख भूमिका बजावली होती. आपली पदरमोड करून सुमनताई धर्माधिकारी यांच्या सहकार्याने इंदौर-उज्जन, नागपूरसारख्या परराज्यात आणि पुण्यातही जाऊन बालनाटके करण्याचे धाडस  बल्लाळ यांनी केल्याचे इथे नमूद करावे लागेल.  नाडकर्णी यांनी त्याचा उल्लेख केला असता तर अधिक बरे वाटले असते; परंतु बल्लाळ यांची मरणोत्तरही उपेक्षा झाली, असेच हा लेख वाचून वाटले. इतका अनुल्लेख नाडकर्णी यांच्यासारख्या ज्येष्ठ अभ्यासकांकडून अपेक्षित नव्हता.

– मिलिंद बल्लाळ, ठाणे.

वाचिक अभिनयाचे विस्मृत जादूगार

‘लोकरंग’ (१० मार्च)मधील आनंद मोडक यांचा  ‘मेरी आवाज’ हा लेख वाचताना प्रामुख्याने गायकांच्या आवाजांची दुनिया उलगडत गेली. पूर्वीच्या एका लेखात त्यांनी आकाशवाणीच्या आठवणी जागवल्या होत्या. त्यांचे लेख वाचून मला जुन्या काळातल्या लीलावती भागवत, बाळ कुरतडकर, प्रभाकर जोशी, कमलिनी विजयकर आदी मुंबई आकाशवाणी केंद्रावरील कलावंतांची आठवण झाली. मोडकांच्या लेखात फक्त नीलम प्रभू (करुणा देव) यांचा उल्लेख आला आहे. ही सर्व मंडळी वाचिक अभिनयाची जादूगार होती. त्यांच्या आवाजाची भुरळ तत्कालीन श्रोतृवर्गावर सतत पडत असे. लीलावतीताई वर्षांनुवष्रे महिला मंडळाचे कार्यक्रम विलक्षण जिव्हाळ्याने सादर करायच्या. त्यांना नीलमताईची साथ असायची. त्याच प्रपंच कार्यक्रमातून जोशी-कुरतडकर यांच्यासह मीना-मीनावाहिनी म्हणून घराघरात जाऊन पोचल्या होत्या. कमलिनी विजयकर रात्री दहा वाजता ‘आपली आवड’ हा बहुपसंत कार्यक्रम धीरोदात्त आवाजात सादर करायच्या. कुणी एक कलावंत (बहुधा माधव कुलकर्णी) दर शुक्रवारी  ‘गांधी -वंदना’ कार्यक्रम अत्यंत श्रवणीय करायचे. त्यात त्यांच्या व्यासंगाचे दर्शन घडायचे. दर शनिवारी ‘भाव सरगम’मधून प्रत्येक महिन्याला एक नवे गाणे रसास्वादासह ऐकायला मिळायचे.. कामगार सभेतले संवादात्मक कार्यक्रम (सहज सुचलं म्हणून) कलावंतांच्या वाचिक अभिनयाच्या बळावर लोकप्रियतेच्या शिखरावर गेले होते. चित्रपट आणि रंगभूमीवरील नाटय़संहिता यथातथ्य सादर करण्यात आकाशवाणीचा हातखंडा होता. पुणे आकाशवाणी केंद्रावरही अशीच वाचिक अभिनय-कलावंतांची समृद्ध परंपरा होती, दूरचित्रवाणीच्या आगमनाने लोकांचे आकाशवाणी कलावंतांच्या वाचिक अभिनयातले स्वारस्य संपले.

हल्लीचे एफएम रेडिओचे निवेदक वाचिक अभिनयापेक्षा वाचिक प्रहसन (फार्स) सादर करतात असं म्हणावसं वाटतं. उपरोक्त कलावंतांची छायाचित्रे क्वचितच पाहायला मिळत तरी श्रोत्यांच्या मनावर त्यांचं आणि त्यांच्या आवाजाचं अधिराज्य कायम असे. त्या जुन्या मंडळींची अवस्था आता ‘नाही चिरा, नाही पणती’ होऊ लागली आहे. कालाय तस्मै नम:, दुसरं काय!

– प्रा. विजय काचरे, पुणे.

 

अंधश्रद्धा आणि ईश्वराचे अस्तित्व

‘लोकरंग’(१० मार्च)मध्ये नरेंद्र दाभोलकर यांनी कुभंमेळ्याच्या निमित्ताने श्रद्धा-अंधश्रद्धेची मार्मिक चिकित्सा करून, ‘विश्वास-अंधश्रद्धा-श्रद्धा’ यांचे चांगले विश्लेषण केले आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्याच्या प्रसिद्धीसाठी (अगदी स्वत:च्या छायाचित्रांसह) अंधश्रद्धेला उत्तुंग स्तरावर नेणारी सर्व भाषक वर्तमानपत्रांमध्ये मोठय़ा स्वरूपातील जाहिरातबाजीवर कोटय़वधी रुपये उधळले.

या संदर्भातील दुसरा मुद्दा असा की, श्रद्धा-अंधश्रद्धांचा कितीही उहापोह केला तरी, सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांमागे ईश्वराच्या अस्तित्वाची अवैज्ञानिक संकल्पनाच आधारभूत आहे. म्हणूनच ही संकल्पना जनमानसातून बाद करण्यासाठी र्सवकष चळवळ उभारण्यात आली पाहिजे. अशा प्रकारची चळवळ उभारणे, हे पुरोगामी विचारणीशी बांधीलकी मानणाऱ्या पक्षांचे आणि संघटनांचे काम आहे, कर्तव्य आहे.

– विजयानंद हडकर, डोंबिवली, मुंबई.

 

न्यायाधीशाची भूमिका कशाला?

‘लोकरंग’ (१० मार्च) मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा ‘श्रद्धा-अंधश्रद्धेची चिकित्सा’ करण्याचा प्रयत्न  खरोखरच कौतुकास्पद आहे. पण व्यक्तिगत विश्वास हा श्रद्धा आहे की अंधश्रद्धा हे ठरवणे वाटते तितके सोपे नाही. कारण एखाद्या व्यक्तीची कृती दिसू शकते, पण त्या कृतीमागचा हेतू दिसत नाही. आणि हा हेतूच श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक ठरवतो. एखादा वास्तुशास्त्रज्ञ कागदावरच्या प्लॅनकडे पाहून ‘किती सुंदर’ असे म्हणतो, तेव्हा त्याला जशी प्लॅनकडे पाहून इमारतीची कल्पना येते आणि तो भारावून जातो, तसेच जर एखाद्या इसमाला देवळातल्या मूर्तीकडे पाहून विश्वाच्या मुळाशी असलेल्या विराटाची आठवण होत असेल आणि म्हणून जर तो इसम मूर्तीपुढे नतमस्तक होत असेल तर त्याच्या कृतीला अंधश्रद्धेचे लेबल लावणे कितपत योग्य ठरेल?

कित्येक संतांचे अनुभव सामान्य माणसाला येत नाहीत, कारण सगळी माणसे सारख्या पातळीवर वावरत नसतात. सामान्य माणूस ज्याला ‘चमत्कार’ म्हणतो,  ‘बोललेले खरे होणे’ इ. गोष्टी संतांच्या बाबतीत नित्याची बाब होऊ शकते आणि त्याच्यावर सामान्यांचा विश्वास बसत असेल तर त्याला अंधश्रद्धा कसे म्हणणार?

वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा कस आंतरजातीय विवाहांच्या म्हणजे समतेच्या निकषावरच लागणार आहे हे दाभोलकरांच्या लेखातील विधान तर पूर्ण वावगे वाटते. अब्राहम िलकनला एका खवचट पत्रकाराने विचारले होते की, ‘बाबा रे, तू वर्णद्वेषाच्या एवढा विरुद्ध आहेस तर तू काळ्या बाईशी विवाह करशील का?’ िलकन म्हणाला, ‘मी काळ्या बाईशी विवाह करणार नाही हे जितकेखरे आहे तितकेच तिला गुलाम म्हणून वागवणे िनद्य आहे, हे माझे मतही खरे आहे.’

डॉ. दाभोलकरांना श्रद्धा-अंधश्रद्धेचा ऊहापोह करण्याचे स्वातंत्र्य जरूर आहे; परंतु दुसऱ्या कोणा व्यक्तीच्या विश्वासाला श्रद्धा / अंधश्रद्धेचे लेबल लावण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र अनुचित वाटतो.

राजीव मुळ्ये, दादर, मुंबई. 

 

‘एका कोळियाने’ ही किटकाच्या जिद्दीची कविता आहे!

‘लोकरंग’(१० मार्च)मधील ‘तपशिलातून तत्त्वाकडे’ हा नारायण कुलकर्णी कवठेकर यांचा लेख वाचला. तपशील माहीत नसले की तथाकथित ‘तत्त्वे’ कशी गोत्यात येतात याचे तो उत्तम उदाहरण आहे. हेिमग्वेच्या ‘ओल्ड मॅन अँड द सी’ या अभिजात साहित्यकृतीच्या मराठी भाषांतराविषयी (जे पु. ल. देशपांडे यांनी केले आहे.) लिहिताना त्याचे शीर्षक लडिवाळ, शब्दाळू, मराठी लेखकीय शैलीचे आणि जातिवाचक आहे, असा शोध कुलकर्णी यांनी लावला आहे! ‘एका कोळियाने’ ही अवघड ठिकाणी जाळे बांधण्याचा हट्ट धरणाऱ्या आणि ते वारंवार तुटले तरी पुन:पुन्हा प्रयत्न करणाऱ्या कोळी या कीटकाच्या जिद्दीचे वर्णन करणारी कविता आहे (‘कोळ्याचा प्रयत्न’ – कवी अज्ञात, आठवणीतल्या कविता, भाग १), याचा त्यांना पत्ता दिसत नाही. ती कविता इतकी लोकप्रिय होती की, ‘एका कोळियाने’ हा मराठीतील वाक्यप्रयोगच ठरला. ‘ओल्ड मॅन अँड द सी’साठी मराठीत यापेक्षा अन्वर्थक शीर्षक सापडणे अवघड होते. असो.

मूळ मुद्दय़ाशी काही संबंध नसता आणि साध्याशा तपशिलाविषयी काही माहिती नसतानाही उगीचच जाता जाता एका कलाकृतीवर अशी पिंक टाकायची जरूर नव्हती.

दीपक कन्नल, बडोदे.