छत्रपती संभाजीनगर

महाराष्ट्रातील शहरांना स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच विवेकाचं बाळकडू मिळत गेलं. या शहरांत धार्मिक सलोखा आहे, असं मुद्दाम सांगावंही लागू नये, असा सामाजिक वारसा या शहरांनी जपला. राजर्षी शाहू, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज.. या साऱ्यांनी आपापली कर्मभूमी ठरलेल्या शहरांना वैचारिक वैभव दिलं, गोविंदभाई श्रॉफ यांच्यासारख्यांनी ते टिकवलं. वैचारिक विकास झालेल्या या भूमीत सुरुंग पेरले जाताहेत का, सामाजिक वारशाचं खच्चीकरण केलं जातंय का, अशा भयशंका मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये, कुठल्याशा निमित्तानं घडलेल्या हिंसाचारामुळे येऊ लागल्या. या शहरांकडे पुन्हा पाहिल्यास काय दिसतं?

Government initiatives like PMAY aim to address housing issues by offering financial aid for self-built homes or group housing.
IE THINC, आपली शहरे: ‘दिल्लीला कमी उंचीच्या, उच्च घनतेच्या घरांची गरज आहे’
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
Ramsar Conservation Court Public Interest Litigation filed by High Court
रामसर संवर्धन न्यायालयाकडे; उच्च न्यायालयाकडून जनहित याचिका दाखल
pune municipal corporation will take action against banners
पिंपरी : फलकांद्वारे शहर विद्रूप केल्यास आता दंडात्मक कारवाई, महापालिका आयुक्तांचा आदेश; प्रभागनिहाय नागरिकांची समिती
MIDC plot for old age home for artists thane news
‘एमआयडीसी’चा भूखंड कलावंतांच्या वृद्धाश्रमासाठी;उद्याोगमंत्र्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Citizen Centered Leave Protection Digital Personal Leave Protection Right to Privacy
‘विदा संरक्षण’ नवउद्यामींना मारक!
Mumbai, MHADA , houses MHADA ,
मुंबई : पत्राचाळीत सर्वसामान्यांसाठी म्हाडाची आणखी १,४५६ घरे

‘औरंगाबाद म्हणायचं नाही. होय, छत्रपती संभाजीनगरच,’ असं म्हणायचं आहे आता. सरकारचा कायदा आहे तसा. त्याला आव्हानही दिलं आहे. म्हणून शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हा औरंगाबाद. तसं हे शहर वसवलेलं. खडकी नावाच्या गावाला मलिक अंबरने घडवलं. पुढे त्याच्या मुलाने या शहराचं नाव फतेहनगर केलं. मग अनेक वर्षे ‘खुजिस्ता बुनयाद’ नावाने हे शहर ओळखलं गेलं. जो सत्ताधारी, त्याचं नाव, हा या शहराचा इतिहास. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या अंगाने जाताना त्याच्या धर्माच्या चौकटी मिरविणाऱ्यांनी शहराचं वातावरण अनेकदा बिघडवलं. पण दोन धर्माना जोडून ठेवणाऱ्या कहाण्याही आहेतच. मोहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब हा शहाजहानचा सहावा मुलगा. त्याचे नाव शहराला देण्याची एक कहाणी धर्मनिरपेक्ष अंगाने सांगितली जाणारी. कोण्या एका हिंदू वस्तीला आग लागली, तेव्हा राजाकडून मदत करण्यात आली. मग त्या वस्तीतील मंडळींनी त्याला एक सिंहासन भेट दिले. त्याच्या विविध रंगातून औरंगाबाद हे नाव पुढे आले. येथील राम मंदिराच्या ट्रस्टकडून भाडय़ाने दिलेल्या व्यापारी संकुलातील दुकानात अनेक मुस्लीम व्यक्ती व्यापार करतात. कधी गाडी लावण्यावरूनही या भागात वाद झाले नव्हते. १९८६ पासून शहरात दंगे होऊ नयेत यासाठी कृतीसमिती स्थापित झाली. पण शहरांचे दोन धर्मीयांमधील परस्पर अवलंबित्व कमालीचे अधिक आहे. फळ घेण्यासाठी अजूनही शहागंजमध्ये जाणारे अनेक जण आहेत. शहराच्या नावातील इतिहास असो की धर्माच्या आधारे होणारे मतदान, एका बाजूला हे सारे घडताना विकास कोणी केला, या प्रश्नाचे उत्तर देताना शिकलेली सारे लोक अजूनही रफिक झकेरिया यांचं नाव घेतात. १९८५ पासून शहराचा सूर बिघडत गेला. पण गोविंदभाई श्रॉफ हयात असेपर्यंत किमान विकासप्रश्नी तरी थेट धर्म हा आधार मानला जात नव्हता. कामगारांच्या प्रश्नी होणाऱ्या बैठकांमध्ये हिंदू- मुस्लीम दोन्ही समाजाचा सहभाग असे. विद्यापीठ नामांतराच्या काळात नामांतराच्या बाजूचे आणि विरोधक असे दोघे जण एकाच घरात होते. वैचारिक मतभेद असावेत, पण त्याचा सार्वजनिक जीवनावर आणि वैयक्तिक नाते संबंधावर परिणाम होऊ नये ही प्रगल्भताही या शहरामध्ये आहे.
(ताजे हिंसाकारण : रामनवमी उत्सवावर दगडफेक.)

कोल्हापूर..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यामध्ये असलेली सामाजिक समतेची सूत्रे कोल्हापूरच्या भूमीत पेरली गेली. त्या आधारे लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना पुरोगामी विचारांचे कार्य तडीस नेणे सोपे झाले. पुढच्या पिढीतील विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, कलाकारांमध्ये हा विचार पदोपदी दिसत राहिला. राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूरचे संस्थानिक. तरीही त्यांची संपूर्ण कारकिर्द पुरोगामी विचाराचा पुरस्कार करणारी होती. ‘ एक वेळ गादी सोडेन, पण बहुजन समाजाचा उद्धार करण्याचे कार्य सोडणार नाही,’ या त्यांच्या विधानातून त्याची प्रचिती येते. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे, अस्पृश्यउद्धाराचे कार्य, आंतरजातीय विवाह केवळ मान्यता न देता आपल्या एका भगिनीचा विवाह तशा पद्धतीने घडवून आणला. घटस्फोटाचा कायदा, प्रत्येक समाजासाठी बोर्डिग, शिक्षण संस्थांना सर्वतोपरी मदत अशा अनेकानेक कार्यातून त्यांनी आपल्या संस्थानातील मागासलेल्या अप्रवाही समाजाला उन्नतीच्या मार्गावर आणून ठेवले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे कार्य केले. त्यांच्यानंतर शाहू महाराजांनी या चळवळीचे नेतृत्व करताना अस्पृश्य, गरीब समाजाचा उद्धार घडविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी मदत करणाऱ्या शाहू महाराजांनी माणगाव परिषदेत अस्पृश्य व इतर बांधवांना परिचय करून देताना माझ्यानंतर अस्पृश्योद्धारक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच असतील, याची जाणीव करून दिली होती. यामुळेच यशवंतराव चव्हाण यांनी शाहूराजांचे वर्णन ‘मोठय़ा दिलाचा राजा’ असे केले होते. राजाराम महाराज, शहाजी महाराज यांनीही ही विचारधारा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आजही श्रीमंत शाहू महाराज या विचारांचे पुरस्कर्ते म्हणून दिसतात. स्वातंत्र्योत्तर काळातील माधवराव बागल, एन. डी. पाटील, गोविंद पानसरे अशा अनेकांनी पुरोगामी विचारधारा कृतीशीलतेने अधिकच पुढे नेली. यातूनच कोल्हापूरचे वातावरण हे समतेचे, एकमेकांना मदत करण्याचे मिळून मिसळून राहणारे बनत गेले. दग्र्यामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना होत राहिली. मोहरममध्ये पीर नाचवण्यात हिंदूू तरुणांचा पुढाकार राहिला. वि. स. खांडेकर, शिवाजीराव सावंत, रणजीत देसाई यांच्या लिखाणात याच विचारांचा धागा गुंतलेला दिसून येतो. आबालाल रेहमान सारख्या चित्रकाराला या भूमीने डोक्यावर घेतले. संगीतसम्राट अल्लादिया खाँ यांचा पुतळा उभारला. पी. सरदार यांनी रेखाटलेली हिंदूू देवतांच्या तसबिरी दिसतात; त्यामागे धर्माची आराधना करण्याबरोबर पुरोगामीत्वाचा विचार अगदी घरोघरी जपला गेला आहे, हे कारण आहे. कोल्हापूर चित्रपटांचे माहेरघर म्हटले जाते. इथल्या चित्रपट निर्मितीतून एकमेकांना आधार देत जगले पाहिजे असा संदेश ‘साधी माणसं’ देत राहिली. मराठा समाजाचे प्राबल्य असले तरी ब्राह्मण, मुस्लिम, मागासवर्गीय लोकप्रतिनिधी निवडून देताना कोणाला संकोच वाटला नाही.
(ताजे हिंसाकारण : समाजमाध्यमांवरील आक्षेपार्ह छायाचित्र.)

अमळनेर..

सुवर्णनगरी म्हणून नावारूपास आलेल्या खान्देशातील जळगावला कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि साने गुरुजी अशा थोर विभुतींचा वारसा लाभलेला आहे. अमळनेर हे तापी नदीच्या खोऱ्यात बोरी नदीकाठी वसलेले शहर. जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. धरणगावातील पाळधी येथून फार दूर नाही. १९०६ पूर्वी हल्लीचे जळगाव आणि धुळे या दोन जिल्ह्यांचा मिळून एकच खान्देश जिल्हा होता. तेव्हा अमळनेर हे खान्देशातील मध्यवर्ती ठिकाण होते. अमळनेर ही साने गुरुजींची कर्मभूमी, प्रसिद्ध उद्योगपती तथा विप्रो उद्योग समूहाचे संस्थापक अझीम प्रेमजी यांची कर्मभूमी. श्रीमंत प्रतापशेठ यांची दानभूमी, संत सखाराम महाराज यांची पुण्यभूमी आहे. खान्देशातील सामाजिक, राजकीय, औद्योगिक आणि सांस्कृतिक पंढरी म्हणून अमळनेर ओळखले जाते. स्वातंत्र्यलढय़ात अनेक मोहिमांची आखणी याच ठिकाणी झाली. दीडशे-पावणे दोनशे वर्षांपूर्वी अमळनेर येथे संत सखाराम महाराज होऊन गेले. राजकारण, समाजकारण आणि देशप्रेमाने भारावलेल्या या भूमीतून वारकरी संप्रदायाचा ध्वज मोठय़ा डौलाने त्यांनी आपल्या खांद्यावर फडकवत ठेवला. संत सखाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे या क्षेत्रास मिळालेली प्रसिद्धी आजही कायम आहे. अमळनेर साने गुरुजींची कर्मभूमी आहे. ते प्रताप विद्यालयात शिक्षक होते. भारतातील महत्त्वाचे तत्त्वज्ञान मंदिर (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फिलॉसॉफी) अमळनेरमध्ये आहे. या शहरात श्रीमंत प्रतापशेठ यांनी कापड मिल उभारली. अण्णा भाऊ साठे यांनी अमळनेरच्या मिल कामगारांवर पोवाडा रचला. ९ डिसेंबर १९४५ रोजी मोहम्मद हुसेन हाशम प्रेमजी यांच्या वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट लिमिटेड अर्थात विप्रोची मुहूर्तमेढ याच भागात रोवली गेली. विप्रोच्या आजच्या महाकाय वटवृक्षाचे बीजारोपण अमळनेरमध्येच झाले होते. विप्रोची सुरुवात शेतीमाल आणि शेतीमालावरील प्रक्रिया करून तयार झालेल्या उत्पादनांच्या विक्रीतून झाली. दिवंगत चित्रपट अभिनेत्री स्मिता पाटील यांचे मूळ गाव याच तालुक्यात आहे. त्यांचे वडील शिवाजीराव पाटील, काका उत्तमराव पाटील आणि काकू लीलाताई पाटील यांच्याशिवाय येथील इतिहासाची पाने उलटता येत नाहीत. उत्तमराव पाटील हे साने गुरुजींचे आवडते विद्यार्थी होते. या भागास साहित्याची मोठी परंपरा लाभली आहे. बहिणाबाई चौधरी यांच्याकडे जिवंत काव्य रचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. शेती किंवा घरात काम करताना उत्स्फूर्तपणे लेवा गणबोलीतील ओव्या व कविता रचून गात असत. दैववादापेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे, अशी त्यांची धारणा होती.
(ताजे हिंसाकारण : प्रार्थनास्थळाजवळील ध्वनिक्षेपक.)

नगर..

नगर जिल्हा हा साधुसंतांचा, पुरोगामी विचारांचा म्हणून ओळखला जातो. विश्वासाठी पसायदान इथेच मागितले गेले. सहकार चळवळीने येथील ग्रामीण जीवनात बदल घडवले. एकेकाळचा डाव्या चळवळींचा बालेकिल्ला. शेवगाव आणि संगमनेर ही दोन्ही शहरे मोठय़ा बाजारपेठांची. दोन्ही ठिकाणी विविध प्रश्नांवरील चळवळीचा, सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा आहे. शेवगाव म्हणजे मराठवाडय़ाचे प्रवेशद्वार. मराठवाडा मुक्तिसंग्रामातही शेवगावने मोठे योगदान दिले. निम्मा तालुका जायकवाडीच्या पाण्याने समृद्ध झालेला. स्वातंत्र्याच्या चळवळीत नानासाहेब भारदे, बाळासाहेब भारदे, मारोतराव घुले पाटील आदींनी जातधर्म न पाहता शेवगावची बांधणी केली. सहकारी-शैक्षणिक संस्था उभारल्या. सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या महात्मा सार्वजनिक वाचनालयाने येथे सांस्कृतिक चळवळ रुजवली. चाळीस वर्षांपूर्वीची, १९८२ मधील एक अपवादाची घटना वगळली तर शेवगावला दंगलीचा, तणावांच्या घटनांचा इतिहास नाही. संगमनेरही चळवळींचा इतिहास असलेले मोठय़ा बाजारपेठेचे गाव. आता कोठे या गावाची शहरीकरणाकडे वाटचाल सुरू झाली आहे. येथे संमिश्र जनसमुदाय. देशात, महाराष्ट्रात कोठे काही घडले की त्याचे पडसाद पूर्वी संगमनेरमध्ये उमटणार अशी परिस्थिती. कवी अनंत फंदी यांचे हे गाव. कॉ. दत्ता देशमुख, बी. जे. खताळ, भाऊसाहेब थोरात आणि अलीकडील काळात बाळासाहेब थोरात यांनी येथील घडी बसवली. मोठय़ा संघर्षांतून भंडारदरा, निळवंडे धरणातून पाणी मिळाले. अर्धा तालुका जिरायती; मात्र सहकाराने, दूध उत्पादनाने समृद्धी निर्माण केली.
(ताजे हिंसाकारण : शेवगाव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने काढलेली मिरवणूक , संगमनेर येथील लव्ह जिहादविरोधातील मोर्चा. )

अकोला..
अकोल्यातील राजराजेश्वर.. गायगावचा श्री गणेश.. भैरवगडचा मारोती.. काटेपूर्णाची चंडिकादेवी.. पातूरची रेणुका माता ही सर्व अकोल्याची धार्मिक अधिष्ठाने. तर, अकोल्याचे जणू उपनगर भासावे इतके खेटून असलेल्या बाळापूरची ओळखच मुस्लीमबहुल शहर. मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर असलेल्या बाळापुरात अनेक दर्गे. बाळापूरचा किल्ला असेल, दर्गा असतील वा तेथील मशिदी. मोगल साम्राज्याची एक अस्पष्ट झलक आजही या शहरात नजरेस पडते. या अशा दोन ध्रुवावरच्या दोन संस्कृती दृष्ट लागावी इतक्या एकोप्याने शांती, समता, बंधुत्वाचा आणि सद्भावनेचा संदेश देत येथे नांदतात. ९० वर्षांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी अकोला दौऱ्यावर आले होते. यादरम्यान, ते मुस्लीमबहुल बाळापूर शहरात पोहोचले. येथे हिंदूू-मुस्लीम इतक्या गुण्या-गोविंदाने एकत्रित राहत असल्याचे पाहून ते प्रचंड भारावले. खऱ्या भारताचे हेच खरे चित्र आहे, असे भावोद्गार त्यांच्या तोंडून त्यावेळी निघाले. १९९२ नंतर या भागात जाणीवपूर्वक दुही माजवण्याचे प्रयत्न झाले आणि प्रत्येकवेळी हिंदूू-मुस्लिमांनी एकत्र येत वेळीच समाजकंटकांचे डाव उधळून लावले. आताही काही काळासाठी तणाव झाला तरी तो निवळण्यासाठी सर्वधर्मीय स्वयंप्रेरणेने पुढाकार घेतात. हिंदूू-मुस्लीम एकता हीच खरी अकोला जिल्ह्याची ताकद आहे. सर्वसमावेशकता हे अकोला जिल्ह्याच्या संस्कृतीचे महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ आहे. करोनासारख्या महामारीविरोधात देखील हिंदूू-मुस्लिमांनी सोबतीने लढा दिला. करोनाबाधिताचा मृत्यू झाल्यावर रक्ताचे नातेवाईकसुद्धा अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नव्हते. त्या अत्यंत कठीण काळात ‘जनसेवा’ हीच ‘अल्लाहची इबादत’ हे ब्रीद समोर ठेवून ‘कच्छी मेमन जमात ट्रस्ट’ ही राष्ट्रीय आणि सामाजिक एकात्मतेसाठी झटणारी संघटना पुढे आली. या संघटनेच्या मुस्लीम युवकांनी शेकडो करोनाग्रस्त मृतदेहांवर त्या-त्या धर्माच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्याचे अनमोल कार्य केले. जिल्ह्यात शांतता, एकोपा, बंधुभाव पसरण्यासाठी नेहमीच सर्वधर्मीयांनी पुढाकार घेतला. हीच अकोल्याची संस्कृती आहे.
(ताजे हिंसाकारण : समाजमाध्यमावरील
आक्षेपार्ह मजकूर.)

अमरावती..

अमरावतीची तर ओळखच ‘सर्वधर्म समभाव’ जपणारे शहर अशी. सामाजिक एकात्मतेचा सेतू साधण्यासाठी संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर अविरत धडपड केली. लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने सन १९०० मध्ये याच अमरावतीत सर्वप्रथमच सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवात जात, धर्म, पंथ असा भेद कुणी केल्याचा इतिहास नाही. एका वर्षी तर उत्सवातील वादविवाद स्पर्धेचे पारितोषिक मुस्लीम स्पर्धकाला मिळाले होते, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर मोरोपंत जोशी होते. १९०२ साली स्वत: लोकमान्य टिळक गणेशोत्सवात व्याख्यान देण्यासाठी प्रथमत: अमरावतीला आले होते. मार्च १९०० मध्ये अमरावतीत थिऑसॉफिकल सोसायटीची शाखा स्थापन झाली, पुरोगामी विचारांची बिजं या काळात रोवली गेली. दादासाहेब खापर्डे, सर मारोपंत जोशी, रं. न. मुधोळकर यांसारख्या धुरिणांनी अगदी प्राणपणाने त्या विचारांचा विस्तार केला. संत गाडगेबाबांनी समाजातील अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा यावर प्रहार करीत जनजागृती केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तर विश्वाच्या कल्याणाचा विचार मांडला. शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुखांनी शिक्षणाची दारे सर्व जाती-धर्माच्या मुला-मुलींसाठी खुली केली. डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी तपोवनात कुष्ठरुग्णांची सेवा करून मानवतेचा धर्म दाखवून दिला, तोही याच अमरावतीत. मुस्लिमांच्या कार्यक्रमांमध्ये हिंदूंचा उत्स्फूर्त सहभाग असो किंवा गणेशोत्सवातला मुस्लीम बंधूंचा उत्साह, अमरावती जिल्ह्याने आनंदाचा प्रत्येक क्षण असा मिळून साजरा केला. गौरी-गणपतीच्या काळात वऱ्हाडात महालक्ष्मींची स्थापना केली जाते. पंगती उठतात. अशा घरगुती समारंभांमध्ये देखील मुस्लीम लोक आनंदाने सहभागी व्हायचे, आजही होतात.
(ताजे हिंसाकारण : मोर्चा आणि त्याबाबतचा विरोध)

लेखन सहभाग
सुहास सरदेशमुख दयानंद लिपारे
दीपक महाले मोहनीराज लहाडे
प्रबोध देशपांडे मोहन अटाळकर

Story img Loader