पारंपरिक भूत-प्रेतांच्या चित्रपटांमधील भीती गेल्या दशकापासूनच विरळ व्हायला लागली. सतानाने झपाटलेली माणसे आणि हवेल्या, झपाटलेली जंगले, भुतांकडून होणाऱ्या उपद्रवाचा या चित्रपटांमधला एकसुरी फॉम्र्युला इतका ओळखीचा झाला होता की, लहान मुलेही रात्री टीव्हीवर लागणारे ‘हॉरर शो’ मिटक्या मारत अनुभवू लागली. छोटय़ा पडद्यांवरील भयमालिकांमुळे, संगणकीय गेम्समुळे, डिस्कव्हरी-नॅशनल जिऑग्राफी यांच्यासारख्या ज्ञानवर्धक वाहिन्यांनी घेतलेल्या भुतांच्या झाडाझडतीमुळे आणि वृत्तवाहिन्यांनी मनोरंजनाचा पर्याय बनत भूत-प्रेतांच्या कहाण्यांना रंजकपणे मांडायला सुरुवात केल्यामुळे आधीच चौकटबद्ध असलेल्या या चित्रप्रकाराला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली होती. त्यातच हॉलीवूडमध्ये भयपटांच्या विडंबनाला उत्तम प्रतिसाद मिळू लागल्याने प्रेक्षकांना घाबरविण्याचा वसा घेतलेल्या भयपटांची ऐट कमी व्हायला लागली.
या स्थितीतच ‘ब्लेअर विच प्रोजेक्ट’ (१९९९) नामक भयपटाच्या नव्या अवताराने प्रेक्षकाच्या अंगावर काटा आणणारे भय पुरेपूर उपलब्ध करून दिले. ब्लेअर गावातील तथाकथित चेटकिणीने झपाटलेल्या जंगलाला माहितीबद्ध करण्यासाठी गेलेल्या तीन बेपत्ता फिल्ममेकर्सचे संकलित कॅमेरा फूटेज म्हणजे हा चित्रपट. त्यात भयनिर्मितीसाठीची कलाकुसर नाही. कुठलेही अतिरिक्त भयसंगीत नाही. ते तिघे फिल्ममेकर्स भूत-प्रेत थोतांड मानणाऱ्या पिढीचे प्रतिनिधी असल्याने चेटकिणीच्या दंतकथेचे विच्छेदन करण्यासाठी सरसावलेले असतात. त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली (किंवा न झालेलीदेखील) दृश्ये मात्र त्यांना खोटे ठरवत वास्तवाच्या आभासाद्वारे भीतीचा मोठा डोंगर प्रेक्षकासमोर उभा करते. संहितेपेक्षा प्रेक्षकाच्या मनात दडलेल्या भीतीच्या भांडवलाद्वारे हा चित्रपट इतका परिणामकारक ठरला, की त्याच्या (भय)यशाची गिनेस बुकमध्ये नोंद झाली. पण या यशापलीकडे आणखी एक फायदा हा झाला की, पारंपरिक भयपटांनी कात टाकली. भूत-प्रेत संकल्पना मांडण्याची पद्धती बदलली. ‘रिअॅलिटी हॉरर’ नावाच्या नव्या पंथाने भयपटांमध्ये आघाडी घेतली. गेल्या १०-१२ वर्षांत शेकडो चित्रपटांनी रिअॅलिटी हॉररद्वारे भयभयाट साजरा केला. अमेरिकेचे ‘पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी’, ‘क्वारन्टाईन’ (२००८), ऑस्ट्रेलियाचा ‘द टनेल’ (२०११), कॅनडाचा ‘ग्रेव्ह एन्काउण्टर’(२०११), जपानचा नोरोई (२००५) हे लक्षणीय चित्रपट ब्लेअर विच प्रोजेक्टने कॅमेरा फूटेजमधून तयार केलेला वास्तववादी दृष्टिकोन आणि भयफॉम्र्युला विस्तारताना दिसतात. थरार/भीतीची चढती भाजणी त्यात सापडू शकेल. या चित्रपटांचीही एक चौकट बनू लागली असली, तरी त्यातल्या भयठोशांची तीव्रता अजूनही शाबूत राहिलेली आहे. भयपट सगळ्यांना रूचत-पटत आणि पचत नाही, मात्र भयप्रेमी नसलेल्यांनीही आवर्जून पाहावा (आणि पाहता येण्यासारखाही) असा स्पेनचा ‘रेक’ (२००७) या पंथातील भयविलक्षण चित्रपट आहे.
‘रेक’ला सुरुवात होते, तेव्हा कॅमेऱ्यासमोर एका स्थानिक वृत्तवाहिनीची छबीदार निवेदिका अँजेला विदाल (मॅन्युएला वालेस्को) अग्निशमन दलाच्या कामावर वृत्तपट काढण्यासाठी दाखल झालेली दिसते. पॉब्लो नावाच्या कॅमेरामनने तयार केलेल्या फ्रेममध्ये तिचे सराईत शाब्दिक बागडणे सुरू असते.
अँजेला आणि चित्रपटभर कॅमेरा हातात धरल्यामुळे दिसू न शकलेल्या पॉब्लोचा कॅमेरा अग्निशमन दलातील दैनंदिन कामाचे स्वरूप चित्रबद्ध करू लागतात. तितक्यातच एका इमारतीत घडलेल्या दुर्घटनेचा दूरध्वनी धडकतो आणि अग्निशमन दलातील कर्मचारी मोहिमेवर जाण्यासाठी सज्ज होतात. त्यांच्या या मोहिमेचाही ‘आँखो देखा हाल’ अँजेला आणि पॉब्लो टिपत राहिलेला असतो. इमारतीच्या तळभागात जमलेली माणसे, वरच्या मजल्यावर राहणारी आजारी म्हातारी तेथून भलामोठा आवाज आल्यामुळे, घरात पडली असावी असा अंदाज व्यक्त करतात. त्या एकटय़ाच राहणाऱ्या म्हाताऱ्या बाईला कुणीतरी बाहेर काढणे आवश्यक असल्याचेही सुचवितात. अग्निशमन दलातील कर्मचारी-पोलीस त्या म्हातारीच्या घरामध्ये शिरतात आणि त्यांच्यापाठी अँजेला-पॉब्लो यांचा कुतूहलयुक्त कॅमेरा या सर्व घटनांची नोंद घेत राहिलेला असतो. आतमध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये उभी असलेली म्हातारी दिसते. पोलीस तिला बाहेर आणण्यासाठी पुढे जातो आणि एकाएकी त्याच्या नरडय़ाचा घोट त्या म्हातारीकडून घेतला जातो. सरळसोटपणे चाललेली कॅमेऱ्याची कुतूहलशामक माहितीची नोंदणी आता भयंकर प्रसंगांची साक्षीदार बनायला सुरुवात होते. म्हातारीच्या उग्र वर्तनाला भिऊन तळमजल्यावर पोहोचलेल्या या ताफ्याला आणखी एक धक्का बसतो, तो वरच्या मजल्यावर गेलेल्या एका अग्निशमन अधिकाऱ्याला कुणीतरी खाली फेकून दिल्यामुळे. काय घडतेय, हे इमारतीमधील रहिवासी, अग्निशमन दल, पोलीस आणि अँजेला-पोब्लो यांना कळायच्या आधीच त्या इमारतीला चारही बाजूंनी बंद करून टाकण्यात आलेले असते. बाहेर जाण्याचा रस्ता बंद होतो आणि आतमध्ये भयंकर घटनांची मालिका सुरू होते. बातमीमूल्याची जाणीव असलेली अँजेला तिच्या कॅमेरामनला सारे काही चित्रित करण्याची तंबी देते. पॉब्लोचा कॅमेरा तिच्या तंबीपासून ते घडणाऱ्या सर्व गोष्टींचा तपशील नोंदवत राहतो. जो अर्थातच ‘अंगावर काटा आणणे’, ‘भीतीने गाळण उडणे’ या टप्प्यांना पूर्ण करण्यासाठी प्रेक्षकाला तयार करतो.
‘रेक’मध्ये अनेक गोष्टींचे घाऊक मिश्रण आहे. ‘झॉम्बी’पटाची ही पूर्णपणे वेगळी हाताळणी आहे. भयपटांच्या नव्या-जुन्या फॉम्र्युलेबाज घटकांचाही त्यात समावेश आहे. भयपटांची चौकट तो मोडत नाही. मात्र जुन्या चकटीतच अनेक नवे खेळ यशस्वीरीत्या करून दाखवितो. यातील आणखी एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे तो वृत्तवाहिन्या आणि त्यांच्या प्रतिनिधींना जडलेल्या ‘दृश्यशोषणा’च्या रोगावर तिरकसपणे वार करतो. अग्निशमन दलातील एका अधिकाऱ्याची मुलाखत घेताना कॅमेऱ्याने काय चित्रित करावे आणि वाटल्यास कुठे कात्री लावावी, याचा अँजेलाकडून सुरुवातीलाच पॉब्लोच्या कानात सांगितला जाणारा मंत्र, इमारतीमध्ये अग्निशमन दल-पोलिसांनी कॅमेरा बंद करण्याबाबत घेतलेल्या भूमिकेचा धिक्कार करण्यासाठी अँजेलाची झालेली रणरागिणी, त्या आणीबाणीच्या स्थितीतही कॅमेऱ्यासमोर काही चित्रित झाल्याशिवाय बरे वाटत नसल्याची कबुली, आदी तपशील चपखल आणि वैश्विक आहेत.
भयपट या चित्रप्रकाराचे चाहते मुळातच फार कमी आहेत. सगळेच भयपट सगळ्यांना आवडत नाहीत, तरी सध्याचे रिअॅलिटी हॉरर सिनेमा या चित्रप्रकारात प्रेक्षकाला मोठय़ा प्रमाणावर रेंगाळण्यास भाग पाडणारे आहेत. विकृत-ओंगळवाण्या चेहऱ्यांचे भूत-प्रेत दाखविण्यात रमणारे व तितकेच उच्चरवातील पाश्र्वसंगीत बडविणारे भयपट आज कालबाह्य़ होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांची जागा भीतीचे अधिकाधिक नवे कल्पक मार्ग धुंडाळणाऱ्या चित्रपटांनी घेतली आहे. एका बाजूला आशियाई राष्ट्रांमधील जपानच्या उग्र भयपटांची फळी आहे, तर दुसऱ्या बाजूला ‘रेक’ पंथीय ‘रिअॅलिटी हॉरर’ जगभरामध्ये तयार होत आहेत. या चित्रप्रकाराच्या चोखंदळ चाहत्यांच्या भयसंवेदना धारदार करण्याचे काम एकूण जोमाने सुरू आहे.
बर्डस व्ह्यू : भयभयाट
पारंपरिक भूत-प्रेतांच्या चित्रपटांमधील भीती गेल्या दशकापासूनच विरळ व्हायला लागली. सतानाने झपाटलेली माणसे आणि हवेल्या, झपाटलेली जंगले, भुतांकडून होणाऱ्या उपद्रवाचा या चित्रपटांमधला एकसुरी फॉम्र्युला इतका ओळखीचा झाला होता की, लहान मुलेही रात्री टीव्हीवर लागणारे ‘हॉरर शो’ मिटक्या मारत अनुभवू लागली.
आणखी वाचा
First published on: 10-09-2012 at 04:07 IST
मराठीतील सर्व बर्डस व्ह्यू बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rec hollywood movie cinema hollywood cinema horror horror movie lokrang loksatta lokrang birds view pankaj bhosle