प्रशांत कुलकर्णी

prashantcartoonist@gmail.com

mazhi tuzhi reshimgaath fame myra vaikul little Brother ears were pierced video viral
Video: मायरा वायकुळच्या चिमुकल्या भावावर झाले कर्णवेध संस्कार, पाहा व्हिडीओ
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Bigg Boss Marathi Season 5 fame irina rudakova dance on Nagada Sang Dhol song
Video: “गरबा संपला ताई…”, इरिनाचा ‘नगाडा संग ढोल’वरील डान्स पाहून नेटकऱ्याची प्रतिक्रिया, उत्तर देत म्हणाली, “हो मला…”
marathi actress vishakha subhedar dance with niece watch video
Video: “तुमचा वारसा ही पुढे चालवणार”, विशाखा सुभेदारचा भाचीबरोबरचा जबरदस्त डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
Bigg Boss Marathi fame Ankita walawalkar fish gift to Dhananjay powar for bhaubij
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकरने भाऊबीजनिमित्ताने धनंजय पोवारला दिलं हटके गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “वहिनीला…”
savlyachi Janu Savali fame veena jagtap gift to megha dhade
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम वीणा जगतापने मेघा धाडेला दिवाळीनिमित्ताने दिलं खास गिफ्ट, व्हिडीओ होतोय व्हायरल
Bigg Boss Marathi 5 fame Nikki Tamboli was called vahini by paparazzi video viral
Video: ‘वहिनी’ हाक मारताच लाजली निक्की तांबोळी, अरबाज पटेलबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
billy zane going to play Marlon Brando role
‘टायटॅनिक’फेम अभिनेता बिली झेनचा नव्या सिनेमातील लूक पाहून चाहते झाले चकित; म्हणाले, “ऑस्कर नामांकन…”

समाजाचं किंवा समाजात घडणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा गोष्टींचं प्रतिबिंब साहित्यात, कलाकृतीत पडलं पाहिजे अशी अपेक्षा असते आणि ती रास्तही असते. काही वेळा स्पष्टपणे किंवा आधार घेऊन किंवा पाश्र्वभूमी घेऊन किंवा पुसट संदर्भ देऊन अनेक कलाकृती- म्हणजे नाटक, चित्रपट, कादंबऱ्या, कथा, कविता आणि हो- व्यंगचित्रही आकाराला येताना किंवा सादर होताना आपण बघतो. आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी किंवा संदर्भ त्यातून प्रकट झाल्याने त्या कलाकृतीशी आपली थोडीफार जवळीकही वाढते, हे खरं आहे. एवढंच काय, एखाद्या नामवंत व्यक्तीचं प्रतिबिंब त्याच्या वारसदारामध्ये शोधणं हादेखील आपला असाच एक नकळत चाळा होऊन बसतो. पुढे काळाच्या ओघात हे संदर्भ, संदर्भहीन झाले की त्या कलाकृतीही विस्मृतीत जातात. थोडक्यात- ते प्रतिबिंब कुठंतरी विरून जातं.

पण काही प्रतिभावंत व्यंगचित्रकारांनी या ‘प्रतिबिंब’ नावाच्या रहस्यमय चमत्काराचा शोध घ्यायचं ठरवलं आणि त्यातून अनेक अद्भुत, आश्चर्यजनक, गूढ कलाकृती किंवा व्यंगचित्रं निर्माण झाली.

सोल स्टाईनबर्ग नावाचा एक प्रतिभावंत चित्रकार, व्यंगचित्रकार. काहीतरी अद्भुत आणि गूढ चित्रं निर्माण करण्यासाठीच त्यांचा जन्म झाला आहे असं वाटावं. रोमानियात १९१४ साली त्यांचा जन्म झाला. तत्त्वज्ञान, साहित्य आणि आर्किटेक्चर हे त्यांचे अभ्यासाचे विषय. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ते अमेरिकेत आले  आणि लवकरच जगातील एक प्रतिभावंत कलावंत म्हणून ज्ञात झाले. रेषेद्वारे चित्रांत सतत प्रयोग करत राहणं हा त्यांचा एकमेव ध्यास. त्यांची चित्रं पाहायला लागलं की नकळत जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांची आणि व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांच्या रेषेची आठवण येते, एवढं म्हटलं तरी स्टाईनबर्ग यांच्या व्यंगचित्रांच्या जातकुळीची कल्पना येईल. त्यांची व्यंगचित्रं, रेखाटनं मुळीच हसवत नाहीत. क्वचित कधीतरी एखादी स्मितरेषा तुमच्या चेहऱ्यावर उमटेल- न उमटेल; पण खूप विचार करायला लावते त्यांची रेषा, एवढं मात्र नक्की!

‘रिफ्लेक्शन्स अँड  शॅडोज्’ या त्यांच्या पुस्तकात या विषयावरचा एक निबंध आहे. तो नीट कळण्यासाठी दोनदा तरी वाचावा लागतो. त्यात त्यांनी प्रतिबिंब आणि सावल्या याबाबत तत्त्वज्ञानाच्या अंगाने बरंच काही लिहिलं आहे. पण एक अद्भुत कल्पनाही त्यांनी मांडली आहे, ती अशी : शांत-निवांत पाण्यामध्ये पडणारी प्रतिबिंबं हे मोठं काव्यात्मक दृश्य असतं. उन्हाळ्यामध्ये जेव्हा छान उजेड असतो तेव्हा अतिशय एकसमान (सिमेट्रिकल) अशी प्रतिबिंबं पाहणं हा माझा आवडता छंद आहे. म्हणजे दोन हंस उडत आहेत आणि प्रतिबिंबामुळे एकमेकांच्या जवळ येत आहेत. होडय़ा उलट-सुलट दोन दिसत आहेत. पुलावरून जाणारी रेल्वे ही पाण्यामधून उलटी धावताना दिसते. चंद्रही उलट दिसतो! पण समजा, तुम्ही फक्त या प्रतिबिंबाकडे पाहत राहिलात तर तुम्हाला आणि फक्त तुम्हालाच एक वेगळं जग दिसेल. अशा वेळी एक गंमत म्हणून मी या प्रतिबिंबित जगावर एक छोटा दगड भिरकावतो आणि असंख्य तरंग उमटतात आणि ते सगळं जग हलू लागतं. मी उत्सुकतेने वर पाहतो- की ते वरचं खरं जगही तसंच हलतंय का?

प्रतिबिंब आणि सावल्या या संकल्पनेवर त्यांनी भरपूर चित्रं काढली आहेत. एका चित्रात त्यांनी एका पुष्करणीवर एक पक्षी पाणी पिताना दाखवला आहे. त्याचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडतंय आणि त्याचवेळी जमिनीवर त्या पक्ष्याची सावलीही पडलेली दाखवली आहे. दुसऱ्या एका चित्रात जमिनीवरच्या स्थिर गोष्टी पाण्यात हलताना दाखवल्या आहेत, तर अस्थिर गोष्टी- म्हणजे लहरणारा झेंडा, कडाडणारी वीज इत्यादी गोष्टी पाण्यातल्या प्रतिबिंबात सरळ किंवा स्थिर दाखवल्या आहेत.

एका व्यंगचित्रात तर त्यांनी इंग्रजी आकडय़ांतल्या तीन अधिक आठ बरोबर अकरा (3 + 8 = 11) या समीकरणाचं प्रतिबिंबही तेच राहतं- ही विलक्षण चमत्कृती दाखवली आहे. आकाशातले ‘STAR’  हे जमिनीवर ‘RATS’ होतात. ही केवळ अद्भुत कल्पनारम्यता नाही, तर अनेक तत्त्वज्ञानविषयक लेख यातून जन्म घेऊ शकतात, इतकं ते प्रभावी आहे. (न्यू यॉर्कर संग्रह)

‘खरं म्हणजे मी लेखक आहे. फक्त मी चित्रं काढतो, इतकंच!’ असं स्टाईनबर्ग यांनी स्वत:विषयी म्हटलंय. या पाश्र्वभूमीवर विजय तेंडुलकर यांनी वसंत सरवटे यांना ‘रेषा लेखक’ म्हटलं आहे हे लक्षात येतं. स्टाईनबर्ग आणि सरवटे यांच्यातील साम्य केवळ नाजूक रेषांनी काढलेलं चित्र इतकंच नसून काहीतरी गूढ, सत्य सांगणाऱ्या कलाकृती त्यांनी निर्मिल्या, हे आहे.

आरशातील प्रतिमा या भ्रामक असतात, हे वैज्ञानिक सत्य असलं तरी या प्रतिबिंबातून कधी कधी सत्य अभावितपणे उघड होतं, किंवा या प्रतिबिंबांकडे माणूस कधी कधी आधार किंवा दिलासा किंवा स्वप्न म्हणून अपरिहार्यपणे पाहत असतो. अशा संकल्पना घेऊन व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांनी एक अत्यंत प्रभावी मालिका चितारली आहे.

वृद्धांना एकाकीपणा हा शाप आहे असं म्हटलं तरी चालेल. या एकटेपणातून अनेक जण व्यग्र राहण्याची भूमिका निभावत असतात. म्हातारपणी कितीही जरी सुबत्ता असली तरी बोलण्यासाठी मुलंबाळं किंवा नोकर किंवा मित्र नसतील तर एखादी संध्याकाळ न संपणारी, उदास भासू शकते.

असेच हे एक वृद्ध गृहस्थ अक्षरश: स्वत:च्या प्रतिबिंबालाच ‘चीअर्स’ करून नसलेल्या मफिलीत संपलेले रंग भरण्याचा प्रयत्न करताहेत! विशेष म्हणजे प्रतिबिंबातील त्या वृद्ध गृहस्थांची अवस्थाही तशीच आहे. म्हणून तेही ‘चीअर्स’ करून पार्टीत सामील होत आहेत! विषयाचा हा प्रचंड आवाका केवळ काही रेषांत कॉम्प्रेस करण्याचं सामर्थ्य या व्यंगचित्रकारामध्ये होतं.

अक्षर, आकार, अंक इत्यादींचा सरवटे इतक्या वेगळ्या प्रकारे विचार करतात, की थक्क व्हायला होतं. मराठी भाषेवरची त्यांची हुकुमत त्यावेळी जाणवते. उदा. ‘कलंक’ या शब्दाचं प्रतिबिंब ‘कलंक’ हेच राहतं. या प्रतिमेतून ते एक वेगळंच सत्य वाचकांसमोर मांडतात.

विनोदी नाटकात प्रेक्षकांना मनमुराद हसवण्याचं नेहमीचं हातखंडा असलेलं आपलं काम आज काही फारसं चांगलं झालं नाही याचं दु:ख त्या विदूषकरूपी नटाला होत असतं. मुखवटा हसरा असला तरी त्याआड दडलेल्या अश्रूंना शेवटी तो ग्रीन रूममध्ये वाट मोकळी करून देतो. त्याचवेळी हे आजचं अपयश, पराभव, अपमान, उद्वेग, नराश्य यांतून त्याने लवकर सावरावं म्हणून त्याचं सांत्वन करायला शेवटी त्याचं प्रतिबिंबच पुढे येऊन त्याला जवळ घेतं! (‘सरवोत्तम सरवटे’- लोकवाङ्मय गृह )

केवढी काव्यात्म कल्पना! केवळ अद्भुत!! या दोन्ही प्रतिभावंतांच्या प्रतिभेचं प्रतिबिंब जणू या चित्रांतून उमटल्यासारखं वाटतं!