-पवन नालट

माणूस हा पावसासारखाच असतो. कधी तो दुष्काळ होऊन आपले अंतरंग पोळून घेतो, कधी वळिवाच्या पावसासारखा अचानक बरसून मनाच्या पारव्याला साद घालत राहतो. कधी उग्र रूप धारण करून आपल्या भूत-भविष्य आणि वर्तमानात कोसळत राहतो. बांध तोडून वाहत राहतो सैरभैर, कधी आपल्याच मातीत मिसळून जातो ओलाचिंब होऊन. पावसाची कितीतरी स्मरणे मनात उमटून राहिली आहेत तशीच जशी रेखलेली रंगीबेरंगी रांगोळी बिलगून राहते सारवलेल्या मातीला. पाऊस म्हटला तर अंगभर फुटणारा चैतन्याचा पान्हा आणि अंगावर काटा आणणारे रौद्ररूप अशा दोन्ही रूपांना मी अनुभवलेय. बालपणातल्या आणि नंतरच्या देखील अनेक पावसाळलेल्या आठवणी वाफाळलेल्या चहाच्या साक्षीने पावसाळा आला की हमखास एका-एका घोटासरशी आठवत राहतात.

आमच्याकडे तसा उशिराच पाहुणा म्हणून येणारा पाऊस, पण आला की आम्ही बालपणी दंग होऊन पावसात भिजत राहायचो. पावसात अनवाणी पायांनी आजूबाजूच्या रानात हुंदळून आल्यावर पायात रुतलेले काटे काढण्याची मग कसरत चालायची. पावसातली रानभर उगवलेली तरोट्याची भाजी खुडून आणताना भारी आनंद व्हायचा. कितीही दप्तर झाकले तरी चोरपावलांनी दप्तरात शिरून शाळेची पुस्तके तो काठाकाठाने भिजवायचाच. चिखलाने माखलेले कपडे आणि हातात चिखलाने बरबटलेल्या वहाणा असा घरी परतेपर्यंत अवतार झालेला असायचा. पूर्वी निक्षून येणारा झडीचा पाऊस आता मात्र अनुभवायला कमीच मिळतो. मला आठवते, १९९४ चा काळ तो, आमचे राहते घर बाबांनी अमरावतीच्या जवळपास शेती असणाऱ्या भागात बांधले होते. आता मुख्य शहरात आलाय हा भाग, पण त्या वेळच्या पावसाच्या आठवणी अजूनही मनात आहे. दोन खोलीचं घर आणि प्रचंड येणारा पाऊस, घरभर छपरातून पाणी गळत राहायचे आणि ते पाणी पराती लावून जमा करण्यात आमची दमछाक व्हायची.

Memories of Rain, Memories of Rain in Village, Memories of Rain Impact Over Time, Impact Over period of Time, lokrang article, article rain memories, rain article in marathi,
प्रत्येकाचा जलसण वेगळा…
delayed, arrival, rain, rain news,
दगाबाज ऋतूला पत्र…
story of hrishikesh palande about konkan rain
किती याड काढशील?
Mumbai, rain, experience,
ज्याचा-त्याचा पाऊस.. : निळया ताडपत्रीचा दृष्टांत
Health care also has a different system of advertising
आमचे येथे आरोग्य दुप्पट करून मिळेल
chaturang article, children first bike, children desire for bike in age of 16, Valuable Lesson in Gratitude, electric scooter, new generation, Changing Dynamics of Childhood Desires,
सांदीत सापडलेले.. ! वाढदिवस
chaturang article, modern child rearing, Daily Struggles of Feeding child, child feeding, child rearing, marathi article
सांदीत सापडलेले.. : पूर्णब्रह्म!
chaturanga anti aging marathi news
कारी बदरी जवानी की छटती नहीं…

हेही वाचा…विखंड भारत, अखंड लोक

घराची दारे आंब्याच्या लाकडाची असल्याने पावसाच्या पाण्याने फुगून जायची. त्यामुळे ती न लागल्याने घरात पाणी जमा होऊ नये म्हणून नाना उपद्व्याप आम्ही करायचो. नागपंचमी आली की हमखास पावसाची झड असायची. भर पावसात आजोबांसोबत जवळच्या नागदेवतेच्या ठाण्यावर आरती घेऊन जात असू. घरापर्यंत रस्तेच नसल्याने जंगलातल्या वळणवाटेने पावसाने चिखल-चिखल व्हायचा. तान्ह्या पोळ्याला भरपावसात भिजू नये म्हणून गोणपाट उलटे करून त्याची घोंगशी बनवून, डोक्यात घालून मातीचे बैल लोकांकडे फिरवायचो. पावसाने इतक्या आठवणी दिल्यात की मन भरून गेलेय. त्या वेळी बालपणी अबोधमनाने घराशेजारी तुरीच्या शेतात भर पावसात माती उकरून त्यात वीस पैसे ठेवायचो, कुणी तरी सांगितले होते की तसे केल्याने पैसे आपोआप वाढतात. ही खुळी समजूत, पण पावसाळा गेला की ठेवलेल्या पैशासोबत कुठे तरी वाहून गेलेली असायची. पण ओल्याचिंब मातीने शाकारलेले हात अजूनही मनाचं निर्माल्य होऊ देत नाहीत. प्राथमिक शाळा चार किलोमीटर लांब, शाळेपर्यंत पायी जाताना गुडघाभर चिखलातून माखून शाळेत गेल्यावर पहिले पाय स्वच्छ धुण्याचा सोपस्कार चाले. त्यातही शाळा म्हणजे भिंती म्हणून बांबूचे तट्टे आणि वर टिनपत्रे असलेली. त्यामुळे पाऊस धो-धो कोसळायला लागला की शिकवणाऱ्या बाईंचा स्वर आणि पावसाचा षड्ज कधी एक व्हायचा कळायचे नाही. अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात शिक्षण घेताना तिथल्या ब्रिटिशकालीन इमारतीच्या परिसरात येणारा पाऊस औरच वाटायचा. सारे विभाग दूर-दूर असल्याने पावसात होणारी पळापळ, कॉलेजच्या कँटीनवर झालेली गप्पाष्टकांची मैफील मुसळधार पावसात आणखीनच रंगायची. वाटायचे याच महाविद्यालयाच्या अशा रेशमी पावसात भिजत कवी सुरेश भटांच्या शब्दांच्या किती तरी मैफली सजल्या असतील.

विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा वैशाखात उन्हाच्या झळांनी निष्पर्ण झालेले असते, पण पावसाळ्यात मात्र अंगावरची वल्कले फेकून देऊन चिखलदरा संततधार पावसाने स्वप्नवत वाटावा असा बहरून येतो. मेळघाट, सेमाडोह इथे गेल्याशिवाय पावसाळा पूर्णच होत नाही. वडील सैन्यात परराज्यात असल्याने काही वेळा महत्त्वाच्या सणांना घरी नसायचे. अशाच एका दिवाळीला ऐन दिवेलागणीला पाऊस हजर झाला होता. त्यातच बाबा अनपेक्षित कातरवेळी घरी आले तेव्हा डोळ्यात आनंदअश्रूंचा पाऊस आणि बाहेर रिमझिम पाऊस बरसत होता..

हेही वाचा…तवायफनामा एक गाथा

विदर्भातला सारा पाऊस तसा अनाकलनीयच म्हणायला हवा. मनमानी वागणारा, चातकासारखी वाट बघायला लावणारा आणि उनाड मुलासारखा पायाला भिंगरी बांधलेला. जितका आम्हाला कडक उन्हाळा प्रिय तितकाच पाऊसही प्रिय. वैदर्भीय माणूस म्हणजे तप्त उन्हात फुलून येणाऱ्या पळसासारखा आहे. म्हणून न्याय-अन्याय सहन करत जगण्याचे कोमल आणि तीव्र स्वर त्याने आपल्या स्वभावात स्वाभाविकपणे रुजवून घेतलेले असतात. पूर्वीसारखा वळिवाचा पाऊस आणि रोहिणी नक्षत्रात हमखास हजेरी लावणारा पाऊस आता हवा तेव्हा येतच नाही. त्यात मृग नक्षत्र लागून महिना उलटून गेल्यावर पावसाची जूनअखेर किंवा जुलैला सुरुवात होते. एखाददुसऱ्या पावसानंतर बरेच शेतकरी पहिली पेरणी करून टाकतात आणि त्यानंतर पाऊस नेमका दडी मारतो. मग मात्र दुबार पेरणीच्या फेऱ्यात आलेल्या शेतकऱ्याचे डोळे पावसाच्या प्रतीक्षेत कोरडेठाक होत जातात. पेरणी केल्यावर जर पाऊस आलाच नाही तर भेगाळलेल्या भुईकडे बघून अख्खे गाव अन्नाच्या घासालाही शिवेनासे होते. पाऊस आला तर जेमतेम, खूप झाला तर पिकांची माती करणारा पाऊस आणि चांगले पीक झाले तर मालाला हमीभाव नाही अशा तिरंगी संघर्षात शेतकरी पोळत राहतो.

ग्रामीण भागात शिक्षक म्हणून काम करताना हे जवळून पाहिलेय. पाऊस दीर्घकाळ आला नाही तर गावावर जणू मरणकळा आलेली असते. चौका-चौकात तोंडचे पाणी पळालेली माणसे आ वासून आभाळाकडे टक लावून बसलेली असतात. मला आठवते, २०१९ साली ग्रामीण भागातील शाळेत रुजू होऊन मला काही महिने झाले होते. ज्या गावात रुजू झालो त्या गावाला दोन्ही बाजूने नद्यांचा घेरा होता. पाऊस नसल्याने कोरड्या पडलेल्या नद्या आणि एकीकडून भरपूर पावसात वाहून गेलेला पूल. त्यामुळे कोरड्या नदीपात्रातून बऱ्याचदा शाळेत मी जात होतो. पुढे पावसाळा भरात आल्यावर मात्र या नद्यांना खूप पूर यायचा. पलीकडच्या गावाला जोडणाऱ्या निमुळत्या पुलावरून यादरम्यान मी ये-जा करायचो. पण पूर आला की तोही पूल पाण्याखाली जायचा. एकदा त्याच पुलावरून पूर भरात असताना पूल ओलांडायचे केलेले भलते धाडस माझ्या जिवावर बेतले. त्या दिवशी सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत होता. ओढे, नद्या दुथडी भरून वाहत होत्या. काळ्या ढगांनी झाकोळलेल्या प्रहरी, शाळेतून परतताना तो निमुळता पूल सहकाऱ्यांसोबत ओलांडताना अचानक आलेली भोवळ मला कडा नसलेल्या पुलावरून कधी नदीपात्रात घेऊन गेली याचे भान मला प्रवाहात तीन-चार बुचकळ्या खाल्ल्यावर आले. पुराच्या पाण्याचा प्रवाह पुढेपुढेच ढकलत होता आणि नदीकाठच्या माणसांचा जमाव धूसर होत चालला होता. प्रवाहातून एकदाच नजर वर गेली तेव्हा दिसला तो नदीकिनारी असणाऱ्या आसरादेवीच्या उंच मंदिराचा फक्त कळस. आशा सरलेली असताना एका भल्या माणसाने जिवाची बाजी लावून पुराच्या प्रवाहात उडी टाकली आणि शिताफीने माझे प्राण वाचवले म्हणून हा जीव तरला. अनेक गावांतील नद्यांना नसलेले आणि असलेले अरुंद पूल राजकीय आश्वासनांच्या पावसात वाहून जातात आणि आश्वासनांचे पूल मात्र आपल्याकडे टिकून राहतात ही शोकांतिका आहे. निष्पाप माणसे, जनावरे ज्यांचे सर्वस्व पुरात वाहून जाते त्यांच्यावर दु:खाचा डोंगर होऊन पाऊस कोसळतो.

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : जातवास्तवाचा शोध…

मनाची डायरी तर अजूनही फडफडते आहे. किती तरी लिहिले आणि किती तरी लिहायचे आहे पावसाला. त्याने लिहिलेल्या अनेक स्पष्ट-अस्पष्ट ओळी बोलत राहतात, सारख्या काहीबाही. सांगत राहतात रंगलेल्या आणि रापलेल्या चेहऱ्यांच्या गोष्टी. मुद्दाम खोडलेल्या कहाण्या ओल्याचिंबच राहतात कधीही डायरी उघडली तरी.

(विदर्भातील लोकप्रिय कवी. ‘मी संदर्भ पोखरतोय ’ या काव्यसंग्रहाला २०२२ सालचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार. )

pawannalat@gmail. com