नागपूरपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरील कळमेश्वर वनपरिक्षेत्र म्हणजे वनविभागासाठी अस्तित्वहीन जंगल. बेहडय़ाची झाडे व निलगायींचा अधिवास म्हणजे मृतवत जंगलाची ओळख. तसेच काहीसे हे जंगल होते. ७ फेब्रुवारी २०११ रोजी या जंगल परिसरातील एक वाघीण कातलाबोडी गावातील विहिरीत पडली. तातडीने पावले उचलून नागपूर वन्यजीव आणि प्रादेशिक विभागानं मृत्यूच्या दाढेतून तिला परत आणले. परंतु तिच्या पोटातील बच्च्यांना मात्र गमावावे लागले. आठवडाभर तिच्यावर उपचार करून पुन्हा तिला जंगलात सोडण्याच्या निर्णयाला तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक डी. सी. पंत यांनी हिरवा कंदील दाखवला आणि तिच्यासाठी अधिवासाची शोधाशोध सुरू झाली. या वाघिणीला रेडिओ कॉलर न लावता जंगलात सोडायचे म्हणजे एकांत असलेल्या वनाची गरज होती. कळमेश्वर वनपरिक्षेत्राशिवाय दुसरा कोणता चांगला पर्याय नसल्यामुळे तिला सोडताना तिच्या भविष्याचाही विचार करण्यात आला. १४ फेब्रुवारी २०११ ला या वाघिणीने या जंगलाच्या दिशेने झेप घेतली.
वन्यजीव विभागाचे कार्य येथे संपले आणि प्रादेशिक विभागाने त्यांच्या कामास सुरुवात केली. त्या वाघिणीसाठी खाद्य, त्या खाद्यान्नासाठी खाद्य आणि पाणी या गोष्टी तिथे नव्याने निर्माण करायच्या होत्या. अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पासाठी अशी कामे करायची तर निधी उपलब्ध असतो; पण या मृत जंगलाला जिवंत करण्यासाठी निधी नव्हता. इंग्रजांनी शिकवलेल्या ‘फॉरेस्ट्री’चा आणि आधुनिकतेच्या आहारी न जाता परंपरागत पद्धतीचा वापर करून या जंगलाचा पोत सुधारण्यास सुरुवात झाली. यात सर्वात मोठा अडसर होता तो गावकऱ्यांचा. कारण त्यांच्या जनावरांसाठी हे जंगल म्हणजे उदरनिर्वाहाचे साधन होते. त्यामुळे गावकऱ्यांनाच विश्वासात घेऊन अवैध चराई आणि सरपणाला आवर घातला गेला. त्यांच्या जनावरांसाठी वेगळी व्यवस्था करून सिलिंडर आणि दुभत्या जनावरांची व्यवस्था केली गेली. या जंगलातल्या अवैध रेती-उत्खननाला प्रतिबंध घातला गेला. एवढेच नव्हे, तर जंगलाच्या संरक्षणासाठी गावकऱ्यांचीच मदत घेतली गेली. पावसामुळे जंगलातील माती वाहून जात होती आणि पाणीही साठत नव्हते. त्याकरता सर्वात आधी बांबूंची लागवड केली गेली. पावसाच्या पाण्यामुळे वाहून जाणारी माती त्यामुळे स्थिरावली. अलीकडे अभयारण्य असो की व्याघ्रप्रकल्प- उन्हाळ्यात पाण्यासाठी बोअरवेल, सोलर पंप लावून जमिनीतील पाणी संपवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. मात्र, या छोटय़ाशा जंगलात नदीनाल्यांमधून वाहून जाणारे पाणी अडवले गेले. मृत झालेले पाण्याचे नैसर्गिक स्रोत जिवंत करून अतिशय कमी पैशांत श्रमदानातून बारमाही पाणी उपलब्ध झाले. फारच क्वचित पाण्याची कमतरता भासली, तर या नैसर्गिक स्रोतातच टँकरने पाणी सोडण्याचा प्रयोगही यशस्वीरीत्या केला गेला.
या सगळ्यामुळे गेल्या तीन वर्षांत अतिशय कमी क्षेत्रात असलेल्या या जंगलाचा नूरच पूर्णपणे पालटला. गवताची पातीही न दिसणाऱ्या या जंगलात आता गवताळ प्रदेश तयार झाला आहे. त्यामुळे त्यावर अवलंबून असणाऱ्या आणि वाघांचे खाद्य असलेल्या हरणांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. निलगायींशिवाय कुठलाच प्राणी न दिसणाऱ्या या जंगलात आता मोठय़ा संख्येने हरणे व अन्य वन्यजीव वाढल्यामुळे वाघांसाठी खाद्य तयार झाले आहे. वन्यजीव प्रजातींची संख्या अधिक आणि जंगल कमी अशी परिस्थिती उद्भवल्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षांची भीती होती; परंतु तत्कालीन उपवन संरक्षक पी. के. महाजन आणि तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप टेकाडे यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यातही यश मिळवले. रात्री-बेरात्री या जंगलाच्या सुरक्षेसाठी धावून जाणारे कदाचित ते पहिलेच अधिकारी ठरावेत. जंगलाच्या पुनरुज्जीवनासाठी जे जे काही करावे लागेल, ते ते या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिले. अधिकारी आणि गावकऱ्यांमधील दुवा ठरला तो मानद वन्यजीवरक्षक कुंदन हाते. त्या वाघिणीला मृत्यूच्या दाढेतून वाचवण्यापासून ते तिला जंगलात सोडण्यापर्यंत आणि हे जंगल पुनरुज्जीवित करण्यापर्यंत या गृहस्थाने केलेले कार्य अतुलनीय आहे. कधीतरी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत गावकऱ्यांची जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या घटना इथे अधूनमधून घडतातही; पण गावकरी त्याचा ‘इश्यू’ करत नाहीत आणि नुकसानभरपाईचा आग्रहही धरत नाहीत. कारण त्यांची गावेच या जंगलात असल्यामुळे अशा घटना घडणारच, अशी या गावकऱ्यांची मानसिकता आता झालेली आहे. उलटपक्षी या जंगलाच्या संरक्षणासाठीच ते आता सरसावले आहेत.
पुनरुज्जीवित झालेल्या या जंगलाचे आणखी एक यश म्हणजे त्या वाघिणीला झालेले बछडे! गर्भपातानंतर रेडिओ कॉलर न लावता तिचा मागोवा कळमेश्वर वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी घेतला. वेळोवेळी कॅमेरा ट्रॅपिंगची पाहणी, वाघीण कुठे जात आहे ते बघणे, या गोष्टी कर्मचाऱ्यांनी मनापासून केल्या. अर्थातच त्यांच्या या पाहणीला गावकऱ्यांनीही साथ दिली. आज गावकरी आणि कर्मचाऱ्यांच्या या संघटित कार्याला आलेले यश म्हणजे २०११ मध्ये गर्भपात झालेल्या या वाघिणीने अलीकडेच तीन बछडय़ांना जन्म दिला आहे. दीड ते दोन वर्षांचे हे बछडे आज या जंगलात मुक्तपणे संचार करतात. कधीकाळी वनविभागानेच पाठ फिरवलेल्या या जंगलात आता अभयारण्यालाही लाजवेल अशा तऱ्हेने सुमारे पाच ते सहा वाघांसह इतरही वन्यजीवांचा वावर आहे. जंगलातच गावे आणि जंगलातच सुरुंगांचा कारखाना आहे.
अधेमधे या सुरुंगांचे स्फोटही होतात. परंतु या वातावरणालाही हे वन्यजीव आता सरावले आहेत. एरवी अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्पालगत मानव-वन्यजीव संघर्षांची कैक उदाहरणे दिसून येतात. मात्र, नव्याने जन्मलेल्या या जंगलात गेल्या तीन वर्षांत तरी असा प्रकार घडलेला नाही. त्यामुळे निधीचा स्रोत नसताना मृत जंगलाला पुनरुज्जीवन देण्याचा, तिथे वन्यजीवांसाठी अधिवास निर्माण करण्याचा भारतातील हा पहिलाच अभिनव प्रयोग असावा.                                                     
 

vasai virar loksatta news
वसई : निधी मिळाला, तीनदा भूमीपूजनही झाले मात्र रुग्णालय नाही; आचोळे रुग्णालयाची प्रतीक्षा कायम
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
uran Kandalvan forest latest news in marathi
कांदळवनाची सुरक्षा धोक्यात, उरणमधील कांदळवने विविध मार्गांनी नष्ट करण्याचे प्रयत्न
dilapidated railway bridge on Nagpur Chhindwara route will be opened
नागपूर – छिंदवाडा मार्गावरील खचलेला रेल्वे पुला सुरू होणार,मुहूर्त ठरला
Bangladesh Settlement name change demand by local residents
ऐकावे ते नवलच! नागपूरच्या एका वस्तीच्या नावाने तेथील हजारो लोकांसमोर संकट…
Nagpur, mango tree , Bhonsale period ,
भोसलेकालीन ‘आमराई’ ओसाड होण्याच्या मार्गावर!
Hair loss and baldness cases reported in 11 Shegaon villages unsafe water found in Matargaon
टक्कलग्रस्त माटरगावमधील पाणी अपायकारक! ‘नायट्रेट’चे जास्त प्रमाण
forest lands latest news in marathi
वनहक्क जमिनी दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने धनदांडग्यांच्या घशात
Story img Loader