अनिल साबळे
१९६० नंतर मात्र मराठी कादंबरीचा चेहरामोहरा बदलून गेला. प्रादेशिकता आणि ग्रामीणता यांच्या मर्यादांतून मराठी कादंबरी सुटली. महानगरे, छोटी शहरे आणि ग्रामीण परिसर असे विविध प्रदेश मराठी कादंबरीने आपल्या कवेत घेतले. मनोहर शहाणे हे या काळात पुढे आलेले महत्त्वाचे नाव. त्यांच्या कौटुंबिक नातेसंबंधांवरच्या आणि दु:खांच्या तीव्र वेदना घेणाऱ्या माणसांच्या अनेक कादंबऱ्या लक्षवेधी ठरल्या. मृत्यू आणि नियतीचे गडद काळे आभाळ वाचनातून अनुभवायला देणाऱ्या शहाणे यांच्या ‘धाकटे आकाश’ या कादंबरीविषयी..
कादंबरी हा एक गंभीर वाङ्मयप्रकार आहे. जीवनदर्शन आणि कलात्मकता या दोन्ही गोष्टींनी तो लेखकाची कसोटी पाहणारा खडतर प्रकार आहे. १९४५ ते १९६० हा कथेचा कालखंड मानला तर १९६० नंतरचा कालावधी हा कादंबरीचा मानावा लागेल. १९६० नंतर मात्र मराठी कादंबरीचा चेहरामोहरा बदलून गेला. उद्धव शेळके, भाऊ पाध्ये, मनोहर शहाणे, भालचंद्र नेमाडे, मनोहर तल्हार अशी कितीतरी नवी नावे या काळात समोर आली. साहित्यिक मासिकांच्या वाचनाचा हा सुवर्णकाळ असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यांतून कादंबरी लेखकांची नवी फळी तयार झाली. समाजाच्या विविध स्तरांतील जीवन या कादंबऱ्यांतून समोर आले. कादंबरीलेखनाच्या धाटणीतही बदल झाले. प्रादेशिकता आणि ग्रामीणता यांच्या मर्यादांतून मराठी कादंबरी सुटली होती. महानगरे, छोटी शहरे, आणि ग्रामीण परिसर असे विविध प्रदेश मराठी कादंबरीने आपल्या कवेत घेतले.
साठोत्तरीत नाशिकमधील साहित्यिक मंडळातून पुढे आलेले एक नाव होते मनोहर शहाणे. ‘धाकटे आकाश’ ही त्यांची कादंबरी १९६३ मध्ये मौजेने छापली. त्यानंतर पुढल्या दशकांत वृत्तपत्र, मासिकांचे संपादन करीत शहाण्यांनी डझनांहून अधिक लक्षणीय पुस्तकांची निर्मिती केली. ‘झाकोळ’, ‘पुत्र’, ‘लोभ असावा आणि एखाद्याचा मृत्यू’, ‘ससे’ या मानवी नात्यांशी संबंधित अतिशय उत्तम कादंबऱ्या वाचणाऱ्यांना त्यांच्या लेखनाची ताकद कळू शकेल.
‘धाकटे आकाश’ या त्यांच्या पहिल्या कादंबरीत सुरुवातीपासून मृत्यू आणि नियतीचे काळंकुट्टं आभाळ आपला पाठलाग करत राहते. नंतरच्या काळात गाजणाऱ्या अनेक नावांमुळे बऱ्यापैकी झाकोळल्या गेलेल्या लेखकांपैकी एक नाव मनोहर शहाण्यांचे. ‘धाकटे आकाश’ या कादंबरीची दखल मराठी साहित्य क्षेत्रात मोठया प्रमाणावर घेतलीच गेली नाही. मध्यमवर्गाबाहेरचे फारसे चित्रण ही कादंबरी करीत नाही. तरीही जीवनदर्शनाच्या दृष्टीने ती एक वैशिष्टपूर्ण आहे. वास्तव चित्रण आणि मध्यमवर्गाविषयी असणारी आस्था हे कादंबरीचे महत्त्वाचे गुण.
‘धाकटे आकाश’ कादंबरीतला धाकटा नायक मध्यमवर्गातील असल्यामुळे तो भवतालच्या परिस्थितीचा एक प्रेक्षक होण्याऐवजी त्या जीवनाशी समरस होतो. ‘धाकटे आकाश’ लिहिण्यापूर्वी या कादंबरीसंबंधीचा अस्पष्ट असा आकार त्यांच्या मनात होता. नाशिक येथील अनामिक वाङ्मय मंडळासाठी शहाणे यांनी ती कथा स्वरूपात लिहिली आणि नंतर तिचा विस्तार केला. या कादंबरीमध्ये मध्यमवर्गीयांच्या आर्थिक विवंचनेचे तसेच दुरवस्थेचे अंत्यंत प्रभावी चित्रण मांडले आहे.
‘धाकटे आकाश’ या कादंबरीमध्ये धाकटय़ाचे जग आणि त्याच्या भवतालच्या मोठय़ा माणसांचे जग यांच्यातील संबंधांचे वेगवेगळे पैलू चित्रित झालेले आहेत. धाकटा म्हणजे मधू वालावलकर. इयत्ता चौथीमध्ये शिकणारा मुलगा. धाकटय़ावर वडिलांचे प्रेम होते, पण धाकटा मूळ नक्षत्रावर जन्माला आला होता म्हणून त्याचे तोंड पाहायचे नाही, असे त्याच्या वडिलांनी ठरवलेले होते. पुढे धाकटा सहा महिन्यांचा असताना त्याचे वडील प्लेगने वारले. माणूस प्लेगने वारतो म्हणजे काय होते, हे धाकटय़ाला माहीत नव्हते. धाकटय़ाच्या वर्गातला एक मुलगा त्याला सांगतो की माणसाला उंदीर चावतो आणि मग अंगावर गाठी येतात. हे ऐकल्यावर धाकटा शहारतो. धाकटय़ाची आईसुद्धा चिडल्यावर धाकटय़ाला ‘बत्तीसलक्षणी कारटं! मूळ नक्षत्रावर जन्मलं अन् बापाला खाऊन टाकलं’ असे म्हणायची. त्यामुळे धाकटय़ाला अपराधी वाटायचे. धाकटय़ाचे वडील वारल्यावर घरात आई, थोरला आणि धाकटाच उरले. घराचा जेवढा भाग वाटय़ाला आला तेवढय़ात घरखर्च भागत नव्हता म्हणून धाकटय़ाची आई दुसऱ्यांच्या घरी भांडीधुणी करायची. चार जीव असलेल्या कुटुंबाच्या कहाणीत आपले मन खेचून ठेवण्याचे सामथ्र्य या कादंबरीत आहे. शहाणे यांची संवेदनशील मन आणि सूक्ष्म निरीक्षणशक्ती जागोजागी लख्ख होत राहते.
धाकटा आणि त्याची आई बांबडर्य़ावरून नाशिकला निघते. तेव्हापासून कादंबरीला सुरुवात होते. बांबर्डे हे धाकटय़ाच्या आजीचे गाव. धाकटय़ाच्या आजीचे घर अगदी गावटोकावर. गावातल्या एका चौकात घासलेटचा कंदील काचेच्या घरात ठेवलेला होता. कंदिलातील पिवळय़ा प्रकाशावर धाकटा प्रेम करू लागला. धाकटय़ाच्या आईला माहेर सोडल्याचे आणि धाकटय़ाला गाव सोडावे लागल्याचे दु:ख होते. धाकटा तसा गोष्टी सांगण्यात मोठा पटाईत. जैन मंदिराच्या उंच ओटय़ावर बसून तो मित्रांना काल्पनिक गोष्टी सांगायचा. धाकटय़ाचा म्हातारा आजा नेहमी गोधडी पांघरून झोपून असायचा. धाकटय़ाच्या आज्याला पाचदहा मिनिटांला एकेक कप चहा लागायचा. धाकटय़ाची आजी आपल्या नवऱ्याला ‘मरत का नाहीस?’ ‘जीव का देत नाहीस?’ म्हणून हिणवत राहते. परंतु पुढे तीच आजी-आजा वेडय़ांच्या रुग्णालयात नेताना कासावीस होते. या म्हाताऱ्याला चहा पाजा म्हणून पोलिसाला एक रुपया देते.
धाकटा बांबडर्य़ात असताना मामाच्या गोठय़ात एक लांबलचक साप निघाला. कंदिलाच्या प्रकाशात वैरणीवर असलेल्या सापाला मामाने चेचून मारून टाकले. मारलेला साप जाळला. जाळलेला हा साप राखेतून आपल्या अंगावर धावून आला तर आजी आपले रक्षण करील असे त्याला वाटायचे. धाकटा मामासोबत गुरे वळत टेकडीवर जाई. धाकटय़ाला माळरानावरची तांबडभुरकट माती आवडायची.नाशिकला जाणारी मोटार निघून गेल्यावर ‘‘गेली मोटार, आता बसा रडत,’’ असे बोलणारा मामा धाकटय़ाला एकंदर वाईट वाटतो. मोटार निघून गेल्यावर धाकटय़ाची आई चिडून म्हणते, ‘‘बरे बरे. आम्ही जाऊ पायी पायी नाशिकरोडला. काळजी करू नको. तुझ्या घरी परत नाही येत.’’ आईचा संतापी स्वभाव धाकटय़ाला बिलकूल आवडत नाही. धाकटा आणि आई बांबडर्य़ाहून पायी चालत नाशिकरोडकडे निघतात. धाकटय़ाला आईच्या मागे मागे चालताना सारखे वाटते, पुन्हा मागे परतावे आणि ‘‘धी रामभरोसे हिंदू हॉटेलमधील कांद्याची कुरकुरीत भजी आणि थंडगार चटणी खावी.’’
धाकटय़ाला अचानक फकिराची आठवण झाली. फकिरा धाकटय़ाच्या जातीगोतीचा नसला तरी तो धाकटय़ावर अलोट प्रेम करायचा. निफाडला धाकटय़ाचे काका वकिली करीत. त्यांच्याकडे धुण्याभांडय़ांना जी बाई होती तिचा मुलगा होता फकिरा. शिवणकाम करण्यासाठी फकिरा नाशिकला आला होता. फकिरा धाकटय़ाच्या घरी राहत होता. कापडपेठेतल्या एका म्हाताऱ्या शिंप्याच्या दुकानात तो कपडे शिवायला शिकत होता. फकिरा एका मशीनवर हातपाय मारत बसायचा.
धाकटा घरी न सांगता एक दिवस फकिरासोबत निफाडला गेला. चार-आठ दिवसांनी तो एकटाच मोटारीत बसून परत आला. घरी न सांगता फकिरासोबत निफाडला गेला म्हणून धाकटय़ाच्या भावाने आणि आईने त्याला मारले. धाकटय़ाच्या भावाने धाकटय़ाला सुतळीने बांधले. बाहेरून कुलूप लावून घेतले. धाकटय़ाचा भाऊ आणि आई बाहेर गेल्यावर धाकटय़ाने सुतळी सोडली. तो खोलीच्या भिंतीवर चढला. नंतर माळय़ावर चढून तो बाहेर आला. आई आणि भावाचा राग आला म्हणून धाकटा रुसून घर सोडून निघाला.
धाकटा नाशिकरोड आला तेव्हा त्याच्याच वयाची रुसून निघालेली दोन मुले त्याला भेटली. घरदार नसलेल्या पोरांच्या अंगाला जसा वास येतो तसा त्यांना येत होता. आपण मुंबईला पळून जाऊ आणि सिनेमात करू असे ती धाकटय़ाला म्हणत होती. मुंबईला जाण्यासाठी देवळालीवरून गाडी आहे असे धाकटय़ाने सांगितल्यावर तिघेही देवळालीला पायी चालत आली. तिघांना प्रचंड भूक लागली होती. धाकटय़ाकडे फकिराने दिलेले दोन-चार आणे होते. त्यातून त्यांनी शेवपापडी, शेवकुरमुरे खाल्ले. ते वाळूत झोपले तेव्हा धाकटय़ाला आपले घर आठवले. धाकटा पुन्हा रात्रभर चालत सकाळी आपल्या घरी आला.
त्यानंतर धाकटा तालमीत जाऊन व्यायाम करू लागला. तिथे भावाने घरातून हाकलून दिलेला शांताराम नावाचा तरुण त्याला दिसतो. तो कुणाकडून तरी अंथरूण- पांघरूण आणून तालमीत झोपायचा. शांतारामाला नोकरी नाही मिळत म्हणून त्याला घरातले लोक थारा देत नव्हते. शांताराम तालमीत झोपलेला दिसू लागल्यावर धाकटय़ाला वाटायचे, शांताराम काय खात असेल? नेहमी झोपलेल्या माणसाला भूक लागत असेल का? एक दिवस शांतारामाने अॅसिड पिऊन आत्महत्या केली. रिकाम्या तालमीत शांताराम जळका चेहरा घेऊन फिरतो आहे अशी धास्ती धाकटय़ाच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे धाकटय़ाची तालीम कायमची सुटली.
धाकटय़ाला मारामारीचे चित्रपट बघायला फार आवडायचे. आईने दिलेले पैसे किंवा प्रेतावर उधळले जाणारे पैसे धाकटा हवेत झेलून सिनेमाला जाण्यासाठी साठवून ठेवायचा. एक दिवस त्याच्या भावाने ते पैसे काढून नेल्यामुळे धाकटय़ाला सिनेमाला जाता आले नाही. त्याच्या भावाने शाळा सोडून नोकरी धरणे हे आईच्या जिवाला लागले होते. धाकटय़ाचा भाऊ नोकरीला लागला त्या दिवसापासून घरातले वातावरण जरा तंगच होते.
मटुमा एक गुजराती स्त्री. जी धाकटय़ाच्या घरी आईचे लग्न झाल्यापासून राहत होती. धाकटय़ाच्या घरात दुकान थाटून तिने किराणा विकायला सुरुवात केली होती. तिचा नवरा चिमणशेट धाकटय़ाला आपला मित्रच वाटे. मटुमाला मूलबाळ नव्हते. मटुमाच्या सर्व सवयी धाकटय़ाला ठाऊक होत्या. मटुमाच्या शब्दात काहीतरी जादू होती. ती जादू धाकटय़ाला आवडायची. बांबडर्य़ाच्या आजी-आजोबाला मामाने नाशिकला कायमचे पाठवून दिले होते. धाकटय़ाचा आजा तर वेडाच झाला होता. धाकटय़ाच्या मामाने ‘आजीला तिथेच ठेवा, इकडे पाठवू नका’ असे पत्र पाठवले होते. आईबाप म्हातारे झाले की त्यांना पोरे हाकलून देतात ही गोष्ट धाकटय़ाच्या मनाला फार लागते. बांबडर्य़ाच्या मामाची आणखी एक वाईट गोष्ट धाकटय़ाला समजली तेव्हा धाकटा गलबलून गेला. ती गोष्ट म्हणजे – एका रात्री मामा जागाच होता. दुपारी मामाचे आणि शेतावर काम करणाऱ्या कुळाशी कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे मामा रागात होता. रात्री आजा ओरडून चहा मागत होता. आजाने चहाचा हट्ट सोडला नाही. म्हणून मामाने आजाच्या कानावर चापट मारली. म्हातारा खाली कानावर पडला. ओटय़ाचा दगड आज्याच्या डोक्याला लागला. तेव्हापासून आजा वेडा झाला. त्यानंतर आजाला डॉक्टरांनी उपचारासाठी पुण्यातील वेडय़ाच्या इस्पितळात पाठवले. आता आपणदेखील मरून जावे म्हणून धाकटय़ाची आजी वैद्याने दिलेली औषधे घेत नव्हती.
धाकटय़ाच्या भावाचे लग्न झाले आणि धाकटय़ाला वत्सला नावाची वहिनी आली. वहिनीचे खेडेगाव संगमनेरजवळचे. धाकटा वहिनीच्या गावाला गेल्यावर प्रवरा नदीच्या काठाने फिरायचा. वहिनीचा भाऊ पुरुषा धाकटय़ाला प्रवरेवर पोहायला घेऊन जायचा. पुरुषा धाकटयाला शिंगरावर बसवून वाळूच्या रस्त्यावर घेऊन फिरायचा.
धाकटय़ाच्या भावाला म्हणजे थोरल्याला मुलगी झाली. तिचं नाव चंचल. धाकटय़ाच्या आयुष्यात आता लहान बाळाच्या रूपाने आनंद आला. पण तो फार काळ टिकला नाही. लहान मुलगी चंचल अकाली निधन पावल्यामुळे धाकटा मुळापासून हादरून गेला. जन्मल्यापासून अशक्तच दिसणारी चंचल एकसारखी रडत राहायची. चंचल वारल्यामुळे वहिनी आतून पोखरत जाताना धाकटा पाहत होता.चंचल वारल्यावर काही दिवसातच थोरल्याला क्षयाचा आजार होतो आणि त्यामुळे थोरल्याला म्हसरूळच्या इस्पितळामध्ये दाखल केले जाते. इमारतीकडे जाणारा धुळीखडीचा एकटा रस्ता धाकटय़ाला उदासवाणा वाटे. धाकटा थोरल्याला फळे आणि डबा घेऊन जाई. एक दिवस धाकटा इस्पितळात गेला नाही त्यामुळे थोरला व्याकूळ होऊन रडतो. त्यामुळे धाकटा अधिकच कासावीस होऊन थोरल्याची माफी मागतो.
धाकटय़ाच्या वर्गातली तसेच गल्लीत राहणारी नमी धाकटय़ाला येता-जाता दिसल्यावर धाकटा आतून हळवा होतो. त्या दोघांचे बोलणे कधीच होत नाही. ती दोघे फक्त एकमेकांकडे बघत राहतात. धाकटय़ाला नमी आवडू लागते, पण आपल्या घरातली दु:खे पाहून तो नमीसोबत काही एक बोलू शकत नाही.
धाकटय़ाच्या आयुष्यातील आकाशाचे असे नंतर अधिकाधिक गंभीर होत जाणारे तुकडे या कादंबरीत पुढे स्पष्ट व्हायला लागतात. आडशहरात राहणाऱ्या निम्न मध्यमवर्गातील जन्म-मृत्यू, वेड- प्रेम, विषय-वासना, आर्थिक दैन्य -आजारपणात पिचलेली मने अशा कितीतरी गोष्टी या कादंबरीत आहेत. मानवी नाती आणि दु:खांचे अनेक पदर मनोहर शहाणे यांच्या लेखनातून उतरतात. ‘एखाद्याचा मृत्यू’ या कादंबरीत तर मृत्यू झाल्यानंतर अवतीभवती नातेवाईक आप्तांच्या चर्चाना आणि घटनांना खूपशा रिपोर्ताजी शैलीत शहाणे शब्दबद्ध करतात. मर्तिकाला आलेल्यांचा दांभिक शोक दाखवून देतात. तसाच इथल्या धाकटय़ाच्या आकाशातून दु:खाने पुरती कोंडलेली माणसे शहाणे समोर आणतात. ही माणसे आणि दु:खांच्या घटनांचे पीळ कमी-अधिक स्वरूपात अनुभवलेला वाचक त्या वर्णनांतील अचूकतेने चकित होतात.
कवी, कथा आणि कादंबरी या तीनही क्षेत्रात सक्रिय. ‘टाहोरा’ हा कवितासंग्रह, ‘पिवळा पिवळा पाचोळा’ या संग्रहातील कथांतून गेल्या काही वर्षांत अनिल साबळे यांनी आपल्या ग्रामीण आणि आदिवासीबहुल भूगोलाला मराठी साहित्याच्या पटलावर आणले. नागरी जीवनापासून पूर्णपणे वेगळे आणि साहित्यात न उमटलेले जगणे त्यांच्या कथांमधून जिवंत होते. त्यांचे जंगलाशी असलेले नाते त्यांच्या लेखनातून प्रभावीपणे उमटले आहे. ‘डहाण’ ही अलीकडेच प्रकाशित झालेली कादंबरी सध्या गाजत आहे.
anildsable80 @gmail.com