सई केसकर
वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं आणि माधुरी पुरंदरे यांची चित्रं असलेलं जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांची गोष्ट सांगणारं ‘किमयागार कार्व्हर’ हे अमेरिकी कृषितज्ज्ञाची गोष्ट सांगणारं छोट्यांसाठीचं लहानसं पुस्तक. एखादी व्यक्ती घडत असताना त्या व्यक्तीची जिद्द, एखाद्या गोष्टीच्या ध्यास घेऊन त्याचा पाठपुरावा करण्याची चिकाटी, अभ्यासू वृत्ती, विनयशीलता असे गुण त्यांना यशाच्या शिखरावर नेतात हे एक सरधोपट, सरळसोट कथन आहे. या चाकोरीत अनेक यशस्वी व्यक्तींची चरित्रं बसवता येतील. पण व्यक्ती घडत असताना, तिच्या आयुष्यातले तिला घडवणारे लोक, तिच्या आजूबाजूची सामाजिक, भौगोलिक परिस्थिती या सगळ्यांचा तिच्यावर परिणाम होत असतो.
प्रा. कार्व्हरांच्या आयुष्यात अशा अनेक व्यक्ती होत्या. कृष्णवर्णीय लोकांना गुलामगिरीत ठेवण्याच्या काळात, त्यांना दत्तक घेऊन आपल्याच मुलासारखं वाढवणारे सुझन आणि मोझेस कार्व्हर, त्यांना शिक्षणाच्या दिशेने वळवणारे कृषितज्ज्ञ यायगर, अंगी असलेल्या विविध पैलूंना झळाळी यावी यासाठी कधी उघडपणे, तर कधी लपूनछपून त्यांना मदत करणारे अनेक शिक्षक आणि मित्रपरिवार अशा सगळ्या लहानमोठ्या व्यक्तींचा आणि प्रसंगांचा उल्लेख या पुस्तकात येतो. त्यामुळे गरिबीशी, अन्यायाशी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या सहृदयी, प्रेमळ लोकांचा त्यांच्या वाटचालीतील सहभागही वाचकांच्या लक्षात येतो.
आणखी वाचा- आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : लोकदानातून सिनेधनुष्य..
पुस्तकाची सुरुवात छोट्या जॉर्जच्या आयुष्यापासून होते. बागकामात, शिवणकामात, चित्रकलेत आणि स्वयंपाकात रमणारा, वेगवेगळ्या वयांतला जॉर्ज वाचकांसमोर येत राहतो. ही सगळी कौशल्यं अडीअडचणीला त्याच्या उपयोगी पडत असतात. कुणी पैशांची मदत केली की, त्यांची बाग फुलवून दे, कधी आर्थिक चणचण असेल तेव्हा एखाद्या खानावळीत स्वयंपाक कर, कुणाला सुंदर चित्र काढून दे, कधी स्वत:साठी किंवा इतरांसाठी शिवणकाम कर – असं करत करत जॉर्ज शिक्षण पूर्ण करतो. पुढे जाऊन तो कोण होणार आहे याची अजिबात कल्पना नसलेले वाचक मग त्याच्या लहानपणातच रमून जातात. तबेल्यात, शेतात नाहीतरी स्वयंपाकघरात काम करणाऱ्या गोंडस जॉर्जची चित्रं बघण्यात हरवून जातात. पुढे पीएचडी करण्याची संधी समोर असूनही ती सोडून कार्व्हर अलाबामा राज्यातल्या टस्कीगी गावात आले. पाठोपाठ कापसाचं पीक घेतल्यानं नि:सत्त्व झालेल्या तिथल्या जमिनीवर त्यांनी अनेक प्रयोग केले. या प्रयोगांतून तिथल्या शेतकऱ्यांना मुख्यत्वे आवर्ती लागवड करून जमिनीचा कस कसा वाढवायचा याचं तंत्र त्यांनी शिकवलं.
पुस्तकात ही माहिती सोप्या भाषेत दिली असली, तरीही भाषेचं किंवा विज्ञानाचं सुलभीकरण केलेलं नाही ही महत्त्वाची बाब आहे. उदाहरणार्थ, कापसासारख्या, जमिनीतून पोषण शोषून घेणाऱ्या पिकानंतर भुईमूग का लावायचा याचं कारण देताना, भुईमुगासारखी पिकं हवेतला नायट्रोजन जमिनीत पुन्हा कसा रुजवतात याचं सविस्तर, वैज्ञानिक वर्णन केलं आहे. या वर्णनात ‘नायट्रोजन’ हा शब्द न वापरता ‘नत्रवायू’ हा शब्द वापरला आहे. पण ते वर्णन वाचून शाळेत शिकवलेल्या विज्ञानाच्या आधारे नत्रवायू म्हणजे नायट्रोजन असणार हे इंग्रजी माध्यमात शिकणारं मूल सहज ओळखू शकेल. तसंच जमीन नि:सत्त्व आहे हे सांगण्यासाठीदेखील ‘मुरमाड’, ‘रेताड’ असे एरवी मुलांच्या कानावर सहज न पडणारे शब्द वापरल्यानं, ऐकणारी लहान मुलं लगेच, ‘म्हणजे काय?’ असा सुखावणारा प्रश्न नक्की विचारतील. ‘हे लहान मुलांना समजेल का?’ यावर अकारण चिंता करत हे लेखन केलेलं नाही ही स्वागतार्ह बाब आहे.
आणखी वाचा- आठवणींचा सराफा : बरंच काही आणि कॉफी..
पाठ्यपुस्तकं सोपी करून लिहावीत हे योग्यच, पण लहान मुलं विरंगुळा म्हणून जे काही वाचतात / ऐकतात त्या पुस्तकांमध्ये मात्र भाषा सोपी करण्याच्या हट्टाचा अडथळाच होतो. एखाद्या अवघड शब्दापाशी अडखळणारं मूल त्या शब्दाचा अर्थ माहिती करून घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही इतका विश्वास आपणही मुलांवर ठेवायला हवा! हे पुस्तक त्यांच्या लेखनाइतकंच चित्रकलेमुळे वाचनीय झालं आहे.
‘किमयागार कार्व्हर’ : वीणा गवाणकर, चित्रे- माधुरी पुरंदरे, राजहंस प्रकाशन, पाने- ८७, किंमत- १५० रुपये.
saeekeskar@gmail.com