बदलत्या जीवनशैलीने मानवी शरीरात होणारे घोटाळे आणि ते दूर कसे करता येऊ शकतात, याबद्दल मार्गदर्शन करणारे सदर..
आनंददायी जीवनशैलीमध्ये स्त्री-पुरुष संबंध फारच महत्त्वाचे ठरतात. अलीकडच्या काळातील बलात्काराच्या हृदयद्रावक घटना वाचून मन हेलावले नसेल असा माणूस नसेल. ज्या समाजात अशा घटना घडतात, तो समाज अर्थातच अत्यंत हीन दर्जाचाच आहे, हे आपण पहिल्याप्रथम मान्य केले पाहिजे. पुरुषाला स्त्रीदेहाचे आकर्षण वाटणे ही प्रकृती; स्त्री अशा कुठल्याही प्रकारच्या संबंधासाठी तयार नसताना तिच्यावर जबरदस्ती करणे ही विकृती; आणि अशी विकृती काबूत ठेवणे ही संस्कृती होय. यादृष्टीने पाहता आदिवासी आपल्या कितीतरी पुढे आहेत हे जाणवते. आपल्या जगण्याच्या पद्धतीत काहीतरी भयानक चुका होत आहेत, हे कुणाला समजते आहे असे वाटत नाही. सगळे सरकारवर आणि पोलिसांवर खापर फोडून मोकळे होत आहेत. ज्या देशात गर्भातील स्त्रीकोंबाचा मुडदा पाडतात आणि वयात आलेल्या स्त्रीवर बलात्कार होतात, त्या देशातील समाजात काहीतरी भयंकर चुकले आहे यात शंकाच नाही. म्हणजे परिस्थिती अशी भयानक आहे की, काही बेशरम लोक ‘आमच्या मुलीला पुढे बलात्काराला सामोरे जावे लागू नये म्हणून स्त्रीचा गर्भ पाडतो,’ असे ‘तर्कशुद्ध’ विधान करायला कचरत नाहीत. त्यात आपल्यातलेच काहीजण सरकार किंवा पोलीस म्हणून काम करतात. त्यांच्याकडे बोट दाखवणे म्हणजे आपली जबाबदारी झटकणे आहे. या सर्व प्रकारांना आपणच सर्व जबाबदार आहोत.
आपला इतिहासदेखील स्त्रियांच्या बाबतीत फारसा गौरवशाली नाही. आत्ता-आत्तापर्यंत आपण विधवांना केशवपन करायला आणि सती जायला भाग पाडत होतो. नंतर त्यांची मंदिरे बांधत होतो. अशी दुटप्पी वर्तणूक आपण बिनदिक्कत करत आलो आहोत. आता त्यात अत्यंत जलदगतीने सुधारणा होणे आवश्यक आहे. सर्वप्रथम स्त्रियांनी त्यांच्या मुलांना ‘विशेष’ वागणूक देणे बंद केले पाहिजे. मुलगा होणे म्हणजे काही विशेष झाले आहे असे जे त्यांना वाटते, ते त्यांनी मनातून पार पुसून टाकले पाहिजे. त्यासाठी लहानपणापासून मुलामुलींना सतत एकत्र वाढवले पाहिजे. वयोमानपरत्वे त्यांना एकमेकांच्या शरीर-मनात होणाऱ्या बदलांची जाणीव आपसुक व्हायला हवी. नरास आकर्षति करणे ही गोष्ट प्राणिविश्वात गंधामार्फत होते, तर मनुष्यप्राण्यात ही गोष्ट करण्यासाठी केवळ स्त्रीचे असणेदेखील पुरेसे असते. हे स्त्रीला पूर्णपणे माहीत असले पाहिजे. भारतातील फार मोठय़ा समाजमानसात चित्रपट आणि त्यांतील दृश्ये ही त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे कलाकारांनी आपण काय दाखवून पसे मिळवतो, त्याचा समाजातील अप्रबुद्ध मनांवर काय परिणाम होतो, याचा विचार कलेशी असलेल्या बांधिलकीपेक्षा जास्त केला पाहिजे. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा कुणाचा तरी जीव जास्त महत्त्वाचा आहे याचे भान त्यांनी राखले पाहिजे. भारतात पूर्वीच्या काळी गणिकांना अत्यंत सन्मानाने वागविले जाई. आज नाइलाजाने वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांनाही आपण तशाच सन्मानाने वागवले पाहिजे.
हे प्रत्यक्षात होईतो स्त्रियांनीही जबरदस्त ताकद कमावली पाहिजे. कमीत कमी महाराष्ट्रात तरी ‘गार्गी अजून जिवंत आहे’ हे पुस्तक प्रत्येक मुलीला वाचण्यासाठी आणि जमेल तेवढे (ते) आचरणात आणण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत केली पाहिजे. त्यातली दहा-अकरा वर्षांची एक मुलगी साऱ्या समाजाविरुद्ध किती जबरदस्त लढा देते, हे वाचून प्रेरित होणार नाही अशी स्त्री नसेल. असे म्हणतात की, शहाणपण ही अशी गोष्ट आहे, की जे वापरायला लागेल अशा ठिकाणी जाण्यापासून ते आपल्याला परावृत्त करते. असे शहाणपण सर्वानाच लाभो, हीच सदिच्छा. पण दुर्दैवाने आपण संकटात सापडलोच, तर आपल्यावर जबरदस्ती करणाऱ्याला जन्माची अद्दल घडेल असे सामथ्र्य प्रत्येक स्त्रीकडे असायला हवे. त्याचवेळी प्रत्येक पुरुषाकडे बघताना सतत संशय मनात ठेवल्यास ‘संशयात्मा विनश्यती’ हे वचनही ध्यानात असू द्यावे.  
मुलामुलींना परस्परांच्या सान्निध्यात निकोप वाढता यावे, एकमेकांना समजून घेता यावे यासाठी शहरात खास मोकळी ठिकाणे निर्माण करावयास हवीत. हे करण्याऐवजी झुडपाआड चाळे करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी म्हणून कंठशोष करणाऱ्यांची कींव करावी तेवढी थोडीच. त्या- त्या वयात ती- ती गोष्ट न केल्याने वठलेले वृद्धच अशा प्रकारचा कंठशोष करतात. स्त्री-पुरुषांसाठी एकमेकांचा सहवास किती आनंददायक असतो किंवा असू शकतो, हे हळुवारपणे समजणे फार महत्त्वाचे आहे. अर्थात स्त्रीने आपणहून समर्पण करणे वेगळे; आणि तिला ओरबाडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणे वेगळे. या दोन बाबींची तुलनाच होऊ शकत नाही. हे सर्व मुलांना योग्य त्या वयात कळले पाहिजे. तसेच एखाद्या मुलीला ती आपल्याला आवडते हे कसे सांगावे, हेही मुलांना शिकविले पाहिजे. तसेच एखाद्या न आवडणाऱ्या मुलाने असे विचारल्यास त्याचा किंचितही अपमान न करता त्याला नकार कसा द्यावा, हे मुलींनाही माहीत हवे. एकमेकांशी न जमले तर परस्परांपासून सभ्यपणे दूर कसे व्हावे, हेही शिकवण्याची वेळ आज आली आहे.   
स्त्री-पुरुषांनी एकमेकांना उठाव दिला पाहिजे. एकमेकांच्या ऊर्जेचा स्तर वाढता ठेवला पाहिजे. शिवाने शक्तीला धारण केले पाहिजे, तर शक्तीने शिवाला त्यासाठी प्रेरित केले पाहिजे. समाजाने स्त्री व पुरुष तत्त्व यांना निकोपपणे एकत्र येण्याची संधी दिली पाहिजे. म्हणजे मग कुणाचीच घुसमट होणार नाही. भयग्रस्त स्त्रिया ज्या समाजात असतात, तो समाज हीनत्वाकडेच जातो. कारण त्या समाजाने या तत्त्वांच्या ऊर्जेला अभिव्यक्ती करायची संधीच नाकारलेली असते. आपल्या जीवनशैलीत स्त्रियांचा आणि पुरुषांचा समान पातळीवर सहभाग असायला हवा. त्यांचे परस्परांशी अतिशय मनमोकळे संबंध असायला हवेत. जगात पन्नास टक्के पुरुष आणि तितक्याच स्त्रिया असताना (भारतात काही ठिकाणी असे नाही.) निम्म्या मानवांशी असलेले संबंध हे भीतीने ग्रासलेले असता नयेत.
समाजाला विकृती काबूत ठेवण्यासाठी मानवी प्रवृत्तींकडे निकोप मनाने पाहता यायला हवे. या प्रवृत्ती जर अवरुद्ध केल्या, तर आज आहे तशी परिस्थिती उत्पन्न होते. म्हणजे टीव्हीवर योगी पुरुष चळेल असे चाळे पाहायचे, पण प्रत्यक्ष आयुष्यात असे केल्यास ते मात्र घृणास्पद समजायचे, हा दुटप्पीपणा झाला. तेव्हा खऱ्या अर्थाने समाज-संस्कृती प्रगल्भ व समर्थ झाली की काहीही झाले तरी अशा प्रकारची विकृती उसळी घेणार नाही.

chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Success Story Of Manmohan Singh Rathore
Success Story Of Manmohan Singh Rathore: आईसाठी सोडली सैन्याची नोकरी, एका सहलीने बदललं आयुष्य; वाचा मनमोहन सिंग राठोड यांची परिश्रम अन् समर्पणाची गोष्ट
After the woman fell from the roof, her husband jumped in to save her viral video on social media of husband wife love
VIDEO: प्रेम काहीही करायला लावतं! बायको छतावरून कोसळली म्हणून नवऱ्याने केलं असं काही की…, पाहा नेमकं काय घडलं
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video
“हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO