हेमंत प्रकाश राजोपाध्ये rajopadhyehemant@gmail.com
भावेविण देव न कळे नि:संदेह।
गुरुविण अनुभव कैसा कळे।।
संत ज्ञानेश्वरांच्या नावावर असलेल्या हरिपाठातील ओळी मराठी भक्तिविश्वाची माहिती असलेल्यांना किंवा सांप्रदायिक मंडळींना ज्ञात आहेत. एकुणात भारतीय श्रद्धा/ भावविश्वात अनुभव किंवा अनुभूती या गोष्टीला कुठल्याही शब्द-ग्रंथ-प्रामाण्याइतकेच महत्त्व दिल्याचे दिसते. एकीकडे भक्तिभाव उचंबळून आल्यावर ‘मी-तू पणाची झाली बोळवण’ अशी ईश्वराशी एकात्म झाल्याची जाणीव प्रकट करणारी पदे आहेत, तर दुसऱ्या टोकाला दैनंदिन व्यवहाराचे रहाटगाडगे ओढताना वैतागल्यावर ‘स्वत: मेल्याशिवाय न दिसणारा स्वर्ग दिसत नाही’ किंवा ‘जळते त्याला कळते’ या त्रागा व्यक्त करणाऱ्या म्हणी आहेत. ही दोन्ही टोके जोडली गेली आहेत ती अनुभव-अनुभूतीच्या धाग्याने. भारतीय श्रद्धाविश्वामध्ये अनुभव किंवा अनुभूती या संकल्पनेची चिकित्सा करणं तसं जिकिरीचंच काम. यामागे दोन प्रमुख कारणे अशी की, अनुभव ही संज्ञा भारतीय तत्त्वज्ञान व श्रद्धा विश्वात केवळ इंद्रियजन्य जाणिवांच्या पातळीवरच जोखली जात नाही. जाणीव हा शब्द ‘ज्ञा’ जाणणे या धातूपासून बनला आहे. ज्ञान हा शब्ददेखील याच धातूवरून आला. बौद्ध परंपरांसाठी महत्त्वाचा असलेला ‘बोधि’ हा शब्ददेखील ‘बुध’ जाणणे या धातूवरून बनला आहे. या दोन्ही महत्त्वाच्या धातूंचा संबंध हा आधुनिक पाश्चात्त्य धारणांच्या इंद्रियजन्य अनुभवाला ‘सत्य’ मानण्यासंदर्भातील धारणेशी विसंगत आहे. हे अनुभव इंद्रियजन्य नसल्याने त्यांची व्याप्ती वैयक्तिक संवेदनांपुरती मर्यादित असते. त्यांतून अनेकदा अतींद्रिय, चमत्कृतीपूर्ण अशा घटना, धारणा किंवा मिथके जन्माला येतात. आजच्या जगातील आधुनिक समाजात या संवेदना कितपत मान्य होतील किंवा रुचतील हा प्रश्न! दुसरे कारण असे की, आधुनिक जगात अनुभूतिविश्व हे केवळ आध्यात्मिक किंवा श्रद्धाविश्वाइतकेच मर्यादित उरलेले नाही. आज ज्या समाजघटकांना जात, वर्णव्यवस्थेतून शोषण झालेल्या घटकांचे, आधुनिक अभ्यासाने तर्ककठोर व व्यवहारी झालेल्या जगात अनुभूतींची अभिव्यक्ती अभिजन वर्गाच्या स्वप्निल श्रद्धा व यौगिक गूढ अनुभवांच्या भिंती ओलांडून वास्तव वर्तमानातील आजवर दबलेल्या समाजांच्या प्रखर हुंकारांच्या रूपात व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे अनुभव किंवा अनुभूती या संकल्पनेचे दक्षिण आशियायी सांस्कृतिक विश्वातील स्वरूप हे दोन टोकांच्या अभिव्यक्तींद्वारे व्यक्त होते.
मात्र, या लेखामध्ये मानववंशशास्त्रात सांस्कृतिक, श्रद्धाविषयक अंगाने ज्याला इंग्रजीमध्ये Experience म्हटले जाते त्याचा विचार करायचा आहे. वर नमूद केलेल्या दुसऱ्या सामाजिक अनुभवाविषयी आपल्याला पुढील भागांतून सविस्तर चर्चा करायची आहे. भारतीय तत्त्वज्ञान विचाराच्या दृष्टीने Experience या शब्दाच्या जवळ जाणारा प्राचीन शब्द आहे- दर्शन किंवा भाव. यापैकी दर्शन हा शब्द एखाद्या तत्त्वाविषयी विशिष्ट रीतीच्या ध्यान-चिंतनावस्थेत उमगलेले सार किंवा आकलन या अर्थाने वापरला जातो. विशिष्ट ‘मार्मिक’ बाबींविषयी चिंतनावस्थेत किंवा विशिष्ट ध्यानावस्थेत मिळालेली दृष्टी, त्याविषयीचा साकल्याने गवसलेला विचार म्हणजे ‘दर्शन’ अर्थात, vision. उपलब्ध भारतीय साहित्यातील प्राचीनतम ग्रंथाविषयीच्या, ऋग्वेदाविषयीच्या परंपरेच्या धारणा या अशाच आहेत. वेदांचे रचयितें असलेल्या ऋषींना वेद, म्हणजे ज्ञान ‘दिसले’ व त्यांनी ते ज्ञान, या दर्शनाचा- साक्षात्काराचा अनुभव न आलेल्या आपल्या पुढील पिढीच्या हाती सुपूर्द केले, असे वेदांची परंपरा आपल्याला सांगते. ऋग्वेदाविषयीच्या धारणांनुसार ऋषींना वेद दिसले; दिसले म्हणजे ते कुठल्याशा अमूर्त स्रोताकडून त्यांना मिळाले. याच स्रोताला वेदाविषयी पूज्यभाव बाळगणाऱ्यांनी ईश्वराचे नि:श्वसित मानले व त्यामुळे वेद अपौरुषेय (मनुष्याने न निर्मिलेले) असल्याचे ठरवले गेले. त्यामुळे त्यांची चिकित्सा करणे आपसूकच निषिद्ध ठरले गेले.
वेदांविषयीच्या दर्शन-धारणेचा विचार करत पुढे जायच्या आधी इथे वर दिलेल्या दोन कारणांसोबत आणखी एक तिसरा मुद्दा आपल्याला आधी लक्षात घ्यावा लागेल. वेदांतील ऋषींना हे ज्ञान दिसले, तेव्हा ते ध्यानावस्थेत होते, की चालताचालता त्यांना एकदम साक्षात्कार झाला. की सेमिटिक धर्मात देवदूत ज्ञान-संदेश प्रेषितापर्यंत पोहोचवतो अशी कल्पना येते, त्याप्रमाणे कुणा देवतेने त्यांना हे ज्ञान बहाल केले वगैरे काहीही कथा आपल्याला मिळत नाही. भारतीय परंपरेतील नोंदींनुसार हे असे साक्षात्कार-दर्शन कुणालाही, कधीही होऊ शकते, अगदी ‘दत्त म्हणून समोर उभे राहावे’ असं आपण म्हणतो तसे. डायना एक या ज्येष्ठ विदुषीने म्हटले आहे त्याप्रमाणे, ‘हिंदू प्रार्थनापद्धतीत सामान्य माणसाच्या दृष्टीने देवतेचे अस्तित्व, देवाकडे पाहणे आणि देवाने आपल्याकडे पाहणे या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पद्धतीत देवतेने तुमच्याकडे पाहाणे/ लक्ष देणे ही एकतर देवतेची कृपा असते, किंवा तुमच्या गतजन्मातील धार्मिक-उपासनेचे किंवा पुण्याचे फलित मानले जाते.’
आता पुन्हा ऋग्वेदाकडून वळलेली गाडी पुन्हा एकदा ऋग्वेदाकडेच नेऊ या. ऋग्वेदातील ऋषिगण सोमरस (एफेद्रा-हओम यानावे ही वनस्पती आजही पेशावर-इराण-अफगाणिस्तान व अन्य मध्य आशियायी देशांत पेयरूपात सेवन केली जाते.) प्राशन करतात हे आपण सारे जाणतो. ऋग्वेदातील ८.४८.३ सूक्तात ऋषी म्हणतात, ‘आम्ही सोमरसाचे प्राशन करतो, आता आम्ही अमर झालो आहोत. आम्ही दीप्तिमान अशा प्रदेशात पोहोचलो आहोत. आम्ही देवता शोधून काढल्या आहेत. आता द्वेष, आकस वगैरे (मर्त्यलोकातील) गोष्टी आमचे काय बिघडवणार, हे अमर्त्य अशा शक्ते?’ ऋग्वेदातील केशी नामक सिद्धगण या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ऋग्वेद १०.१३६.२.३ येथे हे तृतीयपुरुषी उल्लेखाकडून प्रथमपुरुषी निर्देशाकडे जाणारा मंत्र अगदी बोलका आहे. ‘वाऱ्याच्या आवरणात राहणारे, मळकी वस्त्रे पांघरणारे हे सिद्ध आहेत. जेव्हा देवता त्यांच्यात संचारतात तेव्हा ते वाऱ्याच्या प्रवाहावर बसून प्रवास करतात. ‘सिद्धत्वाने भारलेले आम्ही हे असे वाऱ्यावर आरूढ झालेलो आहोत. तुम्ही केवळ आमचे मर्त्यदेहच पाहू शकता.’ या पूर्ण सूक्तात तृतीयपुरुषाचा वापर करून केशी या गणाचा निर्देश अधिकांश असला तरीही- सहा-सातवेळा आलेला प्रथमपुरुषी उल्लेख ऋषींच्या उन्मनी भावावस्थेतील अनुभूतीचे दर्शन घडवतो. उपनिषदांत आत्माब्रह्म यांच्या मीमांसेच्या निमित्ताने ब्रह्मज्ञान झाल्यावर आपण स्वत:च ब्रह्म असून विश्वात्मक झाल्याची जाणीव ऋषींना होत असल्याचे दिसते. अशा अवस्थेत ध्यात्याला (ध्यान-चिंतन करणाऱ्याला) आपणच अन्न आहोत, आपणच अन्नसेवन करणारे आहोत. ब्रह्म या सर्वोच्च तत्त्वाच्या अनुभूतीने हरपून उन्मनी अवस्थेत गेलेल्या ऋषींना आपणच या संसारवृक्षाचे धारक-पालक-वर्धक आपणच आहोत अशा वेगवेगळ्या अनुभूती आल्याचे दिसते. आत्मा हाच परब्रह्म असल्याची जाणीव होणे म्हणजे ब्रह्मज्ञान होणे आणि एकदा ब्रह्म जाणले की मग जगात जाणावे असे काही उरत नाही (एकेन विज्ञातेन र्सव विज्ञातं भवति) अशी अनुभूती व दृढ खात्री साक्षात्कार झालेल्याला होते.
ज्ञानाविषयीच्या जाणिवा, आकलन ते देवतेचे दर्शन या दोन धारणांना स्पर्श करणारा अनुभूती हा शब्द केवळ या दोन अर्थापुरताच मर्यादित आहे असे नाही. दर्शन हा अनुभूतीशी संबंधित असलेला घटक पारंपरिक भक्तीच्या विश्वात अधिकाधिक महत्त्वपूर्ण ठरत गेला, तर दुसरीकडे साहित्यविश्वात ‘भाव’ ही संकल्पना अनुभूतीच्या वेगळ्या पलूंचे प्रतिनिधित्व करते. बहुतांश शब्दकोश ‘भाव’ या शब्दाचे अस्तित्व (मूळ धातू- भू-भव: असणे), मानसिक अवस्था, विशिष्ट मनोवस्था (mood) आत्यंतिक आनंद (एकस्तस्य), अर्थ-सार किंवा अंगात होणारा संचार असे वेगवेगळे अर्थ देतात. मात्र देशी श्रद्धविश्वाने ‘भाव’ ही संकल्पना लौकिक (secular) व अतींद्रिय-अलौकिक-आध्यात्मिक (supernatural) जाणिवा या दोन भागांत विभागल्याचे दिसते. यापैकी लौकिक भावामध्ये सौंदर्य किंवा कलात्मकतेला दिला गेलेला प्रतिसाद, मानवी भावना, तीव्र उत्कंठा (passion), व सर्जक कल्पना यांचा समावेश होतो तर अतींद्रिय-‘मार्मिक’ या श्रेणीत ईश्वरीय किंवा साक्षात्कारी सत्पुरुषांविषयीचे अनुभव, जीव-ईश्वर (किंवा ब्रह्म) यांचे ऐक्य, शरणागती, दैवी संकेत-प्रेरणा (intutuion), भौतिक विश्वाचा विसर इत्यादी गोष्टी दिसून येतात. हे असे अतींद्रिय भाव ‘आतून’ अनुभवले जात असले तरीही भावविष्ट -संबंधित अवस्थेने भारलेल्या अवस्थेत व्यक्ती जे बोलतो, आचरण करतो त्यातून वास्तव-भौतिक व्यवहारात विशिष्ट अधिकारांच्या कक्षेत संबंधित व्यक्तीला बसवण्यात येते व त्यातून सामाजिक चलनवलनाला धार्मिक-सांस्कृतिक व्यवहारांत अधिक महत्त्व मिळू लागते व पुढे ती व्यक्ती अधिकारी होऊन आपले तपोबल/ ज्ञानबल समाजासमोर कळत-नकळत, कमीअधिक प्रमाणात व्यक्त करतो.
साहित्यविषयक धारणांचा विचार केल्यास काव्यानंद हा ‘ब्रह्मानंदसहोदर’ (वर चर्चा केलेल्या उन्मनी अवस्थेतील आनंदाचा जणू भाऊच) असल्याची धारणा साहित्यशास्त्रकारांनी व्यक्त केली आहे. अगदी उपनिषदांत वर उल्लेख केलेल्या उन्मनी आनंदाला सर्वोच्च रस (रसो वै स:) असे संबोधणे यादृष्टीने सूचक आहे. साहित्याला साहित्यशास्त्रकारांनी मिळवून दिलेली प्रतिष्ठा त्यांनी विशद केलेल्या साहित्याच्या प्रयोजनातून ठळक होते. काव्य अर्थात साहित्य (संस्कृतात गद्यपद्य दोन्ही काव्य असे म्हणायची प्रथा आहे) हे यशप्राप्तीसाठी, अर्थप्राप्तीसाठी, व्यवहार (नीती व लोकरीती) शिकण्यासाठी, अभद्र गोष्टीच्या प्रभावापासून वाचण्यासाठी आणि तत्काळ आनंद मिळवण्यासाठी व पत्नी ज्याप्रमाणे बोलून गोष्ट गळी उतरवते तसे योग्य बोध गळी उतरवण्यासाठी उपयुक्त असते. (काव्यं यशसे अर्थकृते व्यवहारविदे शिवेतरक्षतये, सद्य:परनिर्वृतये कान्तासम्मिततयोपदेशयुजे) असे साहित्याची प्रयोजने सांगताना साहित्यशास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
साहित्याला एखाद्या गुरूचे किंवा जीवनमार्गदर्शकाचे स्थान दिले गेल्याने परंपरेतील कर्मठ ग्रंथप्रामाण्य अधिकाधिक ठाम व अधिकारवादी होत गेलं. आपल्या लेखमालेतील पुढील भागांपैकी अधिकार या कल्पनेचा परामर्श घेताना आपण या साऱ्याचा सविस्तर विचार करणार आहोत. मात्र, भारतीय लोकधारणांतील अनुभूती या संकल्पनेची चिकित्सा करताना या मुद्याला स्पर्श करणे गरजेचे वाटते.. श्रद्धापर अनुभव आणि विशिष्ट साहित्यातून-कलेतून (यात गीत-वक्त्तृत्व-अभिनयादी कलाही अंतर्भूत मानायला हव्या) मिळणारा आनंद किंवा रसनिष्पत्तीचा आनंद हा इतर साऱ्या अनुभूतींप्रमाणेच मानवी अभिव्यक्ती आणि आकलनानुरूप बदलत जाणारा व सापेक्ष अशा स्वरूपाचा असतो. अगदी सुरुवातीला उद्धृत केलेल्या हरिपाठातील ओवीत नमूद केल्यानुसार, गुरू किंवा आता वर चर्चिल्यानुसार ग्रंथ यांचे अधिकार संबंधित श्रेणीतील साहित्य-श्रद्धानुभव घेणाऱ्या मंडळींवर प्रभाव गाजवतात. त्यातून संबंधित विचाराचे, तत्त्वाचे किंवा साहित्यिक मूल्यव्यवस्थेचे संस्थात्मीकरण होऊन व्यवहारातील अधिकार, अर्थव्यवहार सत्ता इत्यादी गणितांना चालना मिळते. केवळ मानसिक पातळीवरील व्यवहार किंवा मेंदूतील प्रक्रिया-रसायनस्राव इत्यादींच्या अंगाने अर्थात न्यूरोसायन्सच्या अंगाने अनुभूती या संकल्पनेचा, ध्यानसमाधी, ब्रह्मानंद वगैरे अवस्थांचा विचार आधुनिक विज्ञान करते आहे. त्याविषयीची शास्त्रशुद्ध उत्तरे या प्रयोगशीलतेतून मिळतीलही. मात्र बहुसंख्याक समाजाच्या आध्यात्मिक, श्रद्धाविषयक प्रेरणा बहुधा मानवी समाजाच्या अस्तित्वाच्या शेवटापर्यंत टिकून राहातील, ही संभावना अधिक दिसते. त्यातून ‘अनुभूतिजन्य’ अशा धारणा मानवी समाजाचे संचालन करत राहतील ही शक्यता बळावत राहिल. अशावेळी श्रद्धेच्या पाईकांचा श्रद्धा आचरण्याचा अधिकार मान्य करणे जितके योग्य आहे; तितकेच किंबहुना- त्याहून अधिक गरजेचे ठरेल प्रत्येक काळात, प्रत्येक समाजात अशा अनुभूतींची चिकित्सा करत राहणे!
(लेखक ‘ऑब्झव्र्हर रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)