मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारा नेता, ज्याचा करिश्मा महाराष्ट्रातील मोठय़ा जनसमूहावर होता, त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (१७ नोव्हेंबर) पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा जयदेव आणि जिवलग सहकारी पंढरीनाथ सावंत यांनी त्यांच्या राजकारणबाह्य़ गुणांना, आठवणींना दिलेला उजाळा..
बाळासाहेब ठाकरे माझे कोण होते? गुरू होते. संपादक होते. पालक होते. नेते होते आणि अपार प्रेम करणारे गॉडफादरही होते. बाळासाहेब हे कलावंत, राजकारणी, संपादक, व्यंगचित्रकार आणि माणूस म्हणूनही मोठे होते. पत्रकारितेच्या माझ्या सुरुवातीच्या कालखंडात म्हणजे १९६६ मध्ये प्रथम मी त्यांच्या संपर्कात आलो. मराठी माणसासाठीच्या संघर्षांचा तो काळ. शिवसेनेच्या स्थापनेचा आणि ‘मार्मिक’मधून मराठी माणसासाठी तोफा धडाडण्याचा तो काळ. सभा-बैठकांच्या व्यग्र वेळापत्रकातूनही ‘मार्मिक’च्या माध्यमातून लेखन व व्यंगचित्रे काढून बाळासाहेबांनी जो अफाट लोकसंग्रह जमा केला, ते कल्पनेतही न बसणारे. मराठी माणसांचा आवाज उठविण्यासाठी त्यांची लेखणी तलवारीसारखी चालायची. पत्रकारितेचे बाळासाहेब हे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही होते.
‘मार्मिक’च्या सुरुवातीच्या काळात प्रबोधनकार व बाळासाहेब यांच्या चर्चेतून अग्रलेखाचा विषय ठरायचा. दादांच्या म्हणजे प्रबोधनकारांच्या टाइपरायटरवर तो तयार झाला की, मी तो बाळासाहेबांना वाचून दाखवायचो. सहसा त्यात काही बदल नसायचा. असल्यास पानाच्या समासात लिहून, दादांना दाखवून, प्रभादेवी येथील प्रेसमध्ये न्यायचो. लिहिताना कागदाच्या डावीकडे चार बोटे मार्जिन असलेच पाहिजे, हा दादांचा नियम होता. मी प्रारंभी मार्जिन ठेवायचो नाही. अशा वेळी दादा म्हणायचे, ‘नवीन काही सुचले तर ते काय बापाच्या ‘एक्स एक्स’वर लिहायचे?’ दादांचे बोलणे फटकळ होते. मात्र, त्यात शिकविण्याची भूमिका असायची. वरून नारळासारखे, आतून अत्यंत गोड. अर्थात त्यांना पचवणे हे तितकेसे सोपे नसायचे. त्यासाठी त्यांच्या कसोटीला तुम्हाला उतरावे लागे. त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झालात तर ज्ञानाचे भांडार तुम्हाला मिळाले, म्हणून समजा. दादांनी मला शिष्य म्हणून स्वीकारल्यामुळे बाळासाहेबही निश्चिंत झाले. त्यातूनच त्यांच्याही शिकवणीचा लाभ मला झाला. प्रबोधनकारांच्या आणि बाळासाहेबांच्या विचारांत एकवाक्यता होती. विशेष म्हणजे एखाद्या घटनेबाबत दोघांनी केलेला उपदेश अथवा विश्लेषण सारखेच असायचे. शब्दरचना जरी थोडी वेगळी असली तरी भूमिकेत एकवाक्यता असायची. प्रबोधनकारांचा जसा व्यासंग दांडगा होता, तसे बाळासाहेबांचे वाचन प्रचंड होते. वेगवेगळ्या विषयांची त्यांना केवळ माहितीच नसे, तर त्याबाबतचे त्यांचे आकलनही आश्चर्यकारक होते. विशेष म्हणजे या दोघांची स्मरणशक्ती दांडगी म्हणावी, अशी होती. कोणत्या पुस्तकात, कोणत्या पानावर, कोणता मुद्दा सापडेल हे दादा व बाळासाहेब सहज सांगत. पानक्रमांकासह पुस्तकातील उतारे सांगणे हे कसे काय जमते, याबद्दल मला कुतूहल होते. माझ्या पत्रकारितेच्या उमेदीचा तो काळ होता. एक दिवस न राहवून मी दादांना याबद्दल विचारले, तेव्हा ‘बाळलाच जाऊन याबाबत विचार,’ असे ते म्हणाले. बाळासाहेबांकडे जेव्हा याबाबत विचारणा केली तेव्हा स्मरणशक्तीला शिस्तीची जोड कशी द्यायची याचे रहस्य त्यांनी सांगितले. एखादे पुस्तक आवडले तर त्यातील माहिती आपण सांगू शकतो, परंतु सैनिक जशी नियमित कवायत करतात, तसेच वाचनाचे आहे. वाचलेला भाग स्मरणात ठेवण्यासाठी नियमित सवय लावून घेणे आवश्यक आहे. अशा सरावातून कालांतराने कोणत्याही पुस्तकातील हवी ती माहिती नेमकी कोठे आहे, हे सांगणे सहज शक्य होऊ शकते, असे बाळासाहेब म्हणाले. स्मरण कसे लायब्ररीसारखे हवे. पुस्तक कसे जिथल्या तिथे सापडायला हवे आणि पुन्हा जिथल्या तिथे गेले पाहिजे. स्मरणशक्तीची बाळासाहेबांना दैवी देणगी तर होतीच, त्याला त्यांनी अभ्यासाची जोड दिली. माझ्या पुढच्या वाटचालीत त्यांनी दिलेल्या गुरुमंत्राचा मोठा फायदा झाला.
संपादक, संपादन, पत्रकारिता, व्यंगचित्रे याबाबत बाळासाहेब व प्रबोधनकारांची सुस्पष्ट अशी भूमिका होती. आजच्या व उद्याच्या पत्रकारांनाही त्यांच्यापासून शिकण्यासारखे बरेच काही आहे. पत्रकारिता हे एक व्रत आहे, ही बाळासाहेबांची भूमिका होती. केवळ आपले नाव चमकविण्यासाठी पत्रकारिता करायची नाही, हे त्यांनी मला सांगितले. पत्रकारिता ही सामाजिक बांधीलकी असून ती लोकांसाठी करायची असते. ती लोकांच्या उपयोगी पडली पाहिजे, ही भूमिका ते वेळोवेळी मांडायचे. ‘उगाच एखाद्या मंत्र्याची बाईची भानगड काढलीस तर मी त्याला महत्त्व देणार नाही, परंतु रेशनवर मिळणाऱ्या वस्तूंचा कोण काळाबाजार करतो, ते शोधून काढलेस तर नक्कीच शाबासकी देईन. सणावाराला तूप, साखर, रवा मिळत नाही, या बातमीपेक्षा खेडेगावातल्या माणसाला औषधावाचून मरावे लागत असेल तर त्या बातमीला जास्त महत्त्व द्यावे,’ असे ते सांगत. बातमीकडे बघण्याचा त्यांचा सामाजिक दृष्टिकोन हा असा होता. ‘एखादे उद्ध्वस्त झालेले गाव कोणी वसवले तर ते कसे वसवले याची यथायोग्य माहिती दिली तर उद्या ते अन्य लोकांसाठीही मार्गदर्शक ठरू शकते,’ असे ते सांगायचे.
शब्दांशी खेळणे आणि शब्दांना खेळवणे, हे बाळासाहेबांकडूनच शिकावे. मार्मिक टीका आणि मर्मभेदक टीका हे त्यांच्या लेखनाचे मर्मस्थान होते. परंतु बातमी कशी लिहावी, याबाबतचे त्यांचे विचार प्रत्येक पत्रकाराला उपयोगी पडणारे आहेत. बाळासाहेबांचा सभांचा फड नेहमीच गाजायचा. त्याच्या बातम्याही यायच्या. एकदा अशाच त्यांच्या एका प्रचंड सभेत लोकांनी जल्लोष केला. टाळ्यांचा पाऊस पडला. हशा आणि घोषणांनी ती सभा बाळासाहेबांनी अगदी गाजवली. दुसऱ्या दिवशी साहेबांच्या भाषणाची बातमी प्रसिद्ध झाली. बातमी वाचून त्यांनी मला बोलावून घेतले व म्हणाले, ‘हे जे मी सभेत बोललो ते घरी बोललो असतो तरी असेच आले असते. सभेचे वातावरण यात कोठेच नाही. ‘मार्मिक’मध्ये वार्ताकन वाचताना वाचकाला आपण त्या सभेत हजर असल्याचा भास झाला पाहिजे, असे लिखाण करायला हवे.’ बातमी-वार्ताकन कसे करावे, हे त्या दिवशी उलगडले. त्यांचे हे सांगणे केवळ त्यांच्या स्वत:च्या सभेपुरते नसायचे तर वेगवेगळ्या घटना टिपताना ‘लेखन चित्रित’ व्हावे, म्हणजेच वाचकाला आपण घटनास्थळी प्रत्यक्ष असल्याचे वाटेल, अशी त्यांची भूमिका असे. भाषा कशी असावी, शब्द कसे वापरावे हे वेळोवेळी सांगत असत. भाषा कशी असावी, हे सांगताना त्यामध्ये साने गुरुजी पहिले आणि आचार्य अत्रे हे दुसरे असल्याचे ते आवर्जून सांगत. खरे म्हणजे दादा आणि बाळासाहेब यांचे मार्गदर्शन हे मला लाभलेले मोठे गुप्तधन होते.
संपादक म्हणून साहेब वेगळे होते. चुकल्यामाकल्यास समोर बोलावून किंवा सगळ्यांसमोर हजामत करणे त्यांच्या स्वभावात नव्हते. ‘मार्मिक’ प्रसिद्ध झाला म्हणजे अगदी अथपासून इतिपर्यंत ते विरामचिन्हांपर्यंत बारकाईने वाचून काढत. त्यांना काय वाटते, ते बाळासाहेब लहानशा चिठ्ठीवर लिहून पाठवत. त्यात चूक दाखवलेली असे, त्याचप्रमाणे दुरुस्ती काय हवी याचे मार्गदर्शनही असे. पत्रकाराने पाळण्याची पथ्ये ते कधी कधी समक्ष सांगायचे. यामागेही कारण होते, ते म्हणजे अन्य लोकांनी तशाच प्रकारच्या चुका भविष्यात करू नये. यातील दोन उदाहरणे सांगण्यासारखी आहेत. परळमध्ये पूर्वी डॉ. वामन शंकर मटकर नावाचे काँग्रेसचे आमदार होते. त्यांचे बोलणे थोडेसे तोतरे होते. एका निवडणुकीत त्यांची लढत शिवसेनेच्या उमेदवाराशी होती. त्यामुळे मार्मिकमधील माझ्या ‘टोच्या’ या सदरातून त्यांच्या या बोलण्याच्या शैलीची जोरदार टिंगल उडवली. ते प्रचारासाठी एखाद्याच्या घरी जात आणि म्हणत, ‘ह ह हॉवशे आमटीचो वास हांगलो येतो हा. कसली केलँस? हवळ्यांची? मग हातावर थोडी भुरकीत, ह ह हांगली आसा.’ तो लेख वाचल्यानंतर साहेबांनी मला बोलावले नि आवाज न चढवता म्हणाले, ‘हे बघ पंढरी, माणसाच्या स्वभावातल्या, वागण्यातल्या व्यंगावर टीका करावी. त्याच्या शरीरव्यंगाचे विडंबन करू नये. जा.’ मी मागे वळतो तोच परत हाक मारून म्हणाले, ‘बाणकोटय़ा, मालवणी इतकं चांगलं कसं लिहितोस?’ त्याकाळी मुंबईत स. का. पाटलांची वट होती. माझ्या एका सदरातून मी लिहिले,
सदोबा झुट मत बोलो,
खुदा के पास जाना है,
जहा हाथी है ना घोडा है,
वहीं हरदम ही जाना है ‘सदोबा’
यावर साहेबांनी चिठ्ठीत ‘मस्त’ एकच शब्द लिहिला. मात्र ज्यावेळी डांगे यांची खिल्ली उडवणारे ‘डांग्यांच्या मळ्यामंधी मॉस्कोचे पाणी’ हे विडंबन काव्य लिहिले, त्यावेळी मला बोलावून म्हणाले, ‘डांगे यांची जास्त टवाळी करू नये. फार मोठा माणूस आहे, हे तुला हळूहळू कळत जाईल. कालांतराने शिवसेनेचे पहिले अधिवेशन झाले, त्यावेळी साहेबांनी डांगे यांना मार्गदर्शक म्हणून बोलावले होते.
संपादक म्हणून साहेब असे होते. माणसांची जाण त्यांना होती. कर्तृत्ववान माणसांचे कौतुक करताना त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही. त्यांच्या लेखणीत कधी द्वेष किंवा आकस नसायचा तर केवळ त्वेष असायचा. शब्दांचे फटकारे ते असे काही मारत की, ज्याच्यावर टीका करत त्याला भोवळ आल्याशिवाय राहत नसे. अत्रे-ठाकरे वाद हा दुर्दैवी खरा, परंतु ज्या आचार्य अत्रे यांनी आपल्या लेखणीने भल्याभल्यांना लोळवले त्याच अत्रे यांना बाळासाहेबांच्या फटकाऱ्यांनी शब्दबंबाळ व्हावे लागले. बाळासाहेबांच्या शब्दांचे घाव झेलणे अशक्य झाल्यानंतर अत्रे प्रबोधनकारांकडे येऊन अक्षरश: रडले होते. याच अत्रे यांच्यावर साहेबांचे प्रेमही अफाट होते. अनेकांशी त्यांचे वाद झाले. भांडणे झाली, पण ती तेवढय़ापुरतीच असायची. त्या व्यक्तीच्या गुणांना त्यांनी दाद दिली नाही, असे कधी झाले नाही. मग तो पु.ल. देशपांडे यांच्याशी उडालेला खटका असो की शरद पवारांशी राजकीय झगडा असो. वैयक्तिक आयुष्यात त्यांनी असंख्य माणसे जोडली होती. पुस्तकांप्रमाणेच ‘माणसं वाचणं’ हाही त्यांचा एक छंद होता. आलेल्या माणसाचा स्वभाव, हावभाव, विचार ते अचूक टिपत. त्याचा वापर लेखन, व्यंगचित्रांमध्ये आणि भाषणांत अत्यंत खुबीने ते करत असत.
व्यंगचित्रकार म्हणून त्यांचे स्थान अनन्यसाधारण म्हणावे लागेल. बाळासाहेब इंग्लंड-अमेरिकेत जन्माला आले असते तर व्यंगचित्रकार म्हणून कीर्तीची सर्व शिखरे त्यांनी पार केली असती.
ज्या काळात त्यांनी ‘मार्मिक’ साप्ताहिक काढले, तो काळ सुरू असलेली साप्ताहिके पटापट बंद पडण्याचा होता. परंतु नुसत्या व्यंगचित्रावर साहेबांनी साप्ताहिक चालवले. एवढेच नव्हे तर शिवसेनेसारख्या बलाढय़ संघटनेला जन्मही दिला. त्यांचे व्यंगचित्र काढणे म्हणजे एक अग्निहोत्रच होते. रोज सकाळपासून जेवढी वर्तमानपत्रे असतील ती वाचून काढायची. त्यातील योग्य वाटलेल्या बातमीवर लाल स्केच पेनाने खुणा करायच्या. त्याची घटना, व्यक्ती अशी वर्गवारी करायची. हे सारे कापून चिकटवून ठेवायचे. रविवारी या सगळ्या बातम्यांवर विचार करून ‘जत्रे’साठी पाच-सहा आणि मुखपृष्ठासाठीचे व्यंगचित्र निश्चित करायचे. त्यानंतर सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी सहा वाजता ते व्यंगचित्राच्या कागदाची सुरळी हातात घेऊन घरातील गॅलरीत उभे राहायचे. एक वेळ व्यंगचित्र नेण्यासाठी मला उशीर व्हायचा, मात्र त्यांची वेळ कधी चुकली नाही. राजकारण, सभा यांच्या धबडग्यातही बाळासाहेबांनी आपला नेम कधी चुकवला नाही. कामावरची त्यांची निष्ठा आणि श्रद्धा हे गुण आजच्या पत्रकारांनी आवर्जून घेण्यासारखे आहेत. व्यंगचित्र काढताना ते जो विचार करायचे तोही भन्नाट असायचा. व्यंगचित्रातील माणसाचा केवळ चेहरा अचूक दिसून त्यांना भागत नसे तर ज्याचे व्यंगचित्र काढले त्याचा स्वभावही चित्रित झाला पाहिजे, हा त्यांचा आग्रह असायचा. व्यंगचित्रातील अनेक बारकावे ते आम्हा मंडळींना सांगायचे. परंतु, प्रत्यक्षात त्यांना व्यंगचित्र काढताना पाहणे हे अद्भुत असायचे. ते पेन्सिलने ड्रॉइंग करून घेत नसत. थेट ब्रशनेच सगळे करत. अशा प्रकारचे कौशल्य मी अन्यत्र कुठे पाहिले नाही. वेगवेगळ्या व्यक्ती व विषयांची त्यांना सखोल माहिती असे. एकदा गप्पा मारण्यासाठी गेलो असताना रमाकांत देसाईंची गोलंदाजी, र्मचटचा लेट कट, नूर महंमद, चार्लीचा विनोद, सी. रामचंद्रन यांचे संगीत पूर्वीच्या महान संगीतकारांच्या प्रभावापासून कसे वेगळे होते अशा वेगवेळ्या विषयांवर बोलत गेले. सुदैवाने आम्ही ते टेप केले. यातून बघता बघता २२ लेख तयार झाले. शिवसैनिक व बाळासाहेब हे नातेही असेच अतूट होते. आपल्या समर्थ लेखणीतून त्यांनी हा नातेसंबंध अनेकदा उलगडून दाखवला आहे. मात्र नातलग अथवा नातेगोते असा शब्द आला की, ते सावध होऊन म्हणायचे, ‘जे गोत्यात आणते, ते नाते. असले नाते मला नको. शिवसैनिक आणि माझे हृदयबंध आहेत, ते खरे नाते.’ माझ्यावरही असेच प्रेम त्यांनी केले. तीन वेळा माझ्या हृदयाची दुरुस्ती त्यांनी मला करून दिली. माझी पत्नी गेली तेव्हा वसंत सोपारकरांना फोन करून ‘पंढरी सावरला का’ असे विचारले. सहकारी व पत्रकारितेतील शिष्य म्हणून त्यांनी दिलेले प्रेम एवढे मोठे आहे की, त्यामुळेच मी स्वत:ला शिवसेनेतील सर्वात श्रीमंत माणूस समजतो.
(लेखक ‘मार्मिक’ साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक आहेत.)
चित्रकार भारत सिंग यांच्या कुंचल्यातून साकारलेले शिवसेनाप्रमुख.
पत्रकारितेचे ‘मार्मिक’ विद्यापीठ
मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारा नेता, ज्याचा करिश्मा महाराष्ट्रातील मोठय़ा जनसमूहावर होता, त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (१७ नोव्हेंबर) पहिला स्मृतिदिन.
First published on: 17-11-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remembering balasaheb thackeray pandharinath sawant