..आणि त्या वाडय़ात अचानक अंधारून येतं. वाडय़ाचे मालक दादासाहेब लगबगीने चौरंगासमोर बसतात. पोथीवाचन सुरू होतं. दोन-चार ओळी धीरगंभीर आवाजात ऐकू येतात- न येतात इतक्यात चौरंगाबाजूच्या दोन समयांमधल्या पेटणाऱ्या वाती तडतडू लागतात. दादासाहेब आपली जळजळीत नजर त्या पेटत्या ज्योतींवर टाकतात. तडतड थांबते. पोथीवाचन सुरू होतं. आणि पुन्हा तीच तडतड सुरू होते. तीन-चार आवर्तनांतून मग तोच आवाज. वाचनाचा व तडतडीचा आवाज शिगेला पोचतो आणि सारा वाडा हिरव्या-निळ्या प्रकाशानं व्यापून जातो. पाठीमागच्या खिडकीतून कुणी वेडा प्रकटतो. दादासाहेब त्याला कडकडून मिठी मारतात. ‘दामू, कुठे रे कुठे होतास तू इतके दिवस?,’ असं म्हणत गहिवरतात. सबंध वाडय़ावर, मुलाबाळांवर जरब ठेवणारे, कडक शिस्तीचे, पोरांना चळचळा कापायला लावणारे दादासाहेब दामूला पाहताच एकदम वेगळेच होतात. विरघळतात.
प्रा. वसंत कानेटकरांच्या ‘वेडय़ाचं घर उन्हात’- मधला हा प्रसंग आजही माझ्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा दिसतोय. समईतल्या वातींचं ते तडतडणं आजही माझ्या कानात घुमतंय. साहित्य संघातल्या खुल्या नाटय़गृहातला तो राज्य नाटय़स्पर्धेतला प्रयोग होता. वर्ष होतं- १९५७.
कानेटकरांचं हे पहिलंच नाटक. त्या नाटय़प्रयोगानं मी विलक्षण भारावून गेलो होतो. गुंतागुंतीच्या मनोव्यापारांचं असं नाटक मराठीत त्यापूर्वी मी पाहिलं नव्हतं. ‘सवाई माधवरावांचा मृत्यू’ तोपर्यंत मी वाचलं नव्हतं व पाहिलंही नव्हतं. मराठीतली तीन नाटकं- ‘सवाई..’ ‘वेडय़ाचं..’ आणि ‘बॅरिस्टर’- लक्षणीय आणि संस्मरणीय ठरली ती त्या- त्या नाटकाच्या मनोविश्लेषणात्मक गुणवत्तेमुळे! शेक्सपीअरच्या नाटकांचं विशेषत्वही याच.. व्यक्तिरेखांच्या मानसिक आंदोलनांवर भर देण्यावर आहे.
दिग्दर्शक भालबा केळकरांनी या वेगळ्या प्रकारच्या प्रायोगिक नाटकाचं सादरीकरणही तितकंच वैशिष्टय़पूर्ण केलं होतं. एखाद्या चित्रपटालाही शक्य होऊ नये असा फ्लॅशबॅक त्यांनी मांडणीतून, प्रकाशयोजनेतून आणि समईच्या पेटत्या वातीच्या फडफडण्यातून प्रभावीपणे उभा केला होता. मोहन वाघ यांनी हेच नाटक पुढे व्यावसायिक रंगमंचावर आणलं तेव्हा त्याचं नेपथ्य रघुवीर तळाशिलकर यांनी केलं होतं. त्यांनी फ्लॅशबॅकच्या प्रसंगात मागच्या खिडकीलाच चाळवलं होतं.
दादासाहेबांच्या भूमिकेतले डॉ. श्रीराम लागू प्रथमत:च ठसठशीतपणे संपूर्ण नाटय़रसिकांच्या मनात ठसले ते याच नाटकामुळे! दादासाहेब या व्यक्तिरेखेबद्दल डॉ. लागू ‘लमाण’मध्ये लिहितात- ‘आजपर्यंत अनेक व्यक्तिरेखांनी वैचारिक पातळीवर माझ्याशी खूप संवाद साधला आहे. पण प्रत्यक्ष अनुभूतीच्या झपाटय़ात माझा संपूर्ण कब्जा घेतला तो प्रथम दादासाहेबांनी. इतका पिळवटून टाकणारा अनुभव मला नवीन होता.. पार झपाटून टाकणारा होता. पूर्वी तर कधी आला नव्हताच; पण पुढच्या आयुष्यातसुद्धा फार मोजक्या नाटकांनीच तो मला दिला.’ १९५७ च्या राज्य नाटय़स्पर्धेत या नाटकाने प्रयोग, लेखन, दिग्दर्शन व अभिनय (श्रीराम लागू व अरुण जोगळेकर) अशी पाच पारितोषिके मिळवून एक नवा विक्रम केला.
‘कथा कुणाची, व्यथा कुणा!’ हे गो. गं. पारखी यांचं नाटक १९६८ साली राज्य नाटय़स्पर्धेत सादर केलं गेलं. रहस्यप्रधान नाटक असूनही त्यात खून, धक्के असला प्रकार नव्हता. रंगमंचावर आघाती असं काहीच घडत नसतानाही छातीत धडधड व्हायची. नक्की कथानक आठवत नाही, पण पोस्टातल्या पाकिटाच्या गोंद लावायच्या ठिकाणी विष लावलेलं असतं. पाकीट वापरणाऱ्यानं जिभेनं गोंदाची जागा ओली केली, की त्या विषाचा परिणाम त्या जिभेवर होणार, अशा कल्पनेवर ते नाटक आधारलेलं होतं- एवढं नक्की. (स्पर्धेत पारितोषिकं मिळवल्यानंतर हे नाटक आत्माराम भेंडय़ांनी केलं.) स्पर्धेतल्या नाटकाचं दिग्दर्शन राजाभाऊ नातू यांनी केलं होतं. आकर्षक नेपथ्य व रंगसंगतीनं हे नाटक नटलेलं होतं. नेपथ्यात छताला लावलेला सिलिंग फॅन होता आणि घरात शिरणाऱ्या पात्राने बटण दाबलं की तो पंखा खरोखरीच फिरायचा. रंगमंचावर छताला लावलेला पंखा पात्राने बटणाने फिरवला तर आजही प्रेक्षकांच्या टाळ्या पडतील; मग ४० वर्षांपूर्वीच्या प्रेक्षकांनी या पंख्याला कशी दाद दिली असेल याची कल्पना करा. नुकत्याच रंगमंचावर आलेल्या ‘लहानपण देगा देवा’ या जुन्या नाटकाच्या नवीन प्रयोगातही छताला पंखा लावलेला होता. पण तो कधी फिरला नाही वा फिरवला गेला नाही. (नाटकातल्या पात्रांना एअरकंडिशनिंगची थंडी सहन होत नसावी.) राजाभाऊ नातू हे पुण्यातील अत्यंत कल्पक व हुशार दिग्दर्शक आणि नेपथ्यकार होते. पुरुषोत्तम करंडक नाटय़स्पर्धेचे व महाराष्ट्र कलोपासकचे ते एक आधारस्तंभ होते. स्पर्धेने मराठी रंगभूमीला दिलेला हा गुणी रंगकर्मी फार लवकर हे जग सोडून गेला.
महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्या नाटय़स्पर्धेत (१९६०) बाजी मारली ती ‘रंजन कलामंदिर’ या नाटय़संस्थेच्या ‘चंद्र नभीचा ढळला’ या नाटकानं. फ्रेंच कादंबरीकार व नाटककार अल्बर्ट कामू यांच्या ‘कॅलीगुला’ या नाटकाचं ‘चंद्र नभीचा ढळला’ हे रूपांतर पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी केलं होतं. एका वेडय़ा महमदी राजाची ही वेडी कथा. असाध्य ते साध्य करू पाहणारा राजा क्रौर्याची केवढी परिसीमा गाठतो, त्याचं चित्रण करणाऱ्या या मूळ नाटकात रूपांतरकर्त्यांने अनेक गोष्टींचं मिश्रण केलं होतं. अचाट कल्पनेवरचं नाटक, नेटकं दिग्दर्शन, उत्तम अभिनय आणि सादरीकरण या गुणवत्तेच्या जोरावर या नाटकानं लेखन, दिग्दर्शन व अभिनयाची पारितोषिकं मिळवली. ‘चंद्रकुमार’ची प्रमुख भूमिका करणाऱ्या राजा पाठक यांनी शैलीदार अभिनयाचा एक उत्तम नमुना या भूमिकेतून सादर केला. गणेश सोळंकी याच नाटकातून लक्षवेधी विनोदी नट म्हणून ख्यातनाम झाला आणि पुढे काही वर्षे मुंबईतल्या नाटय़-चित्रपटसृष्टीत पाय रोवून बसला. गोपाळ कौशिक याचं संगीत दिग्दर्शन संस्मरणीय होतं. पुढं हे नाटक व्यावसायिक रंगमंचावर सुधा करमरकर यांनी सादर केलं तेव्हा या नाटकातील पदं गाण्यासाठी खास गोपाळलाच पाचारण करण्यात आलं होतं. लता मंगेशकर यांच्याबरोबर गाणं गाण्याची संधी त्याला मिळाली होती. गोपाळ हा एक तल्लख बुद्धिमत्तेचा संगीतकार होता. मुंबईकर निर्मात्यांनी त्याला योग्य दाद द्यायला हवी होती. आज या नाटकातले राजा पाठक, गोपाळ कौशिक व पुरुषोत्तम दारव्हेकर कुणीच या जगात नाहीत.
सुधा करमरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या व्यावसायिक रंगमंचावरच्या ‘चंद्र..’मध्ये प्रमुख भूमिकेत मा. दत्ताराम होते. मी या नाटकात हृदयगुप्तची छोटीशी भूमिका करीत असल्यामुळे दत्तारामबापूंचा विलक्षण अभिनय मला कित्येक प्रयोग डोळे भरून अनुभवता आला.
याच नाटकाने पुरुषोत्तम दारव्हेकर यांना नागपूरहून मुंबईला आणले आणि व्यावसायिक रंगभूमीवरचे कायमचे दिग्दर्शक बनवले. तालमीला ते हजर असताना एकदा मी त्यांना विचारलं होतं- ‘मास्तर, तुमच्या नाटकातली पात्रं रंगमंचावर येऊन मागे घडलेल्या गोष्टी सांगत बसतात. शिवाय प्रत्येक पात्र स्वत:ची अशी एक वेगळीच गोष्ट घेऊन रंगमंचावर प्रकटतो. असं का?’ (त्यावेळी मी परीक्षक, समीक्षक काहीच नव्हतो. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, ते हेच का?) ‘प्रेक्षकांचं लक्ष वेगवेगळ्या ठिकाणी केंद्रित करावं लागतं..’ हे मास्तरांचं त्यावेळचं उत्तर मला पटलं नव्हतं. पण मास्तरांची ही शैली ‘कटय़ार काळजात घुसली’पर्यंत कायम होती.
‘चंद्र नभी..’च्या नेपथ्यात राजवाडय़ातल्या उंच स्तंभाबरोबर पाश्र्वभागी निळं आकाश दिसायचं. व्यावसायिक नाटकात लताबाईंनी गायलेल्या पाश्र्वगीताबरोबर आकाशातले ढग लहरत, प्रेक्षकांच्या टाळ्या घेत पुढे जायचे. (१९६० सालच्या या टाळ्या होत्या. कुणी म्हणत- याच एका दृश्यासाठी सुधा करमरकरांनी हे नाटक व्यावसायिक रंगमंचावर आणलं असावं.)
मूळ ‘कॅलीगुला’ नाटक व ‘चंद्र..’ यांची तुलना करणारा एक परखड लेख त्यावेळी ‘लोकसत्ता’त छापून आला होता. मूळ नाटकाची (नाटककाराची) जीवनदृष्टीच रूपांतरकर्त्यांने बदलल्यामुळे टीकाकार य. दि. फडके रुष्ट झाले होते. स्पर्धेत मात्र या रूपांतराला लेखनाचे पहिले पारितोषिक मिळाले.
१९६२ सालच्या नाटय़स्पर्धेत नागपूरच्या रंजन कलामंदिराने पुन्हा एकदा ‘चंद्र..’सारखंच यश मिळवलं ते त्यांच्या ‘वऱ्हाडी माणसं’ या नाटकानं. सवरेत्कृष्ट नाटय़प्रयोग, लेखन, अभिनय व दिग्दर्शन या क्षेत्रातील पारितोषिकविजेते होते पुरुषोत्तम दारव्हेकर, राजा पाठक आणि गणेश सोळंकी. प्रादेशिक भाषेतलं- मराठीतलं हे पहिलं यशस्वी नाटक असावं. सर्व गुणी माणसांची ही कथा होती आणि नियती हीच त्यात खलनायिका होती. हे नाटक माझ्या लक्षात राहिलं ते दोन गोष्टींसाठी. कुठलाही अंगविक्षेप न करता अत्यंत स्वाभाविक पद्धतीने गणेश सोळंकीने फुलवलेला विनोद; आणि या नाटकातलं वऱ्हाडी वाडय़ाचं नेपथ्य! वाडा पाश्र्वभागी आणि नाटक ओसरीवरच घडायचं. भिंती तोडणारं आणि मुक्त नाटय़ावकाश प्राप्त करून देणारं स्पर्धेतलं हे पहिलंच नाटक असावं. ‘झाला का चहा?’ या प्रश्नाला गणेश सोळकीनं दिलेलं ‘खाली येऊन पाहा..’ हे उत्तर आजही माझ्या कानांत घुमतंय.
पुढील काळात संस्थांनी नाटकं मोठी केली आणि नाटकांनी संस्था मोठय़ा केल्या. या स्थितीचा प्रारंभ पीडीए, रंजन कलामंदिर या संस्थांनी केला असं म्हणायला हरकत नाही. माणदेशी माणसांचं आणि त्या प्रदेशाचं प्रत्ययकारी दर्शन स्पर्धेतील नाटकांतून प्रथम घडलं ते ‘जाणार कुठं?’ या व्यंकटेश माडगूळकरांच्या पुण्याच्या पी.डी.ए.ने सादर केलेल्या नाटकातून. हे नाटकही रंगमंचावर मोकळ्या अवकाशालाच अधिक वाव देणारं होतं. शहरी संस्कृती व ग्रामीण संस्कृती यांच्या संक्रमणावस्थेचं दर्शन हे नाटक घडवायचं.
गावातलं टपरीवजा चहाचं हॉटेल काही गुंड येऊन क्षणार्धात तोडमोड करून जमीनदोस्त करतात. हा प्रसंग अवघ्या पाच-सात मिनिटांचा; पण कमालीचा परिणामकारक व्हायचा. भालबा केळकर गुंडांच्या प्रमुखाच्या भूमिकेत विलक्षण दरारा निर्माण करायचे.
येणाऱ्या शहरी संस्कृतीनं माणसांत होणारे बदल या नाटकाने यथार्थपणे टिपले होते. श्रीराम खरे या नाटकात ट्रक ड्रायव्हरची भूमिका करत असत. त्यांच्या ट्रकचा आवाज ऐकू येतो आणि ट्रकच्या हेडलाइट्सचा प्रकाशझोत रंगमंचावर गोलाकार फिरतो आणि ट्रकच्या फिरण्याची दिशा प्रस्थापित करतो. प्रेक्षकांत असणाऱ्या म्या पामराची मान त्या प्रकाशझोताबरोबर १८० अंश कोनात फिरायची आणि उत्स्फूर्तपणे टाळी पडायची. १९६५ सालच्या या स्पर्धेतील नाटकाच्या प्रकाशयोजनेचं अनुकरण मग कित्येक व्यावसायिक नाटकांतून करण्यात आलं.
१९६५ सालच्या नाटय़स्पर्धेत पी.डी.ए.च्या ‘तू वेडा कुंभार’ने सवरेत्कृष्ट प्रयोग, दिग्दर्शन, नेपथ्य आणि अभिनयाची पारितोषिके मिळवली. विजेते होते- भालबा केळकर, श्रीधर राजगुरू, श्रीराम खरे आणि जब्बार पटेल.
या नाटकात नेपथ्यातील अंगण खऱ्या शेणाने सारवत असत. त्यामुळे प्रयोगभर रंगमंचावर व प्रयोगात माश्या घोंघावत असत. मी पाहिलेल्या अंतिम स्पर्धेतील मुंबईतल्या प्रयोगाला घोंघावणाऱ्या माश्यांना बंदी केली असावी. त्यामुळे हाऊसफुल्ल नाटय़प्रयोगात फक्त प्रेक्षकच होते. (मुंबईला शेण मिळालं नाही, हे कित्ती बरं झालं!) हा शेणाचा प्रयोग त्यापूर्वी विजया मेहता यांनी ‘शितू’च्या वेळीही केला होता.
त्यावेळच्या स्पर्धेतल्या आणखी काही नाटकांच्या आठवणी पुढील लेखात..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा