नकळत्या वयापासून संगीत हाच श्वास अन् ध्यास कसा होत गेला, संगीतसागरातले माणिक-मोती कसे सापडत गेले, त्यातून ब्रह्मानंदी कशी टाळी लागली, याचा सुरेल प्रवास कथन करणारे सदर..
माझ्या अगदी बालपणीची पहिलीवहिली स्मरणं.. जी मला अगदी अंधुकशी आठवतात. ती म्हणजे- अकोला इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीची १५-१६ खोल्यांची बैठी चाळ. चाळीतले दुसऱ्या क्रमांकाचे क्वार्टर आमचे.. सार्वजनिक नळाचे कोंडाळे शेवटच्या म्हणजे सोळाव्या क्वार्टरसमोर. त्यामुळे रोज सकाळी चाळीतल्या प्रत्येकाला नळकोंडाळ्यासमोर प्रातर्विधीकरिता आणि घरातल्या पिण्याचे तसेच वापरण्याचे पाणी साठवणीकरिता जावेच लागे. पंधराव्या बिऱ्हाडात राहणाऱ्या पल्र्याच्या (मूळ नाव प्रल्हाद) घरात चाळीतला एकमेव रेडिओ होता. सकाळी पल्र्याच्या रेडिओवर वाजणाऱ्या सिलोन केंद्रावर साडेसात ते आठ या वेळात ‘पुराने फिल्मों के गीत’ या कार्यक्रमातली गाणी ऐकताना नळकोंडाळ्यावर करावी लागणारी प्रतीक्षा आवडू लागली.. हवीहवीशी वाटू लागली..
अवीट गोडीची तेव्हा जुनी झालेली लोकप्रिय गाणी या कार्यक्रमात पुन्हापुन्हा भेटत राहायची.. पण या सगळ्या सुंदर गाण्याच्या जोडीला – एका श्रेष्ठ आणि कालातीत अलौकिक अशा महान गायकाचे गाणे या कार्यक्रमातले शेवटचे गीत असे स्वर्गीय कृष्णलाल सैगलसाहेबांचे.. मला ध्वनिमुद्रित गाण्यातून ज्यांच्या सुरांनी झपाटले.. खरं तर संत मीराबाईच्या भजनातल्या ‘म्हातो स्याम डंसी’प्रमाणे ज्यांच्या सुरांचा डंख मला झाला, त्यातले एक म्हणजे के. एल. सैगलसाहेब. कहुं क्या आस निरास भई, एक बंगला बने न्यारा, दो नैना मतवाले तिहारे, मैं क्या जानु क्या जादू है किंवा देस रागातली – भावपूर्ण गायकीचा उत्कट आविष्कार म्हणावे अशी रचना ‘दुख के अब दिन बीतत नाही’ (विसाव्या शतकातले मराठी भाव – चित्र संगीतातले सर्वश्रेष्ठ संगीतकार-गायक आदरणीय कै. सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि गायलेल्या ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटाच्या अप्रतिम शीर्षकगीताच्या निर्मितीची प्रेरणा सैगलसाहेबांच्या याच गाण्यातून घेतल्याचे त्यांनी मला अतिशय कृतज्ञापूर्वक एका भेटीत सांगितल्याचे स्मरते.) आणि भैरवीतली अप्रतिम रचना- बाबुल मोरा नैहर छुटो जाय.. (गाणं ऐकताना सैगलसाहेबांच्या स्वरातली विलक्षण आर्तता रसिकाच्या मनभर दाटते आणि डोळ्यातून वाहू पाहते.)
या पुन्हा पुन्हा भेटणाऱ्या गाण्यामुळे मी सैगलसाहेबांचा कायमचा भक्त होऊन गेलो.. अत्यंत सुरेल आणि भिजलेला स्वर.. गाण्यातली मुश्किल स्वाभाविकता (ज्याला मी बोलण्याइतकी सहजता मानतो.) आणि गाण्यातले भाव या हृदयीचे त्या हृदयी उमटवण्याची अद्भुत ताकद.. ही सैगल गायकीची खास वैशिष्टय़े म्हणता येतील..
त्यांच्या स्वरांनी त्या नकळत्या वयात असं गारूड घातलं होतं की, प्रसंगी त्यांचं गाणं ऐकण्याकरिता माझा स्वच्छतागृहाकरिता आलेला नंबर सोडून मी त्या नळकोंडाळ्यावर रेंगाळत राहायचो..गेली पन्नासहून अधिक वर्षे ‘पुराने फिल्मों के गीत’ या रोज सकाळी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात शेवटचं गाणं सैगलसाहेबांचं वाजवून तेव्हाच्या रेडिओ सिलोन अर्थात आत्ताच्या श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने सैगलसाहेबांना केवळ एक अप्रतिम मानवंदना दिली एवढेच नव्हे, तर त्यांचं सुंदर स्मारकच केलंय, अशी माझी भावना आहे..
पुढे वाढत्या वयाबरोबर चित्रपट संगीतातल्या दिग्गज स्वरांबरोबर हिंदुस्थानी/ कर्नाटक शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, अभिजात पाश्चिमात्य संगीत, जाझ संगीत, पॉप/रॉक संगीत, विविध देशातले लोकसंगीत.. अशा श्रवणभक्तीच्या कक्षा विस्तारत गेल्या. स्वरातला आनंद घेताघेता अवघ्या जगण्यातला आनंदस्वर शोधण्याचे वेध आणि वेड लागले.
माझ्या आईला शास्त्रीय संगीतात अतिशय रूची होती.. आमच्या घरी रेडिओ आल्यानंतरच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये, अकोल्यातल्या शासकीय कन्या शाळेत शिक्षिका असलेल्या माझ्या आईची शाळा दुपारी असल्याने सकाळी आकाशवाणीच्या नागपूर, इंदोर-भोपाल, मुंबई, पुणे केंद्रावरील शास्त्रीय गायन/वादनाचे सव्वासात ते पावणेआठ दरम्यानचे कार्यक्रम ऐकता ऐकता आईने माझ्यात शास्त्रीय संगीताची रूची रुजवली आणि वाढीस लावली. पुढे आईची शाळा सकाळची झाल्याने आकाशवाणीच्या मुंबई ब केंद्राच्या कार्यक्रमाच्या सिग्नेचर टय़ूनपासून आंघोळ, कुकर लावणे, पोळ्या करणे या सर्व गोष्टी रेडिओशी संलग्न असत आणि सर्व कामं आटोपून ती बरोबर सकाळी सात वाजता शाळेला जायला घराबाहेर पडे.
आईजवळ साधं रिस्टवॉचसुद्धा नव्हतं. पण होतं केवळ रेडिओ नावाचं अप्रतिम घडय़ाळ. ज्याच्या एकेका संगीतरचनेवर- मग ती उस्ताद बिस्मिल्लाखान साहेबांची सनई असो की, पहिलं, दुसरं, तिसरं भक्तिगीत असो किंवा साडेसहाच्या इंग्रजी बातम्या असोत, सकाळची तिची प्रत्येक कृती बांधलेली होती. शास्त्रीय गायनाबरोबर पंडित डी. व्ही. पलुस्करांच्या ‘जब जानकीनाथ सहाय करे.. चालो मन गंगा जमुना तीर.. ठुमक चालत रामचंद्र..’ आणि पंडित कुमार गंधर्वाच्या ‘मुझे रघुवरकी सुध आई..’, ‘सुनता है गुरु ग्यानी..’, कुदरत की गत न्यारी न्यारी..’ यासारख्या भजनांनी मला मोहित केले. ती मोहिनी अक्षय आहे..
विविध भारतीवर रोज रात्री सव्वाआठ ते पुढला अर्धा तास शास्त्रीय संगीत या सदरात विख्यात गायक/वादकांच्या रागसंगीताचे आविष्कार ऐकायला मिळत.. माझी आवडती शास्त्रीय गायकांची जोडी – उस्ताद नझाकत अली आणि उस्ताद सलामत अली. त्यांची ध्वनिमुद्रिका त्या कार्यक्रमांतर्गत त्या दिवशी प्रक्षेपित व्हावी, अशी मी अधूनमधून देवाजवळ प्रार्थना करी आणि कधीतरी देव माझी प्रार्थना ऐकेही.
या कार्यक्रमापाठोपाठ शास्त्रीय संगीतावर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम मी अतिशय आवडीने ऐकत असे.. दर बुधवारी रात्री आठ ते नऊ दरम्यान सिलोन केंद्रावरचा ‘बिनाका गीतमाला’ न चुकता ऐकला जाई. रोज सकाळी ११ ते साडेअकराच्या दरम्यान आकाशवाणी मुंबई ‘ब’ केंद्रावर कामगारसभा कार्यक्रमात सोमवार ते शनिवार चित्र -नाटय़-भाव-भक्ती आणि लोक अशा विविध प्रकारची गाणी पुन्हापुन्हा भेटत. आकाशवाणीच्या मुंबई ब केंद्रावरून दर सोमवारी रात्री १० ते ११ दरम्यान ‘आपली आवड’ हा रसिक श्रोत्यांच्या मनपसंत गाण्यांचा कार्यक्रम, तसेच प्रत्येक महिन्याच्या दर शनिवारी सकाळी त्या महिन्यासाठी निर्मिलेलं नवं गाणं ऐकवणारा ‘भावसरगम’ हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम हे माझे अत्यंत आवडते कार्यक्रम होते. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, पंडित जितेंद्र अभिषेकी यांसारख्या अनेक प्रतिभावंत संगीतकारांची पुढे ध्वनिमुद्रिकेद्वारा लोकप्रिय झालेली कितीतरी उत्तमोत्तम गाणी ही मूलत: ‘भावसरगम’ची देणगी होय..
रेडिओवर साडेनऊला सिलोन केंद्राची प्रात:सभा संपत असल्याने ११ वाजता सुरू होणाऱ्या कामगार सभेपर्यंत वेळ काढायला मला एके दिवशी रेडिओ कुवैत या मीडियम वेव्ह बँडवर प्रक्षेपित होणाऱ्या केंद्राचा शोध लागला.. त्यावर इंग्रजी गाणी लागत. त्या गाण्यातली भाषा तेव्हा आणि नंतरही फारशी कळली नाही, पण सुरांची वैश्विक भाषा- ती मला खूप आनंद देत होती. दुपारी ‘विविध भारती’ केंद्रावरची हिंदी गाणी संपली, की दिल्ली केंद्राच्या ‘उर्दू सव्र्हिस’वरून पुन्हा हिंदी चित्रपट गीते.
..असा सिलसिला चालूच रहायचा अगदी रात्री पाकिस्तान रेडिओ स्टेशनवरून मेहदी हसन, नूरजहान, एस. व्ही. जॉन यांनी गायलेली फिल्मी – गैरफिल्मी गाणी, कव्वाल्या.. कधी रेडिओ मॉस्कोवरून होणारे मराठी कार्यक्रम तर कधी कुठल्याशा अनामिक आकाशवाणी केंद्राद्वारे पाश्चिमात्य वाद्यवृंदातून उमलत गेलेल्या सिम्फनीजचं प्राणांवर पडलेलं संमोहन! असं उत्तररात्री रेडिओशी मैत्र जुळत गेलं. रेडिओ माझा सखा.. मितवा होऊन गेला आणि खरं तर माझा गुरूही..
गेल्या काही वर्षांत कुठल्याही मोबाईलवर रेडिओ एफ एम चॅनल्ससह उपलब्ध झाल्यापासून रेडिओवरल्या स्थानिक/खासगी एफ.एम.चॅनेलवर वाजणारी अर्धीमुर्धी गाणी, रेडिओ जॉकी नामक निवेदकाची जाहिरातींच्या भडिमारासह चर्पटपंजरी, असा एकूण मामला असला तरी कधीतरी रात्री-उत्तररात्रीच्या फेरफटक्यात कारमधल्या रेडिओवर कुठल्याशा एफ. एम. चॅनेलवर ‘पुरानी जीन्स’ या शीर्षकांतर्गत गेल्या ३०-४० वर्षांतली खरोखरीच मधुर आणि अर्थपूर्ण गाणी ऐकताना मला अनपेक्षित पण सुखद धक्का बसला.
म्हणजे – रेडिओ माझ्यानंतर आलेल्या तरुणाईच्या पिढय़ांना अजूनही काही सुंदर आणि हृदयंगम असं ऐकवतोय. त्यांना ते आवडतंय आणि हवंहवंसं आहे, या जाणिवेनं मला नव्या पिढीची रसिकतेची जणू ग्वाही मिळाली. रेडिओशी आमच्या पिढय़ानुपिढय़ांच्या जुळलेल्या अखंड भावबंधांचा हा प्रत्यय. त्यामुळे रेडिओ हा सदैव आपल्या सर्वाचा सखा- मितवा!
ओम ‘रेडिओ’ नम:।
ओम रेडिओ नम:।
नकळत्या वयापासून संगीत हाच श्वास अन् ध्यास कसा होत गेला, संगीतसागरातले माणिक-मोती कसे सापडत गेले, त्यातून ब्रह्मानंदी कशी टाळी लागली, याचा सुरेल प्रवास कथन करणारे सदर..
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-01-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remembering radio