आयुष्याच्या अनुभूतीतून ज्यांच्या कवितेनं जन्म घेतला, अशा कवयित्री इंदिरा संत यांची जन्मशताब्दी नुकतीच (४ जानेवारी) सुरू झाली आहे. व्यक्तिगत जीवनानुभूती आणि भावभावनांचे हळुवार, कोमल, आवेगी पडसाद इंदिराबाईंच्या निसर्गप्रतिमांतून व्यक्त होताना दिसतात. जीवनातील निष्ठुर आघात पचवत त्यांना शब्दरूप देताना त्यांची कविता उत्कट, अलवार, समृद्ध अन् प्रगल्भ होत गेली. अशा इंदिराबाईंचं व्यक्तित्व तसंच पान ३वर त्यांच्या काव्यप्रवासाचा मागोवा..
इं दिराबाईंना प्रथम पाहिलं ते कऱ्हाडला झालेल्या एका कवयित्री संमेलनात. मी तेव्हा कॉलेजमध्ये शिकत होते. इंदिराबाई संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. साधी, सुती, नऊवारी साडी. एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर आलेला पदर. लहानसं कुंकू. दागिने नाहीतच. हलकं हसणं. जास्त हसू आलं तर तोंडाला पदर लावून हसायच्या. कवितावाचन अगदी सपाट. शांत. बोलणं साधं. ऋजु. संकोचानं भरलेलं.
पण मग अनौपचारिक भेटल्या तेव्हा त्या बोलण्याला जिव्हाळ्याचा कणीदार मोहोर आला. कौतुक करणं हा त्यांचा स्वभाव होता. ठायीच आईपण होतं. मग कधी एखादी कविता आवडली की भेट पाठवायच्या.. चंदनी मोर किंवा चंदनचूरही. त्यांनी दिलेली साडी त्या काळात कितीतरी माघारणींच्या अंगावर असेल!
त्यांची ती सलगी, देण्याची रीत अगदी आश्वस्त करणारी असायची. कवितेसारखीच तीही. ना भडक, ना आक्रमक. त्यांनी ना वैयक्तिक आयुष्यात कुठल्या संबंधांवर वार केले, ना कवितेत भाषेवर किंवा परंपरेवर हत्यार उपसलं. दोन्हीकडे जाणवत राहिलं ते त्यांचं शालीन सामथ्र्य आणि स्वाभाविक गुणसंपदेची आभा.
हृदयाच्या झडपेसारखी असते कविता. ती झडप उघडी असते म्हणून आयुष्याच्या जिवंतपणाचा उष्ण रक्तप्रवाह चालू राहतो. चांगली कविता वाचली की उडणाऱ्या नाडीचे ठोके वाढतात. रक्ताचा रंग थोडा अधिक गडद झाल्यासारखा वाटतो. हे जेव्हा जेव्हा घडतं, तेव्हा तेव्हा त्या कवितेविषयी कृतज्ञ वाटत राहतं. तिनं आपलं असतेपण सार्थ केलं असं वाटतं. ती आहे म्हणून जगणं आहे असं वाटत राहतं.
ऐन तरुणपणात असं वाटायला लावणाऱ्या कवितांपैकी एक होती इंदिराबाईंची कविता. कविता म्हणजे काय, याची थोडी पुसट कल्पना नुकती येऊ लागलेली असताना ही कविता भरभरून भेटली आणि भावलीही. मराठी कवितेचा केवढा तरी मोठा पैस तेव्हा नजरेच्या आवाक्यात येत चालला होता. प्राचीन मराठी कवितेपासूनचा एक थोरला विस्तार. केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज, तांबे होते. माधव ज्युलियन होते, बोरकर, कुसुमाग्रज होते आणि आरती प्रभूही होते. पु. शि. रेगे होते आणि अनिलही होते. मर्ढेकर तर होतेच; पण अरुण कोलटकर, नामदेव ढसाळ आणि लघु-अनियतकालिकांच्या चळवळीतले आणखी कितीतरी कवी होते. अत्यंत कसदार, विविध जाती-पोतांची अभिजात कविता आणि जोडीला त्या कवितेपेक्षा अगदी निराळी, संपूर्ण नवी, प्रयोगशील कविता. एकमेकींना छेदणारी; पण छेदत पुढेच जाणारी कविता.
त्या सगळ्या कल्लोळातून इंदिराबाईंची कविता एखाद्या सागरकन्येसारखी वर आली. हॅन्स अँडरसनच्या परीकथेतली सागरकन्या. मानवी राजपुत्रावर तिचं मन जडतं आणि ती शेपटीऐवजी दोन पाय मागून घेते. सुखदु:खांनी भरलेलं माणूसपण तिला मिळतं खरं; पण दर क्षणी पाऊल टेकवताना सुरीच्या पात्यावर उभं राहिल्यासारख्या तीव्र वेदना तिला भोगाव्या लागतात. इंदिराबाईंची कविता अशी मनजडीच्या आयुष्यासाठी सुरीच्या पात्यावर उभी राहिलेली कविता होती.
रात्रच की स्तब्ध उभी क्षितिजाच्या काठावर
खिळलेले पाऊल अन् गिळलेले लाख स्वर
आवरला तोल कसा ठाऊक हे एक तिला
सावरला बोल कसा ठाऊक हे एक तिला
गिळलेल्या बोलाची खिळलेल्या तोलाची
शपथ तिच्या ओठावर चढत जिचा रंग मला
अशी अवघड शपथ घालणारी कविता. मधाच्या चवीचं विष तीच प्रथम पाजत होती..
पावसाची एक रात्र येते होऊन माणूस
डोळे पुसत आपुले मला पाजविते विष
अशा भावसांड प्रतिमा तेव्हा बाईंच्या कवितेत प्रथमच उमटत होत्या.
कधी कुठे न बोलणार कधि न काहि सांगणार
कधी कधी न अक्षरांत मन माझे ओवणार
असा अभिजात संयम कणखर तरलतेनं प्रथमच व्यक्त होत होता.
धगधगते जीवन हे धरून असे ओंजळीत
आले मी कुठुन कशी..आले मी, हेच फक्त
असा साधेपणाच्या पोटातला तीव्र आकांतही प्रथमच जाणवत होता. तोवरच्या कवयित्री साध्या, बाळबोध लिहिणाऱ्या होत्या. पारंपरिक संकेतांची अनेकदा निर्जीव आणि कधी कधी न कळता जिवंत आणि गोड उजळणी करणाऱ्या होत्या. त्यांच्या कवितांचे विषय सांगता येत होते. त्यांच्या रचनांचे घाट मळलेले होते. अपवाद बहिणाबाई चौधरींचा होता. आणि पुढे ‘मालनगाथे’चं संपादन करून इंदिराबाई जणू त्यांचा चरणस्पर्श करून आल्या होत्या. मात्र, बाकी बहुतेकींचं जग छोटं होतं. पिंपळाला फेरे घालावेत तसे संसाराला फेरे घालणाऱ्या, सोशिक, श्रद्धाळू आणि परंपराशील बायकांचं जग. नव्या कवितेची चाहूल लागलेल्या मनोरमाबाई रानडय़ांसारख्या एखाद्या कुणी होत्या; पण ती त्यांनी घेतलेली चाहूल फार क्षीण होती.
दोष त्यांचा नव्हता. काळानं जेरबंद केलेले पाय सगळ्याजणींचेच होते. पण जशा लक्ष्मीबाई टिळक आपल्या नैसर्गिक स्वभावबळानं त्यातून सुटल्या; मालतीबाई बेडेकर आपल्या विचारशक्तीच्या जोरावर सुटल्या; तशाच इंदिराबाई आपल्या अपारंपरिक संवेदनशीलतेनं सुटून गेल्या.
रक्तामध्ये ओढ मातिची मनास मातीचे ताजेपण
मातीतुन मी आले वरती मातीचे मम अधुरे जीवन
असं म्हणत असताना त्याच मातीतून त्या उंच उठल्या आणि जाणिवांच्या एका मोठय़ा अवकाशाला त्यांनी हात पसरून जवळ घेतलं. निसर्गाचं एक मोठं भान त्यांच्या मर्यादित आयुष्याच्या वर्तुळातच जागं झालं. बेळगावात त्यांचं बहुतेक आयुष्य गेलं. घर आणि नोकरी यांच्या मधल्या वाटेवर दोन्ही बाजूंना पसरलेला एक मोठ्ठा माळ होता. चढतीच्या टोकाशी एक पावसाळी तळं होतं. दूरवर दिसणारं, घुमट असलेलं एक देऊळ होतं. आंब्या-फणसांच्या झाडांतून आणि कळकीच्या बेटांतून जाणारा उतार होता. आणि क्षितिजाशी मोरपंखी डोंगरांच्या रांगा.
इंदिराबाईंची कविता ही या वाटेवर जीव जडवलेली कविता होती.
त्यांच्याजवळ संवेदनशील मन होतं आणि परिमित जगण्यातून उंच उठणारे ‘प्रतिभेचे विशिष्ट एरियल्स’ही (हे त्यांचेच शब्द!) होते. तरी पण घर आणि नोकरी यांच्या मधली ती माळाची वाट त्यांना मिळाली, हे त्यांचं भाग्यही होतं.
अशी वाट पायाखाली न आलेल्या, फक्त घरातच अडलेल्या, त्रासलेल्या, शिणलेल्या किंवा घर आणि नोकरीच्या मधल्या वाटेवर ठेचकाळणाऱ्या, येरझारा घालताना दमून गेलेल्या त्यांच्याभोवतीच्या कित्येक बायका होत्या. त्यांना इंदिराबाईंच्या कवितेनं एक वेगळा अनुभव दिला. गळ्यातल्या हुंदक्यांची कविता होऊ शकते, हे त्यांना तिथे समजलं. दु:खाची गाठ तर आयुष्यभर त्यांच्या काळजात होतीच. त्या दु:खाचं कोतेपण ओलांडून ही कविता आभाळभर झाली.
काय बाई सांगू कथा क्षण विसावा भेटतो
गुलबशीच्या फुलासंगे पुन्हा दिस उगवतो
‘काय बाई सांगू कथा’ पाणी आणून डोळ्यात
एवढेच बोलली ती घागरीला हात देत
असं, एवढंच बोलणाऱ्या पुष्कळजणी असतात. आणि अशाही पुष्कळ असतात, की ज्यांना आपल्या सोसण्याचं काय करायचं, ते समजत नाही. त्या निर्थकाच्या वाटेनं चालत राहतात. अशा सगळ्या बायकांनी इंदिराबाईंच्या कवितेत सोसण्याचं सोनं झालेलं पाहिलं. कवितेच्या वाटेनं दु:खाला ओलांडून कुठे पोचता येतं ते त्यांना कळलं. जिथे जीव माघारणीसारखा सुखावतो असं माहेर त्यांना तिथे भेटलं. बाजारूपणाचा, प्रदर्शनीयतेचा, उठवळ लालसेचा स्पर्शही नसलेली बाईंची कविता अगदी तालेवारपणे आपलं दु:खभान सांभाळत आली. ती त्यांची सखी नव्हती की त्यांची प्रतिकृती नव्हती. उमेदीच्या काळापासून वाटय़ाला आलेला संघर्ष करता करता त्यांच्या लक्षात आलं की, त्यातच जगण्याचं सार्थक करणारं काही गवसायचं असेल तर गवसतं. पण तशा संघर्षांत व्यक्तिमत्त्वातून सारख्या ठिणग्या उडत राहतात. त्या ठिणग्यांचं इंदिराबाईंना अनिवार आकर्षण होतं. त्यांच्या कविता म्हणजे त्या ठिणग्याच तर आहेत!
ना. मा. संत गेले. दहा वर्षांचा तृप्त, प्रेममय संसार संपला. पण कविता संपली नाही. वाटय़ाला जे दाट, गहिरं दु:ख आलं, त्यानं जणू कवितेला विजेची जखम केली. मग प्राणांतिक वेदनेनं सळसळून उठलेल्या कवितेनं स्त्रीलिखित कवितेच्या तोवरच्या सगळ्या मर्यादा मोडल्या आणि जीवनाच्या नव्या जाणिवांनिशी स्वत:ला शोधत ती उंच उंच जात राहिली. कलेची अभिजात सुंदरता तिच्या भाळावर चंद्रकोरीसारखी चमकत होती.
तो अनुभव स्त्रीलिखित कवितेतला साक्षात्कारासारखा अनुभव होता. आधीचे काही अस्फुट आवाज सोडले तर बाईनं स्वत:विषयी कवितेतून इतक्या समर्थपणे बोलण्याची ती पहिलीच वेळ होती. बाईनं कलात्म जाणिवा इतक्या प्रगल्भपणे व्यक्त करण्याचीही ती पहिली वेळ होती. बाईनं पुरुषप्रधान कवितेत सहज न घडणारं स्त्रीत्वाचं उत्कट दर्शन घडवण्याचीही ती पहिली वेळ होती. भावकविता काय असते याचं कुलवंत रूप प्रकट होण्याचीही ती स्त्रीलिखित कवितेतली पहिलीच वेळ होती.
त्या पहिल्या वेळेला आजपर्यंत कवितेशी बांधलेल्या साऱ्याच जणी कधी ना कधी कृतज्ञपणे स्पर्शून येतात. त्यांच्या जन्मशताब्दीच्या प्रारंभकाळी तर हे सांगितलं पाहिजेच ना!