डॉ. मीना वैशंपायन
‘प्रा. अ. का. प्रियोळकर लेखसंग्रह खंड १ व खंड २’ अशा दोन खंडांचे प्रकाशन येत्या शुक्रवारी, १७ मार्च रोजी एशियाटिक सोसायटीच्या दरबार हॉलमध्ये होत आहे. हे खंड प्रियोळकरांच्या सुवर्णस्मृतिवर्षांत प्रकाशित होत आहेत हे विशेष. या प्रकाशन सोहळय़ानिमित्त..
एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात, मराठय़ांच्या इतिहा ससंशोधनास आरंभ झाला. याच शतकाच्या शेवटी मराठी भाषा व मराठी संस्कृती यांच्या समृद्ध वारशाची जाणीव मराठीजनांना होऊ लागली. आपण नवीन दृष्टिकोनातून या वारशाचा शोध घेऊन तो लोकांपुढे मांडला पाहिजे अशी प्रेरणा तत्कालीन विद्वानांच्या मनात निर्माण झाली.
वि. का. राजवाडे यांच्यासारख्यांनी इतिहास संशोधनाबरोबरच साहित्य संशोधनाचा मार्गही पुढील संशोधकांना दाखवून दिला. यातूनच पुढे मराठीत अनेक नामवंत संशोधननिष्ठांची मांदियाळी निर्माण झाली असे दिसते. याच मांदियाळीत एक महत्त्वाचे नाव होते ते म्हणजे प्रा. अ. का. प्रियोळकर यांचे! मुख्यत: मध्ययुगीन मराठी कवी आणि पोर्तुगीज ख्रिस्ती-जेजुइट कवी यांच्या मराठी वाङ्मयाविषयी विविध प्रकारचे आणि महत्त्वाचे संशोधनकार्य करणाऱ्या प्रियोळकरांनी चरित्रलेखनही केले ते एकोणिसाव्या शतकातील समाजपुरुषांचेच!
‘ग्रंथ म्हणजे ज्ञानाचे कुंभ!’ हे सूत्र सतत मनात बाळगणारे प्रा. अ. का. प्रियोळकर यांचे नाव मराठीच्या अभ्यासकांना, वेगवेगळय़ा अभ्यासक्षेत्रांतून परिचित झालेले असेल. ज्यांनी आपली हयात सातत्याने ग्रंथसंशोधन, ग्रंथचिकित्सा, ग्रंथसंग्रह व ग्रंथसंबंधित सर्व पैलूंच्या संशोधनासाठी अपार परिश्रम करण्यात घालवली, त्या प्रा. अ. का. प्रियोळकर यांचे हे ‘सुवर्णस्मृति’वर्ष! या निमित्ताने त्यांचे कृतज्ञ स्मरण प्रत्येक मराठी भाषकाने करायला हवे. त्यांच्या बहुविध संशोधनकार्याची, मराठीच्या जतनासाठी, वृद्धीसाठी घेतलेल्या परिश्रमांची थोडक्यात कल्पना अभ्यासकांना आणि इतरेजनांना यावी हे या लेखाचे एक प्रयोजन आहे.
लोकहितवादींप्रमाणेच प्रा. प्रियोळकरही म्हणत की, ‘‘भाषेत ज्ञानवृद्धिकर ग्रंथ असावेत हेच भाषेस व राष्ट्रास भूषणावह आहे. आपले भाषेत अधिकाधिक चांगले ग्रंथ होतील तर ते आपली ज्ञानसमृद्धी वाढवतील.’ आजच्या तंत्रज्ञानमय युगात हे म्हणणे कदाचित न पटणारे किंवा कालविसंगत वाटेल, परंतु ग्रंथांना तितकाच योग्य व स्थायी पर्याय नाही, हेही आपण जाणतोच. आपल्याकडे असलेल्या ज्ञानभांडाराचे जतन व संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या एशियाटिक सोसायटीने आवश्यक ते संदर्भग्रंथ प्रकाशित करणे व त्यांचा लाभ पुढील पिढीच्या संशोधकांना मिळेल अशा तळमळीने प्रयत्न करणे हे सोसायटीच्या आजवरच्या लौकिकास साजेसेच आहे. त्यानुसार ‘प्रा. अ. का. प्रियोळकर लेखसंग्रह खंड १ व खंड २’ अशा दोन खंडांचे प्रकाशन येत्या शुक्रवारी, १७ मार्च रोजी एशियाटिक सोसायटीच्या दरबार हॉलमध्ये होत आहे. हे प्रकाशन या सुवर्णस्मृतिवर्षांत व्हावे आणि त्यासाठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभावेत हेही विशेष आनंददायी आहे.
प्रस्तुतच्या दोन खंडांमध्ये प्रियोळकरांचे असंकलित लेखन संग्रहित केलेले आहे. प्रा. प्रियोळकरांनी मराठी वाङ्मय, भाषा, ग्रंथचिकित्सा याबाबत मोठय़ा प्रमाणावर व सातत्याने लेखन केले होते. त्यांच्या कार्याचे, लेखनाचे जतन करण्याचे काम मोठे व महत्त्वाचे होते. त्यांचे बरेचसे संशोधन त्यांच्या हयातीतच त्यांनी ग्रंथरूपाने प्रकाशित केले होते. परंतु त्याशिवाय अनेक अज्ञात, हस्तलिखित काव्यसंहिता मिळवून, त्यांची पाठचिकित्सा करत त्यातील भाषाविषयक घटकांची तर्कसुसंगत मांडणी, नवीन माहिती, आपले संशोधन किंवा ग्रंथालये वा ग्रंथ याच्याविषयीचे आपले विचार, त्यांनी लेखांच्या स्वरूपात वेगवेगळय़ा नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केले होते. हे सारे लेखन गोव्यातील व मुख्यत: महाराष्ट्रातील वृत्तपत्रे, नियतकालिके यामध्ये विखुरलेले होते. ते लेखन म्हणजे मराठी वाङ्मय-संशोधनाच्या दृष्टीने वेगळी व महत्त्वाची साधने आहेत. त्यामुळे त्यांचे संकलन होणे आणि ते वाचकांना, अभ्यासकांना उपलब्ध करून देणे आवश्यक होते.
डॉ. सु. रा. चुनेकर यांनी १९९५ मध्ये केलेल्या प्रियोळकरांच्या लेखन-सूचीनुसार त्यांच्या स्वतंत्र लेखांची संख्या २६८ होती, त्यापैकी काही प्रियोळकरांच्या इतर ग्रंथांमध्ये समाविष्ट झाले. तरीही त्यात समाविष्ट नसणारे २२५ लेख होते. सूचीत नसलेले काही लेख (सुमारे १०) नंतर आम्हास मिळाले. याशिवाय हिंदी, इंग्रजी व गुजरातीतील लेख ३१ आणि इतरांच्या ग्रंथांमध्ये समाविष्ट झालेले किंवा प्रस्तावनावजा लेख ३८ होते. (त्यांच्या नावावर आज ५६ ग्रंथ- स्वतंत्र व संपादित- आहेतच.) ही आकडेवारी त्यांच्या अफाट लेखनाची कल्पना देईल. यापैकी महत्त्वाच्या लेखांचे संकलन-संपादन शास्त्रशुद्ध रीतीने व परिश्रमपूर्वक होणे आवश्यक होते. ते करण्यासाठी एशियाटिक सोसायटीने मराठीचे अभ्यासक, संशोधक असणारे डॉ. नितीन रिंढे यांच्यावर ती जबाबदारी सोपवली. या खंडांचे संकलन-संपादन करणे, त्यास विस्तृत तळटिपा, संदर्भ पुरवणे या बाबी अभ्यासपूर्वक केल्या गेल्या आहेत, त्यामुळे या खंडांचे संदर्भमूल्य वाढले आहे. प्रियोळकरांच्या लेखनाकडे वर्तमानातील वाङ्मय संशोधकाने कसे पाहावे हे संपादकांच्या विस्तृत प्रस्तावनेतून स्पष्ट होईल. शिवाय आपल्या पूर्वसुरींनी आपल्यासाठी केवढा अमूल्य संशोधनवारसा निर्माण करून ठेवला आहे हे भविष्यातील वाङ्मयसंशोधकांना जाणवेल आणि ते प्रेरकही वाटेल.
१८९५ साली गोव्यातील प्रियोळ येथे जन्मलेल्या प्रियोळकरांची कर्मभूमी मात्र मुंबईच राहिली. त्यांनी आत्मचरित्र लिहिण्यास सुरुवात केली होती, तरी ते पुरे होण्याआधीच त्यांचे १९७३ साली मुंबई येथे निधन झाले. प्रा. अ. का. प्रियोळकर यांचे प्रारंभीचे आयुष्य मोठय़ा एकत्र कुटुंबात व सधन स्थितीत गेले. परंतु तत्कालीन परिस्थितीनुसार शिक्षणाचे माध्यम कधी पोर्तुगीज, कधी मराठी, कधी इंग्रजी असे बदलत राहिले, त्यात काही वेळा परीक्षा हुकल्या व शेवटी ते वयाच्या २७-२८व्या वर्षी बी.ए. झाले. मॅट्रिक झाल्यानंतर ते आधी धारवाडच्या कॉलेजात व शेवटी बी. ए.च्या वर्षी सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात शिकत होते. कॉलेजच्या वयातच विविधज्ञानविस्तारसारख्या नियतकालिकात त्यांनी लेख लिहिण्यास आरंभ केला खरा, पण त्याआधी त्यांनी थोडे ललितलेखनही केलेले होते. शालेय वयात आणि कॉलेजातही मराठीचे वाचन होत असे. लेखनाची सुरुवात जरी ललित लेखनानेच झाली, तरीही आरंभापासून त्यांची लेखनप्रवृत्ती गंभीर होती हे लक्षात येते. त्यांच्यावर एकूण प्रभाव होता तो, डॉ. पी. डी. गुणे, म. म. दत्तो वामन पोतदार, डॉ. केतकर, डॉ. रा. गो. भांडारकर यांसारख्या व्यासंगी विद्वानांचा! यामुळे प्राचीन वाङ्मय, भाषाभ्यास यांची त्यांना आवड निर्माण झाली व त्यांनी बरेचसे संशोधन त्या क्षेत्रात केले.
‘नामूलं लिख्यते किंचित्।’ हा संस्कृत पंडित मल्लीनाथाचा आदर्श त्यांनी कायम समोर ठेवतच आपले सारे लेखन केले. परंतु कोणाच्याही, कोणत्याही संशोधनात अंतिम शब्द मानता येत नाही, कारण कालांतराने नवीन साधनसामग्री उपलब्ध होते हे सत्य तेही जाणून होतेच. त्यामुळे कोणतेही संशोधन करत असताना आपला दृष्टिकोन स्पष्ट असावा आणि आपले तत्संबंधीचे धोरण निश्चित असावे याची त्यांनी काळजी घेतली. परिणामस्वरूप त्यांचे संपादित ग्रंथ हे साक्षेपी संपादनाचा वस्तुपाठ ठरत. ज्यावेळी पाठचिकित्साशास्त्र या अभ्यासक्षेत्राची फारशी जाणीव आपल्याकडे नव्हती, तेव्हा त्यांनी दमयंती-स्वयंवर (१९३५) या रघुनाथपंडितरचित काव्याची पाठचिकित्सा करत एक आदर्श निर्माण केला. त्यानिमित्ताने पाठचिकित्साशास्त्राची मूलतत्त्वेच अधोरेखित केली गेली.
यानंतर त्यांनी ज्ञानदेवी, मुक्तेश्वरकृत महाभारताचे आदिपर्व, कविवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ आदी मराठी कवींची व जेजुइट ख्रिस्ती कवींची मराठी काव्ये यांचे साक्षेपी संपादन केले. यात फादर स्टीफनचे ख्रिस्तपुराण खूपच उपयुक्त ठरले होते, ते विद्यापीठांमध्ये नेमले जाई. यामुळे त्यांच्या विद्वत्तेची, व्यासंगाची ख्याती महाराष्ट्रात पसरली. परंतु त्यांनी जे इंग्रजीतून ग्रंथलेखन केले तेही महत्त्वाचे होते आणि त्यामुळे त्यांना परभाषिक वाचकवर्गही मिळाला. त्यातील अजूनही उपयुक्त व लक्षणीय म्हणावेत असे ग्रंथ म्हणजे The Printing Press in India (1958), The Goa Inquisition (1961) , Goa : Facts Versus Fiction (1962) हे तीन. यातील ‘पिंट्रिंग प्रेस इन इंडिया’ हा ग्रंथ अनेकांना दिशादर्शक व माहितीपूर्ण वाटला. प्राच्यविद्याभ्यासक व भाषाविद असणारे, प्रख्यात विद्वान डॉ. सुनीतीकुमार चॅटर्जी यांनी, तसेच भूतपूर्व पंतप्रधान पंडित नेहरूंनीही या आगळय़ा ग्रंथाची व प्रियोळकरांची मुक्तकंठाने स्तुती केलेली दिसते.
महाराष्ट्रातील भाषिक व वाङ्मयीन संशोधन करत त्याच्या विकासाचा आलेख मांडत असताना प्रियोळकरांनी स्थानीय-सामाजिक इतिहासाच्या अंगानेही काही लेखन केले, तसेच त्यांचे फार लक्षणीय कार्य म्हणजे मराठी वाङ्मयसंशोधनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या मराठी संशोधनमंडळाची स्थापना करण्यात त्यांनी घेतलेला पुढाकार. त्यांच्या खटपटीने व अथक परिश्रमांमुळेच स्थापन झालेली ‘मराठी संशोधनमंडळ’ ही संस्था व तिचे ‘मराठी संशोधन पत्रिका’ हे त्रमासिक यांनी आपल्या अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे.
मराठी भाषेसाठी दोलामुद्रिते (incunabulae), तत्रव, नामावली, बृहन्नामावली, दर्शिका ( Index) यासारख्या अचूक पारिभाषिक संज्ञांची प्रातिभा निर्मिती करणारे प्रा. अ. का. प्रियोळकर यांच्यासारख्या विद्वानाचे त्यांच्या सुवर्णस्मृतिवर्षांनिमित्ताने केलेले हे स्मरण सर्व मराठीजनांस प्रेरक ठरावे.