सुधीर भट, गोपाळ अलगेरी आणि मी गेटवेजवळच्या माझ्या क्लबमध्ये प्राथमिक बोलणी करायला भेटलो.. द रॉयल बॉम्बे यॉट क्लब. या सुंदर, प्रशस्त क्लबचा मला फार चांगला उपयोग होतो. शांत, प्रसन्न वातावरणात चहा-सँडविचेस्चा आस्वाद घेत घेत कामाची रूपरेखा ठरवता येते. मोकळेपणाने निर्णय घेता येतात. आमच्या या भेटीत ‘शेजाऱ्यां’च्या कारवायांना पुन्हा एकदा मूर्त स्वरूप द्यायचा निर्णय पक्का झाला.
एक अडचण होती- संहितेची पूर्ण अशी एकही प्रत शिल्लक नव्हती. माझ्याकडे जेमतेम एक खिळखिळी कॉपी उरली होती; पण मधली काही पाने गहाळ आणि सगळी गाणी गायब! मग आधीच्या प्रयोगामधल्या खंद्या शेजारणी मीना गोखले आणि रजनी वेलणकर यांच्याकडे मी धाव घेतली. हरवलेले संवाद, विसरलेली गाणी आम्ही आठवून आठवून पुन्हा एकदा कागदावर उतरवून काढली. तेवढय़ात अलगेरींनी एक लाखमोलाची रेकॉर्ड केलेली टेप मिळवून दिली. साहित्य संघामध्ये होणाऱ्या काही खास नाटकांचे ध्वनिमुद्रण भालचंद्र पेंढारकर करवून घेत असत. कधीतरी कुणाला उपयोग होईल म्हणून. आणि खरोखर, खुद्द एका लेखिकेलाच त्यांच्या या सेवेची केवढी मदत झाली. आज इतक्या वर्षांनी अण्णा, मी आपले आभार मानते.
नाटकाच्या प्रती छापून तयार होत्या. आम्ही पुन्हा एकदा यशवंत देवांना संगीताचा भार सांभाळायची विनंती करण्याचं ठरवलं. जुन्याच अप्रतिम चाली कायम ठेवा, अशी मी नानांना गळ घातली. पेंढारकरांनी केलेल्या प्रयोगाच्या रेकॉर्डिगचा पुन्हा एकदा उपयोग झाला.
नेपथ्याचा आकृतिबंध तर तयारच होता. त्याचा पूर्ण आराखडा- अगदी शेवटच्या खिळ्यापर्यंत- माझ्या डोक्यात पक्का होता. नाटकाला साजेल असा अतिशय सोपा सेट होता. नाटक प्रत्येक शेजाराच्या घरातून फिरते. देखावे फटाफट बदलतात. तेव्हा मध्यवर्ती सांगाडा तोच ठेवून प्रवेश बदलला की त्याप्रमाणे तेवढा जुजबी बदल करायचा. प्रत्येक शेजाऱ्याचे घर त्याचा स्वभावधर्म ध्यानात धरून योजले होते. हॉलच्या डाव्या-उजव्या भिंतींना खिडक्या होत्या. जगनचे घर असले की डावी खिडकी उघडी राही. दुसरी बंद केली की ती भिंतीचाच भाग वाटत असे. मग तिच्यावर अनुरूप असे छानसे निसर्गचित्र चढवले जाई. याउलट, मकरंदच्या घरी सजावट थोडी आधुनिक ठेवली. पेंटिग अॅब्स्ट्रॅक्ट. (हे चित्र पूर्वाने मुद्दाम बनवले. ती जे. जे.ची विद्यार्थिनी होती.) तात्याच्या घरी दोन्ही खिडक्या उघडय़ा असत. घरात देवादिकांचे फोटो टांगलेले. मुख्य म्हणजे एका भिंतीवर तात्याच्या तीर्थरूपांची हार घातलेली तसबीर होती. अर्थात मंगेशचाच फोटो मोठा करून आम्ही फ्रेम केला होता. सूचक प्रसंगी मंगेश गंभीरपणे पिताजींना नमस्कार करून बहार आणत असे. अवघ्या तीन-चार वस्तू बदलून वेगवेगळी घरे सूचित करण्याची ही मखलाशी प्रेक्षकांना बेहद्द पसंत पडली. या नेपथ्यामध्ये वास्तवाला थारा नव्हता. लवचिकपणा हा तर रिव्ह्य़ूचा स्थायीभाव. चाकोरीहून वेगळ्या हाताळणीला लोक मनापासून साथ देतात असा माझा अनुभव आहे. या खेपेला एक नवीन शक्कल लढवली. चार हुशार रंगकर्मीना (बॅकस्टेज) तयार केले. दृश्य संपले की संगीताच्या तालावर ठरल्या ठोक्याला ते शिस्तीत येत आणि पाहता पाहता मंचावर ‘होत्याचे नव्हते’ किंवा ‘नव्हत्याचे होते’ करीत. त्यांना काळ्या जीन्स आणि आमसुली टी-शर्ट असा गणवेष दिला होता. त्यामुळे त्यांची यात्रिक कसरत पाह्य़ला छान वाटे. नाटकाचा ते एक भागच बनून गेले. त्यांच्या सहभागामुळे खेळाला वेगळीच गंमत आली.
‘सख्खे शेजारी’मध्ये वेशभूषेच्या कल्पक हाताळणीला प्रचंड वाव होता. जुन्या प्रयोगात मी कपडेपटाचा फारसा- खरं तर अजिबात विचार केला नव्हता. या खेपेला ही चूक सुधारण्याचं ठरवलं. राणी पाटीलवर ही कपडेपटाची जबाबदारी सोपवली. राणी पण जे. जे.ची पदवीधर होती आणि अतिशय कल्पक आणि मेहनती होती. माझ्या ‘कथा’ सिनेमात ती मदतनीसांच्या टोळीत होती, तेव्हा तिची चुणूक चांगलीच जाणवली होती. राणी नुसती याद्या करून स्वस्थ बसणारी नव्हती. तिने प्रत्येक पात्राचा आणि प्रसंगांचा अभ्यास केला. ‘राणीचा कपडेपट म्हणजे एक स्वतंत्र नाटय़निर्मितीच आहे,’ अशी आम्ही कौतुकाने टिंगल करीत असू. एक-दोन उदाहरणे देते. बायका बंड करतात त्या एका प्रवेशात त्या पुरुषी पोषाख चढवून रणात उतरतात. या सगळ्याजणी साहजिकच आपापल्या नवऱ्यांचे कपडे घालणार, हा तिचा युक्तिवाद अचूक होता. प्रचंड ढगळ शर्ट, खालून मुडपलेल्या पँटी आणि लोंबणाऱ्या बाह्य़ा अशा अवतारात शेजारणी प्रकटल्या की प्रेक्षागृह उसळत असे. पुढे एका प्रवेशात जगन आणि मकरंद यांची मारामारी होते. गुद्दागुद्दी करीतच दोघे स्टेजवरून विंगेत जातात. त्यांच्या बायका स्तिमित होऊन पाहत राहतात. अवघ्या अध्र्या मिनिटात प्रवेश बदलतो. प्रकाश उजळतो. तेव्हा रस्त्याचा देखावा आहे. जगन व मकरंद कण्हत, लंगडत प्रवेश करतात. दोघे जायबंदी आहेत. कपडे फाटलेले. लक्तरं लटकताहेत. कुठे कुठे रक्ताचे डाग आहेत, तर कुठे चिखलाचे. हुबेहूब तशाच कपडय़ांचे दोन संच बनवून राणीने एकाची ‘कलात्मक दुर्दशा’ केली होती. नाटकाच्या अखेरीस पार्टीचा एक प्रवेश आहे. तात्या दुबईला जाणार म्हणून दोस्त ‘सेंड ऑफ’ योजतात. चारही शेजारी नटूनथटून उत्सवमूर्तीची वाट पाहताहेत. तात्या येतो, ते सूट घालून. हा सूट विलक्षण घट्ट आहे. ताणून ताणून लावलेली बटणे विचकल्यामुळे आतला शर्ट दिसतो आहे.. दात दाखवल्यासारखा. तात्याला श्वास घेणे, उठणे, बसणे अवघड झाले आहे. ‘आज मुद्दाम हा लग्नातला सूट घातला हो!’ कृष्णा कौतुकाने सांगते. मंगेश गुबगुबीत असल्यामुळे हा घट्ट सूट प्रकार त्याला फारच गोड दिसे. त्यातून तो बेरकेपणाने टाइमिंग साधून असा काही वळत असे, की उसवलेल्या कोटामधून आतल्या शर्टचे दारुण दर्शन घडत असे. नटांना पुढचे संवाद बोलण्यासाठी हशा ओसरायची वाट पाहावी लागे. शेजाऱ्यांचे (आणि माझे) नशीब म्हणून नाटकाला अशी गुणी वेशभूषाकार लाभली.
नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. दादरच्या एका हॉलमध्ये मंगेश आणि सुदीप सोडला, तर सगळे मला नवीन होते. आणि मीही सगळ्यांना नवीन होते. मला वाटतं, सुरुवातीला सगळे मला जरा बाचकून असत. पण काही दिवसांनी नवेपणा ओसरला आणि तालमीमध्ये मोकळेपणा आला. हसत-खेळत नाटक बसलं. ३१ ऑक्टोबर २०१० ला रात्री शिवाजी मंदिरात त्याचा शुभारंभ झाला. सख्ख्या प्रेक्षकांनी खणखणीत दाद दिली. दणदणीत परीक्षणं छापून आली. ‘एक गतरम्य सफर’- रवींद्र पाथरे (लोकसत्ता), ‘प्रेक्षकांच्या मनात घर करणारे शेजारी’ (लोकमत), ‘दोन घटका निखळ मनोरंजन’ (पुढारी), ‘दर्जेदार विनोदी नाटक’- संजय डहाळे (सामना), ‘चैतन्यदायी कलाकृती’- सुधीर दामले, ‘रिव्ह्य़ूचं सत्र याबाबतीत सई आता दादा ठरली आहे’- राजीव नाईक (दिनांक), ‘निर्मळ, निरागस नाटय़- जे कधीच जुनं होणार नाही’ (आपलं महानगर).. या आणि अशा वर्षांवाने आम्ही चिंब होऊन गेलो. धडाधड प्रयोग लागले.
तिन्ही जोडय़ा अनुरूप ठरल्या. आपसातला स्नेहभाव (क्वचित वैरभाव) दाखवून सर्व शेजाऱ्यांनी ‘सख्खे’ हा शब्द सार्थ करून दाखविला. यशपाल या नव्या नटाने आगंतुकाची सगळी सोंगे उत्तम वठवली. अरबी नृत्य पूर्वाने आणि त्याने छानच केलं. इतकं, की ‘अरबी सुंदरीचं नृत्य खजुरी आहे..’ असं सुंदर वर्णन कमलाकर नाडकर्णीनी केलं.
एका प्रवेशात स्वसंरक्षणासाठी बायका हत्यारं पारजतात. ही ‘हत्यारं’ अर्थात स्वयंपाकघरातून उचललेली असतात. लाटणं, धुपाटणं, ओगराळं! एका प्रयोगानंतर आतीशा नाईक घाबऱ्याघुबऱ्या आत आली. राणीला म्हणाली, ‘अगं, ‘ओगराळं’ हा शब्द हल्लीच्या पोरांना नाही ठाऊक.’ आता काय करायचं? माझ्या स्मृतिकोषात चांदीच्या ओगराळ्याने वाढलेला आमरस हा कायमस्वरूपी नोंदला गेला होता.. जेवढे पेच, तेवढे तोडगे निघतात. पुढच्या प्रयोगापासून आपापली शस्त्रं पारजताना शेजारणी ठणकावून सांगू लागल्या, ‘शस्त्र आहेत आमच्या हातात. हे ‘लाटणं’, हे ‘धुपाटणं’, हे ‘ओगराळं’! नाटक दाखवता दाखवता तरुण पिढीला मायबोलीचे धडे देता आले तर बिघडलं कुठे?
एकदा मंडळी गोव्याच्या दौऱ्याला निघाली होती. रात्रीचा प्रयोग गाठायचा होता. जंगलातून वाट होती. वाटेत मुसळधार पाऊस लागला. आणि मग एक पाण्याचा लोट आला. बसच्या दारातून पाणी आत आलं. हे काहीतरी विलक्षणच होतं. रस्त्यात पाणी तुंबलं म्हणजे काय? अंधार पडू लागला होता. बस थांबली. दोघे-चौघे चौकशीला निघाले. रस्त्यावर एक प्रचंड मोठं झाड उन्मळून आडवं पडलं होतं. त्यानं पाणी अडवलं होतं. बसमध्ये आठ-दहा रंगकर्मी होते. सुदैवाने एक भक्कम दोर होता. तो दोर घेऊन या रंगकर्मीनी धडाधड खाली उडय़ा ठोकल्या. मग युद्धपातळीवरून काम सुरू झालं. दोर झाडाला आणि बसला बांधला आणि बस रिव्हर्समध्ये घेतली. बराच वेळ जीवघेणी रस्सीखेच चालू होती. झाड विरुद्ध माणूस आणि मशीन यांची युती. अखेर युतीचा जय झाला. झाडाचं धूड सरकल्यावर साचलेलं पाणी वाहून गेलं आणि बसने पुन्हा आपला मार्ग आक्रमला. मला वाटतं, शेजाऱ्यांनी जेमतेम तिसरी घंटा गाठली. नाटक सुरळीत चालू राहण्यामागे बॅकस्टेजवाल्यांचा केवढा मोठा कार्यभाग असतो याची लोकांना सहसा कल्पना येत नाही. पडद्याच्या मागे बिनबोभाट काम करणाऱ्या या सेनेला मी मन:पूर्वक सलाम करते.
नाटकाची आमची अवघी टीम शौकीन होती. खूशमिजाज! सदा आनंदोत्सव साजरा करायला तयार. निमित्ताच्या शोधातच असायची. माझ्या वाढदिवसाचे एकदा छान निमित्त मिळाले. सगळ्यांनी मिळून मला अंधेरीच्या कुठल्याशा रेसिडेन्सीच्या गच्चीत सुरेख पार्टी दिली. अतिशय सुंदर अशी साडी मला भेट दिली. माझ्या नाटय़जीवनामध्ये एका अविस्मरणीय संध्येची नोंद झाली.
शेजाऱ्यांचा नवा गुजराती अवतार दिवाळीनंतर लगेच प्रकट होणार आहे. संजय गोराडिया हे गुर्जर रंगभूमीचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक-नट या प्रकल्पाचे सारथ्य करणार आहेत.
सुयोगच्या प्रयोगांमुळे तीस वर्षांनंतरही तेरडय़ाचे फूल टवटवीत राहू शकते हे सिद्ध करून दाखवले. पी. डी. ए. मधले एक जुने सहकारी शशिकांत कुलकर्णी यांच्याशी गप्पा मारताना पुस्तक छापण्याचा पुन्हा विषय निघाला. माझा दुराग्रह एव्हाना विरला होता. नव्हे, आपल्या लाडक्या नाटय़प्रकारावर आपणच अन्याय केल्याची बोच जाणवू लागली होती. श.कु.ने मग काँटिनेन्टलच्या देवयानी अभ्यंकर यांची गाठ घालून दिली. सूर जुळले. मग छापे जुळायला वेळ लागला नाही. सुयोगने सादर केलेल्या १०० व्या प्रयोगाचा सुमुहूर्त गाठून ‘सख्खे शेजारी’चे पुस्तक शिवाजी मंदिरात प्रकाशित झाले. हा खरोखरच एक
‘सख्खे शेजारी’- २
तीसएक वर्षांच्या अवधीनंतर सुधीर भट यांच्या ‘सुयोग’ संस्थेसाठी पुन्हा एकवार ‘सख्खे शेजारी’ दिग्दर्शित करण्याबद्दल मला विचारणा करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-06-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renown drama artist sai paranjpye share her career experience