२९ डिसेंबरच्या ‘लोकरंग’च्या अंकात राम जगताप यांनी ‘अक्षरयोगी’ या माझ्या पुस्तकाबद्दल लिहिलेला द्वेषमूलक व अभिरुचिहीन मजकूर वाचून सखेदाश्चर्य वाटलं आणि करमणूकही झाली. यापूर्वी ‘अनंताची फुलं’ या अनुराधा औरंगाबादकर (माझी मोठी बहीण) यांच्या पुस्तकाबद्दल त्यांनी असाच थयथयाट केला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मान ठेवून त्या उपद्व्यापाकडे आम्ही दुर्लक्ष केलं होतं. परंतु आता त्याच बेतालपणे अंतरकरांवरच्या दुसऱ्या पुस्तकाबद्दल त्यांनी लिहिलं, तेव्हा त्यांच्या लिखाणामागचा आकस आणि अंतरकरद्वेष उघड झाला आहे.  
‘अक्षरयोगी’ला अपशकुन करण्याचा हा विघ्नसंतोषी प्रयत्न असेल, तर तो पूर्णपणे फसणार आहे. मराठी साहित्य क्षेत्रातल्या दिग्गजांनी आणि सुजाण वाचकांनी ‘अक्षरयोगी’चं स्वागत केलं आहे. साहजिक राम जगताप यांनी या पुस्तकाचं कितीही अवमूल्यन करण्याचा प्रयत्न केला तरी काही बिघडत नाही. त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टीने केलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करून मी गप्प राहिले असते. पण दु:खाची गोष्ट म्हणजे तरीही या नगण्य प्रतिक्रियेची दखल घेणं मला भाग आहे. कारण त्यांनी त्यात काही आरोप करून माझी अकारण बदनामी करण्याचा उपद्व्याप केला आहे. तसंच काही ठिकाणी संदर्भ आणि सभ्यता यांच्या मर्यादेबाहेर जाऊन सवंग शेरेबाजी केली आहे. माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या आत्मसन्मानाच्या रक्षणाखातर तिचा समाचार घेणं भाग आहे.
या पुस्तकात निर्मला अन्तरकर यांच्यावरील लेखात ‘‘(अण्णांबरोबर) ती सतीच जायची..,’’ असं वाक्य मी लिहिलं आहे. त्यातून मी ‘सतीच्या अमानुष प्रथेचं समर्थन करीत आहे याचं मला भान राहिलेलं नाही, असा अजब निष्कर्ष काढला आहे. हा लेख मी सतीच्या प्रथेवर लिहिला नसून माझ्या आईवर लिहिला आहे. तिच्या समर्पण भावनेचं वर्णन करण्यासाठी मी मराठी भाषेतल्या, रूढ झालेल्या एका वाक्प्रचाराची मदत घेतली आहे. त्या एका वाक्यातून एका दुष्ट प्रथेचं समर्थन कसं होऊ शकतं? कुसुमाग्रज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या थोर साहित्यिकांनीसुद्धा आपल्या काळांमध्ये सतीत्वाच्या गुणाचा (कृतीचा नव्हे!) दाखला दिला आहे. कुसुमाग्रजांच्या काव्यात ‘आता तर आहे पुण्य सतीचेच उणे’ असा उल्लेख आहे, तर ‘बुद्धय़ाचि वाण धरिले करी हे सतीचं’ असं सावरकरांनी कवितेत म्हटलं आहे. यावरून या दोघांनी सतीप्रथेचं समर्थन केलं आहे, असा निष्कर्ष कुणी काढला, तर मराठी भाषेच्या अज्ञानापोटी केलेला अर्थाचा अनर्थ होईल किंवा दुसऱ्याचा हेतूपुरस्सर केलेला अपमान होईल; त्या व्यक्तीची बदनामी होईल.
या ताशेऱ्यात त्यांनी ‘यावरून या लेखाची जातकुळी कळते’ अशी भर घातली आहे. ‘जातकुळी’ हा शब्द वापरताना या थोर समाजसुधारकाला आपण जातपातीच्या अमानुष प्रथेचं भान आहे का, असा सवाल का करू नये? समीक्षकानं कोणत्याही लेखनाचं संपूर्ण वाचन करून व संदर्भ समजून घेऊन मतं व्यक्त करायची असतात. एखाद्या वाक्यावरून लेखनाची समीक्षा होत नसते. ‘समीक्षा’ या शब्दाची फोड ‘सम+ईक्षा’ अशी आहे व या शब्दाचा अर्थ सम्यक दृष्टीनं, समतोल वृत्तीनं केलेली पाहणी- असा आहे. समीक्षेच्या या व्याख्येत त्यांचं लेखन बसतं का?
समीक्षकाला वाक्यामागचा अर्थ तर कळत नाहीच; पण जे डोळ्यासमोर आहे, तेही दिसत नाही. याचं उदाहरण म्हणजे ‘पुस्तकाच्या मलपृष्ठावर अंतरकरांविषयीचे (लेखकांचे) अभिप्राय छापले आहेत आणि त्यांचेच लेख पहिल्या भागात छापले आहेत..’ हा त्यांचा दुसरा शेरा. हे अभिप्राय त्या लेखकांनी स्वतंत्र लिहिलेले नाहीत आणि लेख वेगळे लिहिलेले नाहीत. त्यांच्या लेखनातूनच हे अभिप्राय संकलित करून मलपृष्ठावर छापले आहेत. अशा प्रकारे मलपृष्ठावर अभिप्राय देऊन पुस्तकाच्या स्वरूपाविषयी वाचकांना कल्पना देणं, हा प्रकाशनाच्या क्षेत्रातला जुना प्रघात आहे. एवढी सर्वसामान्य गोष्ट लेखन क्षेत्रात काम करणाऱ्याला माहीत नसेल, तर त्याला समीक्षा करण्याचाअधिकार नाही, असं खेदानं व नाइलाजानं म्हणावं लागेल. मुळात, मलपृष्ठावरच्या मजकुराचा पुस्तकाच्या मूल्यमापनाशी आणि समीक्षेशी संबंधच नसतो. तो जोडून टीका करणं हे अज्ञानमूलक आहेच; शिवाय आकसानं व उरकून टाकण्याच्या वृत्तीनं पाटय़ा टाकणंही आहे.
जगताप पुस्तक नीट वाचत नाहीत आणि समजून घेत नाहीत याचा ठळक पुरावा म्हणजे त्यांचा पुढील शेरा : ‘या पुस्तकात मान्यवर लेखकांनी अंतरकरांबद्दल लेखक म्हणून बोलण्याचं टाळलं असावं.’ जगतापांना व्यक्तिश: अंतरकरांचं लेखन आवडलं नसेल तर ते त्यांचं मत आहे; ते त्यांचं स्वातंत्र्य आहे. पण आपलं मत सांगण्यासाठी त्यांनी दुसऱ्या लेखकांचा गैरवापर करू नये. ना. सी. फडके, अरविंद गोखले, शं. ना. नवरे, प्र. श्री. नेरूरकर आणि यशवंत रांजणकर यांच्या या पुस्तकातल्या लेखांमध्ये अंतरकरांच्या लेखनगुणाची स्पष्ट व गुणग्राहक दखल आवर्जून घेतलेली आहे. मलपृष्ठावर गोखले व नवरे यांच्या अभिप्रायांचाही समावेश आहे. पुस्तकाचं मलपृष्ठसुद्धा वाचण्याचं सहजसोपं काम ज्यानं केलेलं नाही, त्यानं आतल्या लेखांचं वाचन उचित गांभीर्यानं, प्रामाणिकपणे केलं असेल का, शंकाच आहे.
राहता राहिली बाब- या पुस्तकातल्या इतर मान्यवरांनी अंतरकरांच्या लेखनाचा उल्लेख वा अनुल्लेख करण्याची! तर या पुस्तकातले काही लेखक दुसऱ्या व तिसऱ्या पिढीतले आहेत. त्यांना अंतरकर लेखक म्हणून ठाऊक नसणार, हे उघड आहे. संपादक म्हणून ते अंतरकरांच्या संपर्कात होते. साहजिकच त्यांच्या लेखांमध्ये ‘संपादक अंतरकर’ दिसतात. याचा अर्थ- लेखक म्हणून अंतरकर त्यांना मान्य नव्हते, असा जगतापांना लावायचा असेल तर त्यांनी खुशाल लावावा. या पुस्तकात अनंत काणेकर, चिं. वि. जोशी, ग. त्र्यं. माडखोलकर आदी प्रभुती त्या काळातल्या दिग्गज लेखकांनी आणि १९४० च्या- म्हणजे अंतरकर लिहीत होते त्या काळातल्या मान्यवर समीक्षकांनी अंतरकरांच्या लेखनगुणाची घेतलेली दखलही नोंदलेली आहे. या काळातल्या जाणकारांनादेखील अंतरकरांचा लेखनगुण मान्य आहे, हे ‘अक्षरयोगी’ वाचून आलेली वाचकांची पत्रं माझ्याकडे आहेत. ‘अक्षरयोगी’ वाचल्यानंतर(च) मुंबईच्या ‘महाराष्ट्र सेवा संघ’ या मान्यवर साहित्यसंस्थेनं त्याची दखल घेणारा कार्यक्रम अलीकडेच आयोजित केला होता. तेव्हा अंतरकरांचा लेखनगुण नव्यानं सिद्ध करण्याची वेगळी गरज नाही.
समीक्षकानं पुस्तक जसं आहे त्यानुसार त्याची समीक्षा करावी, हा नियम जगताप यांना ठाऊक नसावा. ते कसं असावं, याबद्दलची आपली अपरिपक्व मतं दुसऱ्यांवर लादण्याची दंडेली ते करत राहतात. वेगवेगळ्या लेखांमधून तीच ती माहिती पुन्हा पुन्हा आल्याची तक्रार ते करतात. ही माहिती नसून अंतरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे निरनिराळे पैलू आहेत, हा साधा फरक त्यांना कळत नाही? एकाच व्यक्तीबद्दल अनेक जण लिहितात तेव्हा काही गोष्टींची पुनरावृत्ती अपरिहार्य आहे, हे त्यांनी समजून घ्यायला हवं होतं.
समीक्षेशी व पुस्तकाच्या मूल्यमापनाशी काडीचा संबंध नसलेल्या किरकोळ गोष्टींची जंत्री करून खुसपटं काढण्याचा त्यांचा उपद्व्याप अनाकलनीय आहे. पुस्तकाची जास्त पृष्ठसंख्या व किंमत, पुस्तकातल्या पुनर्प्रकाशित लेखांच्या प्रसिद्धी तारखा यांच्याबद्दल त्यांच्या तक्रारी अनाठायी आहेत. पूर्वप्रकाशित लेखांच्या नियतकालिकांना श्रेय मी दिलंच आहे. ते म्हणे जुजबी आहे. म्हणजे काय? ते स्वतंत्र पानावर सोनेरी वेलबुट्टी काढून द्यायला हवं का? आणि त्यामुळे पृष्ठसंख्या वाढली, की हे मग छडी मारण्याची संधी घेणार! पुस्तकाचं स्वरूप व पृष्ठसंख्या ठरवणं हा त्याच्या संपादकाचा व किंमत ठरवणं हा प्रकाशकाचा अधिकार आहे. त्याबद्दल समीक्षकानं बोलण्याचं काम नाही. गंमत पाहा- समीक्षेशी संबंध नसलेल्या अशा गोष्टी (उणीदुणी) जगताप बघतात; पण पुस्तकाचं मुखपष्ठ, मांडणी, छपाई यांच्याबद्दल ते ब्र काढत नाहीत.
मात्र, त्यांची उलटतपासणी सुरू होते.. ‘या पुस्तकाचं आणि अंतरकरांबद्दलचे १९६६ मध्ये प्रसिद्ध झालेले लेख इतक्या उशिरा छापण्याचं कारण काय?’ अंतरकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त आणि त्यांचं कार्य व लेखन यांची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी हे पुस्तक काढलं आहे, ही माझी भूमिका पुस्तकाच्या मनोगतात स्पष्ट केली आहे. ते वाचलं असतं तर हा प्रश्न त्यांना पडला नसता. १९६६ साली प्रसिद्ध झालेले लेख २०१३ मध्ये छापू नयेत, असा कायदा आहे का? हे लेख वाचनात आल्यामुळेच खरं तर मला हे पुस्तक काढण्याची प्रेरणा मिळाली. मला नेहमीसारखा चरित्रग्रंथ किंवा नातलग, स्नेही परिवारांचे लेख असलेला गौरवग्रंथ काढायचा नव्हता. अंतरकरांचं साहित्यिक व्यक्तिमत्त्व दाखवणारं आणि विशेषत: त्यांच्या संपादनाची प्रक्रिया स्पष्ट करणारं साहित्य मला या पुस्तकासाठी हवं होतं. संपादक व प्रकाशक यांच्या कार्याची व परिश्रमांची मराठी साहित्यात अजूनही दखल घेतली जात नाही. माझा उद्देश या लेखांमधून पूर्ण होतो असं मला वाटतं. या पुस्तकात अन्य लेखकांचे १९ आणि अंतरकर कुटुंबातल्या फक्त दोन जणांचे लेख आहेत. त्यात आनंद अंतरकरांचा लेख संपादक व गुरू असलेल्या अंतरकरांबद्दल आहे. त्यांच्या आणि माझ्या लेखांबद्दल जगताप यांची पिरपिर आहेच. हे लेख तसे वाचनीय आहेत, असं म्हणण्याचं औदार्य ते एकीकडे दाखवतात, आणि हे आपण भलतंच काय लिहिलं असं वाटून लगेचच आम्हाला छडीही मारत गरजतात- ‘पण या लेखामध्ये अतिशयोक्ती, उपमा, उत्प्रेक्षा यांचा मारा आहे!’ पण अतिशयोक्ती कुठे आहे आणि तो मारा कुठे आहे, याची उदाहरणं ते देत नाहीत. जगताप पुढे आम्हाला हुकूम देतात : ‘अनंत अंतरकर आमचे वडील या मानसिकतेतून त्यांच्या मुलांनी बाहेर यावं.’ अरे वा! आणि ते काय म्हणून? अनंत अंतरकर आमचे वडील होते, हे जैविक सत्य आहे. आणि केवळ जैविक नव्हे, तर अभिमानास्पद सत्य आहे. आजवर आम्ही ‘साक्षेपी टीका’ ऐकून होतो. जगतापांमुळे मराठी साहित्यात ‘आक्षेपी टीका’ या नव्या प्रकाराची मूल्यवान भर पडली आहे.
– अरुणा अन्तरकर

२९ डिसेंबरच्या ‘लोकरंग’च्या अंकात राम जगताप यांनी ‘अक्षरयोगी’ या माझ्या पुस्तकाबद्दल लिहिलेला द्वेषमूलक व अभिरुचिहीन मजकूर वाचून सखेदाश्चर्य वाटलं आणि करमणूकही झाली. यापूर्वी ‘अनंताची

Story img Loader