बोला पुंडलिकावर्दाहारीठ्ठल
श्रीज्ञान्देवतुकाराम पंढरीनाथमहाराजकीजै..
अहाहा मंडळी! काय सांगू तुम्हाला..
मन कसं आनंदानं भरून गेलं आहे. तेही साध्यासुध्या आनंदानं नाही. सदानंदानं!
तुकोब्बामाऊली म्हणतात- आनंदाचे डोही आनंद तरंग आणि आनंदचि रंग आनंदाचा..
आमचं अगदी तस्सं झालं आहे.
अहो, का म्हणून काय विचारता?
आपले सदानंद मोरे महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत!
विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठाल.. हो!
मंडळी, ही सोपी गोष्ट नाही. एकवेळ आमदार-खासदार होणं सोपं. मोदी प्रचाराला आले म्हणजे झालं! मग कमळच काय, चिखलसुद्धा निवडून येतो! पण ही निवडणूक अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची होती. भले भले ढाले ढाले मातब्बर दानाला लागलेत तिथं! हवं तर आमच्या मसापवाल्यांना विचारा!
तेच्यामुळं आमच्या मनात आपलं सारखं बाकबुक, की होतो की काय आपुल्या सदानंदाचा येळकोट आणि भारतनाथाचं चांगभलं!
पण मंडळी, सदानंदमहाराजांनी ही निवडणूक जिंकली. तीही अशीतशी नाही. प्रचंड बहुमतांनी! (म्हणून तर लोक आता त्यांना प्रेमानं ‘समोजी’ असं म्हणू लागलेत!) साहित्यिकांचं एकेक मत (म्हणजे त्यांच्याकडं असतं तेव्हा) लाखमोलाचंच असतं! तर अशा तब्बल एकाहत्तर मतांनी ते विजयी झाले!
आम्ही असंच सांगत नाही.
माऊली म्हणतात- सांगतो ते तुम्ही आइकावे कानी, आमुचे नाचणी नाचू नका.
अहो, आकडेवारीच आहे. मतदान झालं एक हजार २०. त्यातल्या २७ मतपत्रिका अवैध ठरल्या!
दिसतंय दिसतंय आम्हाला. तिकडं कोपऱ्यात कोणीतरी मिशातल्या मिशांत खुदूखुदू हसतंय! पण आम्ही त्या समस्त नेमाडय़ांना सांगू इच्छितो, की या निवडणुकीत प्रौढ मतदान पद्धतीच असते!!
तर समोजींना एकूण मतं मिळाली ४९८. त्यांचे निकटतम प्रतिस्पर्धी भारतराव सासण्यांना मिळाली ४२७. बाकीच्यांचं काय झालं? इंद्रायणीत डिपॉझिट.. बुडालं!
विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठाल.. हो!
तर मंडळी तात्पर्य काय? आमचे समोजी प्रचंड बहुमतानं निवडून आले! साहित्यातले नमोजी ठरले!
एक संतसाहित्याचा अभ्यासक, लेखक, कवी, व्याख्याता, सदरकार, प्राध्यापक, झालंच तर टीव्हीस्टार.. होय! बुवा टीव्हीतल्या बातम्यांच्या कार्यक्रमात पण चर्चक म्हणून काम करतात!.. असं थोर व्यक्तिमत्त्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाचे अध्यक्ष झाले!
हे शुभवर्तमान आमच्या कानी पडलं आणि काय सांगू.. सुख झालं हो साजणी असंच झालं! वाटलं, वाखरीच्या रिंगणात धावतो तसं पळत सुटावं. समोजींना उराउरी भेटावं. भाळी बुका लावावा. गळ्यात तुळशीचा हार घालावा. पण मग म्हटलं, आता वर्षभर समोजींना हे हारच तर गोळा करीत साहित्यसेवा करायची आहे!
विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठाल.. हो!
मंडळी, सेवा वगैरे म्हटलं की लोकांना मेवाच आठवतो. पण जसा प्रधानमंत्री म्हणजे प्रधानसेवक, तसाच संमेलनाध्यक्ष म्हणजे साहित्यसेवकच! त्याला आता इलाज नाही! तेव्हा या नात्यानं समोजींकडून आमच्या काही अपेक्षा आहेत. किंबहुना आमचेही काही ठराव आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे समोजींनी आता तातडीने महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांतील प्रमुख साहित्यसेवकांना सूत्र स्वीकारण्याच्या विधीसाठी बोलावून घेतलं पाहिजे. जमल्यास पाकिस्तानातूनी चार-दोन साहित्यसेवक आले तर तेही पाहावे.
महाराष्ट्रात ठिकठिकाणच्या शाळांमध्ये मराठी मिनीस्कर्ट नेसून वावरत आहे म्हटल्यावर बृहन्महाराष्ट्रात तिची काय अवस्था असेल याची कल्पनाही करता येणार नाही. मराठीच्या संवर्धनासाठी समोजींनी एखाद्या उपग्रहाची (ते जड जात असल्यास किमान उपग्रह वाहिनीची) तरी घोषणा करावी.
संमेलनानंतर समोजींनी तातडीनं विविध राज्यांत दौरे काढावेत. त्यातून मराठी-कानडी, मराठी-मल्याळम, मराठी-पंजाबी असे संबंध दृढ करून इंग्रजीचा प्रभाव रोखण्यासाठी ठोस नाकाबंदी करावी.
मराठी भाषेबद्दलचं आपलं धोरण हे नेहमीच वळणावळणाचं राहिलेलं आहे. तेव्हा त्यात समोजींना काही यू टर्न घेता येणं शक्य नाही. पण प्रयत्ने वाळूचे कण रगडिता.. असो!
हल्ली मराठीतील खपावू पुस्तकं कमी झाली असून, भाषांतरित पुस्तकांची आयात वाढली आहे. तेव्हा समोजींना मेक-इन-मराठीसारखी काही योजनाही लेखकांसाठी राबविता येईल.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे समोजींना साहित्याचा विकास व्हावा यासाठी किमान चार-पाच अनुप्रासिक घोषणा तरी तयार करून घ्याव्या लागतील. त्याकामी निमंत्रित कवींची मदत घेतल्यास किमान त्यांना तरी रिकामटेकडे असं म्हणण्याचं धाडस कोणी करणार नाही!
मंडळी, आमचाही विसरभोळेपणा पाहा.
एवढय़ा मागण्यांचा ठराव केला आणि एक सांगायचं विसरलो-
स्वच्छता अभियान!
महामंडळाच्या मतदारयादीपासूनच त्याची सुरुवात केली तर कसं?
बोला, विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठाल.. हो!