लोकरंग (२३ डिसेंबर)च्या अंकात संपादक गिरीश कुबेर आणि भानू काळे यांचे रतन टाटा यांच्याविषयीचे लेख वाचून वर्षांच्या अखेरीला जे निराशेचं मळभ दाटून आलेलं होतं ते दूर झालं. अगदी मोजक्या शब्दांमध्ये खऱ्या अर्थाने आजच्या घडीला एका महामानवाचं या लेखांतून शब्दचित्र रेखाटलंय. रतन टाटा यांच्या साधेपणाची नेहमी चर्चा होत असते. हा साधेपणा कुठून आला असेल? ही जगण्याची पद्धत त्यांनी कुठून आत्मसात केली असेल? काय कारणं आहेत उपभोगशून्य जगण्याची? आपण कधी त्याचा विचार करणार आहोत काय? त्यातून घेता आला तर काही धडा घेणार आहोत काय?
‘उपभोगशून्य स्वामी’ असं टाटाचं सार्थ वर्णन संपादकांनी केलेलं आहे. समोर आदर्श नाहीत अशी हाकाटी केली जाते, पण आपल्यासमोर या श्रीमंत योग्याच्या रूपाने एक भव्यदिव्य शिखरच आहे. देशाची सर्वच क्षेत्रात झपाटय़ाने अधोगती होताना आपण पाहतो. त्यामुळे स्वत:च्या जगण्याने आणि अलौकिक कर्तृत्वाने या देशात मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना करणाऱ्यांचा आदर्श पुढे ठेवला तर देशाच्या पुनर्बाधणीसाठी त्याचा फायदाच होईल.
रतन टाटा हे खऱ्या अर्थाने भारतरत्न आहेत. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने खरं म्हणजे त्यांचा देशपातळीवर योग्य सन्मान व्हायला हवा, पण ती संधी घेण्याइतपत देशाचं नेतृत्व मोठं नाही याची आपल्याला जाणीव आहे. मात्र टाटांचं स्थान या देशातल्या लक्षावधी जनतेच्या हृदयात आहे.
वसईतले माझे एक स्नेही वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी टीसीएसमधून निवृत्त झाले. त्यांच्या घरी वर्षभरानंतर जाण्याचा योग आला. त्यांच्या हॉलमध्ये देव्हारा आहे. त्यात येशू आणि मरियेच्या तसबिरी आहेत. त्यांच्या बाजूलाच रतन टाटांची भली मोठी तसबीर विराजमान झालेली आहे. जिवंत व्यक्तीची तसबीर ख्रिस्ती धर्मात देवदेवतांच्या जवळ ठेवायची पद्धत नाही, हे मी त्यांना सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, ‘रतन टाटा हे टाटा उद्योग समूहातल्या सर्वच कर्मचाऱ्यांसाठी देवाच्या ठिकाणी आहेत. या घराण्याने आम्हाला पद, प्रतिष्ठा आणि सन्मान दिला.’ मी त्यांना विचारलं, ‘तुम्ही टाटांना कधी प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवाद साधला का?’ यावर संपादकांनी मांडलेल्या मुद्याचाच त्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, ‘मी इतरांपेक्षा  वेगळा आहे असं टाटांनी आम्हाला कधीच भासवू दिलं नाही.’
माणूसपण हरवत असलेल्या काळात भानू काळे यांच्या लेखातलं एक वाक्य कोरून ठेवण्यासारखं आहे. टाटा म्हणतात, शेवटी आयुष्यात एकच आई असते तुम्हाला! आईच्या अखेरच्या आजारपणात करिअरचा विचार न करता तीन महिने हॉस्पीटलमध्ये राहणारे रतन टाटा खऱ्या अर्थाने आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याबद्दल आदर वाटतो.
– सायमन मार्टीन, वसई, मुंबई

‘ललित’ – एक साचलेला साहित्यप्रवाह !
‘लोकरंग’(३० डिसेंबर)मधील ‘अपेक्षा आणि वास्तव’ हा राम जगताप यांचा लेख ‘ललित’  मासिकाचा अत्यंत संयमित आणि अचूक असा ताळेबंद आहे. मी ‘ललित’चा गेली २५-३० वष्रे वर्गणीदार आहे. ग्रंथजगताची संक्षिप्त माहिती आणि तत्कालीन साहित्याचे आस्वादात्मक रसग्रहण असे त्याचे स्वरूप होते आणि त्यामुळे हा अंक साहित्याचा प्रातिनिधिक स्वरूपात परामर्श घेणारा होत असे. पण गेली अनेक वष्रे हा रसरशीतपणा तर निघून गेला आहेच, पण साचलेपणाची लागण झाल्यामुळे त्यातील टणत्कारही लुप्त झाला आहे. ‘ललित’  साहित्याकडे झुकलेला असतो हा जगताप यांचा आक्षेप बरोबर आहे, माझीही त्याला हरकत नाही, पण लेखकांची निवडीमुळे केवळ साहित्यिकही परिपूर्ण अनुभूती त्यातून मिळत नाही, ही खरी खंत आहे.
एखादा कागद पुरवठादार न बदलणे, इतर साहित्य एकाच व्यक्तीकडून घेणे ही मराठी मानसिकता आहे. त्यात हितसंबंध, विश्वास या गोष्टी महत्त्वाच्या असतात, पण लेखकांबाबत मात्र हाच पायंडा पडला तर लेखकांना हे आपल्यावर बऱ्यापकी अवलंबून आहेत असा वास यायला लागतो. आणि मग दर्जाकडे, चांगले, नवे देण्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. यात कंपूशाही नसली तरी संपादकाचा प्रशासकीय आळस दिसून येतो. वर्तुळातील लेखकांना वारंवार संधी दिल्यामुळे त्यांच्या शैलीचा प्रभाव मासिकावर पडून कारण नसताना ती मासिकाचीच शैली होणे हा फार मोठा धोका ‘ललित’कारांनी पत्करला. यामुळे सदराच्या नावात वैविध्य असूनही ‘ललित’चा आविष्कार मात्र गणवेशीय होत गेला.
एखाद्या साम्राज्याचे बुरुज हे तुल्यबळ शत्रूच्या प्रतिहल्ल्यामुळे ढासळल्याचा इतिहास आपण वाचला आहे, पण ‘ललित’ला त्या अर्थाने प्रतिस्पर्धीच नसल्यामुळे त्याच्या सामर्थ्यांची आणि कमकुवत दुव्यांची कसोटीच कधी लागली नाही आणि त्यामुळे त्याचे बुरुज आज ढासळताना दिसत आहेत.
‘ललित लक्षवेधी’ हा उपक्रम चांगला असला तरी त्यातील व्यावसायिक आणि साहित्यिक मूल्य यांची गल्लत होता कामा नये. अ‍ॅडव्होटोरिअल हा प्रकार साहित्यात जपून वापरावा लागतो याचे भान ‘ललित’ने ठेवायला हवे. ‘ललित’कार एकमात्र प्रामाणिक गोष्ट करतात, ती म्हणजे त्यात संपादकीय नसते. कारण कोणी संपादक आहे असा संशयही येऊ नये, याची काळजी बहुतेक अंकांत घेतलेली दिसते. लेखक जेवढे लिहून देईल ते थेट अक्षरजुळणीकाराच्या स्वाधीन करायचे असे एकूण धोरण दिसते. त्यामुळे मासिकातील लेख हे आमिबासारखे पसरट आणि आकाराचा अंदाज न येणारे होतात. यातून अंकाला सौष्ठव तर मिळत नाहीच, शिवाय ते अंकाचे व्यक्तिमत्त्व घालवून टाकतात. पण एवढे असूनही माझ्यासमोर दुसरा चांगला पर्याय नसल्यामुळे मी ‘ललित’चा आजही वर्गणीदार आहे.
डॉ. केशव साठय़े, पुणे</p>

Story img Loader