‘लोकरंग’मध्ये (२० ऑक्टोबर) ‘कथा’ या विषयावरील राजन खान आणि रेखा इनामदार-साने यांचे लेख वाचले. इनामदार-साने यांनी कथेच्या इतिहासाचा आढावा घेत कथेच्या सद्य:स्थितीवर चांगला प्रकाश टाकला आहे. अनेक कथास्पध्रेत परीक्षक म्हणून काम केल्यामुळे त्यांना ‘कथा’ या वाङ्मयप्रकारात आपण नेमके कोठे आहोत याचा अंदाज आहे. राजन खान यांनीही आपल्या परीने ‘कथा’ या विषयाचे आपले आकलन प्रामाणिकपणे मांडले आहे. पण त्यांचे काही मुद्दे पटणारे नाहीत. स्वत:चे जगणे या प्रकारात आपल्याकडे बहुतेक लेखन होते, असा त्यांचा आक्षेप आहे. आपल्या बाहेर डोकावून लिखाण होत नाही, असे ते म्हणतात. मुळात कथा सांगण्याचे आसुसलेपण लेखकात हवे. ती सांगण्याची हातोटी हवी. कथेमध्ये वाचक गुंतून राहील अशी त्याची शैली तर हवीच; शिवाय मुख्य म्हणजे कथेमध्ये एक ठिणगी हवी. हे सारे असले की लेखकाने आत डोकावून कथा लिहिली काय किंवा बाहेर डोकावून लिहिली काय, माझ्या मते हा मुद्दा महत्त्वाचा नाहीच. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर लिहिले जावे अशी अपेक्षा राजन खान व्यक्त करतात. नामांतरावर लिहावे, दंगलीवर लिहावे. हे त्यांचे म्हणणेही फारसे पटणारे नाही. कथा म्हणजे निबंध नव्हे, ना परिसंवादाचा विषय. कोणत्याही ललित लेखकाचे सर्वात मोठे सामथ्र्य हे असते की, काय लिहावे, कशावर लिहावे, हे त्याचे स्वातंत्र्य. हे स्वातंत्र्य मिरवत त्यांनी लिहिते राहावे. राजन खान यांनी मांडलेली पुस्तकी नियमावली, आचारसंहिता कथाविश्व समृद्ध करेल असे मानणे हा केवळ भाबडेपणा आहे.
– शुभा परांजपे, पुणे.
विज्ञानकथेला पर्याय नाही…
‘कथा टिकून राहील..’ आणि ‘मराठी कथा आक्रसतेय!’ हे लेख वाचले. ‘कथा टिकून राहील’मध्ये कथा कशी असावी, आणि कथांचे विविध भाग कसे आहेत, हे सांगितलंय. त्यातला एक भाग विज्ञानकथा आहे, हे मात्र सांगितलेलं नाही. आपण पाहिलेले जीवन, त्यातले आपले वा दुसऱ्यांचे अनुभव याच्याशी जेव्हा विज्ञान जोडलं जातं तेव्हा कथेकडे पाहण्याचा एकंदरीत दृष्टिकोन बदलतो. कथेला जेव्हा अशी वेगळी दृष्टी प्राप्त होते तेव्हाच ती सामान्य कथांपेक्षा वेगळी व सरस ठरते! ‘मराठी कथा आक्रसतेय!’ या लेखात आपली बाजू मांडण्यासाठी लेखकांवर ताशेरे उडवले गेले आहेत. लेखिका विज्ञानकथांबाबत फक्त चारच नावं घेते तेव्हा नवल वाटत नाही. बऱ्याचदा बाळ फोंडके वा लक्ष्मण लोंढे यांची कथा एक कथा म्हणून वाचली जाते. ती विज्ञानकथा आहे याची वाचकाला जाणीव नसते. लोक काय वाचतात, जे वाचतात ते कितपत त्यांच्या डोक्यात जातं, हेही तपासायला हवं. विज्ञानकथेत प्रगल्भता असते. वास्तव असतं. कल्पनारम्यता असते. वेगळेपण असतं. रोजच्या जीवनाशी जरी ती निगडित असली तरी तिच्यात अन्य कथांतल्याप्रमाणे तोच तोपणा नसतो.
– स्मिता पोतनीस, मुंबई.