‘पराजयदशमी’ हा (लोकरंग, १३ ऑक्टोबर) गिरीश कुबेर यांचा लेख समाजातील काही घटकांच्या कप्पेबंद मन:स्थितीवर भेदक भाष्य करणारा आहे. अशा कंपूशाहीमुळे वैचारिक मोकळेपणा हरवत असून एकमेकांबद्दल मोकळेपणाने विचार करण्याची स्वाभाविक प्रकियाच नाहीशी होत आहे. यात केवळ विविध विचारधारांचे अनुयायी किंवा संघटनाच सामील नाहीत, तर वैचारिक नेतृत्व करणारे समाजधुरीण आणि कलावंत नाही. आपण आपले स्वातंत्र्य कधी गमावून बसलो हेच कळत नाही. मग आपापल्या गटांचाच उदो-उदो अपरिहार्य असतो आणि विरोधी सुराला अनुल्लेखान मारण्याची खेळी खेळली जाते. मग एखाद्या चांगल्या कामात एकत्र येण्याची, सहकार्य करण्याची प्रक्रियाच खुंटते आणि हीन राजकारणाचा मार्ग अनुसरला जातो. याचाच काही प्रमाणात अनुभव नुकताच आम्ही घेतला. त्यासाठी निमित्त होते ते आधुनिक महाराष्ट्राच्या चित्र-शिल्प कलेवरील पहिल्याच ‘दृश्यकला’ या कोशाचे. या कोशाची निर्मिती करताना गेल्या साडेसहा वर्षांत चित्र-शिल्पकलेच्या क्षेत्रातील मान्यवरांकडून अशा गटबाजीचे जे अनुभव आले, त्याचे प्रकारही अनेक होते. उदाहरणार्थ- १) वैचारिक अस्पृश्यता पाळण्यापोटी कोशाच्या कामात सहकार्य न करणे. जमल्यास फांदे मारणे किंवा शब्द देऊन तो न पाळणे. २) वैचारिक अस्पृश्यता पाळण्याच्या अतिरेकी भावनेतून आपले नाव कोशात नको असे सुरुवातीला सहकार्य करून काम अखेरच्या टप्प्यात आल्यावर सांगणे व त्यामागे जातीयता असणे. ३) काही विषय विचारधारांपेक्षा वर असतात, हे लक्षात न घेता त्या कार्यात सहकार्य न करणे किंवा आपल्या प्रकाशनात त्याबद्दल काहीही न छापता त्याला अनुल्लेखाने मारणे.
पण अशा प्रकारे वागणारे संख्येने कमी आहेत, मात्र वातावरण प्रदूषित करण्यास ते पुरेसे आहेत. अशांची संख्या वाढू लागली तर सामाजिक ऱ्हास अटळ आहे. सर्वसामान्य माणूस जीवनसंघर्षांत एवढा बुडाला आहे की, तो त्या सर्वापासून दूर आहे. बहुसंख्य तरुण पिढी उदासीन आहे. बाबा, बापू आणि स्वामींप्रमाणेच अशी गटबाजी करणाऱ्यांचेही भक्त बनतात आणि त्यांचे भगतगण आध्यात्मिक क्षेत्रांपेक्षाही माध्यम सान्निध्यामुळे जो काही उदो उदो करतात तो बघून सामान्य माणूस आश्चर्यचकितच होतो. हे लक्षात घेऊन अशी गटबाजी वैचारिक अस्पृश्यता आणि छुपी जातीयता टाळावीच लागेल. असा विचार करणारे काही या समाजात आहेत, पण त्यांचा कोणताही कंपू नाही. त्यामुळे पारितोषिके, सन्मान असोत की शिष्यवृत्त्या त्यापासून ते कायमच वंचित राहतात किंबहुना स्वतंत्रपणे विचार व कृती करण्याची त्यांनी चुकवलेली ती किंमतच असते. ‘पराजयदशमी’ या लेखामधून मांडलेल्या वस्तुस्थितीबद्दल गिरीश कुबेर यांचे अभिनंदन.
– सुहास बहुळकर
अनुकरणीय आनंदाचं झाड
‘लोकरंग’मधील अद्वैत पाध्ये यांचे लेख विचार करायला लावणारे असतात. ‘आनंदाचं झाड’ हा त्यापैकीच!
परिसे, गे, सूनबाई,
नको वेचू दूध दही,
आवा चालली पंढरपुरा,
वेशीपासुनी आली घरा
ही आवा म्हणजे संसारात अडकलेले आपले मन! वय वाढेल तसे हे मन संसारात अधिकाधिक गुरफटत जाते, स्त्रिया तर याबाबतीत आघाडीवर असतात. वस्तूत आणि वास्तूत मन गुंतलेले असते, ते सहजासहजी सोडवता येत नाही. संसाराच्या या गुंत्यात सामान्य व्यक्ती इतकी गुंतत जाते की या गुंत्याचाही तिला मोह पडतो.
तारुण्यात, चतन्याने रसरसलेले हे झाड, मग हळूहळू सुकत जाते. नव्या विचारांचा सूर्यप्रकाश न दिसल्याने त्याची वाढ खुंटते. असलेल्या, नसलेल्या शारीरिक आणि मानसिक दुखण्यांचा बागुलबुवा केला जातो. इतरांना सावली देणारी त्याची भूमिका संपते.
‘वृद्धत्वी नीज शैशवास जपणे’ या ओळीत मनाची निरागसता, नवे शिकण्याची वृत्ती अभिप्रेत असते, त्याऐवजी ‘शैशवातील हट्ट’ पुरवून घेण्याची वृत्ती वाढीस लागते.
या निष्पर्ण वृक्षांच्या रखरखाटात एखादे आनंदाचे झाड अचानक दिसतेही आणि वाळवंटात मृगजळ दिसल्यासारखे वाटते आणि अर्थातच आनंद होतो.
आयुष्यभर पाळलेला संयम, मारलेले मन, संसारासाठी खाल्लेल्या खस्ता या गोष्टी पुन:पुन्हा उगाळण्यात काहीच अर्थ नसतो, या उलट नवीन गोष्टी आत्मसात करणे, नवीन लोकांना आपल्या अनुभवांचा उपयोग करून देणे या गोष्टी या वयात करणे अभिप्रेत असते.
विषयाचे वैविध्य आणि निरीक्षणाची जोड या दोन्ही गोष्टी लिखाण सुंदर आणि वाचनीय करतात. या लिखाणाला सुंदर चित्रांची जोड लेखातील विचाराला आधिक परिणामकारक करते.
– मेधा गोडबोले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा