‘लोकरंग’मधील ‘शुक्रतारा..’ या गाण्यावरील लेख वाचनीय होते. मंगेश पाडगावकर यांनी आपल्या कवितांचे आणि श्रीनिवास खळे यांनी आपल्या स्वररचनांचे असंख्य चाहते निर्माण केले. आपल्याला जे आवडतं ते इतरांना आवडलं पाहिजे हा आग्रह नाही, तर इतरांना जे आवडतं ते जीव ओतून देणं हाच त्यांनी आपला धर्म मानला आणि आपोआपच ते आपापल्या अशा व्यवसायात प्रथितयश झाले.
डॉ. शारंगपाणी यांनी त्यांच्या ‘आवडता व्यवसाय’ या लेखात जे अतिशय छान शब्दांत सांगितलं आहे, त्याचा आशय हाच आहे की ग्राहकाला देव मानून जीव ओतून केलेलं कुठलंही काम केवळ कर्तव्यपूर्तीचा व्यवसाय न राहता प्रिय जीवनशैली बनून जाऊ शकतो. व्यावसायिक आणि ग्राहक हे नातं फक्त बाहेरच्यांशीच असतं असंही नाही. व्यावसायिक संस्थेतच अंतर्गत ग्राहकाचं समाधान करणं हे त्यातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं आद्यकर्तव्य असतं. ‘अशील / ग्राहक देवो भव’, माझा वरिष्ठ अधिकारी हाच माझा पहिला ग्राहक असतो. ज्याचे कंपनीचे संचालक हे ग्राहक असतात जे बाहेरच्या ग्राहकाच्या समाधानाचा विचार करत असतात. ही ग्राहकसाखळी लक्षात घेऊन आपल्या व्यावसायिक कामात आनंद मानण्याची वृत्ती अंगी बाणवणे ही काळाची गरज आहे, तरच आपलं आयुष्य तणावमुक्त राहील.
हे कुठल्या धर्मात बसते?
‘लोकरंग’मध्ये (१० मार्च) महाकुंभाच्या निमित्ताने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी श्रद्धा-अंधश्रद्धा व विज्ञान या संदर्भात केलेले विवेचन काटेकोरपणे किती बरोबर किंवा चूक यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, िहदू धर्मात वाढत चाललेल्या यात्रा, तथाकथित साधुसंत, यज्ञ-याग वगरे कर्मकांडात भारतीय लोक पूर्वीपेक्षा अधिकच बुडालेले दिसतात. हे आधुनिक शिक्षणव्यवस्थेचे अपयश म्हणावे लागेल. सरकार या धर्मश्रद्धांसाठी फारसे काही प्रबोधन करू शकत नाही, कारण एक तर ते निधर्मी/सेक्युलर आहे आणि महात्मा फुले, आगरकरांचा वारसा सांगणारे राजकारणी त्याबद्दल गपगार राहून निवडणूक आणि त्यासाठी जात, धर्मवाद एवढा एकच निकष महत्त्वाचा मानतात. या संदर्भात आगामी पंढरपूर यात्रा व नाशिकचा आगामी कुंभमेळा याकडेही लक्ष वेधावे लागेल. लाखो लोकांनी येऊन नद्या, शहरे घाण व विष्ठामय करून टाकणे हे कुठल्या धर्मात बसते? हे साफ करण्याची जबाबदारी एका विशिष्ट समाजावर टाकून स्वत: निर्मळ राहण्याचा आव आपण कसे आणू शकतो? मागील वर्षी सफाई कर्मचाऱ्यांनी पंढरपूर यात्रेच्या वेळी ही भयंकर जादा जबाबदारी न घेण्याचा निश्चय केला होता, पण ते अर्थातच हरले. माणसाने माणसाची विष्ठा उचलणे हा नतिक आणि कायद्याने अपराध आहे. या व्यवसायात (?) सुमारे ९५ टक्केमहिला असतात (पुरुष मुख्यत: मॅनहोल सफाईत असतात) त्यामुळे हा महिला दुर्बलीकरणाचाही मुद्दा आहे.
या धार्मिक महामेळाव्यांच्या व्यवस्थापनात ही जाणीव बाळगून आपण त्याचे काही व्यवस्थापन घडवू शकतो काय, हे सामाजिक न्याय व तंत्रविज्ञानाचे गोडवे गाणाऱ्यांनी करून पाहायला काय हरकत आहे? यानिमित्ताने िहदू धर्मातल्या अनेक प्रलंबित सुधारणांपकी एका तरी सुधारणेला हात घालूया. गाडगेबाबांचा आदर्श थोर असला तरी आता मानवी हाताऐवजी यंत्र-संयंत्राद्वारे विष्ठा व्यवस्थापन झाले पाहिजे. असे तंत्रवैज्ञानिक व्यवस्थापन शक्य होईल, तोपर्यंत िहदू धर्म मरतड या यात्रा-मेळाव्यांची गर्दी काही वष्रे तरी कमी करू शकतील काय?
– डॉ. शाम अष्टेकर, नाशिक.
परखड आणि सडेतोड परीक्षण
‘अनंताची फुलं’ या पुस्तकावरील परीक्षण वाचलं. मांडलेले सगळेच मुद्दे पटणारे होते. पुस्तक मीही वाचलं आहे. इतकं मोठं आणि विस्कळीत पुस्तक अलीकडे वाचनात आलं नाही. पुस्तक वाचनीय न होता दयनीय झालंय. अनंत अंतरकर माझ्या वयाच्या पिढीला खूप माहीत असण्याचे कारण नाही, परंतु त्यांनी निर्माण केलेली, उत्तम पद्धतीने चालवलेली, उत्तम दर्जा सांभाळलेली ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ ही मासिके ऐकून माहीत आहेत.
आनंद अंतरकर यांनी ‘रत्नकीळ’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी आपल्या वडिलांवर ‘अनंताची फुलं’ या नावाने ४८ पानी लेख लिहिला आहे. व्यक्तिचित्रपर एवढे सुंदर पुस्तक फार कमी जणांनी लिहिले आहे. या पुस्तकात स्व. अनंत अंतरकर इतर लेखांतही डोकावून जातात. मग पुन्हा त्यांच्या मुलीच्या पुस्तकाचे प्रयोजन काय? ‘रत्नकीळ’मधल्या लेखाच्या पलीकडे जाऊन आणखी काही वेगळे पुस्तकात वाचायला मिळेल अशी अपेक्षा होती. पण पूर्ण अपेक्षाभंग. त्यामुळे परखड आणि सडेतोड परीक्षण छापल्याबद्दल आभार.
अभिजित दिवेकर, सातारा.