एका घरगुती समारंभाचं निमंत्रण देण्यासाठी दूरचे नातेवाईक- श्रीयुत पाटील यांच्या घरी मी गेलो होतो. ते ऑफिसात गेल्याचं श्रीमती पाटील म्हणाल्या.
मी विचारलं, ‘‘काही विशेष कारण? पेन्शनचा घोळ झाला की काय?’’
‘‘छे! दर दिवशीप्रमाणे आजही गेले.’’
‘‘कमाल आहे. पंधरा-सोळा वर्षांपूर्वीच काका रिटायर्ड झाले ना?’’
‘‘हो. पण बॉस सोडत नाही. त्याला ह्यांच्या सल्ल्याची सतत गरज पडते. म्हणून जावं लागतं अजूनही.’’
काही दिवसांनी त्यांच्या कार्यालयातले एक ओळखीचे गृहस्थ भेटले. ते म्हणाले, ‘‘सल्लाबिल्ला काही नाही. पाटील म्हणतात की, घरी वेळ खायला उठतो. म्हणून ते रोज ऑफिसमध्ये येतात. त्या दिवशी रजेवर असलेल्या माणसाच्या खुर्चीत बसतात. ऑफिसात सटरफटर कामं निघतच असतात. पाटील मुकाटय़ानं करून टाकतात.’’
माझ्या माहितीतले एक गृहस्थ मला म्हणाले, ‘‘घरी बसलो तर माझं काय होईल ही भीती वाटते.’’
निवृत्त झालेले आणखी काही जण दर दिवशी सकाळी डबा घेऊन घराबाहेर पडतात. लोकल ट्रेनमधून चर्चगेट ते विरार अशा चार उलटसुलट फेऱ्या मारतात आणि संध्याकाळी घरी परततात. नोकरी करत असताना सार्वजनिक सुट्टय़ांची चातकासारखी वाट पाहणाऱ्या आणि प्रीव्हिलेज लीव्हपासून सिक लीव्हपर्यंतच्या सगळ्या रजा हक्काने पदरात पाडून घेणाऱ्या या लोकांना नोकरी संपल्यावर असं का करावंसं वाटतं, हे एक कोडंच आहे.
दुसरं कोडं स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांचं. त्यांचीही वृत्ती बहुधा निवृत्ती न घेण्याचीच असते. सत्तरीला येऊनही कामातून डोकं वर न काढणारे एक सधन व्यावसायिक म्हणतात, ‘‘थकलोय आता. पण मुलं आयतोबा झाली आहेत. मी समोर नसलो तर धंद्याचं वाटोळं करतील. शेवटी माझ्यानंतर ही सगळी मालमत्ता त्यांनाच मिळणार असली तरी तोवर मलाच हा व्याप सांभाळावा लागणार आहे.’’
निवृत्तीच्या पायात संपत्तीचं लोढणं अडकलं की हा असा विचित्र झमेला होऊन बसतो. पण पीटर चॅनसारख्या लोकांची तऱ्हाच वेगळी. पीटर हा आमच्या कंपनीचा सिंगापूरमधला अधिकृत एजंट. मी सिंगापूरच्या धावत्या दौऱ्यावर असताना एकदा भल्या पहाटे तो माझ्या हॉटेलरूमवर आला.
मी डोळे चोळत धास्तावून विचारलं, ‘‘काय झालं?’’
पीटर उत्तरला, ‘‘नवीन कॉन्ट्रॅकचा मसुदा रात्री तयार केला. ऑफिसात जाता जाता द्यायला आलो.’’
‘‘इतक्या लवकर तू ऑफिसात जातोस?’’
पीटरनं त्याचा दिनक्रम सांगितला. सकाळी साडेसहा वाजता बायकोमुलासकट तो घराबाहेर पडतो. मुलाला घराखाली स्कूलबसच्या थांब्यापाशी सोडतो. सात वाजता ऑफिस उघडतो. बायको त्याची पार्टनर-कम-सेक्रेटरी. शाळा सुटली की मुलगा डे-केअरमध्ये जातो. संध्याकाळी सात वाजता बायको मुलाला घरी घेऊन जाते. पीटर बाहेरची कामं आटोपून झोपायच्या सुमाराला घरी पोहोचतो. असं आठवडय़ाचे सहा दिवस चालतं. महत्त्वाचं काम निघालं तर रविवारीही ऑफिस उघडतो.
‘‘इतकं काम का करतोस?’’
‘‘पुढच्या पंधरा वर्षांत बऱ्यापकी पुंजी जमा केली पाहिजे.’’
‘‘का बरं? पस्तिशीही उलटली नसेल तुझी. घाई कशाला?’’
‘‘पन्नाशीला मी काम सोडणार.’’
‘‘आणि काय करणार?’’
पीटरनं डोळे मिचकावत उत्तर दिलं, ‘‘मजा.’’
पन्नाशीनंतर फुलटाइम धमाल करणार, ही महत्त्वाकांक्षा ऐकून मी चाटच पडलो. मी खुर्ची सरकवली आणि म्हटलं, ‘‘बस आणि सांग जरा नीटपणे.’’
पीटर म्हणाला, ‘‘माझ्या वडिलांचा मालवाहतुकीचा व्यवसाय होता. प्रचंड कष्ट करून त्यांनी तो भरभराटीला आणला होता. भरपूर पसे कमावले होते. पण जेव्हा मी हायस्कूलमधून बाहेर पडलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं, की माझ्या संपत्तीमधला एक छदामही तुला मिळणार नाही. माझा व्यवसायही मी तुझ्या हातात देणार नाही. मी हादरून गेलो.’’
‘‘साहजिकच आहे. पण असं का?’’
‘‘ते म्हणाले की, वयाला पन्नास र्वष पूर्ण झाली की, मी हा धंदा बंद करणार आणि तुझ्या आईसोबत जगप्रवास करणार. त्यादरम्यान आम्हाला आवडलेल्या एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी घर बांधून नंतर तेथे राहणार. मी कमावलेले सगळे पसे फक्त मीच खर्च करणार, हे नीट लक्षात ठेव. तुझं भविष्य तू घडव.’’
‘‘कमाल आहे. असं करत नसतं कोणी.’’
‘‘मी आईमार्फत शिष्टाई केली. पण वडील त्यांच्या निर्णयावर ठाम होते.’’
‘‘सख्खे पिताश्री इतके कठोर वागले नसते हे नक्की!’’
पीटर खळखळून हसला आणि म्हणाला, ‘‘नाही. ते ओरिजिनल फादरच! घरात सुबत्ता होती. मी त्यांचं एकुलतं एक अपत्य. साहजिकच माझे मनसोक्त लाड झाले. पण फुकट मिळालेल्या संपत्तीचं मोल माणसाला कळत नाही, अशी त्यांची ठाम धारणा होती.’’
‘‘हो. पण पोटच्या पोराला असं वाऱ्यावर सोडून द्यायचं म्हणजे विचित्रच नाही का?’’
‘‘वाऱ्यावर सोडून दिलं नाही. त्यांनी मला सांगितलं की, तू हवं तितकं शीक. मी तुझा सगळा खर्च करेन. अमेरिकेत शिकायचं असेल तरीही खर्च माझा. नो लिमिट! पण शिक्षण संपलं की तू स्वत: तुझ्या पायांवर उभं राहायचं. मी काडीचीही मदत करणार नाही.’’
‘‘बोलणं सोपं असतं. खरंच तसं केलं का त्यांनी?’’
‘‘शंभर टक्के! मलेशियातल्या एका डोंगरमाथ्यावरच्या घरात आईवडील सध्या राहतात. दोघांची तब्येत एकदम ठणठणीत आहे. महिन्यातून एकदा आम्ही भेटून येतो. इंपोर्ट-एक्सपोर्ट एजन्सीचा हा व्यवसाय शून्यातून उभारताना मला पहिल्यांदा चिकार त्रास झाला. पण आता वाटतं की त्यांनी केलं ते खरंच खूप योग्य केलं. मीही तसंच करणार आहे. म्हणूनच त्यांचं एक वाक्य मी माझ्या मुलाच्या खोलीत फ्रेम करून लावलंय. ‘माणसानं स्वत:चा इमला पायापासून स्वत:च उभारायचा असतो.’ ’’
वा! मी स्तिमित झालो. ही अनोखी विचारधारा मनाला भावली. खरंच, आíथकदृष्टय़ा यशस्वी झालेल्या सुदैवी लोकांनी तरी ‘साठी बुद्धी नाठी’ झाल्यानंतरही कामाच्या टोपल्या टाकत राहण्यात काय अर्थ आहे? तन आणि मन शाबूत असतानाच तोवर जमा केलेल्या पुंजीचा पूर्णवेळ सपत्निक आस्वाद घेण्यासाठी कामाला रामराम ठोकावा, हे उत्तम नाही का?
मग लक्षात आलं की ही विचारधारा तशी अनोखी नाहीच मुळी. मनुस्मृतीनुसारही सुमारे पन्नास वष्रे वयापर्यंत गृहस्थाश्रम आणि त्यानंतर वानप्रस्थाश्रम अशीच संकल्पना होती. आता त्यामध्ये कालमानानुसार छोटे-मोठे बदल करायला काय हरकत आहे?
पण पुढच्या सात पिढय़ांची चिंता माथ्यावर वाहण्याची सध्याची भारतीय मानसिकता पाहता ही विचारसरणी पचनी पडेल का?
वानप्रस्थ
एका घरगुती समारंभाचं निमंत्रण देण्यासाठी दूरचे नातेवाईक- श्रीयुत पाटील यांच्या घरी मी गेलो होतो. ते ऑफिसात गेल्याचं श्रीमती पाटील म्हणाल्या.
First published on: 26-05-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व बोलगप्पा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retirement planning