उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी अशी कधीकाळी आपल्या देशाची मानसिकता होती. त्यावेळी शेतकरी हा खऱ्या अर्थाने बळीराजा होता, पण बदललेल्या आधुनिक जगात शेती करणं कनिष्ठ दर्जाचं मानलं जाऊ लागलं. विकासाच्या नावाखाली शेतीव्यवसायात झालेले बदल हे शेतकऱ्यांसाठी त्रासदायक तर ठरलेच, त्याचबरोबर ते त्यांच्या शिवारासाठी जास्त हानिकारक ठरले. आधुनिक पद्धतीने शेती करताना शिवारांचं होणारं शोषण आणि त्यामुळे सुपीक जमिनीचं रूप बदलून नापीक, क्षारपड जमीन होण्याचा जो प्रवास आहे, तो प्रवास त्या शिवारासाठी जसा वेदनादायी ठरला, तसाच तो शिवाराच्या शेतकरी मालकासाठीही वेदनादायी झाला. असं शिवाराचं आणि त्यासाठी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचं दु:ख विजय जाधव यांनी आपल्या ‘शिवार’ या कादंबरीत मांडलेलं आहे.
हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : गोष्ट सांगण्याची कला…
तीन पिढ्यांचं शिवाराशी असणारं नातं येथे वाचायला मिळतं. अण्णा, तुका, आबा, तात्या यांसारखे मागच्या पिढीचे लोक- ज्यांची नाळ मातीशी घट्ट जोडली गेली होती, ज्यांनी मेहनतीनं आपलं शिवार कसलं, फुलवलं, त्याच्यावर जिवापाड प्रेम केलं, ज्यांना प्रगतीच्या नावानं होणारं शिवाराचे हाल पाहून दु:ख होत होतं, ज्यांना शिवारासाठी आपलं अस्तित्व लयाला जावं असं वाटत होतं; या म्हाताऱ्यांची मुलं ही दुसरी पिढी- ज्यांनी आधुनिक शेती करण्याच्या नावानं भरमसाट रासायनिक खतांचा वापर केला, अंगाला चिखल न लागता पैसा मिळवण्याच्या हव्यासापायी शिवाराचं शोषण केलं. त्यांच्या शेती करण्याच्या पद्धतीमुळे शिवारं क्षारपड झाली आणि कुटुंब कर्जबाजारी झाली. कादंबरीत दिसणारी तिसरी पिढी आपल्या पालकांनी केलेल्या चुका सुधारण्याचा व क्षारपड झालेल्या शिवाराला पुन्हा सुपीक करण्याचा प्रयत्न करायला तयार होतात.
‘शिवार’, – विजय धोंडीराम जाधव, मनोविकास प्रकाशन, पाने- २०३, किंमत, २९० रुपये.
mukatkar@gmail.com