समीर गायकवाड
मागच्या काही वर्षांपासून सुगंधेची परिस्थिती बरी नव्हती. हातातोंडाचा मेळ घालताना तिचं कुटुंब घायकुतीला आलं होतं. तिच्या पोरांची आबाळ होत होती, नवरा खचून गेला होता. सासऱ्यानं कधीच राम म्हटलं होतं, तर सासू खंगत होती. तशात अप्पांच्या आजारपणाच्या बातमीनं ती पुरती कोसळून गेली. तिच्या सगळ्या इच्छा-आकांक्षांवर पाणी फिरलं. दंड घातलेल्या साडीनिशी सासरचा उंबरा ओलांडला आणि पोरांना काखेत मारून ती माहेरी आली. सुगंधा ही अप्पांची धाकटी लेक. पहाडासारखा असलेला आपला बाप अंथरुणाला खिळून राहिलाय, हे कळल्यापासून तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. जीव सरभर होऊन गेलेला. वडिलांच्या छातीवर मस्तक टेकवून डोळ्यातलं आभाळ मोकळं केल्यावरच तिला हायसं वाटलं. त्या दिवसापासून बराच काळ सुगंधा माहेरात तळ देऊन होती. पोरांना उन्हाळ्याची सुटी होती म्हणून ती मोकळ्या अंगानं राहिली, हे जरी खरं असलं तरी त्यांना पोटभर चांगलंचुंगलं खाऊ घालण्याचं छुपं समाधानही माहेरात होतं. घरातल्या सगळ्या कामात भावजयीला मदत करून ती अप्पांची शुश्रूषा करायची.
अप्पांचा तिच्यावर खूप जीव होता, ती पोरवयाची असताना तिला कडेवर घेऊन गावभर फिरायचे. शेरभर जुंधळा देऊन बर्फगोळे खाऊ घालायचे, गावात टुरिंग टॉकीज आली की सिनेमाला घेऊन जायचे, तालुक्याच्या गावी सर्कस आली की आवर्जून घेऊन जायचे. तिचे सर्व लाडकोड त्यांनी पुरवले होते. आपल्या थोरल्या मुलीचे म्हणजे सिंधूचे आपण काही कोडकौतुक करू शकलो नाही, तिला गोडधोड खाऊ घालू शकलो नाही, की सणावाराला नवं कापडचोपड घेऊ शकलो नाही याची त्यांना खंत होती. त्यामुळे सुगंधेचं बालपण तरी सुखात जावं यासाठी त्यांची धडपड असे. कसलीही तक्रार न करता कोरडय़ा भाकरीवर आणि पाण्याच्या घोटांवर विमलअक्कांनी त्यांचा संसार रेटला होता. बळवंतअप्पा मस्क्यांना चार भावंडं होती. वयाने ज्येष्ठ असलेले अप्पा घराचे कत्रे पुरुष होते. त्यांच्या निर्मळ मनात प्रांजळपणा शिगोशीग भरलेला होता. कुणी काय मागेल त्याला ते देत गेले. अगदी कोऱ्या कागदावरही त्यांनी बिनदिक्कत सही केली कारण भावंडांनीच तशी विनंती केलेली, परंतु तिथूनच त्यांचे दिवस फिरले. स्वत:च्याच वाडय़ातून त्यांना परागंदा व्हावं लागलं. शेतशिवाराचा निरोप घ्यावा लागला. अप्पांचा पोरगा गोवर्धन जेव्हा मोठा झाला तेव्हा त्यानं आपल्या चुलत्यांविरुद्ध दावा दाखल केला.
प्रामाणिक, कष्टाळू स्वभावाच्या बळवंतला फसवल्यामुळं गाव आधीपासूनच त्याच्या भावकीवर नाराज होतं. गोवर्धननं दावा दाखल केल्यावर गावानं एकदिलानं त्याच्या पाठीवर हात ठेवला. एक दशकभर कोर्ट-कचेऱ्यांचं चक्र चाललं आणि सत्याच्या बाजूनं कौल लागला. अप्पांच्या हिश्श्याची जमीन त्यांना परत मिळाली. गोवर्धननं आपल्या चुलत्यांच्या विरोधात दावा ठोकल्याचं अप्पांना अजिबात रुचलं नव्हतं, पण दोन पोरींच्या लग्नाचा प्रश्न होता आणि एकुलत्या एक मुलासाठी वारसा मागं ठेवण्याचा सवाल होता. शिवाय आयुष्यभर ब्र न उच्चारणाऱ्या अप्पांच्या परधार्जण्यिा स्वभावाला सांभाळून घेत मुकाटपणे संसार करणाऱ्या विमलअक्काच्या सुखाचाही मुद्दा होता. खेरीज, गावकीचाही दबाव होता, त्यामुळे त्यांना गप्प बसावं लागलेलं. जमीनजुमला ताब्यात आल्यावर अप्पांनी उदार अंत:करणानं आपल्या भावंडांना माफ केलं, त्यांच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या भावंडांना ते रुचलं नव्हतं, त्यांनी अप्पांशी अबोला धरला. शिवाय इस्टेटीच्या निकालाविरुद्ध वरच्या कोर्टात धाव घेतली. मात्र आता कसायला जमीन असल्यानं आणि त्यातून येणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर ही लढाई लढायला गोवर्धन खंबीर होता. त्यामुळे अप्पांनी सगळ्या जबाबदाऱ्या गोवर्धनवर सोपवत कष्टाचा वसा तसाच ठेवून उर्वरित आयुष्य घरादारासाठी आणि गावकीच्या भल्यासाठी व्यतीत करायचं ठरवलं. त्याप्रमाणे ते वागलेदेखील. गोवर्धन, सिंधू आणि सुगंधा या तिन्ही अपत्यांना त्यांनी भरभरून सुख दिलं.
आपल्या पाठीमागं आपल्या मुलींना त्यांचा वाटा मिळायला पाहिजे, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये असं त्यांना वाटत असे. मालमत्तेपायी आपल्या भावंडांत कसं वितुष्ट आलं हे त्यांनी अनुभवलं होतं, त्याची पुनरावृत्ती त्यांना नको होती. त्यामुळं जितेपणीच त्यांनी अनेकदा ज्याचा त्याचा हिस्सा ठरवला होता. त्यांच्या पाठीमागं त्याचा अंमल व्हावा अशी तजवीज त्यांनी केली. गोवर्धनच्या पाठीवर काही काळानं सिंधूचा जन्म झाला तेव्हा त्यांनी जमीनजुमला गमावला होता. अंगावरच्या कपडय़ानिशी घरदार सोडलं होतं. दारिद्रय़ानं ग्रासलेलं असल्यानं सिंधूची खूप आबाळ झाली. थेट ती लग्नाजोगती झाली तेव्हाच न्यायालयाचा निकाल हाती आला. साध्या शेतकरी कुटुंबात तिचं लग्न लावून दिलं होतं. शेंडेफळ असणाऱ्या सुगंधाचा जन्मच बऱ्याच उशिराचा होता. सिंधूच्या लग्नात ती परकरपोलक्यातली किशोरी होती. ती वयात आल्यावर तिची सोयरीक जुळवताना अप्पांनी अगदी तालेवार धनाढय़ कुटुंबात नातं जोडलं होतं. आपल्या जमिनीची वाटणी करताना मुलींची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन अप्पांनी सिंधूला दहा एकर, सुगंधेला पाच एकर आणि गोवर्धनला उरलेली पस्तीस एकर जमीन दिली होती. अप्पांनी केलेल्या वाटण्या सर्वाना मान्य होत्या. पण नियतीनं चक्रं उलटी फिरवली. लग्नाच्या वेळी जेमतेम परिस्थिती असलेल्या सिंधूचं काही वर्षांनी नशीब पालटलं. उजनीच्या कालव्यानं तिच्या मातीत सोनं पिकू लागलं. अख्खं कुटुंब सालोसाल राबत राहिलं. शेतीचे नवे प्रयोग केले गेले. काही काळातच त्यांचा कायापालट झाला, तर सुगंधेच्या घराला एका दशकातच उतरती कळा लागली. राजकारणाच्या नादापायी तिचं कुटुंब कर्जात बुडालं. बागायती शेती विकावी लागली. जिरायतीत पत्थरफोड मेहनत करावी लागायची. गोवर्धन दरसाली तिला पीठा-मिठापासून धान्यापर्यंत सगळा पुरवठा करायचा.
बदललेल्या स्थितीची अप्पांना जाणीव झाली होती. त्यामुळे पुन्हा नव्यानं हिस्से वाटू असं त्यांनी मागच्या दिवाळीत एकांतात सांगितलं तेव्हा सुगंधेला हायसं वाटलं होतं. त्या जोरावर तिनं स्वप्नांचे इमले रचले. पण आता अप्पांच्या आजारपणानं सगळं धुळीस मिळालं. पक्षाघाताच्या झटक्यानं त्यांचं सर्व अंग लोळागोळा होऊन पडलं, वाचा गेली आणि सुगंधेची घालमेल सुरू झाली. अंथरुणाला खिळलेला बाप बरा व्हावा आणि त्यानं आपल्या हिश्श्याची नव्यानं वाटणी करावी अशी प्रार्थना ती करू लागली. अप्पांचं आजारपण लवकर सरलं नाही. उन्हाळा सरताच सुगंधेला सासरचा रस्ता धरावा लागला. अधूनमधून ती येत-जात राहिली. तिच्या सगळ्या आशा अप्पांवरच जडल्या होत्या. ती आल्यावर तिचा हात हाती पडताच अप्पांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत. त्यांना काय सांगायचं आहे हे तिला ठाऊक होतं आणि तिला काय द्यायला हवं हे त्यांना माहीत होतं. कारण त्याच्यातल्या बापानं तिच्यावर अपार माया केली होती. त्या दोघांशिवाय ही गोष्ट कुणालाच उमगली नव्हती. या गुंत्यामुळं सुगंधेची घुसमट होऊ लागली. काही महिन्यांनी नियतीनंच हा प्रश्न सोडवला. संक्रातीच्या दिवशी अप्पा गेले. अप्पांसोबत सुगंधेच्या स्वप्नांची राख झाली. अप्पांच्या दहनानंतर तिच्या वागण्यात कमालीचा फरक पडला. किरकोळ गोष्टीवरून ती गोवर्धन, सिंधूवर चिडू लागली. त्रागा करू लागली. ती सिंधूचा मत्सर करत नव्हती की गोवर्धनचा द्वेष करत नव्हती, पण तिला मनोमन वाटायचं की या दोघांनी आपली खालावलेली परिस्थिती लक्षात घ्यावी आणि थोडं झुकतं माप द्यावं. अप्पांच्या तेराव्यानंतर कागद केले जातील तेव्हा मन मोठं करून आपल्याला हिस्सा वाढवून दिला पाहिजे असं तिला वाटायचं. घरात मात्र या विषयावर बिलकूल चर्चा होत नव्हती, त्यानं सुगंधा धास्तावली होती. एकसारखी धुसफुस करत होती. विमलअक्कानं तिला विचारलंदेखील पण आईपाशी ती व्यक्त होऊ शकली नाही. भावंडांनी आपण होऊन तिचं दु:ख समजून घेतलं पाहिजे असं तिचं म्हणणं होतं.
बघता बघता तेरावा उरकला. रात्रीच सिंधूने निघण्यासाठीची आवराआवर केली. गोवर्धननं दोन्ही बहिणींसाठी धान्याची पोती भरून ठेवली, माळवं आणून ठेवलं. कागदाचा विषयच निघाला नाही. सुगंधेची तडफड वाढत राहिली. त्या रात्री तिला झोप आली नाही. सारखी अप्पांची आठवण येत राहिली. सकाळ झाली. आईच्या कुशीत सिंधू मनसोक्त रडली. रात्रीच तिच्या सासरहून आलेल्या जीपगाडीनं स्टार्टर मारला. गोवर्धननं आपल्या गाडीत सुगंधेचं सामानसुमान भरलं. माळवं ठेवलं. निराश झालेली सुगंधा विमलअक्काच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडली. काही वेळानं स्वत:ला सावरत ती गाडीत जाऊन बसली. ‘खड्रर्र्र्र खड्डर’ आवाज करत गाडी सुरू झाली, तेवढय़ात सिंधू घाईनं घरात धावत गेली आणि हातात दोन कागद घेऊन बाहेर आली. वेगानं सुगंधेपाशी आली, ‘‘हे घे सुगंधे.. हक्कसोडपत्राची कागदं आहेत. माझ्या वाटय़ाची धा एकर आणि गोवर्धनच्या हिश्श्यातली पाच एकर जमीन आमी तुला द्य्ोतोय!’’ सिंधूच्या त्या उद्गारासरशी सुगंधेने गाडीतून उतरून तिला मिठी मारली. तिच्या मनातलं मळभ निवळलं. अश्रूंनी सिंधूचा पदर ओलावला. गोवर्धन, विमलअक्कांनी जवळ येऊन तिला थोपटलं तेव्हा तिने टाहो फोडला. ‘‘अगं सुगंधे, आमाला तुजी आणि अप्पांची घालमेल समजत हुती, पण एका शब्दानं तू बोलायचंस तरी! तुजी चिडचिड आमी ओळखली न्हाई असं व्हईल का! एक शब्द तरी टाकायचा व्हतास. तुजा हक्कच हाय गं त्यो !’’ गोवर्धनच्या उद्गारासरशी सुगंधा त्याच्या कवेत शिरली, हमसून हमसून रडू लागली. विमलअक्कांनी आपले आनंदाश्रू पुसले तेव्हा अंगणातल्या पारिजातकाला तृप्तीची शिरशिरी आली होती.
sameerbapu@gmail.com