समीर गायकवाड

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्वी गावात यायच्या वाटेला लागून असलेला हमरस्ता कमालीचा माणुसकीचा होता. त्याच्या दुतर्फा असलेल्या दाट झाडांमुळे तयार झालेल्या अर्धवर्तुळाकार कमानी साऱ्या रस्त्याने स्वागताला उभ्या असत. या कमानी इतक्या दाटीवाटीने उभ्या असत की हिरव्यागार पानांच्या गुहेतून प्रवास करतो आहोत की काय असं वाटायचं. यात लिंब, बाभूळ, चिंच, वड, पिंपळ, पळस, सुबाभूळ आणि निलगिरी यांची झाडं जास्त- करून असत. त्यातही कडूलिंबांची संख्या मोठी होती. एकमेकांच्या गळ्यात हात घालून बसल्यागत त्यांच्या फांद्या अडकून गेलेल्या असत. दाट सावलीच्या संगतीने प्रवास होई. मधेच झाडी नसलेलं एखादं वळण आल्यावर जाणवायचं की, बाहेर उन्हं किती कडक आहेत. प्रवास कोणत्याही वाहनातला असला तरी सर्व प्रवाशांना समान सुख मिळायचं आणि त्याचं रहस्य या हिरवाईत होतं. विरुद्ध दिशेनं पळणारी झाडं कधी संपतच नसत. गाडीचा वेग वाढला की त्यांचाही वेग वाढे. वाऱ्याच्या झुळकेनं उडून येणारी पानं गाडीच्या खिडकीतून अलगद आत येऊन पडत. त्यांना असणारा मातीचा आणि झाडाचा संमिश्र गंध अजूनही स्मृतींच्या कुपीत जतन केलाय.

या सर्व झाडांचे बुंधे विटकरी रंगात रंगवलेले असत. वरच्या भागात काही अंतर राखून मारलेल्या पांढऱ्या पट्टय़ांमुळे ही सर्व झाडं एका कुळातील वाटायची. त्यांचा परिवार आपल्या स्वागतासाठी खोडात वाकलेला असायचा. ही वनराई म्हणजे वाटसरूच्या मस्तकावर धरलेला हिरवा किरीटच जणू! रोंरावणारं वादळवारं, अंगांगातून घामाच्या धारा काढणारं कडक ऊन, वेडावाकडा कोसळणारा पाऊस, विजांचा लखलखाट अन् ढगांचा गडगडाट यांच्या साथीने निसर्गाच्या कोणत्याही रूपात मातीत रोवलेली आपली मुळं आणखी घट्ट धरून ही झाडं पांथस्थाची सोबत करत. जळून, सुकून गेलेलं एखादं झाड दिसलं की फार वाईट वाटायचं. त्यातल्या एखाद्या झाडानं चकाकणारी वीज आपल्या अंगावर खेळवलेली असायची, नाही तर एखाद्या झाडाचं आयुष्य संपून गेलेलं असायचं. त्याच झाडावर कधीकाळी लहानाचं मोठं झालेल्या पक्ष्यांचा संसार वाळलेल्या फांद्यांवर नव्या घरटय़ात मांडलेला असायचा. त्यातल्या काटक्या लांबूनही स्पष्ट दिसायच्या. पानाफुलांनी डवरलेल्या झाडांवर विविध पक्ष्यांच्या शाळा भरलेल्या असत, त्यांचा तो कलकलाट अजूनही मनात घुमतो आहे..

रस्त्याच्या कडेला खोपटेवजा छोटेखानी ढाबे असत. गाडीचा वेग कमी करून या ढाब्यांच्या पुढय़ात थांबलं की मस्त वाफाळता चहा मिळायचा. लालबुंद तिखट शेंगा, चटणी आणि ज्वारीची पांढरीशुभ्र चवदार खमंग भाकरी, जोडीला लालबुंद कांदा अन् लसणाच्या पाकळ्या.. असा जिभेला पाणी आणणारा साधासुधा, पण रसरशीत मेनू तिथं असायचा. जोडीला वांग्याचं मसालेदार भरीत अन् एखादी झणझणीत सोलापुरी काळ्या येसूराची आमटी! खिशाला परवडेल आणि भुकेची आग शांत होऊन तृप्तता लाभेल असा हा सगळा बेत असायचा. मांसाहारी ढाब्यावरचा बेत तर याहून फक्कड असायचा. काही ठिकाणी तर वाटसरूच्या समोरच सामिष भोजन साग्रसंगीत बनवलं जाई, ज्याचा वास अवघ्या इलाख्यात धुरळा उडवून द्यायचा. त्या दरवळणाऱ्या वासाच्या भपक्यानंच वाहनं तिथे थांबत. अशा एखाद्या ठिकाणी एकदा जेवलेला माणूस पुन्हा त्या रस्त्याने प्रवास करताना त्याच ढाब्याचा शोध घेत ‘वास काढत’ तिथंच यायचा, ही खासियत इथल्या स्वयंपाकात आणि आदरातिथ्यात असे. बसायला लाकडी बाकडी अन् मस्त आरामदायी बाज असत. बहुतकरून बदामाची लफ्फेदार घेर असणारी दाट सावल्यांची झाडं या ठिकाणी असत. या सर्व वातावरणामुळे इथे येणाऱ्या माणसाला चार घास आपोआप जास्त जात. हाशहुश्श करत  नाकातून पाणी येई. मग नाकपुडय़ा व कपाळावर जमा झालेला घाम पुसत पुसत लोक म्हणत, ‘‘थोडं तिखट होतं हो, पण असं जेवण आजवर कुठेच मिळालं नाही हो!’’ असे संवाद आटोपले की शेंगाचटणी वा चिक्कीची खरेदी होई आणि प्रवासी पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होई..

पूर्वी या रस्त्यावर झाडांप्रमाणेच दुतर्फा दिसायचे ते वेगवेगळे फळविक्रेते! एखाद्या झाडाच्या आडोशाला हिरवं नेट बांधून त्याचा तात्पुरता मांडव करून वेगवेगळ्या हंगामानुसार त्या-त्या मोसमातील रसाळ ताज्या फळांच्या टोपल्या घेऊन हे लोक बसलेले असत. क्वचित एखादा फ्रुट स्टॉलदेखील नजरेस पडायचा. मस्त टपोऱ्या सोनेरी मक्याची चविष्ट कणसं भाजून देऊन त्यावर तिखटमीठ चोळून, लिंबू पिळून दिलेला असायचा. ही भाजकी कणसं खाल्ली की साऱ्या प्रवासाचा शीण एका क्षणात नाहीसा व्हायचा. उसाच्या गोड रसात थंडगार बर्फाचे चुरचुरीत तुकडे घालून काचेच्या ग्लासात तो समोर येताच ‘मला रस नको’ म्हणणारेदेखील दोनेक ग्लास ताजा स्वच्छ उसाचा रस घटाघटा आवाज करत पिऊन टाकत असत. बोरं, डाळिंबं, पेरू, चिक्कू, द्राक्षे, आंबे अशी अनेकविध फळं विकणारी ही गावाकडची माणसं कधी काटा मारत नसत वा फळांच्या भावावरून हमरीतुमरीवर येत नसत. एक साधा-सोपा व्यवहार यामागे असे. समाधान आणि तृप्तता याला त्यांच्या लेखी मोठी किंमत असे! या रस्त्यावर उन्हाळ्याच्या दिवसांत मिळणारे लिंबू सरबत हे जणू स्वर्गीय पेयच असे. पिवळंजर्द रसदार लिंबू चिरताच त्याच्या दोन अर्धवर्तुळाकार फोडी होत. त्या फोडी लिंबाच्या लाकडी साच्यात टाकून ग्लासात पिळल्या जात. साखर, वेलची पूड, थोडंसं मीठ अन् थोडासा पाक या ग्लासात घातला जाई. मग थंडगार पाणी अन् बर्फ! लांबच्या प्रवासानं पाय आखडून गेले म्हणून सहज पाय मोकळे करायला उतरलेले वाटसरू एकेक करून काही घटका झाडांखालच्या या रसपानगृहाच्या रमणीय खोपटात रमून जात. मग गावाकडच्या त्या भल्या माणसाशी गप्पांची दिलखुलास देवाणघेवाण होई! ही माणसं प्रेमाची भुकेली असत. एवढय़ा मोठय़ा गाडीतून उतरलेला माणूस आपल्याला नाव-गाव विचारतो, अन् आपल्या खुशालीचे चार शब्द विचारतो या विचारानेच तो हरखून जाई! या रस्त्याने जाताना माणसांच्या नव्या नात्यांची ओळख एकदम सहजासहजी होत असे..

हा रस्ता जसा माणसांचा होता तसाच जित्राबांचाही होता! सकाळच्या वेळेस रस्त्याच्या एका कडेनं माळरानी चरायला निघालेले गाई-म्हशींचे कळप आणि त्यामागून चालत निघालेला गुराखी हे चित्र कायम असे. ही जनावरं जर रस्त्याच्या मधोमध आली तर कधी कधी हॉर्न वाजवूनही उपयोग होत नसे. कधी हॉर्नच्या आवाजानं एखादं अल्लड वासरू उधळून पळायला लागे, मग त्याला आवरता आवरता त्या गुराख्याची पार आब्दा होऊन जाई. या गाई-म्हशींचं शेण साऱ्या रस्त्यानं पडलेलं असे. वाहनांच्या चाकांनी ते आणखी दूपर्यंत पसरलं जाई. मात्र आपल्याच नादात जाणाऱ्या बलगाडय़ा आणि त्यांना जुंपलेले केविलवाणे बल नजरेस पडताच मन दु:खी, कष्टी होऊन जात असे. साखर कारखाने सुरू असताना रस्त्याच्या एका कडेने बलगाडय़ांची ही भलीमोठी रांग लागलेली असे. करकचून बांधलेल्या उसाच्या ढिगाऱ्यावर बसलेले उसतोडीचे मजूर आणि ते जीवघेणे ओझं घेऊन निमूटपणे शून्यात नजर लावून पुढेच चालत राहणारे बल हळूहळू दृष्टीतून ओझरते होऊन जात. संध्याकाळच्या वेळेस चरून झाल्यावर वस्तीकडे, गोठय़ाकडे परतणारे जनावरांचे जथ्थे पाहताच वाटायचं की श्रीकृष्ण आणि त्याचं न पाहिलेलं गोकुळ हेच असावं. पश्चिमेकडून येणारी तिरपी होत गेलेली सूर्याची तांबूस किरणं समोरून येत असत. वासरांच्या गळ्यातल्या घंटांचा मंजूळ आवाज, त्यांच्या पावलांचा टपटप आवाज आणि त्यांच्यामागून लडिवाळपणे पुकारत जाणारा, अंगावर काळं घोंगडं पांघरलेला तो गुराखी असा हा लवाजमा आस्ते कदम पुढे जाई. मग वाहनं वेग घेऊन पुढे सरकत.

तेव्हा कुणाला फारशी घाई नव्हती. लोकांकडे फुरसत होती. एकमेकांबद्दल आस्था होती. निसर्ग आणि माणूस यांच्यात आर्त प्रेमाचं नातं होतं. आता इथं चारपदरी डांबरी सडक झालीय. अंगात वारं भरलेली वाहनं सुंसुं आवाज करत वेगानं धावत असतात. वाटेत एखादा अपघात झालेला असला तरी तशीच पुढे निघून जातात. मरण पावलेला जीव माणूस आहे की जनावर हे पाहण्याची तसदीदेखील कुणी आता घेत नाही. रस्तारुंदीकरणाच्या हव्यासामुळे आधीची दुतर्फा वनराई नष्ट झाल्यापासून हा रस्ता दीनवाण्या चेहऱ्यानं उभ्या असलेल्या अनाथ मुलासारखा वाटतो आहे. आता रस्त्याच्या कडेनं ती खोपटं नसून चकचकीत हॉटेल्स आहेत- ज्यांना ‘हायवे’वर फक्त पसा कमवायचा आहे. आता गावाकडची माणसंही तशी उरली नाहीत. कारण या रस्त्यात ज्यांची जमीन गेली त्यांनाही अफाट पसा आल्याने आता फळे विकत बसायला वेळ नाही! आता आपुलकीच्या गप्पा नाहीत की ती शांत, शीतल, घनदाट सावली नाही. घेरदार झाडांच्या कमानीही नाहीत. आता काही तासात माणसं ईप्सित प्रवास करतात. सगळं कसं फास्ट झालंय. कामं वेगानं होतात. वेळेत भेटीगाठी होतायत. पण या प्रवासातला प्राण हरपलाय. पूर्वी रस्ता लहान असल्यानं अपघात फार होत असत. आताच्या रुंद रस्त्यावर हे प्रमाण कमी झालंय, इतकीच काय ती समाधानाची बाब आहे.

गावाकडच्या गरीब साध्याभोळ्या माणसांची फास्ट फ्यूरियस टुरिस्टना अडचण होऊ नये म्हणून या रस्त्याच्या कडेने एक ‘सव्‍‌र्हिस रोड’ असतो. पूर्वीच्या रस्त्यावर मोठय़ा दिमाखात उभ्या असलेल्या झाडांची भलीमोठी कापलेली खोडं अन् फांद्यांचे जखमांनी भरलेले तुकडे या सव्‍‌र्हिस रोडच्या बाजूला विव्हळत पडून असतात. त्यांची चूक काय आहे हे त्यांना अजून कुणी सांगू शकलेलं नाही. या रुंद चौपदरी रस्त्यानं मी अजून एकदाही लांबच्या पल्ल्याचा प्रवास पूर्ण केलेला नाही. कारण या झाडांच्या कलेवरांनी विचारलेले प्रश्न मला अनुत्तरित तर करतातच, पण शरमेने मान खाली घालायलाही लावतात. आता हा रस्ता सर्वाचा उरला नसून तो सुसाट वेगाने केवळ धावत सुटलेल्या आलिशान गाडय़ांचा ‘हायवे’ झाला आहे!

मी मात्र अजूनही माझ्या स्मरणकुपीतल्या त्या जुन्याच रस्त्यात रममाण झालो की झाडं, पानं, फुलं, गुरांचे कळप आणि ती काळजात रुतलेली गावाकडची माणसं यांच्या आठवणींनी व्याकूळ होऊन जातो आणि डोळ्यांना नकळत रुमाल लावतो. या रस्त्याच्या आठवणी हे एक मोठं ऋणच आहे.

sameerbapu@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road loan gavaksh article sameer gaikwad abn