जिमी हेंड्रिक्स आणि विश्राम बेडेकर हे सारख्या जातकुळीच्या उच्च प्रतिभेचे धारक आहेत. एक रॉक संगीतकार; दुसरा लेखक. एक अमेरिकेतला, एक भारतामधला. पण दोहोंच्या अभिव्यक्तीमधला त्वेष,
हा पाहा वूडस्टॉक फेस्टिव्हल. सन १९६९. स्थळ : न्यूयॉर्कनजीकचं एक मोठालं शेत. संयोजकांची तिकीटविक्री, कुंपणव्यवस्था सारं मोडून-तोडून उत्साही तरुणांची एकच गर्दी इथे जमलेली आहे. समोर व्यासपीठावर सॅन्ताना, दी स्लाय, स्टील्स अँड नॅशसारखे रॉकरथी गात, वाजवीत आहेत. बेभान तरुण व्हिएतनाम युद्धाचा विरोध नाना तऱ्हांनी व्यक्त करीत आहेत. आरोळय़ा उठत आहेत. घोषणा फुटत आहेत. संगीत खरं तर तिथे लुप्तच व्हायला हवं. पण मग सरतेशेवटी येतो आहे जिमी हेंड्रिक्स. त्यानं अमेरिकेचं राष्ट्रगीत ‘The Star Spragled Banner’ वाजवायला घेतलं आहे. बघता बघता गिटारमधून रॉकेटसारखे आवाज येऊ लागले आहेत. कॉर्डस्चा असा काही खेळ जिमी मांडतो आहे, की त्या गिटारमधून आता बॉम्बचे आवाज निघत आहेत! समोरचे लाखभर तरुण हे जिमीनं राष्ट्रगीत ज्या तऱ्हेनं तत्कालीन युद्धाला जोडलं, ते पाहून चकित होत आहेत, आनंदित होत आहेत. आजही समाजशास्त्रज्ञ जिमीची ती कृती युद्धविरोधी असावी, की उलट युद्धाला पाठिंबा देणारी असावी, याचा किस पाडताहेत. जिमीसारखा रांगडा, काळा, तुलनेनं अशिक्षित कलाकार अशी कृती जात्याच करू शकतो, यावर गोऱ्या समीक्षकांचा आजही विश्वास नाही. पण माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं हेही आहे, की निखळ सांगीतिकदृष्टय़ा पाहिलं तरी जिमीनं गिटारवरून युद्धाचं जे आक्रंदन पोचवलं- ते करणं अवघड आहे.. कुणाही गिटारवादकाला विचारा. अर्थात, जिमीनं हे सारं प्रसिद्धीसाठीही केलेलं असावं. कारण त्याचा इतिहासच मुळी तसा होता. त्याने प्रसिद्धी प्राप्त करण्याकरता व्यासपीठावर सरळ गिटार जाळून टाकली नव्हती का? मी यू-टय़ूबवर तो व्हिडीओ पाहिला तेव्हा पहिल्यांदा मला बसला तो धक्का. खूप मोठा. धारणाच बदलवू शकेलसा धक्का. त्या व्हिडीओत जिमीनं अफाट गिटार वाजवली आहे. पण मग शेवटाला तो व्यासपीठाच्या कोपऱ्यात जातो. प्रेक्षकांकडे पाठ करून गिटारला कमरेसमोर धरून सूचक चाळे करतो. मग फेकतोच गिटार जमिनीवर. आपटवतो माइकला, स्वत:ला. मग खाली पडलेल्या भग्न गिटारवर दोन ढांगा ठेवून, रॉकेल टाकून सरळ जाळतोच गिटार! एखादा सतारीया असं काही करेल असं आपण कल्पूही शकत नाही. पण जिमी तसं करतो. आणि ते तसं करणं गाजतं- यामागे दोन समाजांच्या सांगीतिक धारणांमधील मूलगामी फरक आहेत. ‘बीटल्स’च्या ‘यस्टर्डे अँड टुडे’ या रेकॉर्डचं कव्हरच पाहा ना! मांसाचे तुकडे हाती घेतलेली खाटकाच्या वेशातली ‘बीटल्स’ या कंपूची चौकडी आणि अवयव तुटलेल्या बाहुल्या! अर्थात जॉन लेनन, पॉल मॅकर्टनी, जॉर्ज हॅरिसन आणि रिंगो स्टार या चौघांनी ‘बीटल्स’ या नावानं जे काही सर्वसाधारणपणे केलं, ते मात्र यापेक्षा पुष्कळच सौम्य, मध्यममार्गी बहुसंख्य श्रोत्यांना रुचेल असं होतं. त्यामुळेच ते गाजले. आजही ‘बीटल्स’चे चाहते जगभर पसरलेले आहेत. बीटल्सनं इंग्लंडमधून अमेरिकेवर जणू सांगीतिक हल्लाबोलच केलं. मागोमाग अनेक ब्रिटिश रॉक बँड्स अमेरिकेत डेरेदाखल झाले. त्या घटनेला ‘ब्रिटिश इन्व्हेजन’ असंच म्हणतात. अमेरिकेत असणारे अनेक बँड्स त्या ब्रिटिश तडाख्यात नामोहरम झाले, त्यांचं अस्तित्व लयास गेलं. ‘दि रोलिंग स्टोन्स’सारखा कंपू हा ‘बॅड बॉईज’ची प्रतिमा सांभाळत ‘ब्ल्यूज रॉक’ वाजवत राहिला. ‘बीटल्स’ मात्र पॉपजवळचं रॉक गात होते. ते तरुण होते. देखणे होते. उत्साही होते. नवनवं शिकून आत्मसात करणारे होते. अजिबात प्रसिद्धीविन्मुख नव्हते. आणि त्यांचं गाणंदेखील अगदी तसंच होतं. सगळय़ात मोलाची गोष्ट ही, की ते प्रयोगशील होतं. तत्कालीन रेकॉर्डिग यंत्रणांच्या मर्यादा ध्यानात घेऊन बीटल्सच्या गाण्यांकडे बघितलं की त्यांचे सांगीतिक प्रयोग किती काळाच्या पुढचे होते, हे कळतं. कधी बाटल्यांचा आवाज काढ, कधी वाद्याच्या पुढय़ात माइक न ठेवता पोटात ठेव, कधी पौर्वात्य वाद्य वापर.. असं सारं त्या चौकडीनं यशस्वीरीत्या केलं. त्यांनी रॉकला कधी पॉपमध्ये बुचकळलं. कधी लॅटिन अमेरिकन सुरांमध्ये. आणि सरतेशेवटी भारतीय वाद्यांमध्ये त्यांना रॉकचा नवा अन्वयार्थ सापडला. पं. रविशंकरांची सतार जॉर्ज हॅरिसनला इतकी भावली, की ‘रागा रॉक’चा (Raga Rock) उदय झाला. ‘बीटल्स’नं संगीतामधले अनेक पायंडे प्रथमच पाडले. ‘म्युझिक व्हिडीओ’ची संकल्पना नक्की कुणाची, यावर अभ्यासकांचं एकमत नसलं तरी श्रोत्यांपर्यंत पहिल्यांदा पोचलेलं व्हिडीओ संगीत हे बीटल्सचं होतं, याबद्दल कुणालाच संशय नाही. ‘अल्बम’ हा प्रकार केवळ सात-आठ गाण्यांना कोंबून धरणारा प्रकार नव्हे, तर त्यामागे एखादं वैचारिक सूत्र पाहिजे, हेदेखील बीटल्सनं बिनचूक ओळखलं. अल्बमच्या कव्हरपासून ते विक्रीपर्यंत बीटल्सनं निर्मितीक्षम नजरेनं पाहिलं. ‘Lucy in the Sky with Diamonds’सारख्या गाण्यामधून त्यांनी ‘सायकेडेलिक रॉक’ म्हणजे काय, ते दाखवलं. अमली पदार्थ घेतल्यावर माणसाला कसं भिरभिरल्यासारखं, तरंगल्यासारखं वाटतं, हेही त्या रॉकनं दाखवलं. ते गाणं निव्वळ अप्रतिम आहे. कुणीतरी तुम्हाला पुकारतं, दिसेनासं होतं. अन् मग समोर दिसते- नाना भाव डोळय़ांत धारण केलेली मुलगी. (मूळ शब्द : a girl with keliodoscope eyes. काय झकास!) कधी तालाला पकडून, कधी सोडून देत ते गाणं चालत राहतं आणि तुम्हाला उन्मनी मनाचा प्रत्यय देतं. LSD ही आद्याक्षरं त्या शीर्षकात चतुराईनं गुंफली आहेत, हा योगायोग नव्हे! सायकेडेलिक रॉकचं तेच तर सूत्र आहे. आणि हे ‘रॉक रागा’चं गाणं- ‘विदिन यू, विदाऊट यू..’
Try to realise it’s all within yourself
No one else can make you change…
(‘समजून घ्या सारं सारं आहे तुमच्या आत
बदलणार कोण तुम्हास? राहा जरा निर्धास्त
नीट बघा जरा आणि जाणा आपलं खुजेपण
तुमच्या आत, तुमच्या बाहेर आयुष्याचं प्रवाहीपण’)
रॉकच्या रणांगणामध्ये असं शांतवन फुलवणारे ‘बीटल्स’सारखे कलाकार कुठल्या गावचे असतात? रॉकची सारी उंची आणि खोली बीटल्सनं पडताळून घेतली आणि अभिव्यक्त केली. तेव्हा मला सांगा, खरे बीटल्स कुठले? ते खाटकाचे कपडे घातलेले की असे शांतवन फुलवणारे?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा