|| सुभाष अवचट
पिकासोला एकदा विचारलं गेलं की, ‘‘तुम्ही एवढं अफाट काम करता… तुम्ही थकत कसे नाहीत?’’ त्यावर पिकासो म्हणाला, ‘‘हिंदू मंदिरात दर्शनाला जाताना आपली पादत्राणं बाहेर काढून ठेवतात; तसा मी स्टुडिओत येताना माझं शरीर बाहेर काढून ठेवतो.’’
स्टुडिओ ही छोटी-मोठी निरपेक्ष स्पेस असते. रिकामी, पोकळ, टाइमलेस. येणाऱ्या तान्ह््यासाठी आई जसा लोकरीचा स्वेटर, टोपडं विणायला सुरुवात करते, तसतशी ती क्रिएटिव्हिटीने हळूहळू भरायला लागते. अन्यथा ती अडगळीची खोलीदेखील बनू शकते. कोऱ्या कॅनव्हासमध्ये हीच व्हर्जिन स्पेस असते, जशी रिकाम्या अंगणात असते. आपण पारिजातकाचं झाड लावतो, बहरात त्याच्या फुलांचा सडा जसा पडतो, तसं तेच अंगण नवीन रूपानं सजतं… जसं चित्र! चिमण्या आपल्या घरट्यासाठी जशी सुरक्षित वळचण शोधतात, तशी स्टुडिओत आपण जागा निश्चित करता आणि कामाला सुरुवात करता.
ही सुरुवात मात्र प्रत्येक जण आपापल्या जपलेल्या सवयीनुसार करतं. जगातले अनेक चित्रकार, शिल्पकार माझ्या परिचयाचे आहेत. त्यांच्या कामाच्या पद्धतीदेखील! कुणाला रात्री, तर कुणाला दिवसा काम करायला आवडतं. कुणी स्टुडिओत खिडक्या-दारं बंद करून कामाला बसतो. अनेकांना बॅकग्राऊं डला अखंड म्युझिक लागतं. कुणी अगोदर रफ स्केचेस, फोटोग्राफचे रेफरेन्सेस, कॉम्प्युटरची मदत घेतात. माझा एक चित्रकार मित्र दिवसभर शहरात फिरत राहतो. बहुतेक जण थिएटरच्या अंधारात बसतात. काही जण तर पंधराएक दिवस गावोगावी फिरून स्टुडिओत परततात. हे सारे इन्स्पिरेशन्स म्हणा- किंवा सब्जेक्ट्सच्या शोधात भटकतात. ते असं का करतात? ती त्यांची परिभाषा इतरांना कळत नाही, म्हणून तो नादिष्ट; किंवा आयुष्य वाया घालवणार, या अर्थानंच जग त्यांच्याकडे बघतं. यातून जगातले मोठमोठे कलाकार सुटलेले नाहीत. व्हिन्सेट व्हॅन गॉग आणि त्याचे सहकारी गावठी दारूच्या गुत्त्यात बसून भांडणं करायचे. त्या भांडणांत चित्रकला किंवा चित्रांत वापरावयाची मीडियम्स याच्याबद्दलचे मतभेद असायचे. पैसे, घर, गाड्या असे किरकोळ कळलावी मुद्दे नसायचे. हेच वेडेपण जीम मॉरिसन, बिटल्स, तुकाराम, गडकऱ्यांबाबतही प्रसिद्ध आहे. राम गणेश गडकरी देवळाच्या पायरीवर बिड्या ओढीत बसत असत. सासवडातील कर्मठ मंडळी त्यांची टिंगलटवाळी करीत. आचार्य अत्र्यांना आपल्या गुरूची चाललेली ही चेष्टा कळली तेव्हा त्यांनी डझनभर बिड्यांची बंडलं विकत घेतली आणि त्या मंडळींच्या हातात देऊन म्हणाले, ‘‘या साऱ्या बिड्या फुंका आणि गडकऱ्यांसारखं एक वाक्य लिहून दाखवा.’’ या कवींना, गायकांना, चित्रकारांना एक झिंग लागत असते. तिच्या शोधात ते असतात. तो क्षण सापडला की अलौकिक प्रतिभेचं दर्शन ते घडवतात. त्यासाठी अर्नेस्ट हेमिंग्वेदेखील समुद्रात होडी घेऊन एकटा जातो. कुणी युद्धात सामील होतात. हे यासाठीच- की तो- तो अनुभव घेऊन हे सारे आपापल्या घरी येऊन व्हॉल्युम्स, लिखाण, चित्र, शिल्पांत झोकून देतात. त्यात दुसऱ्यांच्या अनुभवांची उसनवार नसते. ते अॅडिक्ट केवळ त्यांना मिळणाऱ्या अलौकिक क्षणांचे असतात.
माझ्या प्रोसेसबद्दल मला ठणकावून काहीच सांगता येणार नाही, कारण मला ती अजूनही समजलेली नाही… पुढे समजेल असंही वाटत नाही. ती समजून न घेण्यातच गंमत आहे. चित्राला सुरुवात करताना तुम्ही अधांतरीच्या अवस्थेत पोहोचता. त्याचं वर्णन होऊ शकत नाही. दरवाजा उघडतो आणि तुम्ही एका पोकळीत- जेथे काही आहे-नाही अशा संभ्रमात उभे असता. अनेक वेगवेगळ्या अनुभवांना तुम्ही सामोरे जाता. पेंटिंगसाठी माझी कोणतीही पूर्वतयारी मी करत नाही; अथवा मला रेफरन्सेस, कॉम्प्युटर, फोटोग्राफ्सचीही गरज आयुष्यभर भासली नाही. मी कधीही विषय ठरवलेले नाहीत. मी सतत स्केचिंग करीत असतो; पण स्केचिंगची मी पेंटिंग्ज केली नाहीत. ते त्रासदायक असतं. स्केचिंगला एक लिरिकल… त्या क्षणांचं अस्तित्व असतं. ते तसंच जपावं… जशी उत्स्फूर्त कविता! कवितेची कादंबरी बनवण्याचा उद्धटपणा होतो. कॅनव्हाससमोर विषय ठरवून जाऊन बसणं, हे त्या स्पॉन्टेनिअस प्रोसेसमधला मनमोकळा आनंद गमावण्यासारखं आहे. तुम्ही स्टेशनवर धावत धावत पोहोचता… आणि तुमच्या समोरून तुमच्याच गावात जाणारी ट्रेन धडधडत निघून जाते… आणि लगेज घेऊन प्लॅटफॉर्मवर तुम्ही बिचारे उभे असता… त्यातलाच हा प्रकार आहे. तरीही चित्रांसाठी कोणतेही प्रयोग, माध्यमं वापरायला कोणाच्या परवानगीची गरज नाही. पण शेवटी ते पेंटिंग तुमचं असावं, गिमिकी नसावं अशी सर्वसाधारण रीत आहे… अपेक्षा नव्हे. इथं मला वाटतं, वर्ल्ड इज पर्सनल! त्यामुळे पर्सनल स्टुडिओत कोऱ्या कॅनव्हाससमोर बसलो की फास्ट फॉरवर्ड होणाऱ्या, रिव्हर्स होत गेलेल्या, स्वत:भोवतीच्या अनुभवांतल्या काही दृश्यांना- कधी त्या दृश्यांमध्ये तुम्ही असता किंवा असूनही त्रयस्थपणे बघत राहता… भूतकाळाची भुतं किंवा आपण पराभूत झालो आहोत अशा वाटणाऱ्या घडून गेलेल्या घटनांची जाळी- खरं तर काहीच नसतं. संमोहनावस्था म्हणावी तर तुम्ही चित्र रंगवण्यात डुबलेले असता. मागे तुमचा स्टुडिओ असतो. आवाज असतात. रंगांचे वास आणि स्वत:च्याच श्वासांचा आवाजही साक्षीला असतो.
सकाळ ही माझी आवडती वेळ आहे. सूर्यप्रकाशात मी पेंटिंग करीत आलो आहे. मला कुणीही त्रास देत नाही. मला त्रास देणारा फक्त ‘मीच’ आहे. मला कंडिशनिंग आवडत नाही. पण त्यातही शिस्त असते. काही फुटांवर कॅनव्हास असतो. तो मला दिसतो खरा, पण माझे उद्योग दुसरेच चालू असतात. म्हणजे झाडांना पाणी घालणं, नोकरांवर उगीचच ओरडणं वगैरे, फोनवर मित्रांची सतत टिंगल करणं… पण हे होत असताना मी त्यात नसावा. मनात कुठल्या तरी इमेजेस फिरत असतात. मग मला एका क्षणी कळतं की, मी पेंटिंगला सुरुवात केलेली नाही, तर जवळजवळ ते संपलं आहे. सांगायचं झालं तर पेंटिंग आयुष्यभरात कधीच पूर्ण होत नाही. केव्हा काय घडेल याचा भरवसा नाही. त्याचीच ही छोटी गोष्ट…
पुणे-मुंबई जुन्या हायवेवर पनवेलपाशी उन्हाळ्यात कलिंगडाच्या गाड्या उभ्या असतात. लालभडक कापलेली कलिंगडं ते हिरव्या कलिंगडांच्या चळतीवर नीट रचून ठेवतात. त्यावर उदबत्तीही टोचलेली असे. कडक, खरखरीत उन्हात ते दृश्य माझ्या मनात ठसलं होतं. त्या सकाळी कलिंगडं मनात घोळत होती. त्याच विचारानं मी काम सुरू केलं खरं; पण जेव्हा चित्र पूर्ण झालं तेव्हा कॅनव्हासवर हात तुटल्यानं वेदना सहन करीत उभा असलेला एक विदूषक आकारला होता. कलिंगड ते तो विदूषक हा प्रवास चित्रात कसा झाला? माझ्या लहानपणी गावातल्या फाटक्यातुटक्या सर्कशीतला तो बुटका विदूषक माझ्या वडिलांकडे तपासायला आला होता. त्याचा चेहरा रात्रीच्याच प्रयोगातला रंगवलेला होता. मी त्याच्याकडे बघून टाळ्या वाजवत होतो; पण त्याच्या मेकअपमुळे त्याच्या वेदना मला समजल्या नाहीत. सबकॉन्शसमध्ये रुतलेला हा पॅथॉस त्या सकाळी मी पेंट केला खरा; पण माझ्या मनात त्या क्षणी तो अजिबात नव्हता. माझ्या चित्रांचे विषय असेच येत गेले. या मनाचा भरवसा नाही. त्यात काय काय लहानपणापासून दडलेलं आहे.
ही मनातील बंद घड्याळं असतात. कधी सुरू होतील भरवसा नाही. कुणाला आत जायला मिळतं अथवा नाही. हात, मन काम करीत असतं, तरीही तुम्ही हे सारं ओलांडून आतल्या दरवाजापलीकडे जाऊ शकता. रियाझाने हे अधिक सोपं होतं. ‘व्हॉट्स द रिअॅलिटी?’ या चोथा झालेल्या चर्चेपलीकडे जाऊन तुम्ही तो आनंद बघत असता. एखाद्या चित्रनिर्मितीत अशीही वेळ येते, की भूतकाळ अदृश्य होतो… भविष्याचा पत्ता नाही… वर्तमानात असून नसल्यासारख्या सगळ्या काळाची बंधनं सुटलेली असतात. तुम्ही जागे असता, आनंदी असता आणि त्या ‘स्पेस’मधून जेव्हा बाहेर येता तेव्हा चित्र काय आहे हे पाहत नाही, तर आतल्या अवस्थेनं तुम्ही हलके होता. चैतन्याची ही गंमत तेव्हाच कळते. कार्य आणि सिद्धीच्या फेऱ्यातून सुटलेली ही आनंदाची गाठ असते.
या व्हिज्युअल आर्टच्या गमती आहेत. हे माझे अनुभव आहेत. तर्कतीर्थ माझ्या स्टुडिओत बसले होते. त्यांच्या एका खंडाचं- पुस्तकाचं मुखपृष्ठ हे उगाचच कारण होतं. माझ्या स्टुडिओच्या बाल्कनीत एक जुनं भलंमोठं चाफ्याचं झाड खालून वर येऊन टेकलं होतं. त्याची गच्च भरलेली माथ्यावरची फुलं सहज हाताला लागायची. एखाद्या फ्लॉवरपॉटमध्ये एखादं अख्खं झाड लावावं असा तो नजारा होता. स्टुडिओमध्ये एक फोटोग्राफर यायचा. तो माझ्यासाठी कॉपिंग, ब्रोमाइड्सचं काम करे. त्यावेळी त्याच्याकडे याशिका हा बारा फ्रेम्सचा कॅमेरा होता. त्याने दहा फ्रेम्स जरी काढल्या तरी तो नफ्यात असायचा. उरलेल्या दोन फ्रेम्स त्याच्याकडे कॅमेऱ्यात शिल्लक असायच्या. माझं म्हणणं असं की, त्याने स्वत:ला आवडेल ते फोटो काढावेत. शास्त्रीजी असतानाच तो आला. मी त्याला म्हणालो, ‘‘अरे, चाफा फुलला आहे. असा टॉप शॉट मिळणार नाही. तू क्लिक कर!’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘नको. मला ते फोटो कामाचे नाहीत.’’ परत त्या विषयावर वादावादी झाली. शास्त्रीजी हे सारं ऐकत होते. तो गेल्यावर मला ते म्हणाले, ‘‘अवचट, कशाला वाद घालता तुम्ही?’’ मी म्हणालो, ‘‘शास्त्रीजी, एवढं सुंदर झाड… त्यात तो फोटोग्राफर… काय हरकत आहे एखादा फोटो काढायला?’’ त्यावर शास्त्रीजी शांतपणे हाताची घडी घालत म्हणाले, ‘‘अवचट, चाफा तुम्हाला दिसतो, त्याला तो दिसत नाही!’’
हीच व्हिज्युअल आर्टमधली खरी मेख आहे. ती म्हणजे ‘दिसणं’ ही होय. कोणाला काय दिसतं? कोणाला समोर असून दिसत नाही. ‘भावणं’ हे फार दूरच राहिलं. तुम्हीच काढलेलं पेंटिंग- तुमच्या मनातलं जे आहे, तेच पाहणाऱ्याला दिसतं का? हा फार शास्त्रीय, खोल विषय आहे. त्याबद्दल कधीतरी चर्चा करावी लागेल. थोडक्यात- राम गणेश गडकरींचं एक वाक्य इथे चपखल बसू शकतं. ते म्हणजे- ‘‘चांदण्यात पहाटे दंडुके मारीत गुरखा कितीही फिरला तरी तो कविता करू शकत नाही.’’
काहीही म्हणा, या ब्रह्मांडात न उलगडलेली अनेक कोडी असतात. त्याला वेळ म्हणायची का? मेक्सिकोमध्ये मी दोनशे वर्षांचं एक जुनं झाड पाहायला गेलो होतो. गाईडनं सांगितलं, काही दिवसांपूर्वी त्याला इतक्या वर्षांनी फुलं आली. आठ दिवस ती फुलं होती. ती पाहायला गर्दी झाली. त्या झाडाला इतकी वर्षे वाट पाहायला लागली. ऋतू येतात, झाडं हसतात. या ऋतूप्रमाणे चेहऱ्यावरच्या रेषा बदलतात. हे ऋतू किती नवीन चेहरे देतात. त्या क्षणांचा इंतजार करावा लागतो. चित्रकार गायतोंडे कोऱ्या कॅनव्हाससमोर कित्येक दिवस बसून निरखत बसलेले असायचे. तसेच मी माझे मित्र प्रभाकर बरवेंना पाहिलं आहे. त्या अलौकिक क्षणाचाच हा इंतजार असावा. एकदा का तो स्पार्क पडला, की पोळ्याच्या दिवशी हिरव्यागार शेतात जसा मोकळा बैल मनसोक्त हुंदडतो तशी प्रतिभा कॅनव्हासवर मोकळी होती.
माझ्या स्टुडिओत कधी संगीत असतं, नसतं; पण मनात मात्र सतत अनेक इमेजेसचे एकावर एक कोलाज येत-जात असतात. त्याला स्थळ-काळाचं परस्पेक्टिव्ह नसतं. खूप खोल विहिरीत शेवाळाच्या गडद अंधाऱ्या पाण्याच्या तळाशी माशासारखं तरंगणारं माझं बालपण असावं. भग्न मंदिराचं अंगण झाडणारा तो कोण असावा? त्याच्या जीर्ण धाबळीतल्या भोकांमध्ये एकांताची प्रतिबिंबं खेळत असावीत. देवालयाच्या पडक्या भिंतीवर उडत येऊन बसलेल्या भटक्या पक्ष्याच्या चोचीत बालपणाचे तंतू असावेत. लिंबाच्या वृद्ध झाडानं त्याच्या सावलीतले शाळेतल्या छोट्या पोरांचे कितीतरी लपंडाव जपले असावेत! कालिकतच्या निमुळत्या, भगभगीत समुद्रकिनाऱ्यावर उभा एक लंगडा घोडा, व्हिन्सेंटच्या शेवटच्या चित्रातले त्याला त्रास देणारे कावळे, मोनालिसाच्या पेंटिंगच्या आतल्या थरात लिओनार्दो द विंचीचं अडकलेलं सेल्फ पोट्र्रेट, जैसलमेरच्या वाळवंटातल्या खुरट्या झुडपावर बसलेला, तहानलेला लांब शेपटीचा काळा पक्षी आणि तप्त वाळूवर पडलेली बाळाच्या गालावरील तीटेसारखी त्याची सावली, घनदाट जंगलात एका फांदीवर बसलेल्या पक्षिणीच्या डोळ्यांतल्या भयानं कासावीस होणारा माझा मित्र कवी ग्रेस, गावाबाहेर काढलेल्या ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचं निराधार बालपण, धरणग्रस्तांसाठी झगडता झगडता काष्ठवत झालेली मेधा पाटकर, व्हिन्सेट व्हॅन गॉगचे झिजलेले बूट, परागंदा झालेले गिरणी कामगार, हजारो मैल चालत गेलेली अनवाणी कुटुंबं, माझ्याबरोबर चहा पीत उभा असलेला, ‘आलोच’ असं म्हणून नसीरुद्दीन शाह विंगेतून जाताना ‘मॅक्बेथ’ व्हावा…
इथं पारतंत्र्य-स्वातंत्र्य नसतं. प्रेडिक्टेबलही नसतं. मनातल्या खोलवरच्या प्रतिमा हलत राहतात. मनातल्या अंगणात अपरात्री चांदण्यांचे कवडसे जसे खेळतात, तसंच पेंटिंग होतं. आणि गंमत म्हणजे त्यांचा पेंटिंगचा काहीही संबंध नसतो. मी त्या प्रोसेसमध्ये अलिप्त असतो… बखळीत आडोशाला वाढलेल्या एखाद्या येड्या बाभळीसारखा!
Subhash.awchat@gmail.com