सुभाष अवचट : रेखाचित्र : अन्वर हुसेन
न्यूयॉर्क म्युझियममध्ये मी पहिल्या दालनात प्रवेश केला. तेथे एक अजब शांतता पसरलेली होती. ती मी कोठल्याही इतर प्रदर्शनांत अनुभवली नव्हती. Vincent Willem Van Gogh या ट्रॅजिक पेंटरचे ते प्रदर्शन होते. ते पाहायला मी खास तेथे गेलो होतो. प्रत्येक चित्रांसमोर माणसे उभी होती. पण इवलीशी कुजबुजही तेथे नव्हती. वास्तविक त्याची चित्रे मी पुस्तकात, पोस्टकार्डवर एरव्ही पाहत आलो होतो. आता मी ती प्रत्यक्षात पाहत होतो. का कुणास ठाऊक, एक अनामिक हुरहुर माझ्यातही होती. उगीच खोटे कशाला सांगायचे? पिकासो, रेम्ब्रॉं किंवा शाळेतली मुलांची चित्रे पाहताना माझे चित्त इतके प्रसन्न होते की त्याला नाव, उपमा देणेसुद्धा विसरून जाणे होते. तो क्षणभर आनंद जपून ठेवावा लागतो. व्हिन्सेंटची चित्रे पाहताना या अनुभवात त्याच्या विदारक आयुष्याचीही जोड होती. ती वेगळी करून चित्र पाहणे अशक्य झाले होते. जवळपास उभ्या असलेल्या इतर माणसांची हीच अवस्था असावी. अचानक त्या शांततेत एक हुंदका ऐकू आला. क्षणभर साऱ्यांचे लक्ष तेथे गेले. एक तरुण ब्लॉंड मुलगी एका चित्रासमोर उभी होती. तोंडावर रुमाल दाबून हुंदका आवरण्याचा प्रयत्न करीत होती. इतरांनी तिच्याकडे न पाहता तिला डिस्टर्ब केलं नाही. ही उपजत सभ्यता म्हणावी लागेल. नंतर मी त्याच चित्रासमोर उभा राहिलो. व्हिन्सेंटचे ते यलो हाऊसमधल्या छोटय़ा बेडरूमचे पेंटिंग होते. एक खिडकी, छोटा आरसा- खुंटीवर टांगलेला, जुना टॉवेल, एक-दोन छोटी-मोठी टेबलं, टेबलावर ठेवलेली किटली, भिंतीवर लटकलेली त्याचीच दोन-चार चित्रं, त्याचे छोटे बेड, त्यापाठीमागे लटकवलेले त्याचे कपडे, डाव्या बाजूचा निळा दरवाजा.. एवढेच. ते नेहमीचे पेंटिंग होते. तरीही तिला हुंदका का आला?
तसे पाहता या चित्रात सावल्यांचा पत्ता नव्हता. पण व्हिन्सेंटने त्याचे अखेरचे दिवस तेथे कंठले होते. त्याच्या वेदना त्या खोलीत होत्या. त्यामुळेच तो हुंदका बाहेर आला असावा. अनेक मास्टर्सची पेंटिंग्ज पाहताना ही रिअॅक्शन येते का? का ती वेगळ्या स्वरूपाची असते? व्हिन्सेंटची गोष्टच निराळी झाली. इतर जगप्रसिद्ध चित्रकारांना हे भाग्य लाभले नाही.
माझीच सोपी गोष्ट बघा. तरुणपणात नेट नव्हते. मोबाईल नव्हते. विमानाने परदेशी जाणे ही मोठी गौरवाची बाब होती. परदेशी पुस्तकेही क्वचित दिसत असत. असे असतानाही कुठेतरी या व्हिन्सेंटचे नाव मला पेठेतल्या गल्लीत ऐकू आले. एवढेच नाही तर कोठल्यातरी श्रीमंत माणसाच्या मुलीने मला परदेशी रंगीत पोस्टकार्ड्स दिली. त्यात एक व्हिन्सेंटचे होते. त्याच्या झिजलेल्या बुटांच्या जोडीचे ते चित्र होते. मला तो पहिला धक्का होता. असाही चित्रांचा विषय असू शकतो? त्यामुळे अचानक माझी ग्रामीण बैठकच बदलून गेली. मी गच्चीत जाऊन ते कार्ड पाहत असे. हा चित्रकार किती चालला असेल? हा कोण आहे? कुठे राहतो? असे अनेक भाबडे प्रश्न त्यावेळी मला पडले होते. पण व्हिन्सेंटच्या आयुष्याबद्दलचे दरवाजे खुले होऊ शकले नाहीत. माझ्या मित्राचे वडील कोल्हटकर हे प्रोफेसर होते. त्यांच्या घरी संग्रहात इंग्लिश पुस्तके असायची. त्यांच्याकडूनच ‘Lust for Life’ याबद्दलची मला माहिती मिळाली. हे पुस्तक पाहण्यासाठी मी पुण्यातील कॅम्पमधल्या ‘मॅनिज’ या पुस्तकांच्या दुकानात गेलो.
मला भीती वाटत होती. पण त्याच्या मालकांनी मला प्रेमाने ते पुस्तक दाखवले. मला एवढे मोठे पुस्तक वाचायची सवय नव्हती. पुस्तकाचे कव्हर पाहून माझी निराशा झाली. त्यावर व्हिन्सेंटचे पोट्र्रेट नव्हते. केवळ एक लँडस्केप आणि Irving Stone या लेखकाचे मोठे नाव होते. पुस्तक विकत घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हते. नंतर त्यावर इंग्लिश सिनेमाही अलका टॉकीजमध्ये लागला. तोही मला पाहता आला नाही. हळूहळू व्हिन्सेंटच्या चर्चा पसरू लागल्या. मला वाटायचे, तो जिवंत आहे. तर कळले, ‘Lust for Life’ १९३५ साली प्रसिद्ध झाले. १९५६ च्या सुमारास तो सिनेमा आला. त्यात कर्क डग्लसने व्हिन्सेंटची भूमिका केली होती. क्वीन या नटाने व्हिन्सेंटच्या भावाची भूमिका वठवली होती. त्यांना अॅकॅडमी प्राईझही मिळाले होते. मला या इन्फर्मेशनचे घेणे-देणे नव्हते. एक तर व्हिन्सेंट जिवंत नव्हता. आणि त्याची चित्रे मला पाहायला मिळत नव्हती.
शिकत असताना ब्लॉक मेकिंग, प्रिंटिंग हे माझे विषय होते. त्यामुळे आम्ही विद्यार्थी निरनिराळ्या प्रेसमध्ये जात असू. शिवाजी नगरच्या एका प्रेसमध्ये आम्ही गेलो होतो. तेथे ऐतवडेकर या सद्गृहस्थांची ओळख झाली आणि अचानक ती वाढली. ऐतवडेकर हे किरकोळ शरीरयष्टीचे गृहस्थ होते. पण त्यांच्यात चित्रकलेचे मोठे प्रेम लपलेले होते. आणि योगायोग असा की ते व्हिन्सेंटचे मोठे चाहते होते. एक दिवस सकाळीच ते घरी आले. पिशवीतून काळजीपूर्वक एक पुस्तक काढले आणि म्हणाले, ‘जपून बघ. नंतर परत कर. एकच कॉपी मुंबईत रस्त्यावर मिळाली.’
त्या छोटय़ा पुस्तकात व्हिन्सेंटच्या चित्रांच्या दहा-बारा रंगीत प्लेट्स छापलेल्या होत्या. मी अधाश्यासारखा त्या पाहत होतो. ऐतवडेकर माझ्याकडे पाहत प्रेमाने म्हणाले, ‘पुढच्या वेळेस मी मोठे पुस्तक मुंबईहून घेऊन येतो.’ नंतर त्यांनी हा खजिना सतत माझ्याकडे मोकळा केला. आणि मी त्याचा पाठलागही केला. मला त्याच्याबद्दल आकर्षण होते की त्याच्या चित्रांबद्दल? त्या वयात भारावून टाकणारी अनेक माणसे माझ्याभोवती होती. पण कुठेतरी जन्मलेल्या व्हिन्सेंटच्या त्या झिजलेल्या जोडय़ाच्या पोस्टकार्डवरच्या चित्रानेच मी भारावला गेलो, हे खरे. त्यामुळेच चित्रकलेत माझा दृष्टिकोन व्यापक झाला, हेही खरे आहे. तेही त्या वेळी, त्या वयात. कलेतला फापटपसारा वाढला नाही.
इम्प्रेशनिझमचा तो कालखंड हा ‘गोल्डन पीरियड’ समजला जातो. तो अजूनही ताजातवाना, परत पाहावा असाच आहे. त्यात योगदान देणारे अनेक चित्रकार अल्पायुषी ठरले. पण त्या आयुष्याच्या थोडय़ा काळात त्यांची निर्मिती अद्भुत आहे. त्यातलाच व्हिन्सेंट हा एक. तो केवळ सदतीस वर्षे जगला. गोळी झाडून घेऊन त्याने आयुष्य संपविले. त्या वयात त्याने नानाविध कामे केली. पण गरिबीनं त्याचा पिच्छा सोडला नाही. गरिबीबरोबरच डिप्रेशनने त्याला दूर ठेवलं नाही. पण त्याचा भाऊ थिओ त्याच्यावर प्रेम करायचा. आर्थिक मदतही करायचा. व्हिन्सेंटचा तो खरा भाऊ, मित्र असा ‘सब कुछ’ होता- तो त्याच्या मृत्यूपर्यंत. त्या काळात सिफिलीस या रोगाने अनेक मृत्यू झाले. व्हिन्सेंटला त्याचेच भय होते. त्या रोगावर तेव्हा औषध तयार झाले नव्हते. या रोगानेच व्हिन्सेंटचे घराणेही नष्ट झाले. शेवटी त्याचा भाऊही त्याचमुळे मृत्यू पावला. या रोगामुळे आपण कधीही भ्रमिष्ट होऊ शकतो, आपल्या कानात निरनिराळे आवाज येऊ लागतील, ‘हॅल्युसनेशन’मध्ये आपण ठार वेडे होऊ शकतो, या भीतीने त्याअगोदर आपण चित्रे काढून मोकळे व्हावे या विचारानेच सूर्यप्रकाशात जावे म्हणून तो साऊथ ऑफ फ्रान्समध्ये एका छोटय़ा गावात गेला. तेथे तो ‘यलो हाऊस’ या घरात राहिला. त्याने झपाटल्यासारखी २१०० पेंटिंग्ज केली. ८६० तर त्याने शेवटच्या दोन वर्षांत केली. अनेक ड्रॉइंग्ज, स्केचेसही झालेली होती. त्याच्या साथीला पॉल गॉगीन हा प्रसिद्ध चित्रकार आणि मित्र होता. त्यानेही तेथे पेंटिंग्ज केली. दोघांच्या भांडणानंतर गॉगीन पॅरिसला, आणि नंतर ताहिती बेटावर गेला. व्हिन्सेंटने आयुष्यात फक्त एकच पेंटिंग विकले. Anna Boch या बाईने ते चारशे फ्रॅन्क्सला विकत घेतले होते. त्याला गावातल्या लोकांनी वेडा म्हणून असायलम्मध्ये ठेवले. तेथून परतल्यावर परत चित्रे काढून त्याने आयुष्य संपवले. तिकडे त्याचा भाऊ थिओही जग सोडून गेला. पण त्याच्या बायकोने व्हिन्सेंटची सारी चित्रे, त्याची पत्रे, रेखाटने जपून ठेवली. आणि त्याच्या पुतण्याने अॅमस्टरडॅमला व्हिन्सेंटचे जगप्रसिद्ध म्युझियम उभारले.
व्हिन्सेंटचे वेडेपण, त्याचे कान कापणे, त्याचे आजारपण यामुळे अनेक दंतकथा पसरल्या. त्यावर लाखो पाने जगभर छापली गेली. चित्रपट आले. त्याच्या चित्रांच्या किमती अब्जावधी झाल्या. अशी सहानुभूती, प्रसिद्धी इतर चित्रकारांना मिळाली नसेल. पण यामागे दु:खाची झालर सतत राहिली. त्याने भय, भूक, वेडेपण चित्रांतूनच व्यक्त केले. त्याच्या कमर्शियल आयुष्यात तो पूर्ण पराभूत झालेला होता. थिओला लिहिलेल्या पत्रांत प्रत्येक पेंटिंग करताना त्याची मानसिक अवस्था त्याने लिहिली आहे. त्यामुळे त्याच्या चित्रांकडे पाहताना जोडीला त्याच्या ट्रॅजिडीची जोडही सामावली जाते. त्याने या वेदनेला त्याच्या वेगळ्याच चित्रशैलीत बेमालूमपणे सामावले, आणि त्याचे हे वेडेपण किती अलौकिक आहे हे जगापुढे ठेवले. मृत्यूनंतर कलाकाराचा गौरव होणे ही जगरहाटी आहे. पण त्याच्या चित्रांची कदर त्याच्या वहिनीने आणि पुतण्याने ठेवली, हेही महत्त्वाचे आहे.
इकडे अॅमस्टरडॅममध्ये वेगळ्याच घडामोडी घडत होत्या. व्हॅन गोच्या म्युझियमचे जोरात बांधकाम सुरू होते. Kenneth Wilkie हा रिपोर्टर ‘हॉलंड हेरल्ड’ या वर्तमानपत्रात काम करत होता. दररोज सायकलवरून जाताना तो हे बांधकाम बघत असे. त्याच्या बॉसने त्याला सांगितले की, म्युझियमचे उद्घाटन जवळ येत आहे. तू असे काही आर्टिकल लिही, की व्हिन्सेंटबद्दल अजून कोणीही लिहिलेले नाही. दिवस कमी होते. केन ही असाईनमेंट घेऊन बाहेर पडला. एखाद्या थ्रिलर चित्रपटामध्ये बघावे असा त्याने शोध घेतला. त्यावर त्याने पुस्तक लिहिले. ते म्हणजे ‘असाईनमेंट व्हॅनगो’! ते प्रसिद्ध झाले. गाजलेदेखील. त्यात त्याने व्हिन्सेंटच्या खऱ्या आयुष्यातले सुटलेले धागेदोरे परत जुळवले. खऱ्या गोष्टी बाहेर आल्या. अपुऱ्या माहितीमुळे ‘लस्ट फॉर लाईफ’मध्ये निसटलेल्या अनेक गोष्टी त्यामुळे दृष्टोत्पत्तीस आल्या. व्हिन्सेंट खरा वेडा होता का, यावर ही काही पुरावे बाहेर आले.
इकडे पुण्यातही इतर घडामोडी झाल्या. ऐतवडेकर नेहमीसारखे घरी आले. पिशवीत हात घालून झेरॉक्समध्ये बाईंड केलेले पुस्तक त्यांनी मला दिले. ‘जपून वाच आणि परत कर!’ त्यांनी सांगितले. ते पुस्तक होते- ‘असाईनमेंट व्हॅनगो!’
या पुस्तकाने व्हिन्सेंटचे आयुष्य आणि त्याच्या चित्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.
युद्धाच्या काळात चित्रकलेच्या क्षेत्रात उलथापालथ झाली. जर्मनी, फ्रान्स, लंडनमधली अनेक मौल्यवान चित्रे पळवली गेली. त्यावेळी चित्रांचे रेकॉर्ड नव्हते. पण त्या लोकांना सोने- चांदीपेक्षा या चित्रांचे मोल जास्त होते. मार्केटमधून हजारो पेंटिंग्ज अदृश्य झाली. त्यात अर्थातच व्हिन्सेंटची चित्रे होतीच. खरेदीदार बहुतांशी श्रीमंत ज्यू आणि जर्मन लोक होते. परिस्थिती निवळली. आणि आश्चर्य म्हणजे अनेक वर्षांनी तीच पेंटिंग्ज बाजारात परत आली. काही ‘अन्नोन फॅमिलीज्’नी म्युझियमला ती गिफ्ट दिली. माणसाचे आयुष्य संपते, पण चित्रे जनरेशनवाईज टिकून राहतात. व्हिन्सेंटची चित्रे अजून टिकून आहेत त्यापाठी त्या चित्रांतली तुम्हाला जाणवणारी भावना, वेदना, आशय, मांडणी कधी जुनी होत नाही. त्यात गेल्या शेकडो वर्षांत अनेक पिढय़ा आल्या-गेल्या, किंवा येत- जात राहतील. व्हिन्सेंटचे म्युझियम हे व्हिजिटर्सनी भरतच राहणार. दर क्षणी प्रत्येकाला व्हिन्सेंटच्या चित्रांत वेगळी अनुभूती मिळत राहणार.. त्यांतल्या वेदनेचा, सौंदर्याचा अमर्याद अर्थ शोधत राहणार. त्या तरुण ब्लाँड मुलीच्या हुंदक्यामध्ये हाच अर्थ भरलेला आहे.
Subhash.awchat@gmail.com