बऱ्याच दिवसांनी साताऱ्याला रोहिणीकडे जाणं झालं. रोहिणी माझी जुनी मैत्रीण. मी साताऱ्यात असताना तिचं लग्न झालं होतं. त्यामुळे तिच्या सासरच्या घराशीही माझं घट्ट नातं जडलं. रोहिणी
‘तूच बघ म्हणजे झालं. मी सांगून थकले. माझ्या सुनांचा स्वयंपाक तयार असतो गं! पोरांचेच नखरे. आवडीनिवडी तर विचारूच नकोस! एकाला गोडच, दुसऱ्याला तिखटच, तिसऱ्याला आंबटच! आणि या दोघी बसतात सगळ्यांची मर्जी सांभाळत!’ सासूबाई करवादल्या.
‘अहो, मग छानच की! त्यानिमित्तानं घरात चारी ठाव स्वयंपाक होतो ना?,’ मी म्हटलं.
‘हो. पण सगळ्यांनी चारी ठाव जेवायला हवं. फक्त आपल्या आवडीचे पदार्थ खाऊन काय उपयोग? किंबहुना, ते जास्त खाल्ले गेल्यानं आजारांना कारण ठरतात.’
‘आजी, तू ना, उगीच कारल्याची भाजी, मेथीची आमटी, कवठाची चटणी, शेपू, जवसाची चटणी अशा संग्रहालयात ठेवायच्या पदार्थाचा आग्रह नको करत जाऊस गं.’ – नातू उवाच.
‘अरे, मग सगळे पोषक पदार्थ तुमच्या पोटात जाणार कसे? म्हणून मी नेटवरून माहिती काढून इथे तक्ता लावलाय बघ. कुठल्या पदार्थात किती प्रथिनं, किती जीवनसत्त्वं, किती खनिजं असतात ते. हे सगळं रोज पोटात जायलाच हवं,’ रोहिणीचा दीर म्हणाला.
‘काका, आधी तुझा तो तक्ता लक्षात ठेवणं अवघड. त्यात बघून तसं जेवायचं ठरवलं ना, तर भीमासारखं गाडाभर जेवावं लागेल आणि अजगरासारखं वर्षभर पचवत
बसावं लागेल.’
‘म्हणून तर आजीचा चारी ठाव जेवणाचा मार्ग उत्तम नाही का? षड्रस आहार घेतला की पूर्ण पोषण होणारच,’
मी म्हटलं.
‘षड्रस आहार? आता हे काय नवीन?’
खरं तर ही संकल्पना नवीन नाही; जुनीच. नेटवरच्या भारंभार आणि अव्यवहार्य माहितीपेक्षा षड्रस आहार ही संकल्पना अगदी सामान्य माणसालाही समजायला आणि व्यवहारात आणायला सोपी आहे. पण स्वतंत्र भारतात या एतद्देशीय आरोग्यदायी कल्पनेचा अंतर्भाव कुठल्याही क्रमिक पुस्तकात नसावा, हे किती मोठं दुर्दैव! (गंमत म्हणजे काही अभ्यासक्रमांत पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणे- चवी फक्त पाच आहेत, असं मुलांना शिकवतात. तिखट ही चव नसून केवळ जिभेला होणारी संवेदना आहे म्हणे!)
शाळेत भौतिकशास्त्र या विषयात मूलद्रव्यांची संख्या १०८ आहे, असं आम्ही शिकलो होतो. आता ती ११८ आहे म्हणे. पृथ्वीवरील यच्चयावत सजीव आणि निर्जीव पदार्थ याच मूलद्रव्यांपासून बनतात. मानवी शरीराच्या पोषणासाठी ४४ घटकांची गरज असते. पण हे सगळे घटक, प्रत्येक खाद्यपदार्थातील त्यांचं प्रमाण, त्यांचं शरीराला आवश्यक प्रमाण हे सामान्य माणसाला कसं समजावं? साक्षरांपासून निरक्षरांपर्यंत आणि बुद्धिवंतांपासून मूढांपर्यंत सर्वाना समजणारी आहारविषयक सामान्य गोष्ट म्हणजे अन्नाची चव. मग पोषणाचे नियम या चवींवर आधारीत असले तर? नेमकं हेच काम आयुर्वेदशास्त्र करतं.
आयुर्वेदाच्या मते, सृष्टीची उत्पत्ती पाच मूलद्रव्यांपासून होते. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ही ती मूलद्रव्यं होत. यांना ‘पंचमहाभूते’ असंही म्हणतात. सृष्टीतला प्रत्येक पदार्थ पांचभौतिक आहे. (उदा. मातीमध्ये पाचही महाभूतं असतात. फक्त पृथ्वी महाभूताचं प्रमाण अधिक असतं.. पाण्यात जल महाभूताचं प्रमाण अधिक असतं, इ.) आपलं शरीर आणि त्याचं पोषण करणारे निसर्गातील आहारीय पदार्थ पांचभौतिकच आहेत. साहजिकच आहारीय पदार्थाच्या सहा चवींची (गोड, आंबट, खारट, कडू, तिखट, तुरट) निर्मितीसुद्धा या पाच महाभूतांपासूनच झाली आहे. प्रत्येक चवीच्या पदार्थात पाचही महाभूतं असतातच. फक्त त्यांचं प्रमाण कमी-जास्त असतं. म्हणजे जेवणात सहाही चवींचे पदार्थ असतील तर शरीरपोषक पाच महाभूतं शरीराला मिळणारच. तरी कोणती चव किती प्रमाणात घ्यावी, आपण एखाद्या चवीचे पदार्थ खातच नसलो, किंवा जास्त खात असलो तर काय, हे प्रश्न आहेतच. त्यासाठी आपण एकेका चवीचा विचार करू या.
‘गोड’ ही आपल्या आहारातील सर्वात महत्त्वाची चव! म्हणून तर ‘साधा स्वयंपाक गोड मानून घ्या!’ अशी अतिथीला विनंती केली जाते. सर्वानाच ही चव प्रिय असते. ‘मला गोड अजिबात आवडत नाही,’ असं म्हणणाऱ्या किंवा ‘मी अजिबात गोड खात नाही,’ असं समजणाऱ्या व्यक्तीही गहू, ज्वारी, तांदूळ, डाळी, दूध, तूप, गूळ, साखर असे गोड पदार्थ रोज; तर सुकामेवा, फळं, मध असे पदार्थ अधूनमधून खातच असतात. शरीरातील रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सातही धातूंचं आणि बल, वर्ण, स्वर, केस, ओज या सर्व भावांचं पोषण गोड पदार्थ करतात. इंद्रियांची कार्यक्षमता ते वाढवतात. जखम भरून काढणं, तुटलेलं हाड जोडणं, अशक्तपणा व झीज भरून काढणं, शरीराची वाढ होणं यासाठी गोड पदार्थ आवश्यक असतात. लहान मुलं, वृद्ध, गर्भिणी, कष्टकरी या सर्वासाठी गोड पदार्थ हितकारक असतात. त्यांचं हे महत्त्व जाणूनच आपल्याकडे पोळी, भाकरी, भात असे मुख्य पदार्थ पानात मध्यभागी आणि जास्त प्रमाणात वाढले जातात.
गोड पदार्थामध्ये पृथ्वी आणि जल ही दोन महाभूतं जास्त प्रमाणात असतात. मिष्टान्नात तर गहू + दूध + साखर असा गोडाचा अतिरेक असतो. असे पदार्थ पचायला जड असतात. (म्हणूनच गोडाच्या जेवणानंतर आपण सुस्त होतो.) अग्नी तीक्ष्ण असणाऱ्या व्यक्तींनी नियमित शारीरिक कष्ट, व्यायाम करणाऱ्या व्यक्तींनी, हिवाळ्यात अशी पक्वान्नं खावीत. बैठी कामं करणाऱ्यांनी, भूक व पचनशक्ती मंद असणाऱ्यांनी उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूत पक्वान्नं कमी प्रमाणात खावीत. उदा. नेहमी एका वेळी तीन साध्या पोळ्या खाणाऱ्या व्यक्तीनं पुरणाची पोळी एक किंवा दीडच खावी; आपण चार खातो. एरवी दोनच साध्या पोळ्या खाणारे आपण- आमरस या जड पदार्थाबरोबर एक ऐवजी चार पोळ्या खातो. तेही भूक आणि पचनशक्ती कमी असणाऱ्या उन्हाळ्यात! आजारी व्यक्तींनी तर पक्वान्न खाऊच नयेत.
जेवणाच्या सुरुवातीला (पाचकरस स्रवत असताना) गोड पदार्थ खावेत. (आपल्याकडे ते सुरुवातीलाच वाढण्याची पद्धत आहे.) म्हणजे पोट भरल्याची जाणीव होऊन योग्य वेळी जेवण थांबतं आणि खाल्लेलं नीट पचतं. जेवणानंतर स्वीट डिश म्हणजे अग्नीला ‘वर्क लोड’! आपलं सगळं काम झाल्यावर ऑफिस सुटायच्या वेळेला बॉसनं आपल्याला काही मोठ्ठं काम सांगितलं तर आपली अवस्था कशी होते? तेव्हा केलेल्या कामाची प्रत काय असते? जेवणानंतर गोड खाल्लं की आपला अग्नी असाच दमतो; अन्न अर्धवट पचवतो किंवा पचवतच नाही. एकदा पचन बिघडलं की शरीर आजारांचं माहेरघर बनायला वेळ लागत नाही. आपली हजारो वर्षांची सुफळ परंपरा सोडून, जन्माला येऊन पाचशे र्वषही न झालेल्या देशाचं आहार-कृषी अशा गंभीर विषयांत आपण अनुकरण करावं, हा आत्मघात आहे.
वरील नियम धाब्यावर बसवून गोड पदार्थ खाल्ले तर श्वास- खोकला- सर्दी असे कफाचे आजार, स्थुलपणा, कृमी, टय़ुमर्स, गलगंड, हत्तीपाय, प्रमेह, अपचन यांसारखे आजार होतात किंवा असलेले आजार वाढतात. (भाग- १)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा