‘काली घटा छाये मोरा’ (सुजाता)
यात मनात झुरणारी, समजूतदार, सोशीक, कायम ‘बेटी जैसी’ असल्याचं (पण ‘बेटी’नसण्याचं) दु:ख काटय़ासारखं मनात सलत ठेवून कष्ट उपसणारी सुजाता. तिचं गाणंसुद्धा ‘लाऊड’ कसं असेल? दार बंद करून मनाचं गुपित आधी स्वत:शी कुजबुजत, लाजत लाजत गुणगुणणारी नूतन आणि एकदा ती कबुली स्वत:शी दिल्यावर बागेत ते बागडणं.. ते सतारीच्या ठेक्यात पायऱ्या चढणं.. मला ‘माझं’ माणूस मिळालं तर कुणाचं काही बिघडणार आहे का? मी प्रेमात पडलेलं या दुनियेला चालणार आहे ना? ‘ऐसे में कहीं कोई मिल जाए रे’मधला ‘रे’ कसा खाली ओघळतो. जणू लाजून तिची मान खाली झुकलीय. सगळं गाणं एका ‘लो टोन’मध्ये आशाबाई गातात. ‘यूं ही बगियन में डोलूँ..’ हा ‘डोलूँ’चा उच्चार तर अनंत वेळा ऐकावा असा.
‘क्या हो फिर जो दिन रंगीला हो.’ (नौ दो ग्यारह)
चित्रपट संगीताच्या इतिहासात अतिशय उत्तम चित्रांकित केलेल्या गाण्यांमध्ये वरचा क्रमांक असलेलं हे गाणं. गाण्यातला प्रत्येक शब्द, प्रत्येक म्युझिक पीस पडद्यावर कसा रिफ्लेक्ट होतो, ते बघण्यासारखं आहे. चित्रण इतकं चपखल, की सुरुवातीच्या इंट्रो पीसमध्ये अॅकॉर्डियनचा पीससुद्धा एक अॅकॉर्डियन वाजवणारा स्त्री-हात कोपऱ्यात दाखवून जातो. थक्क करणारी गोष्ट म्हणजे सिगरेटची धूम्रवलयं व्हायब्रोफोनच्या सोबतीनं जातात. ती वलयं, सिगरेट धरणारा शशिकलाचा हात याच्या हालचालींतसुद्धा अर्थ, लय असावी? शशिकला ठेक्यात जे काही ठुमकते, ते चालणं व नृत्य यांच्या सीमारेषेवरचं काहीतरी आहे. पण खूप आकर्षक. त्याला ‘बल खाके चलना’ हाच शब्द सुचतोय. दोन अत्यंत ग्रेसफुल स्त्रिया- हेलन आणि शशिकला.. त्यांना आवाज देणाऱ्या दोन धारदार तलवारी- आशा आणि गीता. सारख्याच प्रमाथी. घायाळांनी फक्त ‘आह्’ म्हणावं. एकीच्या सवालाला दुसरी जबाब देतेय. शब्दा-शब्दांत लय गुंफणारी गीता ‘रेत चमके समुंदर नीला हो’ म्हणताना ‘चमके’वर काय सुंदर जोर देते. ‘क्या हो फिर जो दुनिया सोती हो’ला लावलेला खासगी आवाज. तिच्या प्रत्येक सवालाला ‘आहा, फिर तो बडा मजा होगा’ म्हणत मस्त नाचरी उडी घेणारी हेलन. गाण्यात मस्त चेंजओव्हर आहे. ‘कोई कोई फिसल रहा होगा’ म्हणताना आशाबाईंनी त्याच शब्दावर खरोखर आवाज ‘घसरवलाय.’ विलक्षण ‘ग्रेस’ आहे या गाण्यात. कारण ही ‘ग्रेस’ सचिनदा, विजय आनंद, साहिर, गीता, आशा, शशिकला, हेलन या सगळ्यांच्यात आहे. इतकं बारकाईनं गाणं करणाऱ्या, क्लब साँगवर एवढी मेहनत घेणाऱ्या या सर्वाना केवळ एक खणखणीत सॅल्यूट!
दिल का भँवर करे पुकार.. (तेरे घर के सामने)
तो कुतुबमिनारचा गोल जिना. नूतन, देव आनंद यांनी पायऱ्या उतरत उतरत म्हटलेलं गाणं. गाणं कसलं? एक लाजवाब इजहार! संपूर्ण गाणं जिन्यात चित्रित करणं हे गोल्डी आनंदच करू शकतो. आणि ती संपूर्ण चाल ‘अवरोही’ (उतरत्या) स्वरांत बांधणं, इतकंच नव्हे तर मधले म्युझिक पीससुद्धा तसेच उतरत्या स्वरांचे बांधणं, ही सचिनदांची कमाल. पण हा कुठला शुभसंयोग? हे गाणं आधी बनलं आणि मग त्याचं ‘असं’ चित्रण झालं, की विजय आनंदने उतरत्या जिन्यात गाणं करायचं हे ठरवल्यामुळे मग अशी चाल बर्मनदांनी या गाण्याला दिली? मी उत्तर शोधतेय. पण जे काही आहे ते भन्नाट आहे. फक्त भारावणंच आपल्या हाती आहे. पुन्हा त्या जिन्याच्या संदर्भात ‘प्यार की उँचाई, इश्क की गहराई’ हे हसरत जयपुरीचे शब्द किती सूचक!
अपनी तो हर आह इक तूफान है.. (काला बाजार)
हे गाणं ‘बघण्यात’ प्रचंड मजा आहे. वरच्या बर्थवर वहिदा, खाली तिचे आई-वडील आणि देव आनंदमहाशय भजन म्हणण्याच्या बहाण्याने इश्क फर्मावताहेत. ‘उपरवाला जानकर अंजान है’ म्हणताना उपरवाला परमेश्वर की ही सौंदर्यखनी वहिदा? रफीच्या आवाजातली ‘अंजान है’वरची ती लोकोत्तर हरकत.. अशा जागांचं नोटेशन वगरे काढण्याचा प्रयत्नही करू नये. उगीच गुलाबाच्या पाकळ्या उपटून पुन्हा मोजून लावण्यासारखं वाटतं. ‘उपरवाला’ या शब्दाचा प्रत्येक वेळी वेगळा केलेला नशीला उच्चार.. गाडीच्या शिट्टीचाच म्युझिक पीस, फक्त गिटारची सोबत.
फैली हुई है सपनों की बाहे (घर नं. ४४)
सुरुवातीच्या आलापापासून एक मस्त माहोल निर्माण होतो. ‘आजा चल दे कहीं दूर’ म्हणताना ‘आजा’ शब्दातलं ते मोहक बोलावणं. अशा हाकेला कोण करंटा नाही म्हणेल? एका श्वासात म्हटलेल्या दोन ओळी ‘उदी घटा के, सायें तले छुप जाए’ या ओळी सर्वात वरच्या स्वरावर असणं. ‘दूऽऽर’ शब्दावरचं ते कहर अप्रतिम डोलणं.. अक्षरश: आपण त्या हिरवाईत मनमुराद भटकतोय, मस्त थंड हवा सुटलीय, ‘चल, कुठेतरी भटकू या. मागे वळून पाहायचंच कशाला?’ हा सगळा फील अवघ्या पावणेचार मिनिटांत हे गाणं देतं.. ‘चमत्कार’ आणखी काय असतो?
बिछडे सभी बारी बारी (कागज के फूल)
रफीच्या आवाजात पॅथॉस.. ‘बिछडे’ या शब्दातच असलेला तो निराश उसासा अनुभवण्याचीच गोष्ट. हा उसासा मनाला भिडतो. हेलावून टाकणारं काहीतरी ऐकतोय आपण. ‘इक हाथ से देती है दुनिया, सौ हाथों से लेती है..’ या कैफी आझमींच्या शब्दांना नव्हे, तर थेट भावनांना चाल लावलीय बर्मनदांनी.
खोया खोया चाँद (काला बाजार)
खरं तर खूप अतिपरिचय होईपर्यंत ऐकलेलं हे गाणं. पण म्हणूनच काही अप्रतिम सौंदर्याच्या जागा नव्याने ऐकून पाहा. चालीचा तो अप्रतिम फ्लो, सुंदर लय, प्रत्येक वेळी अंतऱ्यात मेंडोलिन आणि फ्लूटचा छोटासा गोड पीस सतत सोबत करतोच. आणि ‘तिला’ प्रेमात पाडण्याचा निश्चय करून निघालेला देव आनंद. मला या गाण्यातल्या सर्वात जास्त आवडणाऱ्या ओळी..
तारे चले, नजारे चले
संग संग मेरे वो सारे चले
चारो तरफ इशारे चले
किसीके तो हो जाओ..
इतक्या सगळ्या गोष्टी तुला सुचवताहेत, तरी तुला प्रेमात पडावंसं वाटत नाही? आता तू ‘कुणाची तरी’ हो एकदाची; पण ‘अशी’ फिरू नकोस- ही भावनाच किती गोड आहे.
पिया तोसे नना लागे रे (गाईड)
अत्यंत सविस्तर, चनीत केलेलं गाणं. या एका गाण्यामुळे चित्रपटात फार मोठी उलथापालथ होते. राजू
‘रात को जब चांद चमके, जल उठे तन मेरा,
मं कहूँ मत कर ओ चंदा इस गली का फेरा,
आना मोरा संया जब आए ..
चमकना उस रात को जब मिलेंगे तन-मन’
म्हटल्यावर नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घडायला हवं ना! मग तो पॉज येतच नाही. कारण त्या क्षणी ‘ती’ मुग्ध होते आणि मग कोरसच ती ओळ पुढे नेतं. तिचे शब्द संपतात तिथे. मग ती आणि कोरस यांचा ‘पिया.. हो हो पिया’ हा गोड संवाद होऊन एक सुंदर लकेर त्या ‘रे’वर घेऊन मग ते गाणं ‘संपतं.’
जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला
(प्यासा)
या चालीत कठीण चढउतार, वक्र जागा असं काहीही नाही. आहे ती एक भळभळणारी जखम. एक कायमचा सल.. आयुष्यात प्रेम न मिळाल्याचा.. भेटलेलं प्रत्येक आपलंसं वाटणारं माणूस सोडून गेल्याचा. आणि आता त्या दु:खाला तरी काय घाबरायचं? ‘गम से अब घबराना कैसा, गम सौ बार मिला..’ हेमंतकुमारचा तो आपल्याला स्वत:च्याच मनाच्या आत आत नेणारा आवाज. ‘कलियाँ माँगी’मधला ‘गी’चा आतला उच्चार आणि ही ‘साधी’ चाल. ‘हमको अपना साया तक अक्सर बेजार मिला..’ क्या बात है!
वक्त ने किया.. (कागज के फूल)
‘जाएंगे कहाँ.. सूझता नहीं.. चल पडे मगर रास्ता नहीं..’ आयुष्यातला तो विमनस्क मकाम. जिथे मागेही जाऊ शकत नाही, पुढे भवितव्यच नाही. ‘तो’ तू नाहीस, मीही ‘ती’ नाही. काय विलक्षण क्षण असेल तो. हे गाणं तालाला वेगळं आहेच. ‘वक्त ने’मधल्या ‘ने’वर ‘बीट’ आहे; पण तो तांत्रिक मुद्दा झाला. गीताच्या आवाजातल्या कातरपणाचा अनुभव घेण्यासाठीच हे गाणं ऐकायचं. ‘क्या तलाश है’मधली ‘तलाश’वरची ती तडफड- त्यात स्वत:ला विरघळून टाकत ऐकायची, तर आणि तरच समजेल. ‘बुन रहे हैं दिल ख्वाब दम ब दम.. तुम रहे न तुम, हम रहे न हम..’
चाँद फिर निकला (पेइंग गेस्ट)
काय म्हणावं या गाण्याला? ‘सुलगते सीने से धुवाँ सा उठता है’ या ‘धुवाँ’मध्ये खरंच गुदमरतो आपण. ‘दम घुटता है’, ‘जला गए तन को बहारों के साये, मं क्या करू हाये, के तुम याद आये’ हे सगळं कसं अलगद, अवरोही उतरत उतरत ‘सा’वर विसावतं. ‘रसिक बलमा’ आणि ‘चाँद फिर निकला’ यांची आर्त हाक एकाच स्वरावलीची; पण पुन्हा पुढे खूप वेगळ्या अभिव्यक्तीची. आणि त्या ‘क्या करूं हाये’वर ओवाळून टाकायला आपल्याकडे एकच जीव असावा याचं वाईट वाटतं.
संपूर्ण बर्मनदा एका मोठय़ा पुस्तकाचाच विषय आहेत. ‘होठो में ऐसी बात’सारखं अतिभव्य गाणं काय, किंवा ‘लिखा है तेरी आँखो में’, ‘अरे यार मेरी तुम भी हो गजब’ अशी मस्त फडकती गाणी काय! ‘दिन ढल जाए’सारखं गाणं- की ज्यात देव आनंदची चूक असूनही आपण त्याच्या दु:खात सहभागी होतो, त्याचीच आपल्याला सहानुभूती वाटते.. हे त्या गाण्याचं, चालीचं, रफीच्या आवाजाचंच यश नाही का? बुद्धीपेक्षा भावनेला महत्त्व द्यायला भाग पाडणाऱ्या अशा गाण्यांसारखी खूप गाणी राहून जातात.. गाण्याच्या रेकॉìडगच्या आधी सकाळी लताबाईंना फोन करून फक्त ‘हॅलो’ ऐकून आज आवाज ‘कसा’ आहे ते पाहणारे, ‘लोता’ है तो हम सेफ हैं’ म्हणणारे, गाणं मनासारखं झालं की पान खिलवणारे, पण ‘चला, आज मी डब्यात मस्त फिश आणलंय,’ असं जाहीर करून स्वत:च एकटे डबा खाणारे बर्मनदा! इतकं कंगोरेदार व्यक्तिमत्त्व असल्यावर चालीसुद्धा तशाच होणार ना! महाप्रचंड काम करून ठेवणारा हा अवलिया संगीतकार ३१ ऑक्टोबर १९७५ ला हे जग सोडून गेला. पण कुठल्याही कातरक्षणी तुम्हाला जगण्याची उमेद आणि तारुण्य पुन्हा देणाऱ्या जबरदस्त गाण्यांचा खजिना मागे ठेवून!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा