पराग कुलकर्णी

मागील काही लेखांत आपण फॅसिझम, आर्थिक बुडबुडे (बबल) म्हणजे काय हे जाणून घेतले. तसे पाहिले तर फॅसिस्ट शक्तीचा उदय व आर्थिक बुडबुडे फुगणे/ फुटणे हे दोन्ही अपघातच. एक सामाजिक/राजकीय, तर दुसरा आर्थिक. त्यांत महत्त्वाचं साम्य म्हणजे या दोन्हींना प्रारंभी मिळणारा लोकांचा प्रचंड पाठिंबा. आज जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा लोक त्या, त्या वेळी तसे का वागले असतील? माणूस विचार कसा करतो? निर्णय का व कसे घेतो? तर्कसंगत व कोणताही पूर्वग्रह न ठेवता तो निर्णय घेऊ शकतो का? असे प्रश्न पडतात.

पण प्रश्नांचा हा प्रवास अजून काही प्रश्नांच्या अभ्यासातूनच जातो. त्यातला पहिला प्रश्न-

‘२ +२ = किती?’ हा प्रश्न वाचून संपेतो तुमच्या मनात याचे उत्तर ‘चार’ आलेच असेल. तुम्हाला हे उत्तर ‘माहिती’ होतं आणि अगदी सहजपणे तुम्हाला ते आलं. पुढचा प्रश्न- ‘१७ ७ १९ = किती?’ आता तुमच्या मनात विचार आला असेल की, हा प्रश्न पहिल्या प्रश्नाइतका सोपा नाही, पण तरीही उत्तर शोधता येऊ शकेल. तुमच्या मेंदूने गुणाकार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधून त्यातून एक निश्चित केली असेल. आता आकडेमोड सुरू झाली. आकडेमोड करताना तुम्हाला काही गोष्टी थोडय़ा वेळाकरता लक्षात ठेवाव्या लागतात. तुमची एकाग्रता वाढते आणि त्याचा हलकासा ताणही तुम्हाला जाणवतो. शेवटी तुम्ही उत्तर शोधून काढलेच. (आणि तुम्ही जर थोडे ऊर्जा वाचवणारे असाल तर म्हणाल- ती आकडेमोड नंतर बघू. मुद्दा काय आहे?) तर उत्तर आहे- ३२३. आणि मुद्दा हा आहे की, आपला मेंदू दोन प्रकारे काम करू शकतो याचा अनुभव घेणे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ‘आलं’, पण दुसऱ्याचं पद्धतशीरपणे ‘शोधावं’ लागलं. पहिल्या प्रश्नासाठी आपली फारशी ऊर्जा गेली नाही, पण दुसऱ्यात थोडी मेहनत करावी लागली. उत्तर मिळवण्याची पहिली पद्धत वेगवान, तर दुसरी संथ होती.

मानसशास्त्रज्ञांनी पहिल्या पद्धतीला सिस्टिम १, तर दुसरीला सिस्टिम २ असे नाव दिले आहे. सिस्टिम १ ही मेंदूची स्वयंचलित, स्वयंप्रेरित आणि वेगवान अशी विचार करण्याची पद्धत आहे. आदिम काळापासून माणसामध्ये असलेली ‘लढा किंवा पळा’ (Fight or Flight) ही भावना आणि संकटांना आपण त्याद्वारे दिलेला प्रतिसाद हे सिस्टिम १ चे काम आहे. गरम भांडय़ाला हात लागला की तो चटकन् मागे घेणे, जोरात आवाज आला की त्या दिशेला पाहणे हे सिस्टिम १ द्वारे आपल्या नकळत नियंत्रित केले जाते. मेंदू इतक्या जलदगतीने विचार करून निर्णय घेऊ शकला नसता तर मानवजात खूप आधीच नष्ट झाली असती. सिस्टिम २ ही तर्कसंगत विचार करणारी आणि म्हणूनच संथ व जास्त ऊर्जा लागणारी मेंदूची विचारपद्धती आहे. आजूबाजूच्या परिस्थितीतून गोळा केलेल्या माहितीचा अर्थ लावणे, त्यावरून निष्कर्ष काढणे आणि तो सिस्टिम १ ला कळवणे, हे सिस्टिम २ चे काम असते. आपल्या मेंदूत सिस्टिम १ च सदैव सक्रिय असते आणि गरज लागेल तशी सिस्टिम २ ची मदत घेतली जाते. एखाद्या गोष्टीतलं आपलं कौशल्य जसं वाढतं तसं आपण ते काम सिस्टिम १ ने करू शकतो. उदा. जेव्हा आपण गाडी शिकत असतो तेव्हा आपण गियर कोणता आहे, ब्रेकवर पाय आहे का नाही, क्लच दाबलाय का, आजूबाजूला कोण कोण आहे अशा सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक बघत असतो. अशा वेळेस रेडीओवर लागलेलं गाणंही आपल्याला ऐकू येत नाही. पण एकदा का गाडी आपल्याला व्यवस्थित चालवता येऊ लागली की आपण आपल्याही नकळत क्लच, ब्रेक, गियर वापरू लागतो. आणि तेही आपल्या मनात दुसरे विचार चालू असताना.

सिस्टिम १ म्हणजे कार्यक्षमता आणि सिस्टिम २ म्हणजे तर्कसंगतता! आपल्या मेंदूचा भर कार्यक्षमतेकडे जास्त असल्याने तो ऊर्जा वाचवण्यासाठी सिस्टिम १ ने निर्णय घेतो. असे वेगाने निर्णय घेणे आणि त्याची अंमलबजावणी करणे यात सिस्टिम १ तज्ज्ञ असली तरीही काही बाबतीत ती तर्काशी तडजोड करू शकते. अशा वेळी सिस्टिम १ चे निर्णय तितकेसे बरोबर नसतात व आपल्याला गरज असते ती सिस्टिम २ च्या संथ, पण तर्कसंगत विश्लेषणाची.

अर्थशास्त्रात असं मानलं जातं की, माणूस हा तर्कसंगत (रॅशनल) असतो. त्याला स्वत:चा फायदा बरोबर कळतो आणि त्यासाठी तो उपलब्ध असलेल्या माहितीचे विश्लेषण करून योग्य निर्णय घेऊ शकतो. पण हे तितकेसे खरे नाही. डॅनियल काहनमन या मानसशास्त्रज्ञाने अनेक प्रयोग करून अशी मांडणी केली की आपल्या मेंदूचा ‘डिफॉल्ट मोड’ असलेली सिस्टिम १ बऱ्याचदा चुकू शकते आणि ते टाळण्यासाठी आपल्याला सिस्टिम २ ला सक्रिय करणे फायद्याचे ठरू शकते. थोडक्यात, निर्णय घेताना आपला मेंदू काही गोष्टींनी प्रभावित होऊन, तर्क सोडून कसा भरकटू शकतो आणि त्याआधारे कसे निर्णय घेतले जातात, हे डॅनियल यांनी दाखवून दिले. यासाठीच त्यांना २००२ सालचा अर्थशास्त्रासाठीचा (Behavioral  Economics) नोबेल पुरस्कार देण्यात आला. मनाला प्रभावित करून तर्कापासून फारकत घेण्यास कारणीभूत असलेल्या गोष्टींना ‘कॉग्निटिव्ह बायसेस’ (Cognitive Biases) असे म्हणतात. हे कॉग्निटिव्ह बायसेस आपल्या मनाशी कसा खेळ खेळतात, हे पुढील रविवारी पाहू.      (पूर्वार्ध)

parag2211@gmail.com