पराग कुलकर्णी
एक माणूस म्हणून आपण खूप अचाट कामं करू शकतो असं तुम्हाला कधी वाटलं आहे का? आणि ही कामं म्हणजे उंच पर्वतावर चढणं, समुद्र पोहून जाणं, आकाशात उडणं किंवा गिनिज बुकने नोंद घेण्यासारखी किंवा नोबेल पारितोषिक मिळावी अशी कामं नाहीत, तर आपल्या रोजच्या आयुष्यातही अवघड वाटावी अशी अनेक कामं आपण करत असतो. उदाहरणार्थ, आपण रोज वापरत असलेला मोबाइल किंवा कॉम्प्युटरवरचा कीबोर्ड घेऊ. आपण शिकताना A, B, C, D… X, Y, Z अशी क्रमाने शिकलेली अक्षरे आपल्या QWERTY कीबोर्डवर वाट्टेल तशी विखुरलेली असतानाही आज आपण कीबोर्ड न बघताही लीलया टाईप करू शकतो. सायकल चालवणं, गाडी चालवणं, एखादी भाषा शिकणं-बोलणं-लिहिणं यादेखील अवघड अशाच गोष्टी आहेत; ज्या आपल्याला सरावाने सहज जमतात. पण हे होतं कसं? अर्थात यामागे आहे आपला मेंदू आणि त्याच्याशी संबंधित आपली आजची संकल्पना.. न्युरोप्लास्टीसिटी.
आपला मेंदू हा ८६ बिलियन पेशींचे एक जाळे आहे. या पेशींना म्हणतात- न्यूरॉन (Neuron). आणि त्यांना एकमेकांशी जोडणाऱ्या जाळ्याच्या धाग्यांना म्हणतात- सिनाप्सेस (Synapses). आपण ज्याला मन, बुद्धी, विचार, भावना, अनुभव, आठवणी, कौशल्य, माहिती म्हणतो या साऱ्या गोष्टी म्हणजे या न्यूरॉन्स आणि त्यांना जोडणाऱ्या सिनाप्सेसचीच कमाल आहे. हे न्यूरॉन्स इतर न्यूरॉन्सना तसेच शरीराच्या इतर अवयवांना संदेश (सिग्नल) पाठवू शकतात आणि त्यांच्याकडून आलेले संदेश स्वीकारूही शकतात. या न्यूरॉन्स आणि त्यांना जोडणाऱ्या सिनाप्सेस यामध्येच माहिती साठवली जाते. आपण जेव्हा एक झाड पाहतो तेव्हा आपल्या डोळ्यांत असलेल्या पेशी- ज्या सेन्सरसारख्या काम करतात- एक संदेश (इलेक्ट्रो-केमिकल सिग्नल) मेंदूला पाठवतात. हे सिग्नल मेंदूमधील झाडासंबंधी माहिती असणाऱ्या न्यूरॉन्सला सक्रिय (activate, fire) करतात. या सक्रिय झालेल्या न्यूरॉन्समुळेच आपल्याला समोरची वस्तू म्हणजे झाड आहे हे समजते. एक झाड पाहून सक्रिय झालेले न्यूरॉन्स आणि एखादी गाडी पाहून सक्रिय झालेले न्यूरॉन्स हे वेगवेगळे असतात आणि त्यावरूनच आपल्याला त्यांची ओळख पटते. थोडक्यात, बाह्य़ किंवा अंतर्गत संदेशावरून या ८६ बिलियन न्यूरॉन्समधल्या काही न्यूरॉन्सची ठिपक्यांच्या रांगोळीसारखी एक रांगोळी मेंदूत तयार होते- ज्याद्वारे आलेल्या संदेशाचा अर्थ लावला जातो आणि पुढच्या कृतीची माहिती शरीराच्या त्या- त्या भागापर्यंत पोहोचवली जाते.
जन्मानंतर काही वर्षांत आपल्या मेंदूमध्ये खूप सारे बदल होत असतात. जन्मत:च खूप सारे न्यूरॉन्स एकमेकांशी जोडलेले असतात. पण जसजसे आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल शिकतो, त्यानुसार फक्त उपयोगी पडणारे, वापरात येणारे न्यूरॉन्सच एकमेकांशी जोडलेले राहतात आणि विषयानुरूप त्यांची अनेक छोटी छोटी जाळी तयार होतात. यासाठी ‘Neurons that fire together, wire together’ असे म्हटले जाते. उदा. झाड पाहून झाडाची माहिती असलेले न्यूरॉन्स सक्रिय होतात आणि एकमेकांशी जोडलेले राहतात. न्यूरॉन्सचे नवीन न्यूरॉन्सशी जोडले जाणे आणि नवीन जाळे निर्माण होणे हीच आहे आपल्या शिकण्याची प्रक्रिया! पूर्वी असं मानलं जायचं की, ही शिकण्याची प्रक्रिया एका ठरावीक वयापर्यंतच चालू असते आणि नंतर मेंदू बऱ्यापैकी तसाच राहतो. पण गेल्या काही दशकांत संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की, आपला मेंदू हा सतत बदलत असतो. आपल्याला आलेले अनुभव, आपले विचार, भावना, माहिती हे सतत आपल्या मेंदूमध्ये बदल घडवतात. मेंदूच्या या सतत बदलू शकण्याच्या क्षमतेलाच ‘मेंदूची लवचिकता’ (‘न्यूरोप्लास्टीसिटी’) म्हणतात.
ब्रेन स्ट्रोकमध्ये (पक्षाघात किंवा लकवा) मेंदूच्या काही भागात होणारा रक्तप्रवाह थांबतो आणि तिथल्या पेशी मृत होतात. अर्थात याचा परिणाम मेंदूच्या त्या भागाने नियंत्रित केलेल्या शरीराच्या काही क्षमतांवर होतो- जसे की चालणे, ऐकणे, बघणे, बोलणे, शरीराच्या हालचाली करणे इत्यादी. पण न्युरोप्लास्टीसिटीमुळे आज हे लक्षात आलं आहे की पुरेशा (खरं तर खूप साऱ्या) सरावाने मेंदू या क्षमता त्याच्या दुसऱ्या भागात काही प्रमाणात पुन्हा विकसित करू शकतो. आपल्या रोजच्या आयुष्यातही आपण जेव्हा कोणतीही नवीन गोष्ट किंवा कौशल्य शिकतो तेव्हा त्याद्वारे आपण आपला मेंदू बदलतच असतो. पण शिकणे एवढे सोपे नसते. काही गोष्टी काही लोकांना सहज जमतात, तर काही लोकांना त्यासाठी खूप वेळ लागू शकतो. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की, आपण प्रयत्नपूर्वक शिकू शकतो, स्वत:मध्ये बदल घडवू शकतो. त्यासाठी गरज आहे सातत्याने केलेल्या सरावाची. आपण जेव्हा सराव करतो तेव्हा आपले मेंदूचे जाळे बदलते. नव्याने न्यूरॉन्सची जोडणी तर होतेच; शिवाय न्यूरॉन्समधल्या संदेशवहनाची क्षमताही वाढते. या सगळ्याचा परिणाम आपला मेंदू, विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची शक्ती, त्या अनुषंगाने घडणाऱ्या शारीरिक हालचाली या सर्वावर होतो. क्रिकेट, टेनिस, बॅडिमटन आणि इतर अनेक खेळांत क्षणात निर्णय घेऊन कृती करायची असते. सराव चांगला असेल तर आपला मेंदू त्याला सहज आणि पूर्ण कार्यक्षमतेने सामोरा जाऊ शकतो आणि विचार, भावना जुळून येऊन आपल्याही नकळत योग्य ती कृती घडू शकते. यात एक मजेशीर गोष्ट म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा विचार जरी केला तरी ती गोष्ट प्रत्यक्ष करतोय असाच मेंदूचा समज होतो आणि मेंदूचे न्यूरॉन्स सक्रिय होतात. त्यामुळे आपल्या चांगल्या कामगिरीचे चित्रण पुन:पुन्हा मनात केल्यानेही कौशल्य विकसित होण्यास मदत होते.
न्यूरोप्लास्टीसिटीचा अर्थ हाच की- आपल्या पूर्ण शरीराचे नियंत्रण करणारा मेंदू आपण विचारांनी, कृतीने सतत बदलत आहे आणि सरावाने आपण तो बदलवूही शकतो. अर्थात चांगले विचार, चांगल्या सवयी जशा आपल्या फायद्याच्या ठरू शकतात तसेच वाईट विचार, वाईट सवयी, व्यसनं, नकारात्मकतादेखील आपल्या मेंदूवर आणि आयुष्यावर परिणाम करते. यानिमित्ताने आपण स्वत:लाच प्रश्न विचारून बघू, की रोज आपण आपला मेंदू घडवत आहोत की बिघडवत आहोत? शेवटी आपण ज्याचा सराव करणार तेच आपण अधिक कार्यक्षमतेने करणार.. चांगलंही आणि वाईटही!
parag2211@gmail.com