पराग कुलकर्णी
‘संज्ञा आणि संकल्पना’ या सदरात आपण गेले वर्षभर वेगवेगळ्या विषयांतील संकल्पना बघितल्या. आपल्या शिक्षणामुळे, नोकरी-व्यवसायामुळे किंवा आवडीमुळे काही विषय हे आपल्याला नेहमीच जवळचे वाटत असतात. या अशा ‘आपल्या’ वाटणाऱ्या विषयासंबंधीची माहिती आपण तत्परतेने करून घेत असतो. त्या विषयात नवीन काय घडते आहे, याचीही आपल्याला उत्सुकता असते. पण हा असा उत्साह आणि अशी जिज्ञासा आपल्याला इतर- ‘आपल्या’ नसलेल्या विषयांबद्दल वाटते का? वाटली पाहिजे का? म्हणजे तुम्ही इंजिनीअर आहात तर जीवशास्त्र, जेनेटिक्स, पाना-फुलांची रचना आणि त्यांची अंतर्गत प्रक्रिया, या तुमच्या कामात अजिबात उपयोग नसणाऱ्या गोष्टींत तुम्हाला रस वाटावा का? तुम्ही डॉक्टर असाल तर तुमचा वेळ विमान कसं उडवतात, हे समजून घेण्यात व्यर्थ घालवावा का? एखाद्या कलाकाराला गणित, विज्ञान, तंत्रज्ञान याची माहिती करून घेण्याची काय गरज आहे? या सदराचं स्वरूप बघता या प्रश्नांची अपेक्षित उत्तरं काय असतील याची तुम्हाला कल्पना आलीच असेल. पण याची खरंच का आवश्यकता असते आणि वर्षभर चालेल्या या सदरामागचा विचार काय आहे हे आपण आज बघू या.
आपण जेव्हा एखादा विषय शिकतो तेव्हा त्या विषयातील तत्त्वे, त्यातील गृहीतके (Assumptions) आणि त्या विषयाची स्वत:ची असलेली एखादी विशिष्ट विचारपद्धतीही शिकतो. या सगळ्यातून आपला त्या विषयाकडे आणि एकंदरीतच जगाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन निर्माण होतो. एखादा चित्रकार हा आपल्या आजूबाजूचे जग हे रंग, रेषा, आकार या स्वरूपात पाहत असेल, एखाद्या गणितात रस असलेल्या माणसाला आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींत संख्या, सूत्रे आणि गणिताचीच तत्त्वे दिसतील, तर एखादी इतिहास आवडणारी व्यक्ती आजच्या साऱ्या घडामोडींचा संबंध इतिहासाशी जोडत असेल. आपल्या विषयात गढून गेलेली, तज्ज्ञ असलेली किंवा तज्ज्ञ नसली तरी आपल्या विषयाचा दृष्टिकोन सदैव बाळगणारी अनेक माणसे आपण आजूबाजूला पाहत असतोच. खरं सांगायचं तर, आपल्याला असलेली माहिती, ज्ञान, आपले कौशल्य आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे सर्व मिळूनच आपली ओळख ठरवत असतात. आणि याच गोष्टी आपल्याला इतरांपासून वेगळं ‘युनिक’ बनवतात. जेव्हा आपण अनेक विषयातील थोडी का होईना, पण माहिती जमा करतो तेव्हा जगाकडे, स्वत:कडे, एखाद्या समस्येकडे पाहण्याचे तेवढेच नवनवे दृष्टिकोन आपल्याला मिळतात. बऱ्याचदा नावीन्य (Innovation), सर्जनशीलता (Creativity) असं ज्याला आपण म्हणतो, ती म्हणजे एका क्षेत्रातील, विषयातील तत्त्वे आणि पद्धती दुसऱ्या विषयात वापरणे हेच असते. उदाहरणार्थ, आपण ‘बायोमिमिक्री’ ही संकल्पना बघितली आहेच. करोडो वर्षे चालत आलेल्या निसर्गाच्या R&D संशोधनाचा वापर आपण आपल्या समस्या सोडवण्यासाठी कसा करू शकतो, हेच बायोमिमिक्री आपल्याला दाखवते. यामुळे निसर्गातून, जीवशास्त्रातून एखाद्या इंजिनीअरला त्याच्या समस्येचे उत्तर सापडणे शक्य होत आहे- ज्याची उदाहरणे आपण बघितली आहेतच. (किंगफिशर आणि बुलेट ट्रेन, निवडुंग आणि वाळवंटात नैसर्गिकरीत्या तापमान नियंत्रित करणारी इमारत, इत्यादी).
गणित, विज्ञान, कला, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, भूगोल, भाषा, तंत्रज्ञान आणि अशा अनेक ज्ञान शाखा आणि त्यातले विषय हे आपण आपल्या सोयीसाठी वेगवेगळे असे शिकतो. आपली आवड, शिक्षण किंवा नोकरी-व्यवसायानुसार यातील काही विषय निवडले जातात आणि इतर ‘ऑप्शन’ला टाकले जातात, किंवा पूर्णपणे दुर्लक्षिले जातात. पण जग समजावून घेताना, त्यातल्या समस्या समजावून घेताना आणि सोडवताना नेहमीच एकापेक्षा जास्त विषयांचे भान आणि ज्ञान आवश्यक ठरते. डॅनियल काहनमन यांचे नाव आपल्या सदरात Behavioral Economics संदर्भात बऱ्याचदा आले आहे. आपली विचार करण्याची सिस्टिम १ आणि २, कॉग्निटिव्ह बायसेस, प्रॉस्पेक्ट थेयरी या संकल्पनांमागे डॅनियल काहनमन यांचेच योगदान आहे. त्यासाठी त्यांना २००२ सालचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळाला. पण मग डॅनियल काहनमन हे अर्थशास्त्रज्ञ आहेत का? तर नाही! डॅनियल काहनमन हे मानसशास्त्रज्ञ आहेत. मानसशास्त्रातील विचार, तत्त्वे आणि संशोधनाच्या पद्धती वापरून त्यांनी अर्थशास्त्रात मूलभूत ठरतील असे नवे विचार मांडले. मानसशास्त्र, न्यूरोसायन्स आणि अर्थशास्त्र अशा तीन विषयांचा मिळून Behavioral Economics असा नवीन जास्त व्यावहारिक असा विषय निर्माण झाला. यातल्याच ‘नज थेयरी’चा उपयोग अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कसा होतो आहे, हे देखील आपण एका लेखात पाहिलेच आहे. येणाऱ्या काळात सर्वच क्षेत्रात प्रचंड उलथापालथ घडवणारे तंत्रज्ञान म्हणून आपण कृत्रिम बुद्धिमत्तेकडे (Artificial Intelligence) पाहतो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा डोलारा हा संगणक शास्त्र आणि सांख्यिकी (Statistics) या विषयांच्या पायावर उभारलेला आहे आणि काही प्रमाणात न्यूरोसायन्समधील संकल्पनांचा (न्यूरॉन्सची रचना) वापरही त्यात होतो. मूळ भारतीय वंशाचे, पण अमेरिकन असलेले डॉ.अतुल गावंडे यांची वैद्यकीय व्यवसायावर आणि त्यातील समस्यांवर चिंतन करणारी पुस्तके सर्वानीच वाचावी अशी आहेत. वैद्यकीय व्यवसायात आणि इतर कुठल्याही व्यवसायात अनवधानाने होणाऱ्या चुका टाळण्यासाठी काय करता येईल याचं उत्तर त्यांना सापडलं विमान उद्योगात! पायलट वापरतात तशी ‘चेकलिस्ट’ जर वैद्यकीय व्यवसायातील लोक वापरायला लागले, तर नकळत होणाऱ्या अनेक मोठय़ा चुका टाळता येतील असे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. वरील सर्व उदाहरणे एका विषयातील माहितीचा दुसऱ्या विषयात कसा उपयोग होतो हे दाखवणारी आहेत. ज्यांच्याजवळ अशा अनेक विषयाची माहिती, ज्ञान आणि त्यातील कौशल्य असते अशा हरहुन्नरी लोकांना ‘पॉलीमॅथ’ असे म्हणतात. अॅरिस्टॉटल, लिओनार्दो दा विंची, बेंजामिन फ्रँकलिन, मेरी क्युरी, न्यूटनपासून ते स्टिव्ह जॉब्सपर्यंत अनेक क्षेत्रातले अनेक कर्तृत्ववान माणसे पॉलीमॅथ असल्याचे समजले जाते.
आपण लहान असताना आपल्याला आजूबाजूच्या जगाबद्दल अपार कुतूहल असते. सगळ्याच गोष्टी शिकण्याची आणि करून बघण्याची तीव्र इच्छा असते. पण पुढे आपणच स्वत:ला ‘शिस्त’ लावतो. ठरवलेले काही रस्ते पकडून केवळ त्यावरच पुढे चालायचे ठरवतो. ‘Jack of all trades’ ची मजा आपण ‘Master of none’अशी भीती दाखवून घालवतो. आंधळे आणि हत्तीच्या गोष्टींमधल्या माणसांसारखे आपणही आपल्या हाती असलेल्या एकाच ठरावीक माहितीच्या आधारे हत्ती काय असतो, हे समजण्याचा प्रयत्न करत राहतो. गरज आहे ती आपली नेहमीची जागा सोडून, जरा आजूबाजूला फिरून हत्ती नवीन दृष्टिकोनातून अनुभवायची. त्यातूनच कदाचित ‘त्याचे’ खरे स्वरूप लवकर समजू शकेल. नाही का?
parag2211@gmail.com