डॉ. चिन्मयी देवधर drchinmayideodhar@gmail.com

नुकत्याच जाहीर झालेल्या साहित्य अकादमीच्या अनुवादित पुस्तकांच्या पुरस्कार यादीत महाराष्ट्राची मान अभिमानाने उंच व्हावी असे एक नाव म्हणजे डॉ. मंजूषा कुलकर्णी. ‘प्रकाशवाटा’ या डॉ. प्रकाश आमटे यांच्या आत्मचरित्राचा संस्कृत अनुवाद डॉ. कुलकर्णी यांनी ‘प्रकाशमार्गा:’ या नावाने केला आहे. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा संस्कृत साहित्यासाठीचा पुरस्कार मिळाला आहे.

संस्कृत आणि साहित्य हे दोन्ही विषय परळी वैजनाथच्या कुलकर्णी कुटुंबासाठी जिव्हाळ्याचेच होते. मंजूषाताईंचे पणजोबा दत्तात्रय कुलकर्णी हेदेखील साहित्यिक होते. डॉ. मंजूषा कुलकर्णी  यांच्या आई-वडिलांनी लहानपणापासूनच संस्कृत शिकण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले. हुशार मुलांनी डॉक्टर, नाहीतर इंजिनीअर व्हावे असा चारचौघांसारखा विचार न करता भाषा, शिक्षण व साहित्य अशी वेगळी क्षितिजं मंजूषाताईंनी निवडली ती आई- वडिलांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावरच.

१९९७ साली त्यांनी स. प. महाविद्यालयातून कला शाखेची पदवी मिळवली आणि त्याचवेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातूनही संस्कृत विषयात पदवी प्राप्त केली. कौतुकाची गोष्ट अशी की, या दोन्ही परीक्षांमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला. पुढे एम. ए. (संस्कृत), बी. एड्., एम. एड्. तसेच सेट् ( शिक्षणशास्त्र) व नेट् (संस्कृत) या परीक्षांमध्येसुद्धा त्यांनी ही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली. संस्कृतवरच्या प्रेमामुळे त्यांनी संस्कृतभारतीतर्फे घेतले जाणारे विविध अभ्यासवर्गही पूर्ण केले. स्मृतिग्रंथांवर  मौलिक संशोधन करून त्यांनी अमरावती विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. औरंगाबाद, नांदेड आणि अमरावती या विद्यापीठांमध्ये संशोधन मार्गदर्शिका म्हणून आज २५ वर्षांहून अधिक काळ त्या कार्यरत आहेत. वेगवेगळ्या विद्यापीठांत अध्यापन करतानाच एमपीएससीची परीक्षा संस्कृत विषय घेऊन त्या उत्तीर्ण झाल्या. त्याही प्रथम क्रमांकाने! आपल्या प्रशासकीय कौशल्याने त्यांनी याही क्षेत्रात अनेक मानाचे शिरपेच आपल्या मुकुटात खोवले आहेत. राज्याच्या पहिल्या पूर्णवेळ महिला भाषा संचालक म्हणून अवघ्या ३८ वर्षी आपल्या कामाचा ठसा त्यांनी तेथे उमटवला.

कर्तृत्वाला एकाच एका क्षेत्राची मर्यादा घालणं मंजूषाताईंना मान्य नाही. शासकीय सेवेत आपल्या चोख कार्याने वाखाणल्या जात असतानाच संशोधनाला त्यांनी विराम दिलेला नाही. विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांत भाग घेऊन आपले शोधनिबंध त्या सादर करीत असतात. अनेकदा उत्कृष्ट शोधनिबंधासाठी असलेली पारितोषिकेही त्यांनी मिळवली आहेत. भाषेसाठी संशोधन, अनुवाद, परिभाषा कोश, त्याचप्रमाणे भाषाविषयक शासकीय धोरण तयार करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. भाषांवर असलेल्या अकृत्रिम प्रेमामुळे तसेच असीम प्रभुत्वामुळे संस्कृत, हिंदी तसेच मराठी भाषेच्या प्रसार व प्रचारासाठी  शक्य ते सर्व उपक्रम त्यांनी राबविले. त्यासाठी वर्ग, व्याख्याने, प्रवचने, निवेदन, सूत्रसंचालन, एकपात्री प्रयोग, लेखन अशा सर्व प्रांतांतून त्या लीलया मुशाफिरी करतात.

इतकी व्यवधाने सांभाळूनही आपल्यातील सृजनशील लेखक मंजूषाताईंनी निगुतीने जपला आहे. मराठी, हिंदी आणि संस्कृत या तिन्ही भाषांवर त्यांचे सारखेच प्रभुत्व आहे. काव्य, ललित लेखन, वैचारिक, संशोधनात्मक लेखन, चरित्रात्मक लेखन आणि अनुवादात्मक लेखन असे विविध प्रकार त्यांनी सारख्याच ताकदीने हाताळले आहेत. शीघ्रकवित्व हा तर त्यांचा विशेष. सर्वात कमी कालखंडात सर्वाधिक मराठी काव्यरचना करण्याचा विक्रम त्यांच्या

नावे आहे.  त्यांची आजवर २५ पुस्तके प्रकाशित झाली असून, २३ पुस्तकांवर त्यांचे काम चालू आहे. सध्या कौटिलीय अर्थशास्त्रावर त्यांचे काम सुरू असून, हा अद्भुत ग्रंथ हिंदी भाषेत आणण्याचा त्यांचा मानस आहे.

लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. डॉ. कुलकर्णी यांनी ‘अणुविज्ञानातील झंझावात’ हे डॉ. अनिल काकोडकरांच्या जीवनपटावरील नितांतसुंदर पुस्तक लिहिले आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचे हेमलकसा येथील काम डोळे दिपवणारे आहे. त्यामागची त्यांची भूमिका, त्यांच्यावर झालेले सेवाभावी वृत्तीचे संस्कार, हे काम उभारताना आलेल्या अडचणी, मिळालेली मदत हा सर्वच भाग समजून घेण्यासारखा आणि तसेच काही वेळा अंगावर काटा आणणाराही आहे. त्यांचा हा प्रवास ‘प्रकाशवाटा’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी प्रामाणिकपणे शब्दबद्ध केला आहे. वास्तविक अनुवाद हे माध्यम हाताळणे अतिशय अवघड आहे. भाषेचा लहेजा सांभाळून मूळ लेखकाचा आशय अचूकपणे वाचकांपर्यंत पोहोचवणं ही एक प्रकारे तारेवरची कसरतच असते. पण आव्हानच जिद्दीला नवे बळ देते. त्यामुळे डॉ. मंजूषा यांनी हे शिवधनुष्य उचलण्याचे ठरवले. याआधी ‘श्यामची आई’ तसेच ‘विवेकज्योती’ या अनुवादांचा भक्कम अनुभव त्यांच्या पाठीशी होताच. या पुस्तकाच्या अनुवादाच्या संकल्पाने त्या भारावून गेल्या होत्या. डॉ. आमटे यांचे आयुष्य प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी मंजूषाताई हेमलकसा येथे जाऊन राहिल्या. स्वत: अनुभव घेऊनच त्यांनी हे अनुवादाचे काम पूर्ण केले. त्यामुळे या अनुवादाला सच्चेपणाची झळाळी आहे. संस्कृतानुवादाची आपली भूमिका मांडताना डॉ. कुलकर्णी  म्हणतात, ‘संस्कृत भाषा म्हणजे भारत देशाचा जणू स्वयंप्रकाश. कला, संस्कृती, विज्ञान यांचा आरसाच! अशा संस्कृत भाषेत डॉ. आमटे यांची विलक्षण नि:स्वार्थी, निर्मोही, प्रसिद्धीपराङ्मुख जीवनकथा

यावी या प्रांजळ इच्छेने झपाटून त्यांनी हे अनुवादाचे काम २०१७ साली पूर्ण केले. ‘प्रकाशमार्गा:’ या पुस्तकाच्या बाबतीत विषयवस्तु, भाषा, सिद्धहस्त लेखिका असा अमृतयोगच जुळून आलेला आहे. या पुस्तकाचा विषय पाहता ते संस्कृतमध्ये अनुवाद करणे मुळीच सोपे नव्हते. ‘प्रकाशवाटा’ हे आत्मवृत्त अतिशय उत्कटतेने त्यांनी देववाणीत आणले आहे. भाषेचे प्रवाहीपण, विषयाचे गांभीर्य, त्याची खोली, आशयघनता मूळ पुस्तकानुरूप या अनुवादतही उतरली आहे. संस्कृत गद्य साहित्यात काही वेळा आढळणाऱ्या रूक्षपणाचा मागमूसही या अनुवादात नाही. मानवसेवेचे व्रत घेतलेल्या एका कर्मयोग्याचे चरित्र भाषासेवेचे व्रत घेतलेल्या

योगिनीकडून अनुवादित व्हावे हा मणिकांचनयोग होय.

संस्कृत ही प्राचीन, अभिजात भाषा आहे. प्राचीन साहित्य, शास्त्र आणि विज्ञानाचा वारसा सांगणारी आहे. शिकवण्याची पद्धत योग्य असेल तर संस्कृत अतिशय सोपी असल्याचे त्यांचे अनुभवसिद्ध मत आहे.  म्हणूनच संस्कृतमध्ये अधिकाधिक साहित्यनिर्मिती करण्याची त्यांची इच्छा आहे.

मंजूषाताईंच्या विविधांगी कर्तृत्वाची दखल अनेक पुरस्कारांद्वारे घेतली गेली आहे. विद्यारत्न पुरस्कार (२०१०), महिला गौरव पुरस्कार (२०११), द्वारका प्रतिष्ठानचा उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार (२०१७), ई टीव्हीचा ‘सुपर वुमन’ पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झाल्या आहेत. साहित्य अकादमी पुरस्काराने त्यात आणखीन एक अतिशय मानाची भर पडली आहे.