पवन नालट

नवनिर्मितीची चाकं भराभर पुढे सरकत असतात आणि कवी कुठे तरी खूप लांब थांबलेला असतो. त्याच्या असतेपणाला सृजनाचे कोवळे अंकुर फुटत राहतात. हे कोवळे अंकुर जपणारा माणूस कवीच तर असतो. एखाद्याची कविता कागदावर उतरते आणि एखाद्याची कविता काळजात घर करून राहते स्वत:च्या आणि इतरांच्याही! मी अशा नावेने प्रवास करतोय जी नाव अस्तित्वाची आहे. मी या नावेचा नावाडी आहे. नाव पुढे जाते तशी माझ्या चिंतनाची दिशा विस्तारत जातेय. ‘मी कोण?’ असा प्रश्न जेव्हा मी ‘लिलाव’ कवितेत विचारतो, तेव्हा तो माझ्यासह प्रत्येकाचाच प्रश्न असतो. म्हणूनच ‘लिलाव’ कवितेत,

Diwali and Books, Book list, Diwali, Books,
पाहू, निवडू आणि वाचू आनंदे…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
article nobel prize winner south korean author han kang
विश्व साहित्याला गवसलेला नवा सूर
article about psychological effects of bossy behavior on colleagues
इतिश्री : भावनांची सर्वव्यापी जाणीव
ICICI Lombard Travel Insurance Plan detail in marathi
आयसीआयसीआय लोम्बार्डकडून नवीन प्रवास विमा योजना
प्रवेशाची पायरी : ‘आयआयटी’मध्ये ‘डिझाइन’ पदवी सीईटी
Saras Mahotsavs are canceled during the Diwali period as it is the time of code of conduct for assembly elections thane news
बचत गटांच्या सरस महोत्सवांना आचार संहितेची झळ..! दिवाळी निमित्त होणाऱ्या आर्थिक उलाढालीत यंदा खंड
Success Story of Nirmal Kumar Minda who started business from small shop now owner of crore business gurugram richest man
एका लहानशा गॅरेजपासून केली सुरूवात अन् आता झाले कोटींचे मालक, जाणून घ्या गुरुग्रामच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास

‘तरी मी

लढत असतो

जगत असतो

झुंजत असतो

इथल्या अर्थकारणाशी

समाजकारणाशी

संस्कृतीशी

कारण

मी अजून आत्म्याचा

लिलाव केला नाही.’ असे मी ठामपणे नमूद करतो.

सामाजिक, राजकीय व्यवस्थेच्या पाटांमध्ये भरडता-भरडता ज्यांच्या जगण्याचा उद्देशच हरवून जातो, स्वप्ने दडपली जातात अशा असंख्य माणसांचा उद्गारच तर आहे ‘मी संदर्भ पोखरतोय’.

‘मी संदर्भ पोखरतोय’ हा माझा पहिलाच कवितासंग्रह ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कारा’ने सन्मानित होणं हा माझ्यासह माझ्या समकालीन लिहित्या पिढीला ऊर्जा देणारा सन्मान आहे. जागत्या डोळय़ांनी बघितलेलं स्वप्न खरं होताना बघणं माझ्यासाठी, माझ्या कवितेवर प्रेम करणाऱ्या सर्व वाचक, लेखकांसाठी अतीव आनंदाचा क्षण आहे. ‘मी संदर्भ पोखरतोय’ कवितासंग्रहातील कविता म्हणजे संवेदनशीलतेनं ओतप्रोत भरलेल्या सामान्य माणसाच्या मनाचा उद्गारच आहेत. म्हणून शीर्षकातला ‘मी’ हा फक्त माझ्याविषयी नसून तो सामान्य माणसाचा प्रातिनिधिक स्वरूपाचा आवाजच आहे. तो संपूर्ण संग्रहामध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक पर्यावरणाचा बिघडलेला समतोल आणि मानवी मनाच्या अस्वस्थतेचा वेध घेत राहतो; नव्हे, सामान्य माणसाचा आवाज प्रखरपणे अभिव्यक्त करत राहतो. त्यातच त्याचं अस्तित्व आहे, त्याचा संघर्ष सामावलेला आहे. समाजातल्या अनिष्टाला पोखरण्याचं धारिष्टय़ हे सामान्य माणूसच करू शकतो, बरेचदा सामान्य माणूस शोषिकाचीच भूमिका आयुष्यभर बजावतो. पावलोपावली तडजोड करत राहणं आणि व्यवस्थेची गुलामी सहन करत राहणं याला तो अगदी सहज स्वीकारतो. कारण त्याच्याकडे बरेचदा पर्याय नसतो, पण या सर्वातसुद्धा सामान्य माणसाच्या डोळय़ात दाटून आलेलं काहूर मला पदोपदी जाणवत गेलं. त्यातली अगतिकताही मन गोठवणारी असली तरी माझा विश्वास आहे की, सामान्य माणूसच आपल्या हक्कासाठी लढू शकतो, संघर्ष करू शकतो आणि मानवतेची, प्रेमाची भाषा सहजपणे कुणाच्याही अंत:करणात रुजवू शकतो. जसं, मातीत लावलेलं बीज माती आपल्या उदरात घेतं आणि हिरव्या चैतन्याचं सृजन करते, म्हणूनच ‘मी संदर्भ पोखरतोय’ कवितासंग्रहात हिरवी रंगविशेषणे अनेकदा येतात.

उदा, ‘मी सापडेन तुम्हाला / हिरव्या वाळूवरती / अस्तित्वाची रोपे लावताना’ किंवा ‘आपणच हिरवा करावा/ आपल्या पांढऱ्या क्षणांचा कोरा कॅनव्हास किंवा हिरव्या क्षणांचा कोवळा दिवा करून / सोडून द्यावे हृदयाचे काही आलाप मनाच्या निळसर डोहात / प्रकाशाच्या पुनर्पर्वासाठी’ किंवा ‘हिरवी शेतं पिवळी बाभळी आणि पुढय़ात वाहणारी ही पूर्णामाय / भरभरून प्रेम   करते माझ्यावर’ किंवा ‘कदाचित अजूनही फुले फुलतील / या आशेने धुंद झालेला मोगरा / पाने हिरवी करून बसला आहे /  कुणाच्या तरी प्रतीक्षेत’ किंवा ‘मला विसरायचं नाही तांबडं फुटेस्तोवर / मुळांनी आजन्म जपलेले हिरव्या श्वासांचं देणं’.. ही विशेषणं सामान्य माणसाचा संघर्ष करण्याचा आणि आशावादी जगण्याचा आत्मविश्वासच व्यक्त करतात.

मला आठवतंय विदर्भातल्या तापत्या उन्हात गावात हुंदडणारं ते लहान पोरगं, जे श्वास लागेपर्यंत धावत राहायचं आणि अधाशासारखं सारवलेल्या अंगणातल्या रांजणातलं पाणी गटागटा प्यायचं. वडील अंबाला, मेरठ, पंजाब अशा शहरांमध्ये भारतीय सेनेमध्ये असताना बालपणातली माझी अवघी दोन-तीन वर्ष मेरठसारख्या शहरामध्ये गेली, पण त्या वातावरणाचा ठसा अजूनही माझ्या मनावर आहे. जिथे निमुळत्या गल्ल्यांमध्ये असणाऱ्या घरांना किल्ल्याच्या मुख्य दरवाजांसारखी मोठी दारं असायची, समोर खाटेवर हुक्का ओढत बसलेली, डोक्याला पागोटे बांधलेली माणसं आणि आवारामध्ये विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोिवदानं नांदायची. म्हणून आजची समाजमाध्यमं इतकी तीव्र झालेली असतानासुद्धा नव्वदीच्या आसपासचा, त्यानंतरचा काळ मला अधिक आपलासा वाटतो, त्यातला साधेपणा भावतो. शालेय शिक्षण घेत असताना अमरावतीला अनेक व्याख्याने ऐकायला जाणं, रात्रभर देशातील नामांकित हिंदी कवींची संमेलनं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडांगणावर पहाट होईपर्यंत ऐकणं.. यातून माझी सांस्कृतिक जडण-घडण होत चालली होती. समाजवास्तव प्रखरपणे अधोरेखित करणारा हिंदीतील धुमिल हा माझा आवडता कवी आहे. शिवाय विष्णू खरे, मराठीतही अरुण काळे, सुरेश भट यांचे लिखाण मला कायमच आवडत राहिलं. ही काही प्रातिनिधिक नावं सांगितलीत. विविध संमेलनं, कार्यक्रमांना सतत जात राहिल्यामुळे विदर्भ आणि महाराष्ट्रातल्या सगळय़ा सांस्कृतिक परिघाचा माझ्यावर मोठा प्रभाव आहेच म्हणूनच पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना कवितेनं माझा हात धरला, कवितेचे नाना प्रकार हाताळत असताना शब्द, शब्दाची लय, त्यातला भाव, अर्थाची व्यापकता या सगळय़ांचं नकळतच आकलन होत गेलं. हे खरे आहे की जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीचा स्वत: आनंद घेऊ शकत नाही, अर्थाच्या सागरामध्ये स्वत:ला बुडवून घेऊ शकत नाही तोपर्यंत तुम्ही वाचकांच्या हृदयापर्यंत काहीही पोहोचवू शकत नाही म्हणून, माझ्यातून बहरलेला कवितेचा पारिजात हा अत्यंत नैसर्गिकपणे फुललेला आहे. ‘मी संदर्भ पोखरतोय’ हा कवितासंग्रह त्याचंच प्रतीक आहे. कविता लिहिताना आपली स्वतंत्र शैली असावी या मताचा मी आहे. आपल्या कवितेमधून आपली अभिव्यक्ती आणि आपल्याच कवितेचा चेहरामोहरा दिसायला पाहिजे, वाचकांना जाणवायला पाहिजे आणि तो मी माझ्या कवितेतून आतापर्यंत निश्चितच जपलेला आहे.

 बरीच वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात झालेला मूल्यऱ्हास, बोकाळलेला भ्रष्टाचार, अनुभवानं समजलेली तत्त्वहीनता ‘शाळा : काही नोंदी’ या आणि इतर काही कवितांमधून व्यक्त झाली आहे. ‘बाईचं जगणं : दहा कविता’ या दीर्घ कवितांच्या खंडात बहुतांश स्त्रियांना एका अनुल्लेखित शोषणाला नेहमी सामोरं जावं लागतं त्या वास्तवाची प्रकर्षांनं धग व्यक्त झाली आहे. ‘हम-नफ़स : काही नोंदी’ हा दीर्घ कवितांचा पट एकूणच मराठी कवितेत महत्त्वाचा ठरावा असा असून, परधर्मातील संस्कृतीविषयी भाष्य करणाऱ्या आणि मानवी मनाचा या संबंधानं वेध घेणारा आहे. अनेक वर्ष विविध धार्मिक समूहांत वावरल्याने अनुभवातून आलेला आत्मस्वर या कवितांमधून व्यक्त झाला आहे. याच कवितेतील एक उद्गार खाली उद्धृत करतोय..

‘मला माहीत होतं

थडग्यांवर जीव लावणारी माणसं

सर्वच धर्मात असतात

माणसांवर जीव लावणारी माणसं

सापडत नाहीत कुठेही! ’

 ‘मी संदर्भ पोखरतोय’ कवितासंग्रहातील कविता म्हणजे अनुभवात भिजून आत्मशोधाच्या प्रवासाकडे निघालेल्या मानवी वृत्तीचा शोध आहे. विचारवंताच्या झालेल्या हत्या, सामाजिक राजकीय स्थितीनं हतबल झालेला माणूस, माणसाच्या अस्तित्वाची क्षणभंगुरता आणि परधर्मातील सहिष्णुता या सर्वाचा वेध ‘मी संदर्भ पोखरतोय’ कवितासंग्रहाच्या माध्यमातून काव्यमूल्य जपत मी घेतलेला आहे. ‘लालफीतशाही’,‘कडेलोट’,‘जाळ’ या कविता या दृष्टीनं महत्त्वाच्या ठरतात. आजच्या काळात जिथे केवळ रचना प्रकारांचा मोह होऊन कवितांमधील काव्यमूल्य हरवल्या जात आहे तिथे वाचकांनी आणि कवींनीसुद्धा कविता या वाङ्मय प्रकाराकडे अधिक गंभीरपणे बघण्याची गरज आहे.

कविता लिहणं म्हणजे आपल्या आतलं काहीतरी भाषेला देणं असं मला कायम वाटत आलेलं आहे. आणि ही प्रक्रिया कधीच साधी नसते. अनेक छोटय़ा-छोटय़ा कवी संमेलनांपासून ते महाराष्ट्रातल्या विविध संमेलनांपर्यंत कविता सादर करताना समाजातील दु:खाचा प्रवाह अधिक जवळून समजता आला. विशेषत: शहरी मानसिकता आणि ग्रामीण विषण्णता यातील दरी ही भयावह आहे याची पदोपदी जाणीव झाली, अनुभवायला आलं.. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढत असताना समाजाच्या तळागाळातल्या दु:खी माणसांना बघून व स्वत: व्यवस्थेची फरपट सहन करताना मनाला झालेल्या जखमा किती तरी दिवस स्वत:लाच जाळत राहायच्या. या साऱ्यांचं रूपांतर झालं ते शब्दांमध्ये, जे शब्द कवितेच्या रूपानं भावनांचा ओलावा घेऊन कागदावर उतरलं आणि सामान्य माणसाच्या दु:खाचा संयमित आवाज झालं. कवी असणं म्हणजे काय? आपण सार्वकाल कवी असतो का? काव्यमूल्य चिरंतन जपण्याची साधना या सर्वाचा विचार मला महत्त्वाचा वाटतो.

साहित्य अकादमीच्या पुरस्कारानं अधिक चांगलं लिहिण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यापेक्षा मी असं म्हणेन, कविता तिचा मार्ग आपसूकच शोधत असते आणि सृजनाच्या नव्या वाटेकडे तिचा प्रवास निरंतर सुरू असतो.

pawannalat@gmail.com