वेगवेगळ्या प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणारी संमेलने ही साहित्य, साहित्यिक आणि साहित्यव्यवहार यासाठी पूरक आणि पोषकच ठरतात. अपेक्षा अशी आहे की, येथे खरोखरच वैचारिक घुसळण व्हावी. तावातावाने मुद्दे मांडले जावेत. वितंडवाद का होईना, पण वाद होऊ देत. हमरीतुमरीवर आलात तरी चालेल. असे सांगण्याचे कारण हे की, बऱ्याचदा अशा संमेलनामध्ये ‘हो ला हो’ असा प्रकार असतो. बोटचेपेपणाची भूमिका सत्यशोधनाच्या मार्गातला अडथळा बनते. दुसऱ्या कोणी आपले दोष दाखवले तर किंवा टीका केली तर आपल्याला राग येतो. म्हणून बदल आतून व्हायला पाहिजेत.
समाजातील काहीजणांना समाजाची काळजी वाटत असते तर काहीजणांना फार, तर काहीजणांना खूपच काळजी वाटत असते. (गोविंदाग्रजांनी काही काळजीग्रस्त शंकासुरांना ‘चिंतातुर जंतू’ असे म्हटले आहे) जे लोक समाज आणि साहित्य यामधील परस्परसंबंधांचा विचार करतात, त्यांना अलीकडे एका नवीन चिंतेने ग्रासले आहे. त्या चिंतेचे कारण म्हणजे जातीच्या, धर्माच्या, विशिष्ट समूहाच्या, व्यक्तिविशेषांच्या नावाने आयोजित होणारी साहित्यसंमेलने!
खरे तर आपल्या समाजातील जात हे प्रखर आणि अपरिहार्य ठरत चाललेले वास्तव समजून घेतले तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट आणि स्वच्छ होतात आणि अनेक शंकांचे निरसन होते. जातीपातींची वेगळी संमेलने भरवली तर समाजात फूट पडेल अशी एक शंका. धर्माच्या, पंथाच्या नावावर संमेलने भरवली तर फुटीरतावाद वाढीस लागेल अशी आणखी एक शंका. निदान साहित्यात तरी जातीवाद नको अशी एक सोज्वळपणाचा आव आणणारी भोळसर सूचनाही केली जाते. आणि पुन्हा आपणच साहित्य हा समाजाचा आरसा असतो अशी अर्धवट
व्याख्या करणार!
काही वर्षांपूर्वी मराठीतील आत्मचरित्र या उप-साहित्य क्षेत्रातील संख्याशास्त्रज्ञ लक्ष्मण माने यांनी मराठी साहित्य हे साडेतीन टक्क्यांचे साहित्य आहे, असे घोषित केले होते. हा अपूर्णाक वाटणारा आकडा त्यांनी कोणते गणित मांडून शोधून काढला, हे कळायला मार्ग नाही. पण त्यांच्या म्हणण्यात तथ्य होते, दोन-चार टक्के इकडे-तिकडे! पण लेखक, समीक्षक, प्रकाशक, पुरस्कारांचे वाटप, प्रकाशन व्यवहार, मराठीचा भाषिक पातळीवरचा शैक्षणिक आणि विद्यापीठीय व्यवहार- हा या साडेतीन टक्के लोकांच्या हाती एकवटलेला आहे आणि हे सर्वजण उच्चवर्गीय आणि उच्चवर्णीय आहेत. (खरे तर ब्राह्मणी संस्कृतीतलेच) असे त्यांना म्हणायचे असावे. हे रहस्य त्यांनी उघड केले, पण परिणाम विपरीतच झाला. उरलेल्या साडेशहाण्णव टक्क्यांपैकी काही जणांनी साहित्य व्यवहाराच्या क्षेत्रातील नेट, सेट, एम्फिल, पीएचडी या पदव्या प्राप्त करून आपला समावेश साडेतीन टक्क्यांमध्ये करून घेतला.
साहित्य संमेलनाचा व्यवहारही असाच काही व्यक्तींच्या आणि संस्थांच्या हाती असतो. सुदैवाने आज या व्यवहारात खूपच पारदर्शीपणा आला आहे. संमेलनाच्या निमित्ताने आर्थिक उलाढालही मोठय़ा प्रमाणावर होते आणि सांस्कृतिक वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधीही यानिमित्ताने मिळते. तेव्हा ‘साहित्य संस्थांमधील राजकारण’ या विषयावरून गळा काढण्यात अर्थ नाही. शिक्षण, धर्म, निवडणुका इत्यादी सर्वच क्षेत्रांमध्ये हा प्रकार असेल तर तो साहित्याच्या क्षेत्रात येणारच. मुद्दा असा की, वर्षांतून एकदा भरणाऱ्या साहित्य संमेलनात किती जणांना सामावून घेणार? त्यात गेल्या ३०-३५ वर्षांत चित्र इतके बदलून गेले आहे, इतके नवीन लेखक समाजाच्या विविध थरातून आले आहेत, इतकी नवीन पुस्तके विषयाच्या संदर्भात नवे जीवनदर्शन घडवीत आहेत की आता साडेतीन टक्केवाले, आपोआपच साडेशहाण्णव टक्केवाल्यांच्या तुलनेत, केवळ संख्येच्याच नव्हे तर गुणवत्तेच्या दृष्टीनेही अल्पसंख्य ठरू लागले आहेत!
एक सहज लक्षात येणारा चांगला बदल म्हणजे नामवंत प्रकाशकांच्याच पुस्तकांची दखल घेण्याची पद्धतही मोडीत निघाली आहे. अजीम नवाज राहीच्या ‘व्यवहाराचा काळा घोडा’ या पुस्तकाचे प्रकाशक कोण आहेत हे चटकन् सांगता येत नाही. आणि प्रशांत असतारेच्या ‘मीच माझा मोर’ या अनेक पुरस्कार मिळालेल्या कवितासंग्रहाचे प्रकाशक कोण हे अचूक सांगणाऱ्यालाच बक्षीस मिळू शकते! पण गुणवत्तेच्या बळावर उभे असणाऱ्या या कवींची दखल मराठी साहित्य-विश्वाने घेतली! प्रकाशन संस्थादेखील (तथाकथित प्रसिद्ध लेखकांचा पदर सोडून ‘बिराड’ लिहिणाऱ्या अशोक पवारची आणि अंग चोरून एकटेपण भोगणाऱ्या बाबाराव मुसळेंची पुस्तके मागवून, आवर्जून प्रकाशित करीत आहेत.
समाजातील काही जातींना परंपरेने मान मिळाला, काही जातींना स्वातंत्र्योत्तर काळात संख्याबळामुळे महत्त्व प्राप्त झाले. गठ्ठा मतांच्या आशेने राजकारण त्यांच्याकडे झुकले. पण अशाही अनेक जाती, उपजाती, पोटजाती आणि जमाती आणि समूह आहेत, ज्यांना अलीकडे-गेल्या वीसेक वर्षांत सामाजिक पटावर प्रतिष्ठा मिळू लागली आहे, सत्तेत सहभाग लाभत आहे. ज्या जातीमध्ये सतत समोरच्या दहा रांगा सोडून मागे बसण्याची वेळ येत होती, त्यांच्या जातीचा एक लेखक जर स्टेजवर मोठय़ा जातीतल्या मोठय़ा पुढाऱ्याच्या हस्ते बक्षीस घेत असेल तर जातबंधूंना कौतुकाचे भरते येणारच ना! आणि आपला फोटो आणि बातमी छापून आलेली वर्तमानपत्रांतली कात्रणे कापून, जपून ठेवत असेल आणि घरी आलेल्यांना दाखवत असेल तर त्याला हसण्याचे काहीही कारण नाही!
अलीकडे तरुण पिढीमध्ये, सुशिक्षित झाल्यानंतर, नोकरी मिळाल्यानंतर, शहरात घर बांधल्यानंतर आपला इतिहास, परंपरा, सणवार, रूढी विसरण्याची किंवा लपवण्याची पद्धत पडू पाहत आहे. साडेतीन टक्क्यांच्या भाषेचे, रीतीभातींचे, जीवनशैलीचे अनुकरण करणे म्हणजे सुशिक्षितपणा किंवा सुसंस्कृतपणा नव्हे, हे कोणीतरी या पिढीला सांगणे आवश्यक आहे. (आपलाही दुटप्पीपणा असा की, लालूप्रसाद यादव देहाती बिहारीत बोलले तर त्यांचे कौतुक करायचे आणि कोणाच्या बोलण्यात वऱ्हाडीतले दोन शब्द आले तर त्याला अडाणी समजायचे!)
जातींच्या संमेलनांमध्ये साहित्य भलेही थोडे असेल, पण आपल्या जातींची नव्याने ओळख होते. जातींच्या अंतर्गत काही समस्या असतील त्यावर समाजातील काही धुरीण शांतपणे तोडगा सुचवतात. इतर जाती पुढे का गेल्या, आपण मागे का राहिलो यावर चर्चा करतात. काही मुद्दय़ांवर तावातावाने भांडतात. या संमेलनात उपस्थित लेखकाला नवे भान येते, नवी जाण येते. या जातीमध्ये जर एखादे संत किंवा सत्पुरुष झाले असतील तर त्यांच्या तसबिरीच्या साक्षीने आणि संतवचनांच्या प्रकाशात पुढील वाटचालीबाबत विचारमंथन होते.
कोणी फूट पाडत नाही अन् कोणी वेगळा होत नाही. पण आपली वेगळी ओळख जाणवून देण्याचा आणि ती ठसविण्याचा प्रयत्न होत असतो; ज्याचा बाऊ करण्याचे कारण नाही.
मातंग समाजाने अण्णा भाऊ साठे यांना, चांभार समाजाने संत रविदास यांना, आदिवासींनी बिरसा मुंडा यांना आपापले ‘नायक’ म्हणून मानले. ही त्या त्या समाजाची मानसिक, भावनिक आणि वैचारिक गरज होती किंवा सद्यकालीन परिस्थितीत त्यांना असे करावेसे वाटले. याची कारणे जशी समाजशास्त्रीय आहेत, तशीच राजकीय आहेत आणि अस्तित्व दखलपात्र व्हावे या आकांक्षेशी निगडित आहेत.
मोठय़ा संमेलनांमधील गर्दीमध्ये गांभीर्यच गारद होते की काय, अशी शंका येते. सर्वाचाच समावेश करण्याच्या निकडीतून मोठय़ा संमेलनात एखादाच परिसंवाद आयोजित केला जातो आणि एकेका प्रवाहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एकेका वक्त्याला २० मिनिटे बोलायला मिळते. म्हणून ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलन, मुस्लीम मराठी साहित्य संमेलन, स्त्रियांचे लेखिका संमेलन, आदिवासी साहित्य संमेलन, दलित साहित्य संमेलन, ग्रामीण साहित्य, विवेकानंद साहित्य संमेलन, सावरकर साहित्य संमेलन, उपनगरी साहित्य संमेलन- अशी सगळी संमेलने ही साहित्य, साहित्यिक आणि साहित्य व्यवहार यासाठी पूरक आणि पोषकच ठरतात. अपेक्षा अशी आहे की, येथे खरोखरच वैचारिक घुसळण व्हावी. (ब्रेन स्टॉर्मिग?) तावातावाने मुद्दे मांडले जावेत. वितंडवाद का होईना, पण वाद होऊ देत. हमरीतुमरीवर आलात तरी चालेल. असे सांगण्याचे कारण हे की बरेचदा अशा संमेलनामध्ये ‘हो ला हो’- असा प्रकार असतो. बोटचेपेपणाची भूमिका सत्यशोधनाच्या मार्गातला अडथळा बनते. दुसऱ्या कोणी आपले दोष दाखवले तर किंवा टीका केली तर आपल्याला राग येतो. म्हणून बदल आतून व्हायला पाहिजेत. म. ज्योतिबा फुले आणि ‘सुधारक’कार आगरकरांचे लेखन आणि भूमिका या दृष्टीने अभ्यासण्यासारख्या आहेत.
या संमेलनांचा हेतू तेव्हा मात्र असफल होऊ शकतो, जेव्हा एखादे संमेलन राजकीय व सामाजिक स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी या संमेलनाचा उपयोग काही जण करू लागतील. पण अशा व्यक्ती वा प्रवत्ती प्रत्येक समाजात, प्रत्येक काळात असतातच. पण या गदारोळात एखादा विवेकाचा स्वरही असतोच. तो
संतुलन राखतो.
महापुरुष, महामानव, राष्ट्रपुरुष यांच्या नावाने संमेलने भरवली जातात किंवा जगातल्या वा इथल्या महापुरुषांच्या विचारधारेने शतकांना प्रभावित केलेले असते आणि साहित्य कला, अर्थशास्त्र, राजकीय विचार आणि सामाजिक चिंतन यांनाही प्रभावित केलेले असते. पण महापुरुषही काळाची निर्मिती असतात. ते महापुरुष असतात, म्हणून त्यांची प्रज्ञा आणि प्रतिभा काळाच्या पुढचा विचार करते आणि काही कालातीत विचार मांडते. काही विचार कोणत्याही काळात समकालीन वाटतात. पण सर्वच कालखंडात, सर्वच समस्या सोडविण्यासाठी एकच एक विचार उपयुक्त ठरेल, असे ठामपणे म्हणता येत नाही. म्हणून एकाच विचारसरणीच्या चौकटीत साहित्याची कलेची निर्मिती झाली पाहिजे. असा आग्रह धरणे म्हणजे लेखकावर बंधन आणि दडपण तसेच कलाकृतीच्या शक्यतांचा संकोच
करण्यासारखे आहे.
परवा मुस्लीम मराठी साहित्यासंबंधी एक पुस्तक वाचनात आले. त्यातले प्रतिपादन असे की, जो लेखक अल्लाह आणि इस्लाम यांच्यापासून जराही दूर जात असेल तर त्याच्या लेखनाला मुस्लीम मराठी साहित्यात स्थान नाही. मग एखादा लेखक निरीश्वरवादी किंवा धर्मनिरपेक्ष विचारसणीचा असेल तर त्याचे काय करायचे? त्याला मराठी लेखक तरी म्हण्ता येईल ना?
खरे तर सध्याची उलघाल आणि घालमेल यांनी भरलेली जगभरच्या आणि इथल्या मुस्लिमांची मनोवस्था ताकदीने पकडणारा लेखक एक श्रेष्ठ साहित्यकृती मराठीला देऊ शकेल. कलीम खान या कविमित्राच्या दोन ओळी अशा आहेत-
बाबरी मस्जिद असो वा जन्मभू पुरुषोत्तमाची
माझियासाठी अयोध्या आदराचे स्थान आहे
– अर्थात अनेक वलये विस्तारणाऱ्या या ओळींवरून कविमनाची भूमिका आणि अवस्था समजून घेणे हे एक आव्हानच आहे.
याच संदर्भातील कैफी आजमी यांची एक कविता मी वाचली आणि अवाक् झालो, गप्प झालो, सुन्न झालो.. कवितेमध्ये, बाबरी मशिदीच्या घटनेनंतर प्रभू रामचंद्र अयोध्येत येतात आणि शरयू नदीमध्ये पाय धुताना ते पाणी लाल दिसते आणि त्यांना सर्व काही कळून येते. अयोध्येत येण्याचा आग्रह धरणाऱ्या भक्तांना प्रभू रामचंद्र दु:खी होऊन सांगतात-
रौनके जन्नत जराभी नही आई रास मुझे
छह दिसम्बर को मिला दूसरा बनवास मुझे
संमेलनांची वर्तुळे
वेगवेगळ्या प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणारी संमेलने ही साहित्य, साहित्यिक आणि साहित्यव्यवहार यासाठी पूरक आणि पोषकच ठरतात. अपेक्षा अशी आहे की, येथे खरोखरच वैचारिक घुसळण व्हावी. तावातावाने मुद्दे मांडले जावेत.
First published on: 15-12-2013 at 01:01 IST
TOPICSमराठीMarathiमराठी पुस्तकMarathi Booksमराठी साहित्यMarathi Literatureसाहित्य संमेलनSahitya Sammelan
मराठीतील सर्व ऱ्हस्व आणि दीर्घ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahitya sammelan