ज्ञानपीठ पुरस्कारविजेते मल्याळी साहित्यिक तक़झी शिवशंकर पिल्लै यांचे सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरू असून, त्यानिमित्ताने या विलक्षण साहित्यकाराच्या वाङ्मयीन कारकीर्दीचा घेतलेला हा वेध..
मल्याळम भाषेतील प्रसिद्ध कथाकार तक़झी शिवशंकर पिल्लै हे सर्वत्र साहित्यिक म्हणून परिचित असले तरी ते स्वत:ला शेतकरी म्हणवून घेत. १९८४ चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आपली ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती. ते म्हणाले की, ‘मी कोणत्याही भाषेतील विद्वान नाही की एखाद्या विशिष्ट विषयाचा अभ्यासकही नाही. ज्याचं पालनपोषण केरळच्या कुट्टनाड क्षेत्रातील एका दूरच्या गावी झालं असा मी एक खेडवळ माणूस आहे. या गावी काही वर्षांंपूर्वी गाडी चालवण्यायोग्य रस्ता झाला म्हणून हे गाव संपर्कासाठी सुगम बनलं. मी कला, साहित्य, काव्यात्मक अनुभूती किंवा या प्रकारच्या इतर कोणत्याही विषयावर बोलणार नाही. मी फक्त आपल्या ५५ वर्षांतील साहित्यिक अनुभवांविषयीच बोलेन. त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करायला हवी. मी माझ्या जीवनाला साहित्यिकाचं जीवन संबोधणार नाही. परंपरेने मी एक शेतकरी आहे. आणि आजही शेतीच करतो आहे. जर तुम्ही माझ्या पायांकडे पाहिलंत तर त्यावर साफ न करता येणारे मातीचे डाग तुम्हाला दिसतील.’
शेतकरी म्हणून स्वत:ची अशी ओळख ज्ञानपीठाच्या व्यासपीठावरून करून देणारे तक़झी हे मल्याळम्मधील एक श्रेष्ठ साहित्यिक होते, हे कुणीही नाकारणार नाही. सामाजिक वास्तवाची पक्की जाण आणि संवेदनशीलतेने केलेली त्याची मांडणी ही त्यांच्या सृजनात्मकतेची ओळख आहे. तिरस्कृत, बहिष्कृत आणि वंचितांना ज्यांनी आपल्या लेखनामध्ये प्रमुख स्थान दिलं अशा मल्याळम् लेखकांमध्ये तक़झी हे अग्रगण्य होते. आपल्या साध्या, पण तीक्ष्ण गद्यशैलीने ते माणसाच्या मनाचा तळ गाठत असत. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांत त्यांच्या साहित्याचा परिचय करून घेणे उचित ठरेल असे वाटते.
तक़झी शिवशंकर पिल्लै यांची पहिली कथा ‘साधूकल’ (निर्धन) १९२९ मध्ये नायर सव्र्हिस सोसायटीच्या ‘सव्र्हिस’ या नियतकालिकात प्रकाशित झाली होती. ही कथा तक़झी यांनी वयाच्या १७ व्या वर्षी लिहिली होती. त्यावेळेपासून आयुष्याच्या अखेपर्यंतच्या दीर्घ सृजनयात्रेत तक़झी यांनी ३२ कादंबऱ्या आणि जवळजवळ ८०० कथा लिहिल्या. त्याशिवाय एक नाटक, तीन भागांत आत्मकथा आणि एक प्रवासवर्णनपर पुस्तकही त्यांच्या नावावर आहे. १७ एप्रिल १९१२ रोजी जन्मलेल्या तक़झी यांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या तक़झी या गावी आणि नंतरचे शिक्षण अम्बालापुष्प येथील माध्यमिक शाळेत झालं. कुरुवत्त येथील हायस्कूलमध्येच त्यांच्यातील साहित्यिक सृजनात्मकता प्रकटली. लेखनाचा श्रीगणेशा त्यांनी कवितालेखनाने केला. नंतर हायस्कूलमधील एका साहित्यिक अभिरुची असलेल्या अध्यापकांच्या- के. कुमार पिल्लै यांच्या सूचनेवरून तक़झी गद्यलेखनाकडे वळले आणि कथा लिहायला लागले.
कथेची प्रेरणा तक़झी यांना त्यांच्या बालपणातच मिळाली. दररोज संध्याकाळी त्यांचे वडील कुटुंबातील सर्वाना रामायण, महाभारत आणि पुराणांतील कथा ऐकवत असत. ‘एण्डे बाल्यकाल कथा’मध्ये त्यांनी लिहिलंय- एक गोष्ट नक्की, की त्यावेळी मी ज्या कथा ऐकल्या आणि वाचल्या, त्यांचा पुढे जाऊन माझ्यावर खूप प्रभाव पडला.
एका मल्याळम समीक्षकाच्या म्हणण्यानुसार, लेखनातील त्यांचं शिक्षण खूप काळ चाललं. त्यांच्या सुरुवातीच्या रचना याच शिक्षणाचा भाग होत्या. ते लेखनाची कला लिहिता लिहिता शिकले. पहिल्या टप्प्यातलं त्यांचं लेखन हे भविष्यातील त्यांच्या लेखनापेक्षा कितीतरी वेगळं होतं. त्यांचा पहिला कथासंग्रह ‘पुथुमलाट’ (नवा पुरुष) १९३५ मध्ये प्रकाशित झाला. त्यातील कथा बघितल्या तर तक़झी यांच्या कलात्मक दृष्टिकोनाची ओळख पटू शकते. ‘नाव आणि तारीख नसलेले पत्र’ ही कथा एका स्त्रीने आपल्या प्रियकराला आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेलं पत्र आहे. त्यांच्या १२ वर्षांच्या मुलाचं निधन झालेलं असतं. या कथेवर स्टीफन ज्वोग यांच्या ‘लास्ट लेटर’ची स्पष्टपणे छाप पडलेली आहे.
कथांबरोबरच तक़झी कादंबऱ्याही लिहू लागले होते. त्यांची पहिली प्रकाशित कादंबरी ‘प्रतिफलम्’ ही आहे. ती १९३४ मध्ये, तर ‘पतित पंकजम्’ त्याच्या पुढच्याच वर्षी प्रकाशित झाली. ‘प्रतिफलम्’ प्रकाशित होताच वादविषय बनली होती. त्यात एका मुलीची कथा आहे. ती आपल्या भावाच्या उच्च शिक्षणासाठी आपल्या देहाचा व्यापार मांडते. ‘पतित पंकजम्’ ही गुणवती या मुलीची कथा आहे. ती वयाच्या बाराव्या वर्षीच सामाजिक नैतिकतेच्या तथाकथित ठेकेदारांकडून वेश्याव्यवसायात ओढली जाते. ‘परमार्थमल’ ही दोन अनौरस मुलांच्या आईची कथा आहे. त्यातील एक मुलगा लग्नापूर्वी झालेल्या बलात्कारातून जन्म पावलेला असतो, तर दुसरा लग्नानंतर. या कादंबऱ्यांनी मध्यमवर्गीय मानसिकतेवर जोरदार प्रहार केला. या कादंबऱ्यांना मल्याळम् साहित्यामध्ये एका नवीन युगाचा प्रारंभ मानलं जातं.
त्यांच्या दुसऱ्या लेखन कालखंडातील प्रमुख साहित्यकृतींमध्ये ‘तोट्टिय़ूडे माकन’ (भंग्याचा पोर), ‘रंटिडंगझी’ (दोन शेर धान्य) आणि ‘तैंडीवर्गम’ (भिकारी लोक) या कादंबऱ्या विशेष गाजल्या. त्यातील ‘भंग्याचा पोर’मध्ये अलेप्पी शहरातील भंग्यांच्या दुर्दशेची कहाणी आहे. यातील नायकाने आपल्या वडिलांचे प्रेत त्याच्या डोळ्यासमोर कुत्र्यांनी खाल्लेले पाहिलेले आहे. आपल्या मुलाला- मोहनला तरी या बीभत्स जीवनातून मुक्ती मिळावी असं त्याच्यातील वडिलांना वाटतं. समाजाला संघटित केल्याशिवाय ही सुधारणा होणार नाही, हे त्यांच्या लक्षात येते. परंतु तेच आपण उभ्या केलेल्या या आंदोलनाला धोका देतात. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा लयास जाते. ते मोहनला शाळेत पाठवतात. मात्र, पुढे परिस्थितीसमोर हार मानून मोहनलाही तेच काम करावे लागते. हे वास्तववादी चित्रण इतकं इमानदारीने केलं गेलं होतं, की ते वाचकाला मूळापासून हादरवतं.
यानंतर तीन वर्षांनंतर ‘दोन शेर धान्य’ ही त्यांची कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीने तक़झी यांना मल्याळम्मधील अग्रणी कादंबरीकार म्हणून सुप्रतिष्ठित केलं. तक़झी यांच्याच शब्दांत सांगायचं तर त्यांनी जे जीवन भोगलं.. अनुभवलं, एका शेतकऱ्याच्या मुलाच्या रूपात ते जे दु:ख जगले, ते या कादंबरीतील अनुभवाशी खूप जवळचं असं आहे. तर ‘भिकारी लोक’ या कादंबरीत ज्यांना घरदार नाही, ज्यांच्याकडे पैसा नाही, कोणत्याही रीतिभातीशी ज्यांचा संबंध नाही अशा वर्गाचं हृदयद्रावक चित्रण केलं गेलं आहे. त्यांना होणाऱ्या मुलांनाही भिकाऱ्यांच्याच फौजेत सामील करून घेतलं जातं. या समस्येवर तक़झी यांनी नंतरही ‘त्यांच्या आठवणी’ (१९५५) या नावाची एक कादंबरी लिहिली.
तक़झी यांच्यावर त्याकाळी मार्क्सवादाचा खूप प्रभाव होता. ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना त्यांनी म्हटलंय की, ‘कृषीक्षेत्रामधील समस्या वर्गसिद्धान्ताच्या द्वारे मांडणारा मी भारतातील पहिला लेखक आहे असा मी दावा केला तर आपण मला क्षमा कराल.’
परंतु पुढे जाऊन तक़झी यांनी वास्तवाचा स्वीकार करताना आपले वैचारिक पूर्वग्रह सोडून दिले तेव्हा ते सृजनात्मकतेच्या एका उंचीवर सहज पोहोचले. ‘चेम्मीन’च्या (१९५५) प्रकाशनाबरोबर तक़झी यांच्या सृजनयात्रेचा तिसरा टप्पा सुरू होतो. आता तक़झी यांनी राजकारणाला वेगळं केलं होतं. त्याचा परिणाम असा झाला की, त्यांची संवेदना अधिक व्यापक आणि सखोल झाली. तसेच त्यांची सामाजिक आणि वैयक्तिक जीवनातील जटिलतेची समज वाढली. या संवेदनेतून निर्माण झालेलं साहित्य विषयवस्तू आणि कलात्मकता या दोन्ही बाबतीत वैचारिकतेत अडकलेल्या कथा-कादंबऱ्यांपेक्षा कितीतरी पुढे गेलं.
‘चेम्मीन’ ही केरळच्या समुद्रकिनाऱ्यावरील कोळ्यांच्या एका समुदायाची कहाणी आहे. ‘करुतम्मा’ ही त्या समुदायातील एक मुलगी परिकुट्टी या तरुण मत्स्यविक्रेत्याबरोबर प्रेम करते. समाजातील कडक रीतिरिवाजामुळे त्यांचे लग्न होऊ शकणार नाही याची दोघांनाही जाणीव आहे. पण ते एकमेकांपासून स्वत:ला वेगळं करू शकत नाही. ‘चेम्बन’ हे करुतम्माचे वडील आपला स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या या प्रेमप्रकरणाचा भरपूर लाभ उठवतात आणि आपल्या मुलीच्या मध्यस्थीने होडी खरेदी करण्यासाठी परिकुट्टीकडून पैसे उधार घेतात आणि बुडवतात. ते आपल्या मुलीचा विवाह पलानीशी लावून देतात. करुतम्माने हे वास्तव वरकरणी जरी स्वीकारलेलं असलं तरी ती मनातून परिकुट्टीवर प्रेम करीत राहते. पुढे ‘चेम्बन’ यांना कुरुतम्माचं लग्न परिकुट्टीशी लावून न दिल्याचं दु:ख होतं आणि त्यांना वेड लागतं. पलानीला आपली बायको अजूनही परिकुट्टीवर प्रेम करते हे समजतं. त्या दु:खात तो मान्सून सुरू असूनही होडी पाण्यात घालतो. तुफानात त्याची होडी उलटते. त्या रात्री करुतम्मा आणि परिकुट्टी गुप्तपणे भेटतात. भय आणि शंका यांच्यापासून मुक्त होत ते एकमेकांना मिठी मारतात. दोन दिवसानंतर लाटांबरोबर त्यांची एकमेकांच्या मिठीत पहुडलेली प्रेतं किनाऱ्यावर येतात.
‘चेम्मीन’ ही तक़झी यांची सगळ्यात गाजलेली कादंबरी. या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केले गेले. रामू यांनी त्यावर आधारित काढलेल्या चित्रपटालाही राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले. नि:संदेहपणे ही एक अत्यंत उत्कृष्ट अशी साहित्यकृती आहे.
त्यानंतरची त्यांची महत्त्वाची कादंबरी म्हणजे ‘कॅयर’! ही एका गावाची २५० वर्षांत घडलेली आठ पिढय़ांची कहाणी आहे. यात कुणी नायक-नायिका नाहीत. त्यात जवळजवळ एक हजार पात्रं आहेत. त्यांच्या माध्यमातूनच त्या गावाच्या जीवनयात्रेचं चित्रण केलं गेलं आहे. गाव हेच या कादंबरीत नायकाच्या रूपात आहे. हे गाव बदलत असतानाच जिवंत राहतं, विकसित होत राहतं, अन् रूपांतरितही होत राहतं. या कादंबरीतला प्रत्येक भाग सजीव होऊन वाचकांच्या डोळ्यासमोर उभा राहतो.
ही कथावस्तू उभी करण्यात तक़झी यांच्या शैलीचं मोठं योगदान आहे. जेव्हा चंगमपुष्पा कृष्णा पिल्लै यांनी तक़झी यांच्या कथांवर फ्रान्सच्या कथाकारांचा प्रभाव असल्याची टीका केली होती, तेव्हाही त्यांनी त्यांच्या शैलीची स्तुतीच केली होती. चंगमपुष्पा यांनी लिहिलं होतं- ‘तक़झी यांची शैली अतिशय सरळ आणि हृदयाचा ठाव घेणारी आहे. त्या शैलीची नक्कल करणं कुणाही कथाकाराला आवडेल.’ सुरुवातीपासूनच्या त्यांच्या लेखनाचं हे वैशिष्टय़ पुढे पुढे खूपच प्रभावी होत गेलं. हे त्यांचं वैशिष्टय़ त्यांच्या सर्व साहित्यावर प्रभाव टाकून आहे.
१० एप्रिल १९९९ रोजी तक़झी शिवशंकर पिल्लै यांचं निधन झालं. आणि मल्याळम्मधील एका प्रतिभावान, संवेदनशील साहित्यकास रसिक वाचक मुकले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा