‘माऊली प्रॉडक्शन्स’च्या ‘पेइंग गेस्ट’ या नाटकात अरुणने काम केले होते. त्याचा हा अनुभव खूप चांगला होता. त्याचदरम्यान मी एक नवे नाटक लिहिले होते. अगदी स्वतंत्र. मला नेहमी विचारण्यात येतं, ‘का हो? तुम्हाला एवढं सगळं आठवतं कसं?’ आता ते मी काय सांगू? आकडे, तारखा, सन आणि वार सोडले, तर मला माझ्या कलाकारकीर्दीचा तपशील स्पष्ट आठवतो, हे खरं. गतकाळात घडलेल्या कित्येक घटना स्फटिकाप्रमाणे स्वच्छ दिसतात.. पण हे नवे नाटक म्हणाल, तर ते मला कधी, कसे सुचले- ते मी कधी, कसे लिहिले- काही काही आठवत नाही. पाटी कोरी आहे. आठवतं ते हे, की माझ्या पुढय़ात एका संपूर्ण नाटकाचं बाड अवतरलं होतं. ते दुसऱ्या कुणी लिहिलं असेल म्हणावं, तर नाटकामधल्या वाक्या-वाक्यावर माझी मोहोर होती. मग मी ते झोपेत लिहिलं की काय? असेल.
‘हे तुझं नाटक तू ‘माऊली’ला दे..’ अरुण मला म्हणाला- ‘ते त्याला निश्चित न्याय देतील.’ मग उदय धुरतला तो म्हणाला, ‘सईकडे एक नवीन नाटक आहे. अगदी कोरं. तुमच्या बॅनरखाली ते झकास फुलेल.’ त्याची मध्यस्थी सफल झाली. उदय आणि मी भेटलो. मला त्यांची टीम आवडली, आणि त्यांना माझी संहिता भावली. बोलणी झाली. करार ठरला.
नाटकाची कथा तशी सरळ, साधी, घरगुती होती. दोन शेजारी (पुन्हा शेजारी!) कुटुंबे. दोन्ही घरांत आपण एकाच वेळी डोकावतो. मधली भिंत अर्थातच अदृश्य आहे. गुर्जर कुटुंब आधुनिक, जरा उच्च स्तरात वावरणारे आहे; तर अग्निहोत्री परिवार आहे सुसंस्कृत मध्यमवर्गीय. दोन्ही घरांत सत्तरीच्या घरातले एकेक आजोबा आहेत. कर्नल अंबानाथ (आबा) गुर्जर ऐटबाज आहेत. इस्त्रीचे चुस्त कपडे घालणारे. पाईप ओढणारे आणि संध्याकाळी एक ‘छोटा’ घेणारे. नाना अग्निहोत्री अगदी साधे आहेत. ज्ञानेश्वरीची पारायणे करणारे. त्यांचा मिश्किलपणा त्यांच्या संवादामधून सतत डोकावत राहतो. आबा आणि नानांची घनदाट दोस्ती आहे. ते एकमेकांची सतत टिंगल करतात; पण आपली सुखदु:खेही तितक्याच मोकळेपणाने एकमेकांना सांगतात. आबांची नात मिथिला- मिठ्ठू आणि नानांचा नातू रवी यांची खास दोस्ती आहे. पण नित्याची भांडणे, कुरबुरी, रुसवेफुगवे आणि वादावादी यामुळे दोघांना आपल्या सुप्त प्रेमाची अजून जाण झालेली नाही. रवी चित्रकार आहे. नुकताच जे. जे.चा डिप्लोमा घेऊन बाहेर पडला आहे. त्याला नोकरी करायची नाहीए. मिठ्ठू फ्रेंच शिकते आहे. तिच्या ‘अतिविशाल’ ममीला दोन्ही पोरांची दोस्ती मुळीच पसंत नसते. तिचा नवरा एका कंपनीत उच्च अधिकारी, तर मोठा जावई अमेरिकेत उद्योजक असतो. तेव्हा मिठ्ठूला तसंच तोलाचं स्थळ मिळालं पाहिजे असा तिचा निग्रह असतो. या गोष्टीमधली ‘किंचित खलनायिका’ तीच आहे असं म्हणता येईल. मिठ्ठूला स्थळं पाह्य़ला लागल्यावर तिला आणि रवीला त्यांच्या प्रेमाची जाणीव होते. ते हताश होतात. पण दोघे आजोबा घट्टपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतात. रवी-मिठ्ठूच्या प्रेमसंघर्षांचे युद्धपातळीवरून ते सारथ्य करतात. अखेर रवीच्या प्रदर्शनाची प्रचंड तारीफ होते. त्याच्या चित्रांना एका कॉर्पोरेटकडून मोठा आश्रय मिळतो आणि एक ‘उभरता सितारा’ म्हणून त्याची वाहवा होते. ममीचा विरोध वितळतो आणि शेवट गोड होतो.
नाटकाला अद्याप नाव दिले नव्हते. एक अतिशय चांगला मथळा सुचला.. नाटय़विषयाला अतिशय समर्पक असा : ‘सोयरीक’! पण एक अडचण होती. याच नावाचे आईने लिहिलेले एक नाटक होते. ती फ्रान्समध्ये असताना ‘La Poudre aux yeux’ (‘डोळ्यात धूळफेक’) या नाटकाचे भाषांतर करून तिने ते छापले होते. आईला माझी समस्या सांगताच ती हसली आणि म्हणाली, ‘मायलेकींना एकच नाव आवडावं? काय एकेका शब्दाचं नशीब असतं पाहा. खुशाल ठेव तू आपल्या नाटकाचं नाव हे- ‘सोयरीक’!’
डॉ. काशिनाथ घाणेकरांच्या हस्ते ‘सोयरीक’चा शुभमुहूर्त झाला. माझ्यासाठी हे नाटक खऱ्या अर्थाने कौटुंबिक ठरलं. त्यात अरुण- जरी तत्त्वत: आता आम्ही एकत्र नव्हतो, आणि माझी मुलगी विनी- दोघेही भूमिका करणार होते. पात्रयोजना ठरली. कर्नल आबा गुर्जर- अरुण जोगळेकर, नाना अग्निहोत्री- रमाकांत देशपांडे (पु. लं.चे धाकटे बंधू), मिठ्ठू-विनी, रवी- नितीश भारद्वाज, मिठ्ठूची ममी- स्मिता साठे, पपा- बाळ बापट, आणि रवीची आई बाबीताई- शालिनी सावंत.. अशी कलाकारांची नियुक्ती झाली. रमाकांत देशपांडे यांचा चेहरा खूप बोलका होता. त्यांचे घारे डोळे सतत लुकलुकत असत. दुर्दैवाने त्यांचे पाठांतर मात्र कमजोर होते. अभिनयाच्या ताकदीवर ते वेळ मारून नेत. त्यांचे आणि अरुणचे प्रवेश तालमीपासूनच खूप रंगत असत. कर्नल गुर्जरांना एक अजब छंद असतो. टेलिफोन डिरेक्टरी वाचण्याचा. दुर्दैवाने या डिरेक्टऱ्या आता काळाच्या उदरात गडप झाल्या आहेत. पण ज्या कोणी ते जाडजूड ग्रंथ पेलले आहेत, त्यांना आबांच्या छंदाचे मर्म कळेल.
एक छोटा प्रसंग :
(आबांच्या हातात ग्रंथराज आहे. ते गालातल्या गालात हसताहेत. वाचनात तल्लीन. नाना दारात उभे.)
नाना : काय रे? काय वाचतोयस एवढं? खुदुखुदु हसतो आहेस, तेव्हा धार्मिक ग्रंथ निश्चित नाही.
आबा : This is the most fascinating book in the world.
नाना : मोस्ट फॅसिनेटिंग बुक म्हणजे ज्ञानेश्वरी. ‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी..’ पण तू कुठला ज्ञानेश्वरी वाचणार?.. नॉनव्हेजिटेरिअन असणार काहीतरी-
आबा : आता आपले नॉनव्हेजिटेरिअन का दिवस उरले आहेत नाना?.. शुद्ध, सात्त्विक, शाकाहारी पुस्तक आहे. टेलिफोन डिरेक्टरी. मुंबईची.
नाना : आं? कुणाचा नंबर शोधतोयस?
आबा : नंबर नाही शोधत- मुंबईचं अंतरंग शोधतोय.. फार मजेदार स्टडी आहे नाना. अति मनोरंजक. एकदा हातात धरली की खाली ठेववत नाही. खून नाहीत, मारामाऱ्या नाहीत, पांचटपणा नाही-
नाना : अरे, सहस्रनामावलीच वाचायची, तर निदान पुण्यप्राप्तीची तरी काही सोय पाह्य़चीस.
आबा : पुण्य तू कमव नाना.. मला सापडला आहे सामान्यज्ञानाचा ठेवा.. आता मुंबईत जोशी किती असतील सांग-
नाना : आता.. म्हणजे.. आपल्याच ब्लॉकमध्ये तीन जोशी आहेत.
आबा : अरे, २२,००० जोशी आहेत डिरेक्टरीत. म्हणजे फोनवाले-
नाना : कमाले ! डिरेक्टरी वाचायची कल्पना कधी शिवलीच नाही बुवा आपल्याला.
आबा : आणि काय अद्भुत आडनावं रे एकेक.. दहिभाते, कुटमुटिया, जवळघेकर, ताकाखाऊ, खबरदार, वळवळकर, मारफाटिया- हे बघ.
नाना : तू अगदी शब्दन् शब्द वाचतोस? आपलं- नाव न् नाव?
आबा : टु बी ऑनेस्ट, अधूनमधून चीट करतो. उदाहरणार्थ शहा. वैताग! ५६ पानं शहा रे. शहाच शहा. शहांचा महापूर.. मग मी काय केलं ठाऊके? अधूनमधून काही शहा वगळत गेलो.
नाना : अशी शहानिशा केलीस तर तू शहांची!
रवी-मिठ्ठूची जोडी रंगभूमीला नवी होती. दोघांच्यात एक ताजेपणा आणि मोहक निरागसपणा होता. नितीशचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि देखणे रूप प्रथमदर्शनीच प्रेक्षकांची पकड घेत असे. पुढे त्याने चित्रपट आणि टी.व्ही.मध्ये नट म्हणून खूप नाव कमावले. त्याच्या महाभारतामधल्या श्रीकृष्णाला मिळालेली लोकप्रियता अभूतपूर्व होती. अलीकडेच तनुजाला घेऊन ‘पितृऋण’ हा आशयघन चित्रपट त्याने दिग्दर्शित केला.
‘सोयरीक’च्या तालमीमधला नवशिका नितीश अतिशय मनमिळाऊ आणि शिस्तीला चोख होता. तिसऱ्या दिवशीच त्याची स्वत:ची संपूर्ण नक्कल पाठ झाली आणि मग दोन दिवसांनंतर इतर सर्वच पात्रांचे संवाद त्याला मुखोद्गत झाले. पण या प्रकाराची मदत होण्याऐवजी घोटाळेच होऊ लागले. कुणी तालमीत अडले, की पट्कन तो संवाद सांगायचा. यामुळे रमाकांत देशपांडे जरा नाराज होत असत. शिवाय तो इतरांचे संवाद तोंडातल्या तोंडात पुटपुटत असे. त्यामुळे त्याचे ओठ हलत. मग मी रागवू लागले, ‘अरे, हे काय लहान मुलासारखं? दुसरं पात्र काय बोलणार हे तुला आधीच कळलं तर नाटकात ‘नाटय़’ काय उरलं? आपण यांत्रिक कवायत करतो आहोत का? तू तुझ्या पात्रावर लक्ष केंद्रित कर बघू.’ नितीशला अर्थातच हे पटले आणि त्याचे अनाहूत ‘प्रॉम्प्टिंग’ थांबले.
रवी-मिठ्ठूचे सगळेच प्रवेश अतिशय वेधक होत. त्यांची कुरबूर, रुसवेफुगवे, भांडणानंतरची दिलजमाई, प्रेमाराधन.. सगळाच प्रकार लडिवाळ वाटे. नाटकाची सुरुवात होते तेव्हा रवी मिठ्ठूचे पोट्र्रेट काढतो आहे. चित्रकाराच्या लाकडी घोडय़ावर (ईझल) कागद चढवून. बाजूला नाना (रवीचे आजोबा) ज्ञानेश्वरी वाचताहेत.
मिठ्ठू : अय्योऽऽ मान अवघडली माझी. क्रॅम्प आलाय्..
रवी : श्श्. बोलू नकोस.. कान्ट यू कीप स्टिल?
मिठ्ठू : श्वास घेतला तर चालेल ना?.. तुला काय? पाठ धरलीय माझी.. आई गऽऽ
रवी : आताच मान अवघडलीय म्हणालीस. नीट काय ते ठरव.
मिठ्ठू : सगळीच अवघडलीय मी.
नाना : पोर्टेट काढून घ्यायचं म्हणजे तपश्चर्या करावी लागते मिठ्ठूबाई. त्यातून तुमचं चित्र प्रदर्शनात झळकणार-
मिठ्ठू : हं! कौतुक झालं तर रवीचं होणार.. मला काय? (बाबीताई चहा घेऊन येतात.)
बाबीताई : चहा घेणार का रे पोरांनो?
रवी : नाही. मी कामात आहे.
बाबीताई : मिठ्ठू तू?
मिठ्ठू : भलतंच मावशी.. मला पापणी हलवायचीसुद्धा परवानगी नाहीये.
नाना : (चहाचा कप घेतात.) आज ऑफिसला उशीर नाही झाला?
बाबीताई : झालाय थोडासा. मेल्या स्टोव्हची सवय गेलीय पार.. गॅस संपला नेमका.. निघतेच दहा मिनिटांत.
नाना : किती धांदल तुझी.. (सूचक) सून आली हाताखाली, की आराम मिळेल हो तुला.
बाबीताई (हसून) : सून? याला कोण मुलगी देणार? वर्ष होईल जे. जे.चा डिप्लोमा करून.. अजून नोकरीचा पत्ता नाही-
रवी : कारण मला नोकरी करायची इच्छा नाही.. मी काय बसून आहे का? चार असाइनमेंट्स केली की धडाधड..
नाना : तू मार रे भराऱ्या. हेच वय आहे तुझं.. चांगलं नाव कमव.. नोकरी काय, सगळं जग करतं.
मिठ्ठू : नाना, भराऱ्या मारायला जरा तरी स्पीड हवा ना? रवी एक नंबरचा चेंगट आहे. तीन दिवस झाले- ब्रश तिथल्या तिथे गिरवतो आहे.
रवी : या चित्राला वेळ लागतोय, कारण मॉडेलचं सहकार्य नाही. स्वत:चं चित्र काढून घ्यायची हौस दांडगी; पण कोऑपरेशन झीरो. सारखी वळवळत असते-
बाबीताई : फोटोवरून काढ की!
रवी : फोटो निर्जीव असतो आई.. त्यात काय कौशल्य? जिवंत सब्जेक्ट पकडण्यात खरं थ्रिल आहे.
मिठ्ठू : नाना पाहा नं- जिवंत सब्जेक्टला जिवंतपणा करू देत नाही.. हलायचं नाही, बोलायचं नाही..ते काही नाही, हे माझं शेवटचं सीटिंग.
रवी : पाहिलंत नाना? स्वत:ला मोनालिसा समजते-
नाटकाच्या तालमी जुहूला समुद्रकाठी एका छोटय़ा बंगलीत होत असत. गोव्याची आठवण करून देणारं हे घरकुल विनीच्या एका मैत्रिणीचं होतं. सगळे कलाकार गुणी आणि मेहनती असल्यामुळे नाटक लवकर बसलं. रंगीत तालीम बिर्ला क्रीडा केंद्रामध्ये झाली.
उदय धुरतला मी केव्हातरी व्यवहारासंबंधात पत्र लिहिले होते. खाली माझी फर्राटेबाज सही होती. उदयने गुपचूप त्या सहीचा छानपैकी ब्लॉक करून घेतला. वर्तमानपत्रांत आमची पहिली जाहिरात झळकली तेव्हा मला आश्चर्याचा गोड धक्का बसला. लेखिका-दिग्दर्शिका-नेपथ्यकार या मायन्याखाली माझी सही! माझ्या सहीचा तो पहिला अवतार. तेव्हापासून मी माझ्या कोणत्याही कलाकृतीसाठी ही सही वापरते. नाटक असो, चित्रपट असो, टी. व्ही. मालिका असो, वा ‘सय’ असो! या सहीचे श्रेय उदयला जाते.
‘सोयरीक’चा पहिला प्रयोग ११ जुलै १९८४ ला शिवाजी नाटय़मंदिरात झाला. हॉल तुडुंब भरला होता. प्रेक्षकांनी पसंतीची जोरदार दाद दिली. रवी-मिठ्ठू प्रेमप्रकरणाला लाभलेला नाना-आबांचा गनिमी पाठिंबा सगळ्यांना विशेष रुचला. अरुण आणि रमाकांत खुणेच्या शिट्टय़ा वाजवून एकमेकांना सावध करतात तो प्रवेश खरोखरच बहारदार होई. लोकांच्या बळकट प्रतिसादाने उदयला कृतार्थ वाटले. जरासुद्धा कसर न ठेवता ‘माऊली’ने नाटकाचे धडाधड प्रयोग लावले.
आनंदाची गोष्ट म्हणजे ‘सोयरीक’ला त्यावर्षीचा नाटय़दर्पणचा ‘सवरेत्कृष्ट नाटय़निर्मिती’चा प्रथम पुरस्कार जाहीर झाला. सगळ्यांच्या श्रमांचे चीज झाले. नाटकाचे १०० प्रयोग झाले, आणि मग कुणाचीतरी दृष्ट लागली. दिल्लीला काही महत्त्वाची जबाबदारी उद्भवल्यामुळे नितीशला नाटक सोडावे लागले. रवीच्या रोलसाठी उदयने चार-पाच उमेदवार आणले; पण मामला एकूण निराशाजनकच ठरला. अखेरीस एका कलाकाराची निवड करून प्रयोग चालू ठेवले. या नव्या नटाने प्रयत्नांची शिकस्त केली, पण तो ‘बदली कलाकार’च राहिला. नाटकाची भरारी मंदावली. हवा कमी झालेला गॅसचा फुगा जसा हवेत तिथल्या तिथेच गिरक्या घेतो, तद्वत नाटकाची स्थिती झाली. सगळे धीराने काम रेटत होते, पण आणखी एक विघ्न (नाटकाच्या दृष्टीने) उभे राहिले. विनीला नाटय़शिक्षणासाठी फ्रेंच सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. आर्यान मुश्किन या सुप्रसिद्ध दिग्दर्शिकेच्या ‘ल तेआत्र द्यु सोलय’ या संस्थेत निरीक्षक म्हणून तिला प्रवेश मिळाला.. एका वर्षांसाठी.
आता मिठ्ठूसाठी नवी नायिका उभी करण्याची पाळी येऊन ठेपली. उदयने नाव असलेली एक वजनदार अभिनेत्री आणली- ऊर्मिला मातोंडकर. ऊर्मिला निश्चितच प्रतिभासंपन्न होती आणि हाती आलेल्या भूमिकेला न्याय द्यायचा तिने आटोकाट प्रयत्न केला. पण मला वाटतं, तिची खरी ओढ चंदेरी पडद्याकडे होती. नाटक हा मधला एक विश्रांतीचा थांबा होता. पुढे हिंदी सिनेसृष्टीची एक प्रथम श्रेणीची नायिका म्हणून तिने नाव कमावले.
१५० प्रयोग होईपर्यंत नाटकावर अखेरचा पडदा पडला. ‘माऊली प्रॉडक्शन्स’च्या छत्राखाली केलेले ‘सोयरीक’ ही माझ्या मर्मबंधातली ठेव म्हणता येईल.